सत्ता संघर्षाचा एक भाग! 

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 1 जून 2020

वेब ओरिजिनल्स
 

मे  २००४ ची गोष्ट. द न्यूयॉर्कर या अमेरिकेच्या साप्ताहिकमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता, टॉर्चर अॅट अबू गरीब (Torture at Abu Ghraib). अबू गरीब हा इराकची राजधानी बगदादपासून तीस-पस्तीस किलोमीटरवर असणारा एक तुरुंग. इराक युद्धात अमेरिकेनं हा तुरुंग डिटेन्शन साइट म्हणून वापरला होता. कैद्यांच्या उलट तपासणीसाठी सीआयए  म्हणजेच अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीनं वापरलेल्या 'इनहान्स इंटेरॉगेटिव्ह टेक्निक'मुळं हा तुरुंग चर्चेत आला होता. इथल्या कैद्यांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराचे फोटो जगासमोर आले आणि याच अत्याचाराचा लेखाजोखा द न्यूयॉर्करच्या लेखामध्ये मांडण्यात आला होता. हे अत्याचार इतके भयानक होते, की त्यांचे फोटो पाहूनच कोणताही सर्वसामान्य माणूस हादरून जाईल. काय होती ही इनहान्स इंटेरॉगेटिव्ह टेक्निक? आणि अमेरिकेला त्याची गरज का भासली? या अमानुष अत्याचारांनी नेमकं काय साधलं? याची सुरुवात नेमकी कुठून झाली? 'सीआयए'च्या या वागण्यावर जगभरातून ताशेरे ओढले गेल्यावर, अमेरिकेतील सरकारनं यावर काही कारवाई केली? या पद्धती वापरून खरंच किती यश मिळालं आणि किती दहशतवाद्यांना बोलतं केलं? 'द रिपोर्ट', अॅमेझॉन प्राइमचा हा चित्रपट या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी जशीच्या तशी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.

दहशतवाद, आतंकवाद यासारख्या शब्दांकडं बघण्याची जगाची नजर ९/११ या एका तारखेनं बदलून टाकली. अमेरिकेसारख्या माहिती-तंत्रज्ञान, अंतर्गत सुरक्षा, डिफेन्स या सगळ्याच बाबतीत अद्ययावत असणाऱ्या देशावर झालेला हा टेररिस्ट अॅटॅक जगाच्या सुरक्षेच्या संकल्पनांना सुरुंग लावणारा होता. अल कायदानं हा हल्ला करून 'हिम्मत असेल तर आम्हाला अडवून दाखवा' अशी उघड उघड धमकीच दिली होती. जगातली सगळ्यात ताकदवान समजली जाणारी अमेरिकेची सीआयए या हल्ल्याला रोखू शकली नाही, यावर सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं. 'सीआयए'च्या क्षमतेवर शंकाही घेण्यात आली. पण आता प्रश्न होता तो अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचा. यातून सुरू झाली बदला घेण्याची परिभाषा... तेही अगदी उघड उघड! यासाठी 'सीआयए'ला सर्वाधिकार बहाल करण्यात आले. अमेरिकेच्या डिफेन्सचं बजेट असंख्य पटीत वाढवण्यात आलं आणि संशयितांच्या उलट तपासणीसाठी जन्म झाला 'इनहान्स इंटेरॉगेटिव्ह टेक्निक'चा. यूएस एरफोर्समधून रिटायर्ड झालेल्या अणि मानसोपचार किंवा इंटेरॉगेशनचा कोणताही अनुभव नसणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी मांडलेली ही थेरी. पुढं या पद्धतींचा वापर करून मिळालेली माहिती वापरून ओसामा बिन लादेनला ठार मारल्याचा दावाही 'सीआयए'नं केला. पण सगळ्या दाव्यांमध्ये कुठंतरी जाणवणारा फोलपणा, काहीतरी लपवण्याची धडपड सर्वांसमोर उघड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटाचा नायक डॅनियल जॉन्स करतो. अमेरिकेच्या सत्ता संघर्षाचा एक भाग झालेला हा रिपोर्ट म्हणजे तटस्थपणे अभ्यास करून, सत्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न. या कामाच्या समतोलासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रतिनिधींची एक टीम करण्यात येते. सुरुवातीला सहा लोकांची असणारी ही टीम, अगदी दुसऱ्याच दिवशी फक्त तीन जणांचीच उरते आणि शेवटी जॉन्सबरोबर काम करायला फक्त एकच सहकारी उरतो. अमेरिकेच्या एका महत्त्वाकांक्षी सिनेटरकडं काम करून जॉन्स तब्बल पाच वर्षं मेहनत करून या केसशी संबंधित असणाऱ्या सीआयएच्या ६.३ दशलक्ष पानांचा अभ्यास करून एक रिपोर्ट तयार करतो - द रिपोर्ट! यात 'इआयटी'च्या आड करण्यात आलेले अमानुष अत्याचार आणि त्यातून हाती आलेले शून्य रिझल्ट्स हे सगळं तो अगदी उघडपणे मांडतो. यात ओसामा बिन लादेनला मारण्यात 'इआयटी'मुळं फायदा झाला, यातला खोटेपणाही तो शोधतो आणि मग वेळ येते ती हा रिपोर्ट जगासमोर मांडण्याची. 

हा चित्रपट बघताना मी अडकले ते काय योग्य आणि काय अयोग्य यात. इतरांना इजा करण्याची इच्छा असणाऱ्या धर्म-पंथ यांच्या नावाखाली निष्पापांचा बळी घेणं योग्य आहे असं वाटणाऱ्या, शक्य असेल तर अमानुष अत्याचार करण्याची मानसिकता असणाऱ्यांना का दया दाखवायची? पण त्याचवेळी दुसरीकडं सरकारच्या मान्यतेनं हे सगळं करू पाहणाऱ्या आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांकडं कोणत्या नजरेनं पाहायचं? त्यात पुन्हा इथं मुद्दा हा उरतोच, की हे सगळे अमानुष अत्याचार करून नेमकं काय आणि किती मिळालं? हा रिपोर्ट जगासमोर मांडायची जॉन्सची धडपड, त्याला थांबवण्यासाठी केले जाणारे वाट्टेल ते टोकाचे प्रयत्न आणि ‘व्हिसल-ब्लोअर’ होताना जॉन्ससमोर येणाऱ्या असंख्य अडचणी शेवटपर्यंत आपल्याला गुंतवून ठेवतात. या चित्रपटाच्या सुरुवातीला जॉन्सची बाजू फारशी न पटणाऱ्या माझ्या डोक्यात, चित्रपट संपेपर्यंत मात्र विचारांचं कॉकटेल झालं होतं. थोडासा स्लो, पण मुद्द्यांवरून क्षणभरही न भरकटणारा 'द रिपोर्ट' किमान एकदा नजरेखालून जायला हवाच.

संबंधित बातम्या