असा होईल प्रवास सोईस्कर... 

ज्योती बागल
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

पर्यटन हे देशी असो की विदेशी, ते नेहमीच आनंद देणारे असते. पण या आनंदात कशामुळे बाधा येईल काही सांगता येत नाही. अशावेळी आपण आपल्या परीने योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. त्यासाठी आपण ज्या ठिकाण पर्यटनाला जाणार आहोत त्या ठिकाणांची सविस्तर माहिती घेऊन जाणे सोईस्कर ठरते... अलीकडच्या काळात देशातीलच काय पण परदेशातील कोणत्याही ठिकाणची माहिती आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते ती इंटरनेट आणि वेगवेगळ्या वेबसाइट्सच्या माध्यमातून. 

'ट्रिप अडव्हायझर' च्या https:www.tripadvisor.in या वेबसाइटवर जगभरातील पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती मिळू शकते. त्यावर 'थिंग्स टू डू'ची लिंक दिली आहे. त्या लिंकवरच्या सर्चबरमध्ये आपल्याला पाहिजे त्या शहराचे नाव टाकल्यावर त्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांची माहिती येते. त्यामध्ये तेथील निसर्गरम्य ठिकाणे, किल्ले, राजवाडे, डोंगर, धार्मिक स्थळे, बागबगीचे अशा बऱ्याच ठिकाणांची माहिती मिळते. त्या लिस्टमध्ये दिलेल्या प्रत्येक स्थळाचे फोटो, पत्ते, संपर्क क्रमांक, त्या ठिकाणच्या वेळा इत्यादींची सविस्तर माहिती मिळते. Trip Advisor Hotels Restaurants हे अॅपदेखील उपलब्ध असून त्याचा उपयोग पण आपली ट्रिप सुकर करण्यासाठी चांगल्याप्रकारे होऊ शकतो.

पर्यटनासाठी बाहेर पडायचे म्हटल्यावर किमान काही दिवसांचा प्रवास असतो. त्यासाठी अनेक गोष्टींची यादी करावी लागते. त्यामध्ये बरोबर न्यायच्या वस्तू आणि तिकडून आणायच्या काही वस्तूदेखील असतात. अशावेळी त्या त्या गोष्टींची यादी केली, तर गोष्टी लक्षात ठेवणे सोपे जाते. यावेळी 'गुगल कीप' सारखे अॅप उपयोगी पडते. यामध्ये प्रत्येक नव्या फाईलला शीर्षक देऊन त्याखाली वेगवेगळ्या याद्या आपण करू शकतो. जसे की, औषधांची यादी, महत्त्वाची कागदपत्रे असे बरेच काही. ही यादी गरजेनुसार एडिटही करता येते.

ट्रिपोसो हे स्मार्ट ट्रॅव्हल कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. जिथे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांची माहिती नकाशा आणि त्याच्या दिशांसह पुरवते. फक्त याचा वापर करण्यासाठी आपल्याला हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इंस्टॉल करणे गरजेचे असते. यामध्ये आफ्रिका, आशिया, युरोप असे टॅब दिलेले आहेत. यावर येणारी सर्व माहिती थेट विकीट्रॅव्हल आणि विकिपीडियावरून घेतली जाते. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अॅप ऑफलाइनदेखील वापरता येते. https://www.triposo.com/travelguide या संकेतस्थळावरून वरीलप्रमाणे माहिती मिळवता येते.

'मॅप्स ऑफ इंडिया'च्या वेबसाईटवर भारतातील विविध पर्यटन स्थळांची बहुतांश माहिती उपलब्ध आहे. यामध्ये त्या ठिकाणची माहिती, तेथील प्रेक्षणीय स्थळे, तिथे जाणारे रस्ते, हॉटेल्सची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती दिली आहे. www.mapsofindia.com या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला वरीलपैकी हवी ती माहिती मिळवता येते.

'गुगल मॅप' चा वापर आपण फक्त लांबच्या प्रवासातच नाही, तर अगदी रोजच्या आणि जवळच्या प्रवासातही करू शकतो. फक्त यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागते. पण हेच मॅप्स आपण सेव्ह करून ऑफलाइन असतानादेखील वापरू शकतो. ठरावीक ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नसतानासुद्धा यावरून नकाशा दाखवला जातो. त्यामुळे ठरलेल्या ठिकाणी पोचणे सोयीचे होते. https://www.google.com/maps या संकेतस्थळावर जाऊन हव्या त्या ठिकाणचा मॅप बघता येतो. 

