एकट्यानं करावी मनमुराद भटकंती 

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

मी  औरंगाबादला असताना मला बऱ्‍याच वेळा गाइड म्हणून अजिंठा आणि वेरूळ लेण्या दाखवण्यासाठी परदेशी पर्यटकांबरोबर जावं लागायचं. औरंगाबादला गाइड म्हणून काम करताना बऱ्‍याचवेळा अगदी एकट्यानं प्रवास करणाऱ्‍या स्त्री पर्यटक असल्या, की आवर्जून त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळायची. या अशा एकट्यादुकट्यानं पर्यटनासाठी म्हणून जगभरातून आलेल्या स्त्रियांच्या बरोबर दोन दिवस घालवल्यानंतर स्वाभाविकपणे खूप गप्पा व्हायच्याच! पाश्‍चात्त्य जगतातील स्त्रिया ज्या मोकळेपणानं ‘स्वांत सुखाय’ म्हणून भटकायला बाहेर पडतात, ते पाहिलं आणि मी मनापासून ठरवलं, आपणही स्वत:च्या इच्छेनुसार आवडीच्या जागी भटकायला जायचं. प्रत्येकवेळी कुणाच्या तरी संगतीनंच प्रवास करायला हवा, असं अजिबात नाही. प्रत्येकाला आयुष्यात अनेक गोष्टींसाठी तडजोड करीत जगावं लागतं... पण कधीतरी स्वत:साठी म्हणून चार दिवसांसाठी का होईना, पण स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा असं मला वाटतं. फक्त स्वत:साठी म्हणून ते चार क्षण जगताना कदाचित ‘स्व’ला नव्यानं ओळखण्याची संधी मिळून जाते... मनात खोलवर दडून बसलेल्या अनेक गोष्टींना पुन्हा एकदा आठवण्याची संधी मिळते... त्याच्या पलीकडं जाऊन आयुष्यात न करता आलेल्या गोष्टी करण्याची हौस भागवता येते... 

बहुतेक वेळेस एकट्यानं प्रवास करायचं धाडस नसतं, म्हणून आपण तडजोड म्हणून एखाद्या ग्रुपबरोबर, एखाद्या नामांकित ट्रॅव्हल कंपनीबरोबर प्रवासाला जाण्याचा पर्याय स्वीकारतो. त्यात गैर असं काहीच नाही. कारण अशामुळं तुमचा प्रवास हा नेहमीच सुखाचा आणि कुठल्याही वाईट गोष्टींचा अडथळा न येता पार पडतो. पण ‘कधीतरी स्वत:ला हवं तसं जगायला पाहिजे,’ असं वाटणाऱ्‍यांसाठी एकट्यानं भटकंतीला जाण्यासारखा दुसरा पर्याय नाही. जेव्हा स्वतःशी संवाद साधायचा असतो, तेव्हा निसर्गाच्या स्पंदनांशी स्वतःला एकरूप करून घ्यावं लागतं...! मला वाटतं हा अनुभव घ्यायचा असेल, तर प्रत्येकानं निसर्गाशी जवळीक साधायचा प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे निसर्गाला भेटायला मोकळ्या मनानं भटकंतीसाठी घराच्या बाहेर पडायचं! आपल्या सुदैवानं आपला देश इतका सुंदर आहे, की उभा जन्म भिरभिर भटकत राहिलो, तरी संपूर्ण देश पाहून होणार नाही. आपल्या या देशात एकट्यानं प्रवासाला जाता येतील अशा अगणित निसर्गरम्य जागा आहेत; तशीच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळं आहेत. जेव्हा मनाला काही तरी वेगळं करावं अशी अव्यक्त ओढ जाणवायला लागते, तेव्हा कुणासाठीही न रेंगाळता प्रवासाला निघायची तयारी करावी असं मला मनापासून वाटतं...! 

