कोरडे बंधारे, खोल विहिरी... 

संतोष शेंडकर
सोमवार, 13 मे 2019

पाण्यासाठी...
 

पुणे जिल्ह्याचा खरीप निम्मा वाया गेला आणि रब्बी तर जवळजवळ पूर्णच हातचा गेला. आटलेल्या नद्या, घुटकीवर आलेली धरणे, कोरडेठाण बंधारे आणि खोल खोल गेलेल्या विहिरी हेच जिल्ह्याचे भीषण चित्र आहे. आता तर जनावरांना चारा नाही आणि माणसांना प्यायला पाणी नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात टॅंकरची संख्या बघता बघता १६३ वर पोचली असून ती २३३ वर जाईल असा अंदाज आहे.       

पुणे जिल्ह्यात प्रशासनाने आंबेगाव, शिरूर, वेल्हा, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर या सात तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, ११ तालुक्‍यांत दुष्काळाची तीव्रता पोचली आहे. सध्या ११ तालुक्‍यांतील ८९ गावे आणि ८६० वाड्यावस्त्यांमध्ये पावणेतीन लाख लोकांना १६३ टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जात आहे. हा आकडा वाढत जाणार असल्याचे जिल्हा पाणीपुरवठा विभागाचा टंचाई आराखडा सांगतो. विशेषतः बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर या चार तालुक्‍यांत सरासरीच्या ४० टक्केच पाऊस पडल्याने गेले सहा-सात महिने अवस्था दयनीय आहे. अवकाळी का होईना पण पाऊस कोसळावा, या आशेवर लोक आहेत. जिल्ह्यात बारामतीत सर्वाधिक ३७ टॅंकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ इंदापूर, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी २१ टॅंकर सुरू आहेत. ही परिस्थिती पुरेशी बोलकी आहे. दिवसभर महिला आणि मुलांसाठी ‘पाणी’ हे एकमेव काम झाले आहे. रस्त्याच्या कडेला कळशी, हंडे यासह केंडांची आणि टाक्‍यांची तुफान गर्दी असते. टॅंकर आला, की भांड्यांपेक्षा माणसांचीच गर्दी वाढत आहे. शासनाच्या टॅंकरचे प्रतिमाणशी २० लिटर पाणीही पुरत नाही. जनावरांसाठी, शाळांसाठी तर टॅंकरची तरतूदच नाही. यामुळे जिल्ह्यात आश्रमशाळा, निवासी शाळा लवकर बंद कराव्या लागल्या आणि जिल्हा परिषद शाळांतील मुलांना अघोषित सुट्या देण्यात आल्या. आजही शहरांमध्ये आणि कालव्याच्या पट्ट्यात तीव्र दुष्काळातही गाड्या धुवायला ५०-१०० लिटर पाण्याचा चुराडा केला जात आहे. परंतु, जिराईत भागातील लोक एक एक लिटरसाठी भांडाभांडी करत आहेत, हे त्यांच्या गावीही नाही. पुण्यात व्हॉल्वची दुरुस्ती करायला ४० लाख लिटर पाणी वाया गेल्याची बातमी समजली, तेव्हा १५ हजार लिटरच्या टॅंकरवर आख्खा दिवस काढणारे गाव हळहळले होते.     

