राजकीय युद्धातील वास्तव 

समृद्धी धायगुडे
सोमवार, 1 जुलै 2019

वेबवॉच
 

हॉटस्टारने क्रिमिनल जस्टिस वेबसीरिजनंतर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसीरिज प्रदर्शित केली. नागेश कुकनूर लिखित आणि दिग्दर्शित सर्वस्वी मुंबईत घडणारी ही कथा आहे. बॉलिवूडमध्ये डोर, इकबालसारखे चित्रपट केल्यानंतर वेबसीरिजमध्ये उतरताना त्यांना आणखी चांगला प्रयत्न करता आला असता असे वाटते. 

या कथेची सुरुवात मुंबईत एका लोकप्रिय नेत्याच्या हत्येने होते. हा नेता खाण्यासाठी त्याच्या आलिशान गाडीतून खाली उतरतो आणि चार अंगरक्षकांच्या संरक्षणातदेखील दोन दुचाकीस्वार त्याच्यावर तीन गोळ्या झाडतात. हा धक्कादायक प्रकार घडत असताना त्याची दोन्ही मुले आपापल्या विश्‍वात रममाण असतात. हा नेता म्हणजे अमेयराव गायकवाड आणि त्याची मुले म्हणजे आशिष आणि पौर्णिमा गायकवाड. 

अमेयराव गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर तातडीने पुढच्या हालचाली घडतात. संसार आणि मुलाबाळात रमलेली मुलगी आणि नशेच्या आहारी गेलेला मुलगा तातडीने रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतात. याच क्षणापासून बहीण-भावांमध्ये शीतयुद्धाची ठिणगी पडते. पुढील नऊ भागात त्याचा भडका कसा उडतो? त्यात कोणाच्या आयुष्याची राखरांगोळी होते? हे स्पष्ट होते. राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा झाल्या आहेत, हे प्रत्येक प्रसंगातून दिसते. सामान्य गृहिणीचा बोल्डनेस दाखवण्यासाठी धूम्रपानाचा आणि पुरुषार्थ दाखवण्यासाठी बंदुकीचा अतिरेकी वापर केल्यासारखे वाटते.

महाराष्ट्रातील एका प्रमुख पक्षाचा वरिष्ठ नेता गोळीबारामुळे काही दिवस कोमात जातो. त्यानंतरची राजकीय समीकरणे बदलताना त्याचा घरातील वातावरणावर होणारा परिणाम, शीतयुद्धाचे मोठ्या ठिणगीत कसे रूपांतर होते ही सगळी वळणे दिग्दर्शकाने सस्पेन्स ठेवत चांगली मांडली आहेत. या सस्पेन्स ठेवण्याच्या नादात काही अनावश्‍यक पात्रे, प्रसंग यामुळे वेबसीरिजचे भाग विनाकारण वाढवल्यासारखे वाटतात. त्याला टिपिकल मेलोड्रामॅटिक स्वरूप येते. 

या सत्तासंघर्षात काहींचा नाहक बळी जातो, काहींचे करिअर संपते. प्रत्यक्ष घटनेशी संबंध नसतानादेखील दोन प्रेमीजीवांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. वरवर सरळमार्गी दिसणारा माणूस पुरुषोत्तम (संदीप कुलकर्णी) वाममार्गाला कसा लागतो, त्याचे परिणाम काय होतात हे प्रसंग कधीकधी कंटाळवाणे होतात. गायकवाडांचे मारेकरी शोधण्यावरून राजकारण भरकटत जाते. गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, यावरून रंगत जाणारे राजकारण आणि त्यातून बऱ्याच निष्पाप जीवांची उद्‌ध्वस्त होणारी आयुष्ये बघताना दिग्दर्शकाला कोणत्या थराचे राजकारण दाखवायचे आहे हा प्रश्‍न पडतो. एकमेकांना सिद्ध करण्याच्या नादात गुन्हेगारीचे दर्शन या वेबसीरिजमध्ये घडते. गायकवाडांच्या दोन्ही मुलांमधील जीवघेणी चढाओढ नेमकी कुठे जाऊन थांबते, हा तसा उत्कंठावर्धक प्रवास आहे. राजकारणातील इतर गट किंवा त्यांचा सहभाग मूळ कथानकात कमीच वाटतो. यातील एका पात्राचा म्हणजे पुरुषोत्तमचा संबंध गायकवाडांच्या संपत्तीच्या हिशोबाशी आहे. तर दुसरे पात्र केवळ मारेकऱ्याची ओळख पटविण्यापुरते आहे. याला अतिशय बाळबोध, गरजेपेक्षा जास्त महत्त्व यात दिल्यासारखे वाटते. 

मराठी प्रेक्षक म्हणून आवडलेल्या गोष्टी म्हणजे कलाकारांची निवड. या वेबसीरिजच्या निमित्ताने मराठीतील कसदार अभिनेता अतुल कुलकर्णी प्रथमच मायक्रो पडद्यावर येतोय. दुसरी उल्लेखनीय कलाकार म्हणजे प्रिया बापट. मराठी प्रेक्षकांनी तिचा अभिनय प्रवास पाहिलाच आहे, पण यात तिने अतिशय वेगळी भूमिका सक्षमपणे साकारली आहे. आधी एक मुलगी, मग पत्नी आणि नंतर राजकारणी म्हणून भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. तिने बदललेली रूपे खरेच अप्रतिम साकारली आहेत. या सीरिजमध्ये असलेल्या तिच्या बोल्ड दृश्‍यांमुळे पारंपरिक प्रेक्षक वर्ग तिच्यावर नाराज असू शकतो. पण यातील तिचा अभिनय बघता मराठी प्रेक्षकांचा राग नक्कीच दूर होईल. तिसरा अभिनेता म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील तरुण अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. बड्या राजकारण्याचा टिपिकल वाया गेलेल्या आणि सनकी मुलाचा अभिनय त्याने छान निभावला आहे. चौथा कलाकार हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता ईजाझ खान. त्याने या सीरिजमध्ये चौकशी लागलेल्या एका एन्काउंटर स्पेशलिस्टची भूमिका साकारली आहे. इतर कलाकारांमध्ये सचिन पिळगावकर यांनी मुख्यमंत्री जगन्नाथ गुरव, उदय टिकेकर यांनी गायकवाड यांचा डावा हात असलेला जतीनभाईची भूमिका केली आहे. आणखी एक मराठी कलाकार म्हणजे संदीप कुलकर्णी आणि त्याच्या पत्नीची भूमिका करणारी विभावरी देशपांडे. पुरुषोत्तमची भूमिका सुरुवातीला कमी महत्त्वाची असली, तरी शेवटच्या दोन-तीन भागात एकदम भाव खाऊन जाते. यातील ताकदीच्या मराठी कलाकारांचा म्हणावा तसा उपयोग दिग्दर्शकाने करून घेतला असे वाटत नाही. पण एकंदरीत या वेबसीरिजचा जेवढा गवगवा केला, तेवढी ती प्रभाव पाडणारी नाही. फक्त मराठी कलाकारांच्या आणि दिग्दर्शकाच्या लोकप्रियतेमुळे प्रेक्षक मिळेल असा अंदाज आहे. या वेबसीरिजचा शेवट म्हणजे पुढच्या सीझनची नांदी आहे. पहिल्या सीझनमध्ये राहिलेल्या त्रुटी दुसऱ्या सीझनमध्ये भरून निघतील असे वाटते. 

सिटी ऑफ ड्रीम्स (सीझन १)
प्रदर्शन तारीख : ३ मे २०१९
रेटिंग : 3/5

संबंधित बातम्या