हल्ली एकट्यानं प्रवास करण्याचा हा फंडा समाजात रुळायला लागलाय. कारण आपलं जगणं आता पूर्वीप्रमाणं साधं आणि सुखाचं राहिलं नाही. रोजच्या जीवनात अनेक गोष्टींशी तडजोड करीतच पुढची पावलं टाकावी लागतात. अगदी रोज घड्याळाच्या काट्यावर धावताना लहान लहान गोष्टींचा आनंदही हरवून जातो. खरं तर आनंद उपभोगायला वेळच मिळत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग कानकोंडं झालेल्या मनाला, रोजच्या जगण्याच्या वाटेवरील गुदमरून टाकणाऱ्‍या गर्दीतून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी जिवाची तगमग होऊन जाते. अशावेळी निसर्ग साद घालीत राहतो. हल्ली प्रत्येकाला स्वत:चं व्यवधान पाळावं लागतं. आवड सारखी असू शकते. पण जेव्हा आपल्याला आपल्या मनाचा पीळ सोडवायचा असतो, तेव्हा एकटं राहून तो सोडवण्याइतकं सुख नाही. अशावेळी सर्व पाश मागे सोडून कुठंतरी जावं असं वाटायला लागतं. मला वाटतं हा क्षण निर्णायक निर्णय घेण्याचा असतो. ‘सोलो ट्रॅव्हलिंग’ हा नवा फंडा सुरू झाला आहे, तो याच भावनेतून. हल्ली पती पत्नी दोघंही आपापल्या व्यापात पूर्णपणे दंग असतात. शिवाय आवडी-निवडीतही फरक असतोच. अशावेळी कुणाचीही वाट न पाहता बिनधास्तपणे घराबाहेर पडावं असं मला वाटतं. हल्लीच्या तरुणाईची मानसिकता या दृष्टिकोनातून बऱ्‍यापैकी बदलल्याची दिसून येते. पुरुष याबाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. कारण त्यांच्या पायाभोवती संसारातील बेड्या नसतात. हवं तेव्हा घराबाहेर पडण्यासाठी पुरुष मंडळी अर्ध्या पायावर तयार असतातच. नोकरीच्या गदारोळातून बाहेर पडण्यासाठी बायको-पोरांना सोडून मजा मारायला जाण्याचे बेत ते नेहमीच आखत असतात. पण, आता स्त्रियांनीसुद्धा पोराबाळांना नवऱ्‍यांच्या ताब्यात सोपवून निदान चारपाच दिवसांसाठी तरी एकट्यानं प्रवासासाठी बाहेर पडायची तयारी करायला हवी. अगदी थोड्या दिवसांसाठी का होईना, स्वत:साठी म्हणून बाहेरच्या जगात मोकळेपणानं भटकायला हवं आहे. याबाबतीत तरुणाईला फारसं काही सांगायची जरुरी आहे, असं अजिबात वाटत नाही. या मंडळींना स्वत:ला काय हवं आणि काय नको हे अगदी बरोबर ठाऊक असतं. आजकालची पोरं बॅकपॅक घेऊन बाहेरचं जग एकट्यानं अनुभवण्यासाठी तयार असतात. पालकांनीही त्यांना हा आनंद घेण्याची संधी नाकारू नये. 

आजकाल इंटरनेटमुळं अवघं विश्‍व इतकं जवळ आलंय, की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्‍यातून आपण घरच्यांच्या संपर्कात राहू शकतो. घरी बसून जगाच्या पाठीवर कुठं काय आहे, याची माहिती घेऊ शकतो. एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तर त्याची जय्यत तयारी घरी बसून करू शकतो. कुठं जायचं, कसं जायचं, काय पाहायचं, कुठं राहायचं या सर्व गोष्टी अगदी घरी बसून ठरवता येतात. त्यासाठी घरबसल्या इंटरनेटद्वारे सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रवासासाठी एकट्यानं बाहेर पडण्यात कुठलाही धोका आहे, असं मला वाटत नाही. काही संकट निर्माण झालंच, तर मदतीसाठी कुणीही चटकन पुढं येतं. काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नियम पाळले, तर अडचण येण्याची शक्यता राहत नाही. अगोचरपणा किंवा नको ते धाडस अशा गोष्टी टाळल्या, तर प्रवास आणि भटकंती मजेत पार पडू शकते. तरुण मंडळींनी एकट्यानं प्रवास करताना चटकन कुणावरही विश्‍वास ठेवून नसते धाडस करू नये. त्यातही तरुण मुलींनी टॅक्सी वगैरे ठरवताना नेहमी, राहात असलेल्या हॉटेलच्या मदतीनं किंवा ओळखीनं टॅक्सी ठरवायला हवी. एकटं असताना कुणाबरोबरही जाण्याचं टाळलं पाहिजे. आपण कुठं जाणार आहोत याची माहिती राहत असलेल्या हॉटेलमधील मॅनेजरला दिली पाहिजे. ज्या भागात जायचं असतं तिकडची माहिती हॉटेलमधील स्टाफकडून बाहेर पडण्यापूर्वी घेऊन मगच बाहेर पडलं पाहिजे. स्वतःबरोबर जास्तीची कॅश न ठेवता कार्डांचा वापर केला पाहिजे. मुख्य म्हणजे स्त्रियांनी अंगावर कुठलेही दागिने घालून प्रवासाला निघू नये. अगदी सोन्याचं मंगळसूत्रही घरी ठेवून निघावं. प्रवासाला गेल्यानंतर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनोळखी व्यक्तीशी गप्पा मारू नये. आपली माहिती कुणालाही देऊ नये. अनोळखी जागी पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरू नये. नदीच्या काठावर जाताना सांभाळावे. 

