'पिटर द ग्रेट'चा रशिया...

कॅप्टन निलेश गायकवाड
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

भारतीय संदर्भात पुन्हा एकदा रशिया हा देश महत्त्वाचा ठरू लागला आहे. मुळात युद्धखोर स्वभाव असला, तरीही भारताच्या संदर्भात कायमच मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचा या देशाचा प्रयत्न राहिलेला आहे. रशियावर अमेरिका, चीन ही बडी राष्ट्रे खार खाऊन असली तरीही तंत्रज्ञान आणि सामर्थ्य या बाबतीत रशिया कुणाहीपेक्षा मागे नाही हे ते जाणून आहेत. त्यामुळे थेट रशियाच्या विरोधात जायला कुणी धजावत नाही. व्लादिमिर पुतीन यांची राजवट वादग्रस्त असली, तरीही भारताशी असणारे त्यांचे साहचर्य, मैत्रीपूर्ण मदत या गोष्टी दुर्लक्षून चालणार नाही. ताज्या घडामोडी पाहता भारतही रशियाला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. त्यामुळेच या देशाविषयी जाणून घेणे औचित्याचे ठरावे.

 रशियाचा इतिहास हा अतिशय  गुंतागुंतीचा आणि रंजक आहे. रशिया हा झारशाही देश होता. झार म्हणजे राजा. १७२१ मध्ये ‘पिटर द ग्रेट’ हा रशियाचा झार झाला आणि त्याच्या आधिपत्याखाली रशियन साम्राज्याची स्थापना झाली. पिटर हा अलेक्सिस पहिला याचा मुलगा होता. त्याने एप्रिल १६८२ पासून मृत्यू पर्यंत राज्य केले. त्यामध्ये १६९६ पर्यंत पिटरचा सावत्र भाऊ ‘इव्हान पाचवा’ हा त्याच्यासोबत होता. या दोघांनी मिळून एकत्र राज्य सांभाळले. पिटरने रशियाचे साम्राज्य युरोप आणि आशियामध्ये सर्वदूर पसरवले. त्याच बरोबर त्याने रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा प्राप्त करून दिला. या कारणास्तव रशियात आणि इतरत्र त्याचा उल्लेख ‘प्योत्र वेलिकी’ अर्थात  ‘पिटर द ग्रेट’ (महान पिटर) असा करतात. १९१४ च्या  पहिल्या  विश्वयुद्धातदेखील रशियाने अनेक देशांवर चढाई केली. पुढे १९१७ मध्ये रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोव्हिएत संघाचा उदय झाला. ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हिएत संघाची स्थापना झाली आणि २६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे १५ देशांमध्ये विघटन झाले. त्या १५ प्रजासत्ताक देशांपैकी रशिया हा एक देश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. 

रशियन साम्राज्याचा अस्त होण्यासाठी १९१७ मध्ये झालेली रशियन क्रांती कारणीभूत होती. क्रांतीपूर्व काळात रशियात झार घराण्यांची सत्ता होती. त्यामध्ये ‘रोमानोव्ह’ घराणे इ.स. १६१३ पासून ते रशियन क्रांती घडेपर्यंत, म्हणजे सुमारे तीन दशके राज्य करत होते. १९१७ मध्ये ही झारशाही लयाला गेली आणि त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबर महिन्यात रशियात दुसरी उलथापालथ झाली. त्या क्रांतीला ‘ऑक्टोबर क्रांती’ म्हणून ओळखले जाते. या दुसऱ्या क्रांतीमध्ये हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली. रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. १९१७ मध्ये लेनिन हा रशियात परतला,  तेव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरू झाले.  रशियात राज्यक्रांती घडून येण्याला कित्येक शतकांचा सामाजिक व आर्थिक इतिहास कारणीभूत आहे. १९ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत रशिया दोन सामाजिक गटात विभागला गेला होता. एकीकडे राजा (त्सार),  राणी (त्सारिना), जमीनदार,  अमीर-उमराव यांचे ऐश्वर्यसंपन्न जग, तर दुसरीकडे अज्ञानी, उपाशी,   दारिद्र्यात जखडलेली जनता.

