रानाबरोबरच करपलं मन...

राजेभाऊ मोगल
सोमवार, 13 मे 2019

पाण्यासाठी...
 

अडचणीत आणखी भर पडली, की ‘दुष्काळात तेरावा महिना’ आला, असे म्हटले जाते. मात्र, इथे तर तेरावाच नव्हे, तर तेरा दुनी सव्विसाव्या महिन्याच्या पुढे स्थिती गेली आहे. शेती तर पिकलीच नाही. उलट कर्ज घेऊन पेरलेल्या बियाणाचा मुद्दल खर्चही न निघाल्याने त्याची परतफेड पुन्हा कर्ज घेऊन करावी लागली. दु:ख एवढ्यावरच थांबले, तर ते दुःख कसले? भाकरीसाठी धान्याची शोधाशोध, भाकर मिळाली तरी तिच्याबरोबर लागणाऱ्या पाण्यासाठी भटकंती, आपल्याला पाणी मिळाले, मग ज्यांच्या जिवावर शेती कसतो, त्या मुक्‍या जनावरांच्या पाण्याचे काय, असे अनेक अस्वस्थ करणारे सवाल सध्या मराठवाड्यातल्या गावगाड्यासमोर उभे आहेत.

ताठ कणा आणि स्वाभिमानी बाणा असलेल्या मराठवाड्याचा मागील काही वर्षांपासून आता टॅंकरवाडा झाला आहे. लांब धाग्याचा कापूस उत्पादन करणारा हाच मराठवाडा मागील वर्षी बोंडअळीमुळे मोठा अडचणीत सापडला. ‘पांढरं सोनं’ म्हणत मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. मात्र, आता त्याची कितपत लागवड होईल, हे सांगता येत नाही. एप्रिल-मे २०१८ मध्ये हवामान विभागाने यंदा वेळेत आणि चांगला पाऊस पडणार, असा अंदाज व्यक्‍त केला. मोठ्या आशेने भर उन्हाळ्यात शेतीची मशागत करून ठेवली. पहिला पाऊस पडताच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीही करून टाकली. मात्र, नंतर पावसाने दगा दिला आणि पिके करपून गेली. खरिपापाठोपाठ रब्बीचीदेखील तशीच अवस्था झाली. यामुळे आता वर्षभर काय खायचे, घर कसे चालवायचे, या चिंतांनी शेतकऱ्यांची अवस्था वाईट करून टाकली. सध्या तर जमीन तापलेली, हाताला काम नाही, गावात पिण्यास पाणी नाही, जनावरांसाठी चारा-पाणी नाही, अशी अनेक संकटे उभी आहेत. पाण्यासाठी टॅंकरकडे डोळे लागून राहतात. शेतीचे सोडा, इथे दोन मे रोजी शासनाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार मराठवाड्यातील दोन हजार ६५७ गाव-वाड्यांवरील ४२ लाख ६४ हजार ६०५ ग्रामस्थांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यावरूनच या भयाण परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो. यामुळे घराघरांतील मुले-मुली शहराकडे कामाच्या शोधात घराबाहेर पडत आहेत. 

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्‍यातील मंगरूळ येथील अकरावीची परीक्षा दिलेल्या मनोजने थेट पुणे गाठले. घरातील चुलते तिकडे असल्याने मिळेल ते काम करून आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी रवाना झाला आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे अनेक मनोज शहराच्या दिशेने कामाच्या शोधात घर सोडत आहेत. शेतात राबराब राबून पोटच भरत नसेल, तर शेती का व कशासाठी करायची, असा परिस्थितीची दाहकता दाखविणारा प्रश्‍न परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्‍यातील कुंभारी येथील अनेक जण उपस्थित करीत आहेत. जगवणाराच परिस्थितीने असा हताश होत आहे. भविष्यात परिस्थिती बदलली तर ठीक आहे, अन्यथा आता आपण काय खायचे, असे प्रश्‍न असंख्य जणांसमोर असतील. मराठवाड्यात भूजल पातळी मोठ्या वेगाने खालावत चालली आहे. ७६ पैकी ७१ तालुक्‍यांतील चित्र गंभीर आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍याची स्थिती तर फारच भयंकर असून येथील जनतेसमोर पाण्याचे दुर्भिक्ष हे नवे मोठे संकट उभे राहिले आहे. वाशी तालुक्‍यातील पाण्याची पातळी सर्वाधिक कमी म्हणजे मागील पाच वर्षांच्या तुलनेत ६.१४ मीटरने घटली आहे. मराठवाड्यातील प्रमुख असलेल्या गोदावरी, पूर्णा, मांजरा, सीना, भीमा, पैनगंगा या नदीपात्रांची अवस्थादेखील वाईट आहे. आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सरकारी यंत्रणा सोडवू शकली नाही. यामुळे सिंचनासाठी काय काम होत असेल, याचा अंदाज लावता येतो. मराठवाड्यातील या संकटास लहरी निसर्गाबरोबरच, सरकारी यंत्रणा; तसेच लोकप्रतिनिधींचे याकडे झालेले दुर्लक्षच कारणीभूत ठरत आहे. काही ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या. मात्र, त्याठिकाणी नाश्‍ता म्हणावा असाच चारा दिला जात आहे. अशा छावण्यांवर जगणारी जनावरे अंगात कस नसल्याने लगेच शेतात कामाला जुंपता येत नाहीत. 

एकीकडे प्रत्येक गोष्टींत लोकांना शुद्धता हवी आहे, तर दुसरीकडे अन्नदात्यांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. बीड जिल्ह्यातील खिळद येथे दहा दिवसांनी एकदाच टॅंकर येतो. ‘त्यात सगळे गढूळच पाणी असते, काय करावे सांगा? नाही प्यावे तर तहान कशी भागवायची आणि प्यावे तर उद्या काही आजार झाला, तर उपचार कुठे घ्यायचे,’ असे जळजळीत वास्तव प्रयागाबाई गर्जे यांनी मांडले. त्याला जोडूनच पाणी भरून महिलांना मणक्‍याचे, कमरेचे आजार जडत असल्याचेही त्यांनी सांगितले. अशी विदारक परिस्थिती असलेल्या मराठवाड्याचे उद्याचे चित्र कसे असेल, याचा विचार करणेदेखील वेदनादायीच, म्हणावे लागेल. 

संबंधित बातम्या