लव्ह पर स्क्वेअर फूट

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

वेबदुनिया
 

कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात उत्क्रांतीचे काही ठराविक टप्पे असतात. यात उत्तम मार्कांनी दहावी - बारावीची परीक्षा पास होणं, इंजिनिअरिंग अथवा तत्सम डिग्रीसाठी ॲडमिशन मिळवून, पास झाल्यावर मिळेल तो जॉब करणं, ठराविक वयात लग्न करून स्वतःपेक्षा जास्त इतरांसाठी ‘सेटल’ होणं.. हे असे अनेक टप्पे असतात. यातली ‘सेटल होणं’ ही कॉन्सेप्ट लग्न-घर-लेकरं याभोवतीच फिरते. 

स्वतःचं, हक्काचं घर..! मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याला सार्थकी लावणारे हे दोन शब्द. आयुष्यात बाकी काही अचीव्ह करण्यापेक्षा ‘एकदाचं आमचं घर झालं बाबा’ हे सांगण्यात आणि दाखवण्यात अनेकांना जाज्वल्य अभिमान वाटतो. माणसांच्या आणि इमारतींच्या गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या शहरात काही स्क्वेअर फूट जागा स्वतःच्या मालकीची होते याचं का कोण जाणे अप्रूप असतं अनेकांना. स्वतःच्या हक्काचं घर मिळवण्यासाठी प्रसंगी शक्य त्या तडजोडी करायची तयारीही असतेच की! पण ‘फक्त लग्न झालेल्या जोडप्यांना अफोर्डेबल किमतीत घर देणाऱ्या’ एखाद्या हौसिंग स्कीममध्ये बजेट होम मिळावं म्हणून कोणी लग्न करत असेल? एकमेकांवर असणारं प्रेम, आयुष्यभर सोबत देण्याचं वचन या सगळ्यापेक्षा ‘बजेटमध्ये मिळणारं घर’ हा कोणत्या लग्नाचा ट्रिगर पॉइंट असू शकेल? ‘नेटफ्लिक्स ओरिजिनल’चा ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ हा रॉमकॉम चित्रपट याच भन्नाट कॉन्सेप्टवर अगदी आजच्या भाषेत बोलणारा आहे. 

संजय चतुर्वेदी आणि करीना डिसुझा या जोडप्याची ही गोष्ट प्रेम-लग्न-घर या सरळ, साध्या प्रवासाला उलट्या क्रमानं आपल्या समोर मांडते. त्या दोघांचा ‘५५० स्क्वेअर फूट’च्या स्वप्नाचा स्ट्रगल बघताना, हे दोघंही अगदी आपल्यातलेच वाटतात. वडील, भास्कर चतुर्वेदी, रेल्वेत नोकरी करतात या एकमेव कारणानं मुंबईच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणारा संजू नेटवर्क इंजिनिअर म्हणून एका बँकेत काम करतोय. भास्कर चतुर्वेदी लवकरच रिटायर होणार आहेत आणि त्यांच्या रिटायरमेंटनंतर चतुर्वेदी कुटुंबाला सरकारी क्वार्टर सोडावी लागणार आहे. संजयच्याच बँकेत ‘लोन डिपार्टमेंट’मध्ये करीना काम करतेय. करीना, तिच्या आईबरोबर ‘कधीही डोक्यावर कोसळेल’ अशा स्थितीत असणाऱ्या तिच्या मामाच्या घरात एका खोलीत राहतेय. संजय आणि करीना यांची एकमेकांशी साधी तोंडओळखही नसताना, त्यांचं एक स्वप्न मात्र अगदी डिट्टो सेम आहे, ते म्हणजे ‘मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचं घर!’ 

