कर्तव्यांत अडकलेल्या डॉक्‍टरची कथा 

समृद्धी धायगुडे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

वेबवॉच
 

सुधीर मिश्रा या दिग्दर्शकाने ‘होस्टेजेस’ या हॉटस्टारवरील वेबसीरिजच्या निमित्ताने मायक्रो पडद्यावर पाऊल ठेवले आहे. या वेबसीरिजची कथा एका इस्राईली मालिकेवरून घेतली आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी यात थोडासा मसाला भरला आहे. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत तिस्का चोप्रा, रोनित रॉय आणि प्रवीण डबास आहेत. ही वेबसीरिज बघताना कुठेही कंटाळवाणी किंवा रटाळ वाटत नाही. 

कथेची सुरुवात दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या एका खास मिशनपासून होते. त्यावेळी एसपी पृथ्वी सिंगचे अधिकृत कर्तृत्व पाहायला मिळते. नंतर तो प्रेक्षकांसमोर भलत्याच स्वरूपातून येतो. दिल्लीतील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये काम करणारी उच्चभ्रू डॉक्‍टर मीरा आनंद नुकतीच एक शस्त्रक्रिया करून बाहेर येते आणि तिला दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर हाडांची शस्त्रक्रिया करायची आहे, अशी माहिती मिळते. ही शस्त्रक्रिया करण्याचे काम अचानक तिच्याकडे आल्याने ती आश्‍चर्य व्यक्त करते. कारण तिचे वरिष्ठ डॉ. अली हे ती शस्त्रक्रिया करणार असतात. इथून पुढे तिच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंगांना सुरुवात होते. 

त्या दिवशी रात्री डॉ. मीरा घरी येते. पती, मुलांबरोबर जेवण करते आणि सर्वजण आपापल्या खोलीत जातात. त्याच वेळी त्यांच्या घरावर आणि कुटुंबातील प्रत्येकावर लक्ष ठेवलेले चार जण तोंडाला मास्क लावून चौघांना बंदुकीच्या धाकात बाहेरच्या खोलीत आणतात. स्वतःच्याच घरात बंदी झालेल्या त्या चौघांना अचानक घडणाऱ्या या घडामोडींना कसे सामोरे जायचे हे समजत नाही. डॉ. मीरा यांची दोन्ही मुले टिनएजर्स, तर पती एका शाळेचे मुख्याध्यापक दाखवले आहेत. घरातील या तीनही सदस्यांची एक अनोळखी बाजू या निमित्ताने मीरासमोर येते. अपहरणकर्ते डॉ. मीरा आनंदला घरातल्यांची जबाबदारी आणि कर्तव्याच्या कड्यावर आणून ठेवतात. 

डॉ. मीरा एक महिला डॉक्‍टर म्हणून, आई म्हणून आणि पत्नी म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या कसोट्या पार करते. घरात आपली मुले बंदी असूनसुद्धा धाडसाने ती तिच्या घरातल्यांना होस्टेजेस करणाऱ्यांची कुंडली काढून त्यांच्या समोरही एक आव्हान उभे करते. या संपूर्ण नाट्यमय घडामोडींत ती कोणाचे आयुष्य वाचवते आणि कोणाचे नाही, हे पाहताना खरेच उत्कंठा निर्माण होते. 

दिग्दर्शकाने पात्र निवड आणि दिग्दर्शन खरोखरीच उत्तम केले आहे. या मास्क बांधलेल्या चौघांमध्ये आहेत, एसपी पृथ्वी सिंग, एक सोज्वळ आयटी तरुण, एक तरुणी आणि तिचा सनकी बॉयफ्रेंड. एका क्षणी या चौघांचा धीर मोडून वाताहत होते. आपापसांतल्या भांडणांमुळे त्यांच्या मिशनचे नुकसान होते. 

वेबसीरिजचा मसाला म्हणजे शिव्या, प्रणय दृश्‍ये यातही आहेत, पण अगदी कथेच्या गरजेपुरती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सस्पेन्स आणि थ्रिल कायम ठेवणाऱ्या आहेत. 

खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे एक-दोन गोष्टी अर्धवट सोडल्यासारख्या वाटतात. एक म्हणजे या संपूर्ण मिशनला फंड पुरवणाऱ्याची एक झलक दाखवली आहे, पण सर्वांत शेवटी त्याचा थोडासादेखील उल्लेख नाही. राहत्या घरात बंदी केल्यानंतर मुलांच्या शाळा आणि कॉलेज किंवा कुठूनही चौकशी होत नाही. एक डॉक्‍टरला तिच्याच रुग्णालयामध्ये संशयास्पदरीत्या फिरताना, चोरी करताना कोणीही बघत नाही, या गोष्टी जरा अतर्क्‍य वाटतात. 

या वेबसीरिजची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे पात्रांची निवड. टिस्का चोप्राने तिच्या तटस्थ अभिनयाने डॉ. मीरा आनंदची भूमिका उत्तम साकारली आहे. प्रथम दर्शनी अत्यंत हुशार आणि कौशल्यपूर्ण अशी डॉक्‍टरची भूमिका निभावताना आपल्यावरही छाप पडते. त्यानंतर एक धाडसी आई आपले कुटुंब आणि मुलांना यातून सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते, हे करताना तिच्यावर मुलीकडून आणि पतीकडूनही दोन आघात होतात. या परिस्थितीला ती अत्यंत कौशल्याने एकदम तटस्थ राहून कशी सामोरी जाते हे खरेच कौतुकास्पद आहे. दुसरा कलाकार म्हणजे रोनित रॉय (एसपी पृथ्वी सिंग). छोट्या पडद्यापासून चित्रपटांपर्यंत सर्व स्तरांवर त्याचा अभिनय आपण पाहिला आहे. उत्तम आणि प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावणारा एखाद्या गुन्हेगारापासून ते डॉक्‍टरपर्यंत सर्वांना कसे विश्‍वासात घेऊन आपले ईप्सित साध्य करतो, हे पाहण्यासारखे आहे. 

सहकलाकार प्रवीण डबास (संजय आनंद) यानेही आपली भूमिका चांगली साकारली आहे. सहकलाकारांमध्ये अंगंशा बिस्वास (हायमा), असीम गुलाटी (अमन), शरद जोशी (शोवन आनंद), मल्हार राठोड (शायना आनंद), मोहन कपूर (सुब्रमण्यम), दालीब ताहिल (मुख्यमंत्री खुशवंत लाल हंडा), युसूफ हुसेन (डॉ. अली) या सर्वांनी आपापल्या भूमिका उत्तम वठविल्या आहेत. 

एकंदरीतच इस्राईली मालिकेवरून घेतलेली भारतीय वेबसीरिज एकदा नक्कीच पाहण्यासारखी आहे. 

होस्टेजेस 
प्रदर्शन तारीख : ३१ मे २०१९ 
रेटिंग : 4/5

संबंधित बातम्या