भीषण, भयावह दृश्‍य

रूपेश कदम
सोमवार, 13 मे 2019

पाण्यासाठी...
 

रखरखते ऊन, उजाड, ओसाड माळरान, भकास डोंगर, कुठेतरी सावली मिळतेय का हे शोधणारे गुराखी, मेंढपाळ व पाण्यासाठी भटकंती करणारी माणसे... हे अतिशय भीषण व भयावह दृश्‍य; सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांमधील आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांसह फलटण, खंडाळा, कोरेगाव, कऱ्हाड एवढेच नव्हे; तर पाटण, जावळी या भागातील काही गावांनाही यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २००३-०४ च्या दुष्काळापेक्षाही यंदा भयावह परिस्थिती आहे. 

निसर्गाची टोकाची दोन रूपे पाहायला मिळणारा जिल्हा म्हणजेच सातारा जिल्हा होय. एकीकडे ३५०० मिमी पाऊस पडणारे महाबळेश्‍वर, तर दुसरीकडे सरासरी ३५० मिमी पाऊस पडणारा माण तालुका; यावर्षी तेवढाही पडला नाही. पश्‍चिमेकडे आल्हाददायक वातावरण, तर पूर्वेकडे रखरखीत ऊन. एकीकडे वर्षभर खळाळणाऱ्या कृष्णा-कोयना नद्या, तर दुसरीकडे नेहमी कोरड्या येरळा-माणगंगा नद्या. पश्‍चिमेकडे उसाची हिरवीगार शेते, तर पूर्वेकडे पाण्याअभावी करपलेल्या डाळिंब बागा. 

यावर्षी दुष्काळी तालुक्‍यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. माणसांना प्यायला पाणी उपलब्ध होणे अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी डोक्‍यावर हंडा घेऊन मैलो न्‌ मैल भटकंती करावी लागत आहे. ते करूनही पाणी मिळेलच याची शाश्‍वती उरली नाही. शासकीय टॅंकर सुरू असणाऱ्या ठिकाणी ते वेळेवर येतीलच याची खात्री नाही. विविध समस्यांमुळे टॅंकरची तास न्‌ तास प्रतीक्षा नेहमीचीच झाली आहे. शासकीय नियमांप्रमाणे मिळणाऱ्या पाण्यावर जगणे कठीण झाले आहे. उपलब्ध पाण्यावर जनावरांची तहान भागणे शक्‍य होत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांची तडफड सुरू आहे. शेतकऱ्यांना जनावरांचे हाल बघवेनासे झाले आहेत. ती जगवणे अथवा ती विकून मोकळे होणे हे दोनच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत. पाण्याअभावी शेती पिकलीच नसल्यामुळे चारा निर्माण झाला नाही. त्यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची चणचण भासत आहे. पाणी व चाऱ्याअभावी जनावरे जगवावी कशी, हा गहन प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. जनावरांची अवस्था बघून जीव गलबलून जातो. आता कुठे चाराछावण्या सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. 

जिवापाड जपलेल्या डाळिंब, द्राक्ष, सीताफळ यांच्या बागा पाण्याअभावी जळून चाललेल्या पाहताना शेतकऱ्यांचा जीव कळवळतो. बागा जळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. एक वर्षाचा दुष्काळ शेतकऱ्यांना तीन-चार वर्षे मागे घेऊन जातो.

पाण्याच्या टंचाईमुळे यंदा गावोगावच्या यात्रा-जत्रा म्हणाव्या तशा गजबजल्या नाहीत. चाकरमानी मंडळी आल्यापावली माघारी वळली. शहरातील पाण्याची चंगळ गावात नसल्यामुळे गावकऱ्यांना आहे त्या परिस्थितीत सोडून चाकरमान्यांनी शहराला जवळ केले. गावकऱ्यांना मात्र आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही. यावर्षी वळीव दिलासा देईल, अशी अपेक्षा होती; पण अनेक ठिकाणी वळीव बरसलाच नाही. तर जिथे वळीव पडला तिथे थोडासाच पडला. पाऊस वेळेवर येईल याची खात्री नाही. त्यामुळे ही बिकट परिस्थिती अजून किती दिवस राहील हे सांगता येत नाही. दिवसागणिक उपलब्ध पाणी संपत चालले आहे. पाण्याची मागणी मात्र झपाट्याने वाढत आहे. 

तीव्र पाणीटंचाईला तोंड देताना प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे. कारण यापुढे पाणी मिळविण्यासाठी सामान्य जनता हातघाईवर येऊ शकते. दुष्काळी जनतेची ही परवड, होरपळ कधीतरी थांबवा अशी आर्त साद दुष्काळी जनता घालत आहे. 

संबंधित बातम्या