मध्य पूर्व युरोप : अद्‌भुत अनुभव!

मिलिंद बाबर
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

मागच्या वर्षी रुद्रम ही एक शोषित स्त्रीच्या सूडकथेवर किंवा तिने एकहाती घेतलेल्या बदल्यावर आधारित एक सुंदर मालिका आली होती. मुक्ता बर्वे या गुणी अभिनेत्रीने, एकटीने संपूर्ण मालिका ज्या उंचीवर नेली, त्याबद्दल ती खरोखरच कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहे. या मालिकेमध्ये मुक्ताने वेगवेगळ्या स्त्रियांच्या भूमिका इतक्या प्रचंड ताकदीने उभ्या केल्या, की कधी एकदा साडेनऊ वाजतात आणि कधी एकदा टीव्ही लावतो असे व्हायचे.

अगदी ऑफिसमधून निघण्याच्या वेळेपासून ते कुठलीही मीटिंग उशिराने नको किंवा जेवण आधी करायचे का रुद्रम संपल्यावर? वगैरे प्लॅनिंग आम्ही करायला लागलो होतो. रुद्रम सुरू असतानाच आम्हाला मध्य पूर्व युरोपच्या, आधीच ठरलेल्या दौऱ्यावर जावे लागले. परंतु, तिथेसुद्धा आम्ही रुद्रमचा एकही एपिसोड चुकवला नाही. रात्री उशिराने का होईना, पण आम्ही ऑनलाइन तो बघायचोच. इतके आम्ही त्याच्या अधीन झालो होतो. या मालिकेत जसे मुक्ताने वेगवेगळ्या भूमिका म्हणजे एक साधी गृहिणी किंवा जीवनास कंटाळून आत्महत्येला प्रवृत्त झालेली निराश आणि हतबल स्त्री किंवा वेषांतर करून एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवेल इतक्या निर्घृणपणे समोरच्याचा गळा चिरणारी स्त्री किंवा एका गावंढळ बाईचा अवतार घेऊन गुन्हेगारी जगताच्या म्होरक्याला ठोकरणारी स्त्री किंवा टीव्ही चॅनेलवर बातम्या देणारी मुलगी किंवा अतिशुद्ध मराठी भाषेत बोलणारी सरकारी वकील किंवा खऱ्या ख्रिश्चन केअर टेकर स्त्रीलासुद्धा लाजवेल अशी म्हातारी किंवा वेड्याच्या वेषात जाऊन अंदाधुंद गोळीबार करणारी स्त्री किंवा करवतीने मृत देहाचे क्रूरपणे तुकडे करून तो जाळणारी स्त्री किंवा एका मदत करणाऱ्या गुन्हेगारी विश्वातल्या हितचिंतकांच्या खुनाची बातमी ऐकून हृदयद्रावी रडतानाची मुक्ता, खरेच खूप आवडून गेली. जशी मुक्ता बर्वे ही एकच स्त्री परंतु वेगवेगळ्या रूपात ती तितकीच आवडून जाते... तसेच काहीसे युरोपच्या बाबतीत पण घडते. युरोप म्हणजे फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली इतकाच मर्यादित नाही; तर थोडासा हटके म्हणजे स्पेन आणि पोर्तुगाल असेल किंवा उत्तरेकडील स्कॅन्डिनेव्हियन देश डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड असतील किंवा पूर्व आणि मध्य युरोपमधील बरीच वर्षे कम्युनिस्टांच्या विचारसरणीच्या पगड्याखाली दबलेले पोलंड, झेक, हंगेरी, स्लोवेनिया, स्लोव्हाकिया किंवा क्रोएशियासारखे देश असतील. तेही तितकेच सुंदर, तितकेच वैविध्यांनी नटलेले आणि तितकेच ऐतिहासिक... आणि एक चांगली गोष्ट म्हणजे हे देश राहणीमानाच्या बाबतीत, अजून तरी पश्चिम युरोप एवढे महाग झालेले नाहीत. रुद्रममध्ये जशी मुक्ता सर्व भूमिकांमध्ये त्याच ताकदीने भावून गेली; तसाच पूर्व किंवा पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण युरोप त्याच सुंदरतेने आपल्याला पूर्णपणे भारावून टाकतो.  

जगाच्या पर्यटनाच्या दृष्टीने जर विचार केला, तर हा भाग पश्चिम युरोपपुढे तसा दुर्लक्षितच राहिला. ऐतिहासिकदृष्ट्या याचे महत्त्व म्हणजे २८ जून १९१४ ला पहिल्या महायुद्धाची ठिणगी इथेच उडाली होती. ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची गरोदर पत्नी सोफिया यांना उघड्या गाडीतून जात असताना गोळ्या घालून ठार केले गेले. त्या दहशतवाद्याला सर्बियाने मदत केली, असे गृहीत धरून ऑस्ट्रियाने सर्बियाबरोबर युद्ध पुकारले... आणि पहिले महायुद्ध सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धाची बीजेसुद्धा पहिल्या महायुद्धानंतरच्या पॅलेस ऑफ वर्साय इथे झालेल्या करारातच पेरली गेली होती. या दोन्ही महायुद्धांनी फक्त युरोपचा नाही, तर आख्ख्या जगाचाच इतिहास पूर्णपणे बदलून टाकला.