रशिया अतिशय खडतर परिस्थितीतून जात असतानाच १९१४ मध्ये  पहिले महायुद्ध  सुरू झाले. त्यात रशियाही ओढले गेले. त्या युद्धात सहभागी होण्यासाठी रशियाजवळ लष्करी किंवा आर्थिक सामर्थ्य नव्हते. शस्त्रास्त्र, अन्नधान्य यांचा प्रचंड तुटवडा होता, दळणवळणाची साधने विकसीत झालेली नव्हती. त्यातच  जर्मनी विरूद्ध पराभव पत्करावा लागल्याने पहिले महायुद्ध संपण्याच्या सुमारास रशियात बेसुमार महागाई, आवश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा, मोठ्या प्रमाणात झालेली प्राणहानी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीस जबाबदार असलेल्या अकार्यक्षम झारशाही विरुद्ध जनप्रक्षोभ वाढत गेला. हंगामी सरकार आणि समाजवादी विचारांच्या लोकांमध्ये लवकरच मतभेद सुरू झाले. लोकांच्या परिस्थितीबद्दल हंगामी सरकारने हालचाली सुरू केल्या नसल्याने पुन्हा क्रांती होऊन रशियाचे नेतृत्व नव्या लोकांकडे देण्याची चिन्हे दिसू लागली. समाजवाद्यांच्या दबावामुळे  सायबेरियात  हद्दपारीची शिक्षा भोगणाऱ्या  जोसेफ स्टालिन  आणि रशिया बाहेर राहणाऱ्या  लेनिन,  ट्रॉट्स्की,  कामनेव्ह,  रादेक या नेत्यांना रशियात परत येता आले. हंगामी सरकार विरुद्ध लेनिनच्या नेतृत्वाने क्रांतीला जहाल वळण लागले. ताबडतोब आंतरिक युद्धबंदीची मागणी जोर धरू लागली. तसेच जमीनदार, उमराव यांच्याकडून जमिनी काढून त्या शेतकऱ्यांना वाटून देण्याच्या मागणीला समर्थन मिळू लागले. २४ ऑक्टोबर १९१७ रोजी हंगामी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव झाला. सरकारच्या साहाय्यासाठी सैन्य राजधानीत नव्हतेच, त्यामुळे फारसा प्रतिकार झालाच नाही. २४-२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री विंटर पॅलेसवर बोल्शेविक चालून गेले. २५ ऑक्टोबरच्या सकाळपासून समाजवाद्यांनी एक एक करत राजवाडा, लष्कर, पोस्ट व तार घर, रेल्वे, बँक, शासकीय कार्यालये आपल्या ताब्यात घेतले. २६ ऑक्टोबरला समाजवादी पक्षाचे सरकार अधिकृतपणे स्थापन झाले. लेनिन अध्यक्ष पदावर विराजमान झाले, परराष्ट्रमंत्री म्हणून ट्रॉट्स्की, शिक्षणमंत्री म्हणून लुनाचरस्की,  गृहमंत्री म्हणून रिकोव्ह तर अल्पसंख्याक गटांचे/देशांचे मंत्री म्हणून स्टालिन यांनी कार्यभार सांभाळला... आणि सोव्हियेत राजवटीला सुरुवात झाली.

रशिया हा देश आशिया आणि युरोप खंडात वसलेला देश आहे. तो युरेशिया खंडातील देश म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वांत मोठा देश आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा नववा भाग केवळ रशियाने व्यापला आहे. १९ व्या शतकाच्या अखेरीस रशियाकडे २२,४००,००० चौ. किमी. इतकी जमीन होती. आज मितीला रशियाचे एकूण क्षेत्रफळ १७,०७५,४०० चौ. किमी. इतके आहे.

 युरोप आणि आशियामधील एकूण १४ देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत. नॉर्वे, फिनलंड, एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, बेलारूस, युक्रेन, जॉर्जिया, अजरबैजान, कजाकिस्तान, चीन, मंगोलिया आणि उत्तर कोरिया हे ते देश आहेत. रशियाच्या सीमेची एकूण लांबी ५८.६ हजार किमी असून त्यांपैकी केवळ १४.३ हजार किमी जमिनीलगत, तर ४४.३ हजार किमी समुद्राला लागून आहे. उत्तरेस आर्टिक समुद्रापासून दक्षिणेस काळ्या समुद्रापर्यंत युरोपातील रशिया पसरलेला आहे. आशियातील रशियाचे कॉकेशिया,  सैबेरिया व रशियन तुर्कस्तान असे तीन भाग पडतात. महायुद्धापूर्वी युरोपातील रशियाची लांबी व रुंदी सारखीच (१६०० मैल) होती. जमिनीचा पृष्ठभाग ५०० ते ९०० फूट उंचीचा आहे. मधूनमधून नद्यांची मोठमोठी खोरी आहेत. यात कार्पेथियन,  क्रीमियन,  काकेशस,  युरल इत्यादी पर्वत आहेत. देशाभोवती बरीच आखाते असून त्यात बरीचशी बेटे आहेत.

रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठा देश असला, तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. ती साधारण १५ कोटींच्या घरात आहे. त्यातील ही बहुतांश लोकवस्ती ही देशाच्या पश्चिम भागात, म्हणजे युरोपच्या जवळपास एकवटली आहे.

पाषाणयुगातील अवशेष रशियामध्ये मुळीच सापडत नाहीत. अलीकडे पोलंडमध्ये काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. परंतु, सरोवरांच्या प्रदेशांमध्ये व इतर ठिकाणी प्रास्तरयुगानंतरचे अवशेष बऱ्याच विपुल प्रमाणात आढळतात. रशियन भागांमध्ये हजारो निरनिराळ्या जातींनी देशांतर करून तेथे वस्ती केली होती. त्यांच्या वेळची हजारो आयुधे, बरेचसे किल्ले, प्राचीन थडगी सापडतात. नवव्या शतकाच्या शेवटी थेट दक्षिणेपर्यंत हे लोक पसरले. बव्हंशी स्लाव्ह लोकांनी आपले वैशिष्ट्य कायम राखले आहे. जातिसंघ करून राहणे व स्वजातिबाह्य त्यांचे वैशिष्ट्य कायम राहिले आहे. रशियन मनुष्य सहसा स्थलांतर करीत नाही. आपल्या जातीचे संघ करून ते देशांतर करतात. इतर देशांत गेलेला रशियन पुरुष दुसऱ्या स्त्रीशी लग्न करू शकतो, परंतु रशियन स्त्री अशा तऱ्हेचा मिश्रविवाह करण्यास कधीही धजणार नाही. रशियन लोक ज्या लोकांमध्ये मिसळतात त्यांच्याप्रमाणे यांच्याही चालीरीती बदलत जातात.  रशियात साधारणपणे ‘मोठे रशियन’, ‘धाकटे रशियन’, ‘पांढरे रशियन’, ‘फिनिशियन’, ‘तुर्कस्तानातील तार्तार’, ‘बौद्ध’, ‘मंगोलियन’, ‘ज्यू’, ‘जर्मन’ आणि ‘लिथुआनियन’ जमातीचे लोक राहतात. ख्रिश्चन आणि निधर्मी हेदेखील इथले प्रमुख धर्म आहेत.

बुर्यातिया,  काल्मिकिया आणि  तुवाच्या  ऐतिहासिक मठांच्या परंपरांव्यतिरिक्त, बौद्ध धर्म आता अनेक जातीय रशियन धर्मांतरासह रशियामध्ये सर्वत्र पसरलेला आहे. रशियामध्ये सुमारे २० लाख बौद्ध अनुयायी आहेत,  ज्यांचे देशातील एकूण लोकसंख्येतील प्रमाण १.५% आहे. रशियातील बौद्ध धर्माचे मुख्य स्वरूप  तिबेटी बौद्ध धर्माची गोलुकपा शाखा आहे,  ज्याला अनौपचारिकरीत्या ‘पिवळी टोपी’ परंपरा म्हणून ओळखले जाते. इतर तिबेटी आणि गैर-तिबेटी शाखा अल्पसंख्याक म्हणून आहेत. तिबेटी बौद्ध धर्माचा बहुतेकदा  तिबेटशी  संबंध असला, तरी तो मंगोलियामध्ये  आणि मंगोलियामार्फत रशियामध्ये पसरला आहे.

