भारतीय महिलांच्या आरोग्यसमस्या

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 8 मार्च 2021

कव्हर स्टोरी

स्त्रियांच्या आरोग्यसमस्यांचा विचार केला तर त्यात मानवी समाजाला ग्रासणाऱ्या अनेक आजारांसमवेतच स्त्रियांच्या निसर्गतः असलेल्या शारीरिक वेगळेपणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचा समावेश होतो. जगभरातल्या सर्व मानवी समाजात स्त्री-पुरुष लिंगभेद आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे स्त्रियांचे आजार आणि त्यावरील उपचार दुर्लक्षित राहतात आणि व्यापक रूप धारण करतात.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे सक्षमीकरण अशा अनेक बाबतीत सामाजिक जागृती आणि कायदेशीर बदल होऊ लागले. परिणामतः स्त्रियांच्या आरोग्यसमस्यांचा शासकीय पातळीवर, जागतिक स्वरूपात विचार होऊ लागला.      

जगभरात गेल्या १०-१५ वर्षांत महिलांच्या आरोग्याकडे सरकारने आणि आरोग्य खात्याने विशेष लक्ष दिले आहे. शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या आपल्या सर्वांच्याच जीवनशैलीतील बदल आणि पर्यावरणीय बदलामुळे निर्माण झालेल्या असंख्य आजारांची संख्या वाढती असल्याने, ‘लवकर निदान, लवकर उपचार’ हा दृष्टिकोन अवलंबिणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय महिलांच्या जीवनातील महत्त्वाच्या अकरा आरोग्यविषयक समस्यांचा विचार करणे जरुरीचे वाटते. 

कर्करोग 
भारतीय महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, प्रत्येक बारापैकी एका महिलेला कर्करोग होण्याची शक्यता असते. विशेषतः मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमध्ये हा आजार सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात आढळतो. भारतीय स्त्रियांत दोन प्रकारचे कर्करोग प्रामुख्याने आढळतात, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर). भारतात दरवर्षी अंदाजे १ लाख ८० हजार स्त्रियांना स्तनाचा आणि १ लाख ४० हजार स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. दोन्ही कर्करोगांमध्ये आजाराच्या सुरुवातीलाच निदान झाल्यास ते पूर्ण बरे होण्याची शक्यता चांगली असते. त्यासाठी चाळीशीतल्या महिलांच्या दरवर्षी चाचण्या होणे गरजेचे आहे. मॅमोग्राफीमध्ये स्तनाचा आणि पॅप स्मीअरच्या चाचणीत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पहिल्या टप्प्यात शोधला जातो. 

ग्रामीण आणि निम-शहरी भागात या तपासण्यांच्या सोयी नसतात आणि अपवाद वगळता शहरातील सुशिक्षित स्त्रिया सोय असूनही तपासणी करून घेण्यात हयगय करतात. साहजिकच या आजारांचे निदान नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात होते. परिणामतः हे दोन्ही कर्करोगांच्या बाबतीत, आजाराने गंभीर आणि प्राणघातक स्वरूप धारण झाल्यावरच भारतीय स्त्रिया निदानासाठी डॉक्टरांकडे जातात. आई, बहीण किंवा रक्ताच्या नात्यातील स्त्रीला हे कर्करोग होऊन गेले असतील, अशा महिलांनी वयाच्या तिशीपासूनच या आजारांसाठी चाचण्या कराव्यात. 

हृदयविकार
भारतीय महिलांमध्ये हृदयरोगदेखील चिंतेचा विषय मानला जातो. हृदयरोग होण्याची शक्यता स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असली तरी रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असते. भारतीय स्त्रिया याबाबतीत काहीशा अनभिज्ञ असल्याने, या काळात हृदयाच्या चाचण्या करून घेणे आणि प्रतिबंधक उपाय करणे अशा गोष्टी घडत नाहीत. परिणामतः हृदयविकाराचा झटका येऊन दगावण्याचे प्रमाण स्त्रियांत जास्त आढळते. लहानपणापासूनच समतोल आहार, नियमित व्यायाम आणि योग्य वेळी विश्रांती, तसेच धूम्रपान, तंबाखू सेवन न करणे, नियमित तपासण्या करून घेणे या गोष्टींची जागृती भारतीय स्त्रियांमध्ये होणे आवश्यक आहे. 