आजकाल बऱ्‍याच ट्रॅव्हल कंपन्या एकट्यानं प्रवास करावयाचा असल्यास आपल्याला हवी तशी प्रवासाची आयटीनरी म्हणजेच आखणी करून सर्व आरक्षण करून देतात. याला ‘कस्टमाईज्ड हॉलिडे’ असं म्हटलं जातं. आपण फक्त बॅग भरून बाहेर पडायचं धाडस करायला हवं. कस्टमाईज्ड हॉलिडे नको असल्यास बिनधास्तपणे बाहेर पडावं आणि न ठरवता त्या त्या ठिकाणी पोचल्यानंतर योग्य वाटेल तसा पुढचा प्रवास करावा. आपल्यासाठी योग्य तो पर्याय स्वत:लाच ठरवायचा असतो. उत्तर भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं जाण्यासाठी खरोखरच कुणाच्या मदतीची गरज नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास ऋषीकेश, हरिद्वार, उत्तरकाशी, गंगोत्री, गोमुख हे सर्किट करण्यासाठी आठ दिवसांची सुट्टी घेऊन आरामात घराबाहेर पडावं. गंगोत्रीपासून गोमुखाचा ट्रेक फार कठीण नाही. तरुण मंडळींना सहज एकट्यानं करता येण्यासारखा आहे. मात्र, त्यासाठी चालण्याची क्षमता हवी. गोमुखाच्या चार किमी अलीकडं असणाऱ्‍या भोजबास येथील आरक्षण हातात असावं. गंगोत्री भोजबास हा चौदा किमीचा ट्रेक करून भोजबासला मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी गोमुखाला जाऊन परत भोजबासला मुक्काम करून तिसऱ्या दिवशी गंगोत्रीला परतायचं. मस्त ट्रेकिंग होतं... थोडं अ‍ॅडव्हेंचर... थोडा हिमालय आणि शिवाय गंगामैय्याचं दर्शन...! मात्र जाता-येतानाचं ट्रेन, विमान यांचं आरक्षण करणं अपरिहार्य असतं हे ध्यानात ठेवलेलं बरं. हल्ली विमान प्रवास फार महाग राहिलेला नाही. दूरच्या अंतरासाठी विमानानं जाणं केव्हाही सोईचं असतं. वेळ वाचतो. शक्यतो हॉटेलातील खोलीचं आरक्षण केलेलं बरं. पण नसलं, तरी ऐनवेळी हॉटेल मिळतं. फक्त सामानासहित एकट्यानं धावपळ करणं वयस्क मंडळींसाठी अवघड जाऊ शकतं. चंडीगढ येथे ट्रेन अथवा विमानानं पोचल्यानंतर मनाली, मनालीच्या आजूबाजूची ठिकाणं, मनकर्णिका, शिवाय वाघाबॉर्डर अशी टूर करता येणं सहज शक्य आहे. चंडीगढवरून कालका येथून निघणारी कालका-शिमला ही छोटी ट्रेन घेऊन तुम्ही सिमला आणि आजूबाजूची पर्यटन स्थळं करू शकता. ऋषीकेश, हरिद्वार, डेहराडून, मसुरी हा पर्यायसुद्धा एकट्यानं प्रवास करण्यासाठी खूप छान आहे. जयपूर, उदयपूर, जोधपूर, राणकपूर, माऊंट अबू, रणथंबोर, बिकानेर, जैसलमेर हा प्रवासही मस्त आहे. राजस्थानइतकं सुरक्षित राज्य नाही, असं म्हणावंसं वाटतं. फार दिवस हातात नसतील, तर दिल्ली, आग्रा, फतेपूर सिक्री, तेथून जवळच असलेलं भरतपूर पक्षी अभयारण्य, सारिस्का अभयारण्य आणि जयपूर, हा प्रवासही करता येऊ शकतो. 