उत्तरेकडील दलदलीच्या जागी शेतकीचा धंदा मुळीच चालत नाही. तिकडे सांबरे पकडून त्यांच्या मांसावर उदरनिर्वाह होतो. दक्षिणेकडील दलदलीच्या अरण्याच्या प्रांतांत जव,  ओट वगैरे शेतकीचा धंदा अत्यंत कष्टाने होतो. शिकार करणे व मासे धरणे ही लोकांची उपजीविकेची साधने आहेत. मध्यवर्ती प्रदेशात शेतकी हा मुख्य धंदा आहे. मुख्य धान्ये जव,  राय,  ओट आणि गहू हे आहेत. बाल्टिक प्रदेशात शेती अगदी नवीन तऱ्हेने करतात व उत्पन्नही इतर प्रांतांपेक्षा जास्त होते. गहू आणि जवस ही येथील मुख्य धान्ये आहेत. येथे बटाट्याची लागवड होते व गुरांची पैदासही चांगल्या तऱ्हेने झाली आहे. बेसारेबियात गहू,  जव,  मका, दारू, जवस,  जवसाचे तेल व फळफळावळ चांगली होते. रशियात सागवानी लाकूड फार होते. हे सागवान लाकूड तोडण्याचा आणि विकण्याचा धंदा फार मोठा आहे. येथे घोडे आणि मेंढ्या यांची पैदास भरभराटीची आहे. खनिज द्रव्याच्या बाबतींत रशिया हा फार संपन्न देश आहे. सरकारने या बाबतीत सुधारणा करण्याचे बरेच प्रयत्‍न केले आहेत. खाणीची मुख्य ठिकाणे दोन आहेत (१) उरल, एकाटेरीनोस्लाव आणि खारकोव्ह; (२) डॉन नदीच्या भोवतालचा प्रदेश उरलमधील खाणी फार जुन्या आहेत. तेथे लोखंड, कोळसा, सोने,  फ्लातिन, तांबे, मीठ आणि मौल्यवान दगड ही खनिज द्रव्ये मुख्यतः सापडतात. पिटर दी ग्रेटपासून राष्ट्रीय व्यवसाय ऊर्जितावस्थेस आणण्यासाठी रशियन सरकारचे प्रयत्‍न चालले आहेत. परराष्ट्रीय मालावर कर बसवून व पुष्कळ ठिकाणी सरकारी मदत देऊन अंशत: प्रयत्‍न केले, पण त्यांस यावे तसे यश आले नाही. ही चळवळ १८६३ पासून जोराने सुरू झाली. १८२० मध्ये यंत्रसाहाय्याने व शास्त्रीयरीत्या चालविलेले कारखाने पोलंडमध्ये स्थापन झाले. लोड्झ व वार्सामध्ये मोठमोठ्या कापसाच्या गिरण्या आहेत. लोकरीचे, रेशमाचे व कापडाचे कारखाने खेरीजकरून औषधांचे, यंत्राचे,  धातूकामाचे,  चाकू-कात्र्याचे व दारूचे पुष्कळच कारखाने सुरू आहेत.

घटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख,  तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो. ‘मॅास्को’  ही रशियाची  राजधानी व सर्वांत मोठे  शहर  आहे.  ‘रूबल’  हे रशियाचे  चलन  आहे.  रशियाचे सध्याचे  राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे आहेत.  रशियाची राजधानी मॉस्को हे एक रशियातील महत्त्वाचे आणि मोठे शहर आहे. त्याच बरोबर सेंट पिटर्सबर्ग हेदेखील एक महत्त्वाचे शहर आहे. सेंट पिटर्सबर्ग ही पिटरने आपल्या राज्याची राजधानी केली होती. त्याचबरोबर नोवोसिबिर्स्क, येकातेरीनबुर्ग, निज्नी नोवगोरोद, समारा, ओम्स्क, कझान, उफा, पर्म, वोरोनेझ, सारातोव यांसह साधारण ७५ मोठी शहरे रशियात आहेत.

लाल चौक 
हे  रशिया  देशातील  मॉस्को  शहराच्या मध्य भागातील एक मोठे खुले आवार आहे.  मॉस्को क्रेमलिन  हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय लाल चौकामध्येच स्थित आहे.  लाल चौकामध्ये मॉस्कोतील सर्व प्रमुख हमरस्ते जुळतात. रशियन साम्राज्य,  सोव्हियेत संघ व आजचा रशिया या महासत्तांची एक महत्त्वाची ओळख खूण मानली गेली आहे.  लाल चौकाच्या भोवतालच्या बहुतेक सर्व इमारती ऐतिहासिक आहेत. क्रेमलिन व लाल चौक १९९० पासून  युनेस्कोचे  जागतिक वारसा स्थान  आहे.

सेंट बेसिल कॅथेड्रल
हे  रशिया  देशाच्या  मॉस्को  शहरातील  लाल चौकामध्ये  स्थित असलेले एक  ऐतिहासिक  चर्च  आहे. १६५५ मध्ये तत्कालीन झार इव्हान द टेरिबलने कझान व  आस्त्राखान वर  मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी हे चर्च बांधण्याचा आदेश दिला. १२ जुलै १५६१ रोजी बांधून पूर्ण झालेले हे चर्च मॉस्को क्रेमलिनचा  भाग असून ते मॉस्कोमधील सर्वांत लोकप्रिय व प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. या चर्चची वास्तुरचना रशियामधील इमारतींपेक्षा पूर्णपणे वेगळी असून या समान रचनेची इतर एकही इमारत रशियामध्ये अस्तित्वात नाही.

