वेगळ्या वाटेवर...

-
सोमवार, 8 मार्च 2021

कव्हर स्टोरी

राजकारणातील स्त्रियांचा वावर ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. आता तर अगदी पंचविशीच्या आतल्या तरुणीदेखील राजकारणाची वाट धरत आहेत. तर काही महिला अंधश्रद्धा झुगारून राजकारणातील स्वतःला सिद्ध करीत आहेत. अशा तीन महिला सरपंचांच्या या प्रतिनिधिक गोष्टी...

अवघ्या २१व्या वर्षी सरपंच
‘उत्तम शिक्षण घेतलेल्या मुली राजकारणात आल्याच पाहिजेत. तरुणाईला राजकारणात संधी मिळाली, की त्यांच्या आशा आकांक्षांना बळ मिळते. ग्रामपंचायत सदस्य वा सरपंच या पदांमुळे गावासाठी ठोस काही करता येते. मी सर्वात तरुण सरपंच झाले हा सुखद धक्का होता, मात्र सदस्य म्हणून निवडून येणारच होते. स्पर्धा होती तरीही गावातील एकजुटीमुळे निवड बिनविरोध झाली. हा नशिबाचा भाग आहे,’ असे आत्मविश्‍वासपूर्ण उद्‍गार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील निवे येथील सर्वात तरुण सरपंच कल्याणी जोशी यांचे.

कल्याणी यांचे बीएस्सीचे शिक्षण नजीकच्या देवरुख येथील महाविद्यालयात झाले. निवे हे संगमेश्‍वर तालुक्यातील दुर्गम खेडे. कल्याणीचे आई-वडील अल्पशिक्षित, पण त्यांनी कल्याणी व तिचा भाऊ या दोघांनाही शिकवले. कल्याणीने राजकारणात जायचे म्हटल्यावर तिला प्रोत्साहनच दिले. गावातील मुले बाहेर जातात. इथे रोजगार नाही, यासाठी काहीतरी कर असे आईने सांगितले. आरक्षित जागेवर कल्याणींची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर नशिबाचे दान त्यांच्या बाजूने पडले आणि त्या अवघ्या २१व्या वर्षी सरपंचही झाल्या. मात्र त्यांचे विचार स्पष्ट आहेत. कारभार त्याच करणार!

महिलांचे आरोग्य, खेड्यातील बालकांचे कुपोषण, गावातील एकाकी वृद्ध आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना काम करायचे आहे. महिला आरोग्याविषयी बोलत नाहीत. उघड चर्चा करत नाहीत. आता ते चित्र बदलायचे आहे. महिलांची अ‍ॅनिमिक कंडिशन हा गावातील दुर्लक्षित प्रश्‍न आहे. तसेच मुलांचे कुपोषणही. हे चित्र त्यांना बदलायचे आहे. शिक्षणासाठी स्थलांतर होते, ते थांबविणे कठीण आहे. परंतु प्राथमिक शाळेपासून ते स्पर्धा परीक्षेस बसू इच्छिणाऱ्‍यांपर्यंत साऱ्‍यांना संधी व शैक्षणिक साहित्य, पुस्तके उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा आहे. तरुणांच्या स्थलांतरामुळे एकाकी वृद्धांच्या भौतिक तसेच भावनिक व मानसिक गरजा लक्षात घेऊन त्यासाठी काही उपाय त्यांना योजायचे आहेत. अजून भरपूर शिकायचे आहे. मात्र राजकारणात संधी मिळाली, तर काम करत राहणारच असे त्यांनी सांगितले.

निवडणूक बिनविरोध झाल्याने राजकारणात काही वेगळे अनुभव आले नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी राजकारण चांगलेच, असा दावा त्यांनी केला. तरुण मुलींनी आणि महिलांनी राजकारणात यावेच, महिलांच्या प्रश्‍नांची जाण, व्यवहार चातुर्य आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न यामुळे कारभारामध्ये महिला गुणात्मक फरक करतील. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांकडे दुर्लक्ष होते, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या शिक्षणासाठी नेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. निवे गावात अपवादानेच मोबाइलची रेंज मिळते. मुलांना अभ्यासासाठी अडीच किमी दूर जावे लागते. हे तातडीने थांबवायचे हा त्यांच्या अजेंड्यावरील पहिला मुद्दा आहे.

