सुपर पिगलेट ओक्जाची गोष्ट 

प्राजक्ता कुंभार
बुधवार, 6 मे 2020

वेब ओरिजिनल्स
 

लॉकडाऊन सुरू होण्याआधीचा काळ. वुहानमध्ये सुरू  झालेल्या कोरोनाच्या प्रसारानं  फक्त चीनच  नाही,  तर संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. या व्हायरसच्या जन्मकथेचा शोध घेताना, वुहानच्या सी-फूड मार्केटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी खाद्य संस्कृती-परंपरा असते असं स्वतःला कितीही समजावलं, तरी या सी-फूड मार्केटमध्ये खाण्यासाठी-विक्रीसाठी उपलब्ध असणारे प्राणी पाहून आपल्यापैकी अनेकांचं डोकं गरगरलं. ही  रिअॅक्शन अगदीच साहजिक होती. इतरांच्या खाण्याबाबतच्या आवडीनिवडींबद्दल आपण लिबरल असलं पाहिजे, असं कितीही म्हटलं तरी पुन्हा एकदा सगळी चर्चा 'योग्य आणि संतुलित आहार' यावर एकवटते. ही  अशीच काहीशी चर्चा आपल्याकडं बीफ बॅन लागू केल्यावरही झाली होती.

कोणी काय खावं आणि काय खाऊ नये याचं  कंपल्शन करण्याचा कोणाला काहीही  अधिकार नसला, तरी आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना आपल्या अशा अनेक सवयींवर परिणाम करून जातात. ही  सगळी लांबड लावण्याचं कारण एकच... 'ओक्जा', नेटफ्लिक्स ओरिजिनलचा चित्रपट. वरवर पाहता ही  गोष्ट ओक्जा आणि मिजा यांच्या मैत्रीची वाटत असली, तरी ती  अधोरेखित  करते फक्त जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या  कत्तलींना. त्यामुळंच  कोरियन दिग्दर्शक  बोंग जून हो याने सांगितलेली ओक्जाची गोष्ट प्रत्येकानं  एकदा तरी अनुभवायला हवी.

ओक्जा, जेनेटिक म्युटेशनचा वापर करून तयार करण्यात आलेलं सुपर पिगलेट. जगात उद्‌भवणाऱ्या अन्न टंचाईवर मात करण्यासाठी न्यूयॉर्कच्या मिरांडो या ॲग्रिकेमिकल कॉर्पोरेशनने शोधलेला उपाय-सुपर पिगलेट. कमी खाणारी, पण जास्त मांस देणारी डुकरांच्या पिलांची नवी प्रजाती. या जेनिटिकल बदल करून  घडवलेल्या सुपर पिगलेटची २६ छोटी पिल्लं जगातल्या २६ देशांमध्ये पाठवली जातात. त्यांची काळजी घेऊन त्यांना आपल्या देशातल्या पद्धतीनं  मोठं करण्यासाठी निवडलेल्या कुटुंबांमध्ये १० वर्षांसाठी त्यांना ठेवण्याची ही  योजना असते. यातलं एक पिल्लू पोचत ते  थेट साऊथ कोरियात, एका साध्या शेतकरी कुटुंबात, मिजाच्या आजोबांकडं.

लहानपणीच आई-वडील गमावलेल्या मिजाला ओक्जाच्या घरी येण्यानं खेळण्यासाठी एक सवंगडी मिळतो आणि सकाळी एकत्र उठण्यापासून ते रात्री एकमेकींच्या कुशीत झोपण्यापर्यंत ही अनकंडिशनल मैत्री वाढत जाते. या दहा वर्षांच्या काळात, आपल्याला ओक्जाला परत न्यूयॉर्कला पाठवायचंय याचा मिजाला  तर विसर  पडतोच, पण मुळात सुपर पिगलेटची निर्मिती मांस उत्पादनासाठी झाली होती हेही पुसट होत जातं. मग वेळ येते ती ओक्जाला परत पाठवायची आणि मिजाला जाणीव होते, आपल्या एकुलत्या एका मैत्रिणीला कायमचं  गमवण्याची. 

चित्रपटाची गोष्ट कोणत्याही भाषेत असली, तरी मैत्री आणि प्रेम याभोवती फिरणारं कथानक समजून घेणं फारसं अवघड जात नाही. प्रेमापेक्षा अनेकदा मैत्रीच्या गोष्टी जास्त आपल्याशा वाटतात.  कारण मैत्री स्वीकारणं आणि अनुभवणं जास्त सोपं असतं, सहज असतं. त्यामुळंच  असेल कदाचित,  पण ओक्जाला परत मिळवण्यासाठी, तिला जिवंत ठेवण्यासाठी मिजा जे  काही करते, त्याला आपण आपल्याही नकळत सपोर्ट करतो. ओक्जाच्या न्यूयॉर्कला जाण्यामुळं मिरांडोच्या लॅबमध्ये नक्की कोणते शोध लावले जातात, प्राण्यांना कसं वागवलं जातं  आणि सुपर पिगलेट योजनेमागचं सत्य जेव्हा जगासमोर येतं, तेव्हा ही  गोष्ट फक्त मैत्रीपुरती उरत नाही.

आपल्या आजूबाजूला किती छोट्या-छोट्या गोष्टी घडत असतात.  जिथं  आपण घेतलेला छोटासा निर्णय, ठामपणे मांडलेलं  एखादं मत, त्या चुकीच्या गोष्टींची साखळी तोडायला मदत करते. आपल्यामुळं  घडणारा बदल हा नेहमीच भव्यदिव्य असावा, अशी अपेक्षा सतत स्वतःकडून  करणंही  चुकीचं नाही का? स्वतःपुरतं, थोडक्यात काही बदलता आलं, तरी काय हरकत आहे? हा चित्रपट पाहताना, आपण आपले ठोकताळे बांधत जातो.  मिजा सुपर हिरो ठरेल, मोठा बदल घडवून आणेल, असं  आपल्याला वाटतं राहतं... आणि शेवटाकडं  जाताना हाच अंदाज चुकतो. एका छोट्या मुलीला जे शक्य आहे तेवढंच ती करते, पण शेवटी तिची फक्त एक कृती आपल्या चेहऱ्यावर गोड हसू आणते. हा चित्रपट जगता यायला हवा, तो याच गोंडस शेवटासाठी, बाकी सब तो मोहमाया है!

संबंधित बातम्या