मातृआरोग्य
गेल्या दहा-पंधरा वर्षांत गरोदर स्त्रियांच्या प्रसूतिपूर्व काळजीबाबत विशेष प्रयत्न केले जात आहेत. तरीही काही परंपरागत गोष्टींमुळे मातृआरोग्यात हवी तेवढी सुधारणा होत नाहीये आणि प्रसूती दरम्यान होणाऱ्या माता आणि बालकांच्या मृत्यूत आवश्यक तेवढी घट होताना दिसत नाही. याबाबतच्या समस्यांत दिवस राहिल्यापासून प्रसूतितज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जात नाही. अजूनही अनेक ठिकाणी सातव्या महिन्यात प्रसूतीसाठी नाव नोंदवायचे अशीच धारणा आहे. त्यामुळे गरोदरपणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत, त्या स्त्रीच्या योग्य पोषणाची योग्य काळजी घेतली जात नाही, तिच्या पोटातल्या बाळाची वाढ कितपत झाली आहे हे पहिले जात नाही, आवश्यक ती लसीकरणे होत नाहीत. या काराणांमुळे अॅनिमिक माता, कमी वजनाची अर्भके, अपुऱ्या दिवसातली प्रसूती, अचानक गर्भपात, प्रसूतीदरम्यान रक्तस्राव, प्रसूतिपश्चात इतर गुंतागुंतीचे विकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात होतात. यामुळेच प्रसूतिपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतिपश्चात मृत्यूचे प्रमाण आजही जागतिक मानकांप्रमाणे कमी करण्यात भारताला यश आलेले नाही.

गर्भधारणेपूर्वी आणि नंतरच्या काळात जंतुसंसर्ग आणि गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. गर्भधारणेच्या संपूर्ण नऊ महिन्यांदरम्यान मातृ काळजीत निरोगी जीवन जगणे समाविष्ट असते.

छोट्या शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये, इतर आजारांपेक्षा जास्त महिला गरोदरपणात अपुऱ्या आरोग्यसेवेमुळे मृत्युमुखी पडतात.. अशा रोगप्रवण भागांत अधिक वैद्यकीय केंद्रे सुरू झाल्याने आणि मातृआरोग्याविषयी वाढती जागरूकता असल्यामुळे ही संख्या मागील दशकांच्या तुलनेत कमी भीतीदायक आहे.

मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत भारतामध्ये वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणांनुसार पुरुषांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांना या समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. मानसिक आरोग्यामध्ये नैराश्य, चिंता, निद्रानाश, उच्च रक्तदाब आणि हार्मोनल समस्या समाविष्ट आहेत. जीवनातील काही मोठ्या शोकांतिका, अत्याचार, फसवणूक, रजोनिवृत्ती, प्रसूतिपश्चात येणारे नैराश्य, नोकरीमधील लिंगभेद आणि लैंगिक शोषण तसेच सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ लेखले जाणे, शिक्षण, नोकरी, कौटुंबिक व्यवहार यामध्ये दुय्यम स्थान देऊन डावलले जाणे अशा कारणांमुळे स्रियांच्या मानसिक आरोग्याला धक्का पोचतो असे या सर्वेक्षणांचे संशोधनात्मक विश्लेषण केल्यावर लक्षात आले आहे. यामुळे चिंता, नैराश्य, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, न्युरोसिस, हिस्टेरिकल वागणे, स्किझोफ्रेनिया अशा आजारांनी त्रस्त होणाऱ्या स्त्रियांची संख्या खूप वाढते आहे. यात भर म्हणून मानसिक आजारांची लक्षणे दिसूनही कुटुंबाकडून त्याची दखल घेतली जाऊन मानसोपचार करून घेण्याची तयारी खूपच कमी वेळा आढळून येते. जवळपास ७० टक्के स्त्रिया मानसोपचार आणि समुपदेशन टाळतात, असे दिसून येते. मात्र भारतात आता हळूहळू नैराश्य आणि इतर आजारांनी ग्रासलेल्या स्त्रियांवरील उपचारासाठी अधिकाधिक सोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. आजच्या सुशिक्षित तरुणींमध्ये त्याबाबत सकारात्मक भूमिका निर्माण होत आहे.  

लैंगिक आजार 
असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्स, सिफिलिस, गोनोरियासारखे आजार संक्रमित होतात. त्याचप्रमाणे हिपॅटायटिस बी आणि इतर काही आजारांचासुद्धा संसर्ग होतो. मात्र दुर्दैवाने, पुरुषांच्या असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होणाऱ्या या रोगांचा त्रास संख्यात्मक तुलनेत स्त्रियांना जास्त प्रमाणात सहन करावा लागतो.  

