लांबच्या नात्याची ‘छोटी’ गोष्ट

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

वेबवॉच
 

‘डाइस मीडिया’ची ‘लिटिल थिंग्ज’ या यूट्युबवर उपलब्ध असलेल्या वेबसीरिजचा तिसरा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘डाइस मीडिया’ने स्वतःचा असा तरुण प्रेक्षक खूप ताकदीने उभा केला आहे. शिवाय पहिल्या सीझनपासून या वेबसीरिजमधील वेब क्वीन मिथिला पालकर आणि ध्रुव सेहगलची जोडी अजूनही तितकीच लोकप्रिय आहे. हा सीझन पाहण्याआधी याची थोडी पार्श्‍वभूमी माहिती असणे आवश्यक आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनच्या लोकप्रियतेमुळे दुसऱ्या सीझनपासून सर्व हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले. नेटफ्लिक्सवरील पूर्णपणे भारतीय धाटणीची असलेली ही रोमँटिक कॉमेडी वेबसीरिज आहे. या वेबसीरिजमध्ये दोन पात्रांना पूर्ण न्याय दिल्याने ती उत्तरोत्तर खुलत जाते.    

काव्या कुलकर्णी आणि ध्रुव सेहगल हे दोघे आपल्या करिअरच्या निमित्ताने मुंबईत स्थित असतात. रिलेशनशिपमध्ये असलेल्या या दोघांच्या नात्यात खूप सहजता आणि एक लय तयार झालेली असते. ही सहजता पहिल्या दोन सीझन्समध्ये दिसते. काव्या कुलकर्णी ही अस्सल मराठमोळी नागपूरची, पण आता मुंबईकर तरुणी आणि ध्रुव सेहगल दिल्ली का स्कॉलर कुवाँरा. पहिला सीझन अर्थातच नवीन असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दुसरा तुलनेने कंटाळवाणा वाटतो. आता आलेल्या तिसऱ्या सीझनमध्ये ‘डिस्टन्स रिलेशनशिप’वर भर दिलेला दिसतो. 

डिस्टन्स रिलेशनशिप म्हणल्यावर किती तडजोडी एखाद्या जोडप्याला कराव्या लागतात आणि तेही लग्नाच्या आधी, याचे सुरेख चित्रण केले आहे. तिसऱ्या सीझनची सुरुवात ध्रुवला बंगळुरूमधील राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेतील प्राध्यापकांना साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी येते. इथून या मॉडर्न रिलेशनशिपच्या दुराव्याला सुरुवात होते. मॉडर्न कपल्सच्या नात्यातील समंजसपणा, जोडीदाराच्या सवयी, शेअरिंग आणि दूर गेल्यावर एकमेकांना मिस करणे हे पहिल्या भागापासूनच सुरू होते. ध्रुवची ‘हॅपी प्लेसेस’ची संकल्पना शेवटच्या काही भागात लक्षात येते. एका मर्यादेनंतर प्रत्येकाने आपला कम्फर्ट झोन सोडून नवीन धाडस करण्याचा विचार येथे छान मांडलेला दिसतो.

जोडीदार दूर असल्याची पोकळी ते दोघे आपापल्या जवळचे मित्र, सहकाऱ्यांबरोबर शेअर करून भरून काढण्याचा प्रयत्न करत असतात. काव्या हा बदल लवकर स्वीकारू शकत नाही. वरवर सगळे ठीक चालले आहे, असे वाटत असताना ती आतून ध्रुवला मिस करत राहते. तर, ध्रुव त्याच्या मित्रांबरोबर बऱ्यापैकी रुळलेला असतो. बंगळुरूमधील संस्थेचा शांत, हिरवळीने दाटलेला परिसर, वातावरण, अभ्यासासाठी मिळालेला एकांत एंजॉय करत असतो.

काव्या आणि ध्रुवची ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप केवळ त्यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नसते, ती पालकांच्या बाबतीतही असते. ध्रुव दिल्लीतून मुंबईत आलेला असल्याने आणि इकडे काव्या नागपूरहून मुंबईत आल्याने आपल्या पालकांपासूनही तेवढेच दूर गेलेले असतात. या दोघांनाही काही निमित्ताने पुन्हा पालकांच्या जवळ जाण्याची, थोडक्यात आपल्या घरी जाण्याची संधी मिळते. त्यावेळी पुन्हा एवढे वर्ष घरापासून लांब राहिल्याची बोचणी त्यांना लागते. या काळात घरी आल्यावर इथल्या लहानपणापासूनच्या आठवणी, शाळेच्या आठवणी, जुने शेजारी, पहिले प्रेम, घराच्या आठवणी या गोष्टी प्रेक्षकांना नॉस्लेजिक करतात. या सीरिजमधील ‘घर वापसी’ नावाच्या एपिसोडमधून दिग्दर्शक काव्या-ध्रुवच्या व्हिडिओ कॉलमधून छान प्रकारे मांडतो. ‘शादी कब करोगे’ या टिपिकल प्रश्‍नांना हे दोघे कशी उत्तरे देतात, कपल म्हणून वर्तमानातील ध्येय, पालकांविषयीची काळजी, जाणीव हे सर्व चांगल्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने अधोरेखित करते. काव्या आणि ध्रुव पुढे विवाहबद्ध होतात का? पुन्हा घरी जातात का? थोडक्यात त्यांच्या डिस्टन्स रिलेशनशिपचे पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी लिटिल थिंग्जचा तिसरा सीझन एकदा तरी पाहावा असा आहे.    

या संपूर्ण वेबसीरिजच्या टीमचे कौतुक आहेच, पण त्यात विशेष नमूद करण्यासारखे म्हणजे ध्रुव सेहगल हा लेखक, दिग्दर्शक आणि मग कलाकार म्हणून प्रचंड ताकदीचा माणूस आहे. या वेबसीरिजसाठी त्याची पात्र निवड, त्याला दिलेले मोजके पण महत्त्वाचे स्थान याची समज असलेला तो लेखक आणि दिग्दर्शक आहे. एकंदरीतच या वेबसीरिजच्या शीर्षकगीतापासूनच संपूर्ण टीमच्या कल्पकतेचा अंदाज येतो. काही एपिसोड्समधील समर्पक गाणी, प्रकाश योजना, व्हीएफएक्सचा माफक पण योग्य वापर या गोष्टींची दखल घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

तुम्ही जर पहिल्यापासून या वेबसीरिजचे चाहते असाल तर ही पाहालच. पण नवीन प्रेक्षक असाल, तरीही ही वेबसीरिज नि:संकोच बघा. 

लिटिल थिंग्ज 
प्रदर्शन तारीख :
९ नोव्हेंबर २०१९

संबंधित बातम्या