जर लांबचा प्रवास असेल, तर प्रवासात आपला खूप वेळ जाणार असतो. अशावेळी आपल्यासोबत बोलायला प्रत्येकवेळी कोणी असेलच असे नाही. शिवाय आपल्याबरोबर पुस्तके घेऊन बॅगचे किंवा सामानाचे वजन वाढवणे आपल्यालाच त्रासदायक ठरू शकते. अशावेळी 'पॉकेट'सारखी अॅप्स उपयोगी पडतात. ऑफलाईन रिडींगसाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. पण त्यातल्या त्यात पॉकेट हे उत्तम आहे. यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे वाचनीय लेख, साहित्य किंवा इतर महत्त्वाची माहिती, बुकिंग डिटेल्स हे सगळे ठेवू शकता. यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज लागत नाही.

अफार हे एक ट्रॅव्हल गाईड मॅगझिन असून त्यांनी अफार या नावानेच अलीकडे एक अॅप देखील उपलब्ध केले आहे. https://www.afar.com/travel-guides या अॅपचा उपयोग आपली ट्रीप संस्मरणीय करण्यासाठी होऊ शकतो. यामध्ये अनेक वेबसाईट आणि लोकेशन्स सेव्ह करून ठेवता येतात. हेच आपण नंतर ऑफलाइनदेखील वापरू शकतो. यावर ज्यांनी ज्यांनी हे अॅप आधी वापरले आहे, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले दिसतात. ज्यावरून आपण ठरवू शकतो, की हे अॅप वापरायचे की नाही. तसेच आपण आपल्या ट्रिपचे फोटो आणि आपलेही अनुभव इथे शेअर करू शकतो. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती मिळवू शकता. ज्यामध्ये तुमच्या ठिकाणापासून त्या ठिकाणाचे अंतर आणि तिथे जाण्यासाठी प्रवासाला लागणारे दिवस यांचीदेखील माहिती मिळते.

विमानाने प्रवास करायचा झाल्यास एखाद्या कंपनीच्या माध्यमातून तिकीट बुक केले जाते. तशाच काही पर्यटनाच्या वेबसाइट्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून विमानाचे तिकीट बुक करता येते. पण यामध्ये तिकिटांच्या दारात बरीच तफावत जाणवते. अशावेळी 'स्कायस्कनर' https://www.skyscanner.co.in आणि 'कयाक' https://www.kayak.co.in यांसारख्या अॅपचा उपयोग होऊ शकतो. या वेबसाईटवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांच्या आरक्षणाच्या विविध वेबसाइट्सवरच्या दरांची एकाच ठिकाणी तुलना करून योग्य दरातील तिकीट घेता येते.

'सीटगुरू' https://www.seatguru.com या वेबसाइटच्या माध्यमातून विमानाचे आरक्षण झाल्यावर विमानातल्या आसनांची रचना, विमानात उपलब्ध असणाऱ्या सुविधा, टॉयलेट्स आणि आपत्कालीन दरवाजे यांची माहिती मिळू शकते.

'गोगोबोट' Gogobot travel app हे ट्राॅव्हल अॅप आहे. तुम्हाला ज्या प्रकारचे ट्रॅव्हलिंग आवडते, त्यानुसार हे अॅप तुम्हाला सजेशन्स देते. म्हणजे ठरावीक एका ठिकाणी असाल, तर तिथे काय पाहावे, फॅमिली फ्रेंडली प्लेसेस इत्यादीची माहिती पुरवेत.  

हल्ली हवामानाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. हवामानात रोज काही ना काही बदल जाणवत असतात. अशावेळी आपण पर्यटनासाठी निवडलेल्या ठिकाणचे हवामान कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. अशावेळी हवामानाचा अंदाज देणाऱ्या Accu Weather with Superior Accurancy, Yahoo Weather, Weather Forecast, https://www.worldweatheronline.com/ अशा वेबसाइट्स आणि अॅप्सचा उपयोग होऊ शकतो.  

परदेशात पर्यटनासाठी जाताना तेथील चलनाचा बाजारभाव माहिती असणे गरजेचे असते. अन्यथा चलनाची समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी All Currency Converter, XE Currency या अॅप्सच्या मदतीने हव्या त्या चलनाचा वर्तमान बाजारभाव जाणून घेता येतो. यामध्ये जगभरातल्या कुठल्याही चलनाचा भाव हव्या त्या चलनात बघता येतो. 

या वेबसाइट्स आणि अॅप्स शिवाय Hopper, LoungeBuddy, Citymapper, Duolingo, Tripit, Google Translate, Snapseed असे आणखीही अनेक अॅप्स आणि वेबसाइट्स आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे पर्यटन आनंदायी आणि संस्मरणीय करू शकता. यासाठी मात्र आपल्याकडे स्मार्टफोन असायला हवा... आणि अशा साइट्सचा वापर करताना त्या कितपत विश्वसनीय आहेत याची खात्री करून घ्यायला हवी...

संबंधित बातम्या