- शिरीष दामले, रत्नागिरी

नांदेड जिल्ह्यातली सर्वात तरुण सरपंच
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. यात ग्रामपंचायत सेलू येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या स्वाती उल्हास नैताम यांना नांदेड जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या माहूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ आदिवासीबहुल भागात वसलेल्या सेलू गावातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ २३ वर्षांच्या स्वाती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता त्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात तरुण वयाच्या उमेदवार ठरल्या आहेत. 

भूमिहीन असलेल्या स्वाती नैतामचे संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. स्वातीला दोन बहिणी, एक भाऊ आहे. त्यात स्वाती सर्वात मोठ्या आहेत. घरकुलाच्या घरात राहणाऱ्या नैताम कुटुंबातील स्वाती यांचे शिक्षण जेमतेम झाले, परंतु परिस्थितीच्या जाणिवेने त्यांना समाजात राहून संघर्ष करायला शिकवले. आरक्षणाच्या नियमामुळे स्वातः यांचे वडीलही सरपंच होते. वर्तमानकाळात निवडणूक लढवणे म्हणजे वाळू रगडून तेल काढण्यापेक्षा कमी नव्हते. आदिवासी परधान समाजातील बुद्धिजीवी व होतकरू तरुणी म्हणून स्वाती यांचा नावलौकिक होताच. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतदान करून सेलू ग्रामवासीयांनी सरपंच म्हणून निवडून दिले; मोठ्या मताधिक्क्याने स्वाती निवडून आल्या आणि नांदेड जिल्ह्यातील सर्वात तरुण महिला सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

‘आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गाव सेलूच्या सरपंचपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ग्रामविकासाबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळीच्या माध्यमातून गृह उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणार आहे. विधवा, निराधार व स्वकर्तृत्वाने कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्या महिलांना एकत्र करणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांच्या माध्यमातून राबविले जाणारे उपक्रम गाव पातळीवर राबवून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया भक्कम करण्याचा माझा संकल्प आहे,’ असे स्वाती यांनी सांगितले.

- साजीद खान, (माहूर जि.नांदेड)

अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन...
समज.... गैरसमज... प्रसिद्धी माध्यमे... श्रद्धा... अंधश्रद्धा आणि वास्तव अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील एका गावात गढूळ झालेल्या गावाचे आभाळ काळवंडले असताना ‘विश्वासा’ची एक ‘शीतल’ छाया गावावर पडली, या गैरसमजाची दरी चुटकीसरशी भरून निघाली आणि पुन्हा एकदा आनंदाचे निरभ्र आभाळ गावावर राज करू लागले.....

ही कहाणी आहे महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावाची. सहा महिन्यांपूर्वी गावात एक आवई उठली. जो सरपंच होतो त्याचा मृत्यू होतो. प्रसिद्धी माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी गाव गाठले आणि याची रंजक बातमी केली. पुढे नियमाप्रमाणे निवडणूक लागली आणि सरपंचपदी युवा महिला शीतल विश्वास राजपुरे या विराजमान झाल्या आणि या बातमीला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाली. सारी प्रसिद्धी माध्यमे राजपुरीकडे वळली आणि गावाच्या या समज... गैरसमज... श्रद्धा... अंधश्रद्धा.. आणि सत्य, वास्तव यांच्या पलीकडचे वातावरण निर्माण झाले. गावातील सर्वजण सैरभैर झाले. परंतु या साऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उभ्या ठाकल्या नवख्या सरपंच शीतल राजपुरे. त्यांनी हा पारंपरिक गैरसमज खोडून काढण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवले आणि सर्व परिस्थितीला त्या एकाकीपणे तोंड देऊ लागल्या. त्यांच्या बोलण्यातून हा निर्धार अगदी पक्का दिसत होता.

महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी हे गाव जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे आणि पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य रुपालीताई राजपुरे यांचे गाव... या दोघांनी विविध नवनव्या योजना गावात राबवून गावाला एका सर्वोच्च बिंदूवर नेऊन ठेवले. कार्तिकस्वामी यांची पुरातन गुहा हे या गावचे अनोखे वैशिष्ट्य आहे. पाचगणीपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर असूनही पर्जन्यमान खूपच कमी असल्याने या गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते. गावाने एकत्र बसून व वार्षिक यात्रोत्सव रद्द करून याचा सर्व खर्च, वर्गणी गोळा केली. त्याला श्रमदानाची जोड देत डोंगर पायथ्याशी असणाऱ्या वाई तालुक्यातील नागेवाडी धरणाच्या कुशीत गावाने जागा घेऊन तेथे विहीर काढली. त्यातून नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने पाणी उचलून सुमारे १२ किलोमीटर उंचावर डोंगर माथ्यावर गावात आणले आहे. ही योजना राबवून जिल्ह्याला एक वेगळी दिशा या गावाने दिली आहे. 

शीतल राजपुरे यांनी सांगितले, ‘गाव बदलाच्या प्रक्रियेत खूप टोकावर गेले असताना आम्हाला समज आणि गैरसमजाच्या वेगळ्याच समस्येने घेरले होते. प्रसिद्धी माध्यमे गावाकडे धाव घेत होती, आमच्या उत्तरांनी त्यांचे समाधान होत नव्हते. मी नवखीच असल्याने आणि महिला असल्याने काही मर्यादा होत्या. पण मी आमच्या राजूदादांबरोबर बोलले आणि गावाच्या या सर्व परिस्थितीची चर्चा केली. आव्हान मोठे होते, पण मी धडाडीने पार करण्याचा निर्धार केला. ‘सरपंचपद स्वीकारल्यानंतर मृत्यू होतो!’ या नुसत्या अफवा... समज...की गैरसमज हे चक्रव्यूह मला फोडायचे होते. पदावर असतानाच मृत्यू होतो, असा समज या गावातील ग्रामस्थांमध्ये ठासून भरला असल्याचे प्रसिद्ध होताच मी थोडी माहिती घेतली. आधीच्या काही घटनांशी त्या बातमीचा संबंध जोडला जात असल्याचे माझ्या लक्षात आले. मला तरी या बातमीत कसलेच तथ्य वाटत नाही. लक्ष्मी विलास राजपुरे या पाच वर्षे सरपंच होत्या आणि काही वेळा आरक्षित जागा रिक्त असल्याने सरपंचपद रिक्त राहिले होते. त्यामुळे या घटनेशी जोडले गेलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे मला जाणवत असल्याचे मतही सरपंच शीतल राजपुरे यांनी बोलताना व्यक्त केले.

त्या पुढे म्हणतात, ‘गावात सुशिक्षित युवक, व्यापारी, उद्योजक मोठ्या प्रमाणात असून गावात आत्तापर्यंत अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नसल्याचे मी पाहिले आहे. त्यामुळे या घटनांची एकमेकांची जोड देऊन गावाची कुठेतरी बदनामी होत असल्याचे मला वाटते आहे. असे असले तरी या घटनांवर बोलायला मी मोठी अभ्यासू अथवा इत्थंभूत माहिती असणारी व्यक्ती नसून गावातील जबाबदार लोक यावर काम करीत आहेत. त्यामुळे या उठलेल्या आवईचा मी सरपंच म्हणून बीमोड करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटपर्यंत झटणार आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, समज, गैरसमज याच्या पलीकडे जाऊन मी काम करण्याचा निर्धार केला आहे, एवढे मात्र निश्चित.

- रविकांत बेलोशे, भिलार (पाचगणी)

संबंधित बातम्या