जिल्ह्यात चारा पिकांची लागवड रब्बी हंगामात तब्बल ४३ टक्‍क्‍यांनी घटली होती. बरीचशी लागवड जळूनही गेली. त्यातून जगलेल्या कडवळ, कडबा, ऊस या चाऱ्याचा भाव दुप्पट झाला आहे. आता तर साखर कारखान्यांची धुराडी थंडावल्याने ऊस आणि उसाचे वाढेही मिळत नसल्याने जनावरांची उपासमार सुरू झाली आहे. शेळ्यामेंढ्यांना शेतातच काय पण बांधालाही गवत उरले नाही. मेंढपाळांना रानोमाळ भटकावे लागत आहे. यामुळे दूध उत्पादनात तर घट झालीच आहे, पण जनावरेही कवडीमोल भावाने विकली जात आहेत. छावणी द्या... चारा द्या... असा आरडाओरडा निवडणुकीच्या काळात गोपालक करत होते, परंतु राजकीय धुळवडीत पुलवामा... राममंदिर... जात-धर्म या आवाजाखाली छावणीचा आवाज दबला गेला. जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांवरही यावर्षी विदर्भ-मराठवाड्यातून आलेले मजूर केवळ जोडीने नव्हते आले, तर गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या घेऊन आले होते. आता कारखाने बंद झाले, तरी अनेक मजूर कारखान्यांच्या परिसरात प्यायला पाणी मिळते आणि थोडाफार रोजगार मिळतो म्हणून परतलेच नाहीत. त्यांना हंगाम संपल्यावर बैलही मातीमोल भावाने विकावे लागले. चाराही नाही आणि दुधाला भावही नाही, यामुळे आज लाख रुपये किमतीच्या जर्सी गाई ४०-५० हजारांना कुणी नेत नाही आणि सव्वा लाखाची म्हैस ५०-६० ला कुणी विचारीत नाही, अशी अवस्था झाली आहे. कालव्याच्या पट्ट्यातील लोकांना त्या स्वस्तात मिळत आहेत. बारामती, काष्टी येथील गुरांच्या बाजारात विकत घेणारे दुर्मिळ आणि विकणाऱ्यांची झुंबड, असे उलटे चित्र निर्माण झाले आहे. धष्टपुष्टऐवजी खपाटीला गेलेलीच जनावरे जास्त दिसत आहेत. सध्या गाईंना तर गिऱ्हाईकापेक्षा कसायाने चांगले पैसे दिले असते, परंतु राज्यशासनाने गोवंशहत्याबंदी करून पोटावर पाय दिला आहे. जन्माला आलेला खोंड किंवा लुळीपांगळी, आजारी गाय-बैल फुकट सांभाळावे लागत आहेत. एकीकडे छावणी दिली नाही आणि दुसरीकडे दुधाचे अनुदान बंद केले. यामुळे दूध संस्थांनी दुधाचा दर पुन्हा १८ ते २० रुपये प्रतिलिटरवर आणला आहे. परिणामी दुष्काळात तेरावा महिना वाट्याला आल्याची भावना जिल्ह्यात बळावली आहे. 

जिल्ह्यात अवर्षणग्रस्त आणि टंचाईग्रस्त भाग कोणता असतो, हे पिढ्यान्‌पिढ्या निश्‍चित आहे. २०१२ च्या दुष्काळातही टॅंकर, चारा छावण्या, करपलेली पिके अशीच अवस्था होती. यावर्षीही बारामतीच्या मुर्टी-सुपे पट्ट्यापासून अंजनगाव-उंडवडीपर्यंतचा पट्टा जलसंधारणाची कामे प्रचंड प्रमाणात होऊनही पावसाअभावी पूर्ण करपून गेल्यासारखा दिसत आहे. बंधारे बांधल्यापासून पाऊसच नाही. ‘तीन वर्सं आमच्याकडे पाऊस आलाच नाही..’ हे त्यांचे वास्तव असल्याने विहिरींना टिपूसही नाही. बंधारे, तलाव, ओढे भेगाळले आहेत. या भागापासून १०-१५ किलोमीटरवरच्या नीरा डावा कालव्यालगतच्या पट्ट्यात परिस्थिती बरी आहे. आता त्याही भागात लगतची वीज तोडून पाटबंधारे खाते पिकांवर गंडांतर आणत आहे. पुरंदर तालुक्‍याचा नीरा नदीकाठचा लपतळवाडी ते पिंपरे खुर्द-नीरा पट्टा बरा आहे. तसेच पुरंदर उपसा योजनेने आधार दिलेला उत्तर पुरंदरचा पट्टा सोडला, तर अन्य पूर्ण तालुक्‍याला दुष्काळी झळा बसत आहेत. नाझरे धरणाने केव्हाच तळ गाठला आहे. इंदापूरमध्ये उजनी फुगवट्यावरील लाभक्षेत्र आणि नीरा डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र वगळता अन्य इंदापूर नेहमीप्रमाणे कोरडा आहे. लाकडी, निंबोडी, बोरी, कडबनवाडी ही मधल्या पट्ट्यातील गावे आणि नीरा नदी कोरडी पडल्याने निरवांगी, निमसाखर, रेडा, रेडणी हा पट्टा सुकून गेला आहे. शेततळी करून लोक दुष्काळाशी दोन हात करत आहेत. दौंड तालुक्‍यात एका बाजूला मुळामुठा तर दुसऱ्या बाजूला भीमा आहे. तरीही दोघांच्या मधली भांडगाव ते कुरकुंभ पट्ट्यातील गावे दूरदृष्टीअभावी आजही टंचाईग्रस्त आहेत. शिरूरमध्ये इनामगाव, पिंपळसुटी आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांची उभी पिके धोक्‍यात आहेत. पाबळ-केंदूर गटातही दुष्काळी स्थिती आहे. 