सोव्हियेत संघाच्या ना स्तिकतेच्या धोरणांमुळे सोव्हियेत सरकारने १९२८ मध्ये हे चर्च ताब्यात घेतले व येथील धार्मिक कामकाज पूर्णपणे थांबवले. आजही हे चर्च रशिया सरकारच्या मालकीचे असून ते एक वस्तुसंग्रहालय म्हणून वापरले जाते. १९९० पासून ते युनेस्कोचे  जागतिक वारसा स्थान  आहे.

स्टेट हेर्मिटेज वस्तुसंग्रहालय
हे सेंट पिटर्सबर्ग येथे असलेले ‘कला आणि संस्कृती’चा वारसा जपणारे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे वस्तुसंग्रहालय आहे. याची निर्मिती १७६४ मध्ये करण्यात आली असून हे रशियन चित्रकारांच्या अनमोल चित्रांसाठी प्रसिद्ध आहे.

सेव्हीअर ऑन द स्पिल्ड ब्लड
सेंट पिटर्सबर्गमधील हे एक महत्त्वाचे चर्च असून एक प्रमुख पर्यटन स्थळदेखील आहे. १९०७ मध्ये हे चर्च बांधून पूर्ण झाले. आज या ठिकाणी एक ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय पाहायला मिळते. २६६ फूट उंच असलेले हे भव्य चर्च पर्यटकांचा आकर्षण बिंदू आहे.

विंटर पॅलेस
सेंट पिटर्सबर्गमधील हा राजवाडा रशियन सम्राटाचे वास्तव्याचे ठिकाण होते. १७३२ ते १९१७ पर्यंत, म्हणजे रशियन साम्राज्याचा पाडाव होईपर्यंत रशियन राज घराण्याचे इथे वास्तव्य होते. जवळपास १०० फूट उंच असलेला हा राजवाडा आज पर्यटन केंद्र झाला आहे.

पिटरहॉफ
रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे स्थित असलेले हे आणखी एक पर्यटन स्थळ.

बैकाल सरोवर
जगातील सर्वांत जुने आणि सर्वांत खोल असे हे सरोवर आहे. अंदाजे तीन कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकाल सरोवराची सरासरी खोली तब्बल ७४४.४ मीटर इतकी असून कमाल खोली १,६४२ मीटर इतकी आहे. हे जगातील सर्वांत खोल सरोवर मानले जाते. रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असलेल्या या सरोवरामध्ये जगातील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने बैकाल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो. बैकाल सरोवरामध्ये सुमारे १,७०० विविध प्रकारचे जंतू,  प्राणी व वनस्पती आढळतात. जानेवारी ते मे दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. या काळात सरोवरावरील बर्फाचा थर चालण्यासाठी व वाहने चालविण्यासाठी पुरेसा जाड असतो. बैकालच्या वायव्येला रशियाचे ‘ इरकुत्स्क ओब्लास्त’  व आग्नेयेला  ‘बुर्यातिया’  प्रजासत्ताक आहेत. बैकालच्या जवळजवळ सर्व बाजूंना डोंगर आहेत.  ‘सायबेरियाचा मोती’  या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले बैकाल सरोवर एक मोठे पर्यटन केंद्र असून उन्हाळ्यात येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

लदोगा सरोवर 
हे  युरोप  खंडातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे  सरोवर  आहे.  रशियाच्या  वायव्य भागात  सेंट पीटर्सबर्ग  शहराजवळ  लेनिनग्राद ओब्लास्त व कॅरेलिया  या विभागांमध्ये स्थित आहे. एकूण १७,८९१ चौरस किमी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेले लदोगा जगातील १४ व्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. रशियामधील अनेक लहान मोठ्या नद्या लदोगाला येऊन मिळतात.  नेव्हा ही नदी लदोगामधून उगम पावणारी नदी सेंट पिटर्सबर्ग  शहरामध्ये  फिनलंडच्या आखाताला  मिळते. रशियामधील अनेक कृत्रिम  कालव्यांद्वारे  बाल्टिक समुद्रापासून  लदोगा मार्गे वोल्गा नदीपर्यंत  जल वाहतूक शक्य आहे.

एल्ब्रुस पर्वत
एल्ब्रूस हा कॉकासस पर्वतरांगेमधील एक मृत ज्वालामुखी  आहे. ५,६४२ मीटर (१८,५१० फूट) उंचीचा हा पर्वत रशिया देशाच्या  कॉकेशस  भागातील जॉर्जिया  देशाजवळील  काराचाय  व काबार्दीनो-बाल्कारिया या राजकीय विभागांमध्ये स्थित असून तो युरोपमधील  सर्वांत उंच पर्वत मानला जातो.  
 

संबंधित बातम्या