स्थूलत्व
हा आजारही पुरुषांमधे जास्त प्रमाणात आढळला तरी स्त्रियांमध्येही याचे प्रमाण जास्त आहे. व्यायामाचा अभाव, चौरस आहार न मिळणे, बाळंतपणानंतर सव्वा महिना सक्तीची विश्रांती आणि तेलातुपाचा भर असलेले विशेष खाद्य यामुळे बहुसंख्य स्त्रियांमध्ये वजनवाढ होते आणि ती आयुष्यभर वाढतच जाते. रजोनिवृत्तीनंतर वजनवाढ जास्त होते. थायरॉईड हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होणारा हायपोथायरॉयडिझम हा वजनवाढीस कारणीभूत ठरणारा आजारही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अतिरेकी वजनवाढीमुळे होणारे उच्च रक्तदाब, हृदयविकार, टाइप-२ मधुमेह, हाडे ठिसूळ होणे असे आजार स्त्रियांना जास्त प्रमाणात होतात. आजच्या नव्या पिढीतील धूम्रपान, मद्यपान, यासारख्या गोष्टींमुळे यामध्ये आणखी आजारांची भर पडते.

अॅनिमिया
अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ऐंशी टक्क्याहून अधिक भारतीय स्त्रियांमध्ये आढळते. आहारात लोह, जीवनसत्वे आणि प्रथिनांची कमतरता ही याची मुख्य कारणे. अनेकवेळा सडपातळ आणि बारीक दिसण्याच्या हव्यासामुळे अतिशय कमी आहार घेण्याची प्रवृत्ती असते. पण त्यामुळे या मुली, स्त्रिया अॅनिमिक बनतात. लोह कमी असल्याने हिमोग्लोबिन कमी होते, लाल रक्तपेशी कमी होतात. रक्तातील हिमोग्लोबिनच्या अल्पपातळीमुळे शरीराच्या हालचालीसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे अशा स्त्रियांना कमालीचा थकवा येतो तसेच अशक्तपणा जाणवतो. त्यांच्या मासिक पाळीवरदेखील परिणाम होतो. 

स्वयंप्रतिकार रोग
सर्वसाधारणपणे, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत असते. तथापि, त्या स्वयंप्रतिकार रोगास अधिक बळी पडतात. हे आजारांचा असा एक गट असतो ज्यात शरीरातील प्रतिकारप्रणाली (इम्युन सिस्टीम) आपल्याच शरीरातील काही विशिष्ट पेशी किंवा पेशीसमूहांना निकामी करत जाते. 

या आजारात निद्रानाश, सतत चिडचिड होणे, वजन घटणे, सतत घाम येणे, केस पातळ होणे, स्नायूंची कमजोरी, मासिक पाळीच्या काळात कमी रक्तस्राव होणे, डोळे मोठे होणे, हातांची थरथर होणे अशी लक्षणे दिसू शकतात. या प्रकारच्या आजारांमध्ये- टाइप-१ मधुमेह, ऱ्हुमॅटॉइड संधिवात, सोरियासिस, मल्टिपल स्क्लेरोसिस, सिस्टेमिक ल्युपस एरीदिमॅटोसिस, अॅडिसन्स डिसीज असे अनेकविध प्रकार येतात. यांच्याबाबत एकुणातच जनजागृती खूप कमी आहे. त्यामुळे याचे उपचार मोठ्या प्रमाणावर होत नाहीत.  

योनीमार्गाचे आजार
योनीमार्गाला खाज सुटणे, सूज येणे, श्वेतपदर असे योनीमार्गाचे आजार बहुसंख्य स्त्रियांना होत असतात, पण तरीही ते दुर्लक्षित असतात. रोगजंतूंचे संक्रमण, अयोग्य, अस्वच्छ अंतर्वस्त्रे, लैंगिक क्रिया किंवा दीर्घकालीन आजारामुळे वैयक्तिक स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष ही याची करणे असतात.

मासिक पाळीआधी होणाऱ्या वेदना
बहुसंख्य स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा पाळीदरम्यान पायात पेटके येणे, पोट दुखणे, कंबर दुखणे, खूप थकवा येणे असे त्रास जाणवतात. यात मन अस्वस्थ राहणे, उदासीनता येणे असे मानसिक त्रासही जाणवतात. 

पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी)
गैरवर्तन करणारा जोडीदार, पुरुष मित्रांशी दुरावलेली रिलेशन्स, लैंगिक आणि मानसिक अत्याचार अशा घटनांमुळे असंख्य भारतीय महिलांना हा त्रास होतो. यामुळे दीर्घकाळ टिकणारे मानसिक परिणाम तर होतातच, पण लैंगिक रोग किंवा जंतूंचे संक्रमण, नको असलेली गरोदरावस्था, प्रसूतीतील गुंतागुंत असे ही त्रास होतात.

संबंधित बातम्या