एकूण जिल्ह्यात खरिपाची पेरणी अवघी ६५ टक्के झाली आणि त्यातील बरीचशी वायाही गेली. रब्बीची मात्र बहुतांश ठिकाणी पेरणीच झाली नाही. रब्बीच्या पेरणीत एकूण ६० टक्के घट झाली. जिल्ह्यातील उसाच्या १ लाख १० हजार हेक्‍टरपैकी केवळ २९ टक्के क्षेत्रावर ऊस आहे. सुरू हंगामात टंचाईग्रस्त भागातील उसावर भर देऊन गाळप उरकले, परंतु पाणीटंचाईमुळे ऊस उत्पादकांच्या उत्पादनात एकरी १५ ते २० टनांची घट झाली. पुढील हंगामात तर गाळपासाठी कारखान्यांना ऊसच नाही. यामुळे साखर कारखानदारीही अडचणीत येणार आहे. आगामी हंगामासाठी प्रशासनाने खते, बियाणे उपलब्ध करून ठेवली आहेत, पण पाऊस लांबणार असल्याच्या बातम्यांनी शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.  

जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्याने ठिकठिकाणी ४२ ते ४३ अंशाची पातळी गाठल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आणि पाण्याची गरजही वाढली. मात्र, दुसरीकडे वडज, घोड, नाझरे, उजनी, पिंपळगाव जोगे, टेमघर, नाझरे, घोड, कळमोडी ही धरणे मृतपातळीत पोचली आहेत. धरण उशाशी आणि शेतकरी उपाशी अशी अवस्था झाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणेही उचकीवर आली आहेत. या धरणांवरून शेवटचेच आवर्तन सुरू आहे. सध्या मागील वर्षाच्या तुलनेत निम्मेच पाणी उरले आहे. भाटघर, नीरा देवघर ही मोठी धरणे तळाला गेली आहेत. वीर धरणाची परिस्थिती जरा बरी आहे. खडकवासला, चासकमान, पवना, डिंभे, येडगाव धरणांमधून थोडी थोडी आवर्तने सुरू आहेत. जिल्ह्यात सर्व धरणांमध्ये केवळ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा संपला आणि पाऊस लांबला, तर जिल्ह्याची ‘दे माय आणि धरणीठाय’ अशी अवस्था होऊ शकते.  

जिल्हा असा होरपळत असताना सरकारने मात्र, हजार-दोन हजार रुपये दुष्काळ अनुदान खात्यावर दिले. पीकविमा देण्याचे आमिष दाखविले. एसटीचे पास आणि शैक्षणिक फीत सवलत दिली. मदतीबद्दल धन्यवादच परंतु या गोष्टींनी दुष्काळ हटत नाही, हे आजवरच्या कुठल्याही सरकारला समजले नाही. दुष्काळ पडला, की जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूरचा ठराविक पट्टा हा पोळून निघतोच निघतो. पण टॅंकर, चारा यासारख्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांची सवय असल्याने त्यावर उताराच सापडलेला नाही. पुरंदरचा गुंजवणीच्या पाण्याचा गाजलेला उताराही अजून लागू पडलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकांची धामधूम मात्र जल्लोषात पार पडली. एकमेकांवर वैयक्तिक उणीदुणी काढण्यापासून चारित्र्यहनन करण्यापर्यंत नेतेमंडळींची मजल गेली. बेताल वक्तव्यांनीच निवडणूक जास्त गाजली. अपवादात्मक जाणते लोकच दुष्काळाच्या झळांबाबत बोलत होते, अन्यथा भाषणांचा दर्जाच घसरला होता. पेरा नाही, टॅंकरचे पाणी पुरत नाही, जनावरांना चारा मिळत नाही या दुखण्यांकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते. पालकमंत्रीही स्वतःच निवडणुकीत व्यग्र होते. एक मोठे नेते निवडणुकीचा फड संपल्यादिवशी थेट दुष्काळपाहणीला गेले आणि मग अन्य छोट्या-मोठ्या नेत्यांनाही दुष्काळाची जाणीव झाली आहे. परंतु, तोवर आचारसंहितेचा बागुलबुवा पुढे केल्याने लोकांनी आजार जसा अंगावर काढतात, तसा दुष्काळही अंगावर काढला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी माणूस विविध पक्ष झटूनही फारसा सभांसाठी बाहेर पडला नव्हता, पण मतदानासाठी मात्र उत्साहाने बाहेर पडला होता. दुष्काळाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना त्याने हिसका दाखविला आहे की नाही, हे २३ मे रोजी निवडणूक निकालातून स्पष्ट होईलच!

संबंधित बातम्या