मला उत्तरपूर्वेतील राज्यात पुन्हा पुन्हा जायला आवडतं. एकट्यानं भटकंती करायला खूप छान वाटतं. आजही तिकडची परिस्थिती थोडीफार अशांत आहे. पण शेवटी काही गोष्टी नशिबात असतील, तर चुकत नाहीत असं म्हणावं वाटतं. त्यामुळं न घाबरता खुशाल या भागात फिरण्यासाठी जायला काहीच हरकत नाही. मात्र, एकावेळी एकदोन राज्यं एका ट्रीपमध्ये करायला काही हरकत नाही. मेघालय हे राज्य अतिशय सुंदर आहेच. संपूर्ण राज्य पाहायला आठ दिवस लागतातच. आसाम हे सर्वांत सुंदर निसर्गानं नटलेलं राज्य आहे. आसामी लोक स्वभावानं खूप छान असतात. गुवाहाटी येथे शक्यतो विमानानं जावं, म्हणजे खूप वेळ वाचतो. तिथं गेल्यानंतर ज्याला जंगलांची भटकंती करावयाची इच्छा आहे, त्याच्यासाठी खूप वेगवेगळी अभयारण्ये आहेत. काझीरंगा हे ठिकाण असं आहे, की चार दिवस निवांत राहायचं असेल, तरी आसाम टुरिझमची रिसॉर्ट्स खूप सुंदर आणि स्वस्त आहेत. काझीरंगाच्या जोडीला मानस, ओरांग, नामेरी पोबीतारा अशी राष्ट्रीय उद्याने आसाममध्ये आहेत. खुद्द गुवाहाटी शहर, माजुली, शिबसागर, तिनसुखीया, दिब्रुगढ ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. 

मध्यप्रदेशमध्ये झांसी, ग्वालियर, खजुराहो, ओरछा, बांधवगढ, जबलपूर, भेडाघाट हे सर्कल करता येण्यासारखं आहे. ओडिशामध्ये भुवनेश्‍वर, पुरी, चिल्कालेक आणि कोणार्क एकावेळी करणं सहज शक्य आहे. कर्नाटक राज्यामध्ये भटकंतीसाठी अनेक पर्याय आहेत. कारण येथे भरपूर जंगलं आणि हंपी, बदामी, ऐहोळ, पट्टडकल, बेलूर, हळेबीडू यासारखी जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट’ अशी ओळख असणारी पर्यटनस्थळेही आहेत. 

सोलो ट्रॅव्हलिंगसाठी आपल्या आजूबाजूच्या लहान लहान देशांचे अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये नेपाळ पहिल्या नंबरवर आहे. पण श्रीलंका, मालदीव, भूतान, मॉरिशस, म्यानमार या देशांत प्रवास करणं आपल्यासाठी फारसं खर्चीक नाही. तसंच एकट्यानं प्रवास करताना कुठलीही भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. मी व माझे पती सुधीर दोघांनी बँकॉक आणि व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या तीन देशांचा प्रवास पंचवीस दिवसांत पूर्ण केला. यासाठी कुठून कुठं जायचं ते ठरवलं होतं. परंतु, बहुतेक प्रवास उद्या काय करायचं हे आयत्यावेळी ठरवूनच पूर्ण केला. माहिती घ्यायची आणि पुढचं आरक्षण करायचं. असं करून आम्ही व्हिएतनामच्या हनोई शहरापासून प्रवासाला सुरुवात करून बँकॉक येथे संपवला. अतिशय स्वस्तात ही पंचवीस दिवसांची ट्रीप पूर्ण करून मजेत घरी परतलो. यामध्ये बहुतेक प्रवास विमानानं, काही ठिकाणी बसनं आणि काही ठिकाणी बोटीनं केला. जेथे आवश्यकता होती त्या ठिकाणी अर्थातच टॅक्सी वापरली होती. पण कुठंही कशाचाही त्रास झाला नाही. टर्की या देशाचा प्रवासही आम्ही उभयतांनी स्वत: प्लॅन करून अतिशय स्वस्तात आणि कुठल्याही अडचणींशिवाय पूर्ण केला. टर्कीमध्ये एकट्यानं प्रवास करणं सहज शक्य आहे. विशेष म्हणजे नेपाळ वगळता बाकी सर्व देशांमध्ये भारतीय लोकांना अतिशय आदरानं आणि सन्मानानं वागवलं जातं. सर्वांनाच आपले चित्रपट आणि आपल्या खान मंडळींचं अतिशय आकर्षण आहे. टर्की देशातील इस्तंबूल हे अतिशय देखणं शहर पाहण्यासाठी कमीतकमी सहा दिवस तरी लागतात. फारच सुंदर शहर आहे हे. टर्किश लोकही मनानं अगत्यशील आणि वागायला समंजस आहेत. तेथे काही अंतर्गत अडचणी सुरू आहेत. परंतु पर्यटनावर त्याचा काही परिणाम होत नाही. 

‘सोलो ट्रॅव्हल’ हा पर्याय काळाची गरज म्हणूनही पुढे येताना दिसत आहे. काळानुरूप बदलण्याची गरज किती आवश्यक आहे, हे यावरून आपल्या लक्षात येते. निसर्गाशी मनमोकळा रुजवात करायची इच्छा असल्यास कमी खर्चात, भरपूर स्थळं पाहायचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून, बॅकपॅकर म्हणून एकट्यानं भटकंती करायला काहीच हरकत नाही... कारण आपल्या देशात आणि देशाबाहेरही खूप काही बघण्यासारखं आहे! 

संबंधित बातम्या