दोघांचंही स्वतःचं स्वतंत्र आयुष्य आहे. एकीकडं ‘कधीतरी आपल्याला हो म्हणेल’ या आशेवर डिपार्टमेंटच्या बॉस राशीबरोबर एकतर्फी प्रेमप्रकरण सुरू असणारा संजय, तर दुसरीकडं फक्त आईला बरं वाटावं म्हणून सॅम्युअलबरोबर जुळवलेल्या लग्नात स्वतःला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करणारी करीना! अशातच नेमकी ‘जीवन हौसिंग सोसायटी’ची ‘अफोर्डेबल होम्स’ची जाहिरात पेपरमध्ये झळकते आणि आपलं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा हा अल्टिमेट चान्स आहे हे दोघांना जाणवतं. 

पुढं संजय कंपनीकडं होम लोनसाठी अप्लाय करतो, पण त्याच प्रपोजल रिजेक्ट होतं. रिजेक्शनच कारण विचारायला म्हणून लोन डिपार्टमेंटला गेल्यावर कधीतरी ऑफिसच्या पार्टीमध्ये ओळख झालेली करीना त्याला भेटते. ‘तुझ्या एकट्याच्या पगारावर एवढं लोन मिळणं अवघड आहे, त्याऐवजी तू तुझ्या पार्टनरबरोबर जॉइंट-लोनसाठी अप्लाय कर,’ असा मार्ग करीना संजयला सुचवते. पण फक्त बॉयफ्रेंड परदेशात आहे म्हणून संजयबरोबर रिलेशन मेंटेन करणारी राशी त्याला या जॉइंट लोनमध्ये मदत करायला तयार होत नाही. स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणारी करीना ज्यावेळी सॅम्युअलला या स्कीमबद्दल सांगते, त्यावेळी ‘या अशा स्कीम गरीब लोकांसाठी असतात आणि तसंही लग्नानंतर आपण माझ्याच घरी राहणार आहोत’ असं जाहीर करून मोकळा होतो. या सगळ्या गोंधळात स्कीममध्ये अप्लाय करायची लास्ट डेट उभी ठाकते आणि समोर इतर कोणताही पर्याय नसणारे संजय आणि करीना फक्त ‘हाय-बाय’ ओळख असताना, एकमेकांच्या प्रेमात नसताना - एकमेकांचे भावी नवरा बायको म्हणून एकत्र या स्कीममध्ये अप्लाय करतात. घरासाठी अप्लाय केल्यापासून, घर ताब्यात मिळेपर्यंतच्या प्रवासात संजय आणि करीनाची प्रेमाची गोष्ट खूपच ट्विस्ट्स अँड टर्न्स घेऊन अगदीच अपेक्षित असणाऱ्या, सुखद - गोडमिट्ट शेवटाला जाऊन पोचते, पण त्यांच्या नात्याचा हा प्रवास आपल्याला या गोष्टीच्या प्रेमात पाडतो. 

संजय आणि करीनाचं घराचं स्वप्न प्रातिनिधिक म्हटलं, तर आपल्यापैकी प्रत्येकाचीच छोटी मोठी स्वप्नं असतात. आपली धडपड सुरू असते ती ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी. अनेकदा या स्वप्नांसाठी जमतील ते जुगाड करायलाही आपली हरकत नसते, कारण आपल्यासाठी अल्टिमेटली तो शेवटचा रिझल्ट खूपच जास्त महत्त्वाचा असतो. स्वप्न पूर्ण करणं म्हणजे सतत चिडचिड, वैताग, त्रास, ॲडजस्टमेंट, खूप कष्ट हेच समीकरण पक्कं असतं आपल्या डोक्यात, पण ते नेहमीच तसं असणं गरजेचं आहे? नाही ना, कधीतरी निवांत राहून, एखाद्याच्या मनसोक्त प्रेमात पडून, वाटेत येणाऱ्या अडचणींवर स्मायलिंग चेहऱ्यानं उत्तरं शोधूनही येतंच असतील की स्वप्न पूर्ण करता! काय हरकत आहे, आपापली स्वप्न पूर्ण करण्याचे सोप्पे मार्ग शोधायला.. कदाचित त्याबरोबर स्वप्नाबरोबर एखादी प्रेमाची गोष्टही ‘सुफळ संपूर्ण’ व्हायची! 

संबंधित बातम्या