डिजिटल सखी

दीपा कदम
सोमवार, 8 मार्च 2021

कव्हर स्टोरी

त्या दुर्गम भागात चार पाच किलोमीटरच्या परिसरात असलेल्या वाड्या, पाड्यांपर्यंत चेतना भगत सायकलवरून चालती फिरती बॅंक घेऊन जातात. बायांच्या अंगणात उभं राहून त्यांना त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढून देण्यापासून अकाऊंटवर पैसे जमा करण्याचे व्यवहार चेतना प्रत्येकीच्या दारात जाऊन करून देतात.

शहरांमध्ये प्रत्येक चौकाचौकात असणाऱ्या बॅंक आणि एटीएममुळे खात्यातून कोणत्याही वेळेला पैसे काढणे, किंवा मोबाईलवरूनच बॅंकेचे व्यवहार करणाऱ्या शहरी किंवा निमशहरी भागात राहणाऱ्यांना मंडळींसाठी खात्यातून पैसे काढणे हा अजिबातच कौतुकाचा विषय राहिलेला नाही. मात्र ज्या गावांपासून बॅंक वीस ते पंचवीस किलोमीटरवर असते अशा गावातल्या लोकांसाठी बॅंकेच्या वेळेत जाऊन पैसे काढणं हे एक मोठे दिव्यच असते. जीवाचा आटापिटा करून बॅंकेपर्यंत पोहोचल्यावर बॅंकच बंद झालेली असते किंवा बॅंकेतला सर्व्हर डाऊन असतो. बॅंकेच्या शेजारीच असलेल्या एटीएममध्ये पैसे नसतात किंवा एटीएममध्ये मशिनच बंद असतं. खात्यात जमा होणारे कुठल्या तरी सबसिडीचे पाचशे रुपये जमा झाले असतील तर तेल मिठासाठी काढावेत एव्हढ्यासाठीच खटाटोप करत तालुक्यापर्यंतच्या बॅंकेपर्यंत दूरवरच्या गावातून लोकं पोहोचतात. 

तालुक्यापर्यंत पोहोचायलाच खिशाला शंभर रुपयांचा खार लागतो. महाराष्ट्रातल्या गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये बॅंक आणि एटीएमची संख्या खूप कमी आहे. या जिल्ह्यांतल्या दुर्गम आणि नक्षल क्षेत्रात तर बॅंक आणि एटीएमपर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी किलोमीटर प्रवास करून पोहोचावे लागते. अशा दुर्गम भागात दिवसातल्या कोणत्याही वेळेला बॅंक अंगणात येऊन उभी राहत असेल तर त्या घराला झालेला आनंद काय वर्णावा. खेडेगावात राहणाऱ्या एकट्या दुकट्या ज्येष्ठांचे याबाबतीतले हाल तर यापेक्षा वाईट असतात. बॅंकेत पैसे असतात पण हातात नसतात. कधीतरी गावाला येणाऱ्या मुलाने ठेवलेले पैसे संपलेले असते. पूर्वी पोस्टमन मनीऑर्डर घेऊन यायचा तेव्हा अशा आजीआजोबांची सोय व्हायची. दुर्गम खेडेगावातील ही अडचण ओळखून महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) अंगणापर्यंत पोहोचणाऱ्या बॅंकेची कल्पना साकारली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून पैसे गोळा करणे, बॅंकेतून कर्ज घेणे, व्यवसाय उभारणे आणि कर्ज फेडणे हे तर महिला स्वतः करतातच आहेत. ‘डिजिटल सखी’च्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने आर्थिक व्यवहार होतील. ‘डिजिटल सखी’ महिलांना डिजिटल साक्षर व्हायला मदत करेल. अजून नवीन माध्यमे त्यांच्यासाठी खुली होतील, माविमच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ सांगतात.

‘मावीम’ने दुर्गम भागात चेतना भगत यांच्या सारख्या पन्नास डिजिटल सखींना प्रशिक्षण देवून तयार केलं आहे. किमान बारावीपर्यंत शिक्षण अशी अट डिजिटल सखीच्या या प्रशिक्षणासाठी होती. या डिजिटल सखी स्वतःही दुर्गम भागात राहतात आणि आजूबाजूच्या काही गावांपर्यंत सायकलवरून पोहोचून गावातील लोकांची बॅंकांची कामे करून देतात. बँक खातेदारांच्या खात्यांतून पैसे काढणे, खात्यात पैसे भरणे किंवा कर्जाचे हफ्ते भरण्यासारखी काम या डिजिटल सखी करतात. दर महिन्याला ५० हजार पासून २५ लाखापर्यंतची उलाढाल या डिजिटल सखी करत असतात. 

दर महिन्याला २५ लाखापर्यंतची उलाढाल करणाऱ्या चेतना भगत गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील झालीया गावात राहतात. झालीया सोबतच साकरीतोला, गोंदितोला या गावांमध्ये त्या चालती फिरती बॅंक घेऊन जातात. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव सांगताना चेतना भगत सांगतात, गावागावात फिरून स्वॅप मशिनद्वारे पैशाची देवाण घेवाण करणे जोखमीचं काम होतं. सुरुवातीला कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. त्यांच्या खात्याच्या सुरक्षिततेबाबतही लोकांना प्रश्न पडत असत. पण हा सर्व व्यवहार सुरक्षित आहे याची खात्री पटल्यावर मात्र लोकं आता फोन करून बोलावतात, वाट पाहतात. एमएपर्यंत शिक्षण झालेल्या चेतना यांना खेडेगावांमध्ये नोकरीच्या संधीही कमी होत्या. ‘महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘माविम’पर्यंत पोहोचले. बॅंकेच्या व्यवहारांचं प्रशिक्षण घेतलं. स्वॅप मशिन वापरून हे व्यवहार सुरक्षित पद्धतीने करता येतात. त्यांच्या दारापर्यंत बॅंक पोहोचल्याने विशेष करून महिला स्वतः त्यामध्ये लक्ष घालतात. गावातच बकरी विकून आलेल्या पैशातले निदान पाचशे रुपये तरी खात्यात साठवू लागल्या आहेत. आवश्यकता असेल तेव्हा पैसे मिळण्याची खात्री त्यांना वाटू लागली आहे,’ असं सांगताना कर्जाचे हप्ते थकत नाहीत हा या योजनेचा ठळक फायदाही चेतना आवर्जून सांगतात

‘माविम’ने पन्नास महिलांना डिजिटल सखीचे प्रशिक्षण दिले होते. त्यापैकी दहा महिलांना मात्र सध्या नेटवर्कची खूपच अडचण येत आहे. काही गावांमध्ये कोणतंच नेटवर्क मिळत नसल्याने फक्त या दहा जणींना हे व्यवहार करताना अडचण येत आहे. बाकीच्या चाळीस जणींना गावांमधून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

पूर्वी गावांमध्ये मनीऑर्डर घेऊन येणाऱ्या पोस्टमनची वाट पाहिली जायची. गावाखेड्यात प्रवास करून एसटीने किंवा सायकलने जाऊन मनीऑर्डर पोहोचवणाऱ्या पोस्टमनची जागा आता डिजिटल सखीने घेतली आहे. पोस्टमनचं हे आधुनिक व्हर्जन आहे. पोस्टमन मनीऑर्डर घेऊन यायचा, पण ही डिजिटल सखी सायकलवरुन पोहोचते, ती आख्खं बॅंक खाते घेऊनच.

संबंधित बातम्या