दुसऱ्या महायुद्धानंतर मार्शल टिटोने बोस्निया, क्रोएशिया, मॅसेडोनिया, सर्बिया, मॉन्टेनिग्रो आणि स्लोवेनियाला एकत्र करून युगोस्लाव्हिया देश निर्माण केला व त्याच्या मृत्यूपर्यंत (१९८० पर्यंत) या कम्युनिस्ट राजवटीचा तोच प्रेसिडेंट राहिला. मार्शल टिटोच्या मृत्यूनंतर हे सर्व देश विभक्त झाले.

या टूरवर आपण जी ठिकाणे बघतो, त्यामध्ये बर्लिन, ड्रेस्डेन, प्राग, व्हिएन्ना, ब्राटिस्लाव्हा, बुडापेस्ट, लुबियाना, झागरेब, झदार, स्प्लीट आणि डुब्रोवनिक ही महत्त्वाची, सुंदर आणि त्यातली सात तर देशांच्या राजधानीचीच शहरे आहेत.

वरीलपैकी बहुतेक देश खूप वर्ष कम्युनिस्ट राजवटीखाली राहिल्यामुळे किंवा हिटलरने केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांच्यावर त्याचे बरेच दूरगामी परिणाम झालेले दिसतात. हे जग व या जगातील सर्व माणसे ही दुष्टच आहेत किंवा प्रत्येक माणूस हा वाईटच असतो आणि आपण कुणालाही मदत करण्याची काही एक गरज नाही, अशी टोकाची भूमिका घेण्यापर्यंत, या पुढच्या पिढ्यांची मानसिकता तयार झाली की काय? का हे लोक एवढे माणूसघाणे झालेत? असे विचार विशेष करून प्रागला आल्यापासूनच मला सतावत होते. तिथे भेटलेला प्रत्येक माणूस, मग तो पोलीस असेल किंवा टॅक्सीवाला किंवा सामान्य माणूस, ज्याला आम्ही पत्ता विचारला असेल तो प्रत्येक माणूस तुम्हाला शून्यात बघितल्यासारखे बघायचा व चालू पडायचा. अतिशय निर्विकार चेहरे. हा माणूस प्रश्न विचारून माझ्या आयुष्यातले काही क्षण कुरतडतो आहे आणि असा भाव चेहऱ्यावर आणतात. इथला आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे इथल्या जवळपास ९०% लोकांना इंग्लिश येत नाही आणि ज्यांना येते त्यांना मदत करायची अजिबात इच्छा नसते. त्यामुळे ज्यांना ग्रुप टूर नको, त्यांचे त्यांनाच फिरायचे आहे, त्यांच्यासाठी गुगल हाच मित्र मदत करू शकतो. ही झाली नाण्याची एक बाजू.

नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की हे सर्व देश अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. त्यात मला आवडलेले शहर म्हणजे बुडापेस्ट. युरोपमधल्या ज्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लांब नद्या आहेत त्यातली एक डॅन्यूब. तिच्या किनाऱ्यावर एका बाजूला बुडा आणि दुसऱ्या बाजूला पेस्ट, असे हे हंगेरीच्या राजधानीचे शहर. आमचे हॉटेल नोव्होटेल बुडामध्ये, अगदी डॅन्यूब नदीवर आणि आमच्या बरोबर समोर, पण नदीच्या पलीकडे हंगेरीच्या पार्लमेंटची भव्य वस्तू होती, पेस्टमध्ये. डॅन्यूबचे ते भव्य पात्र बघून मी आचंबीत झालो, कारण या नदीचा उगम जर्मनीतल्या ब्लॅक फॉरेस्टमध्ये होतो, तो मी अनेक वेळा पहिला होता. तिथे ही नदी अगदी एखादा छोटासा झरा किंवा ओढ्याच्या आकाराची आहे आणि पुढे आल्यानंतरचे तिचे हे रूप फारच भावून गेलो. आम्ही बुडापेस्टला पोचलो तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते. मंद वारा सुटला होता. स्वच्छ ऊन पडले होते आणि तापमान साधारण १६ अंश होते. हवेत हलकासा गारवा होता. आम्ही रूमवर येऊन चेक इन केले. फ्रेश झालो आणि रंजनाने बरोबर आणलेल्या रेडीमिक्स गिरनारच्या चहाचा वाफाळता कप हातात दिला. त्या गुलाबी थंडीमध्ये त्या भारतीय चहाचा अस्सल, कडक स्वाद म्हणजे, अमृताहुनी गोड... या गाण्याची आठवण करून देणारा तो प्रसंग. एव्हाना सूर्यदेव मावळतीला गेले होते. बाहेर गार वारा सुटला होता. आमच्या रूममधून डॅन्यूब नदी आणि ती पार्लमेंटची बिल्डिंग फारच सुरेख दिसत होती. आता रात्रीने हळूहळू तिचा अंमल दाखवायला सुरुवात केली होती. आम्ही एक तास गप्पा मारून बाहेर पडलो, तेव्हापर्यंत अंधार पडला होता... आणि संपूर्ण बुडापेस्ट शहर आता लागलेल्या दिव्यांनी उजळून निघाले होते. मघाशी दिवसाच्या उजेडात पाहिलेले शहर आता लाइट लागल्यानंतर एखाद्या शृंगार केलेल्या नववधूसारखे दिसत होते. एखाद्या शहराच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या सौंदर्यात  एवढा मोठा फरक पडू शकतो, हे मला पूर्वीच्या अनुभवावरून, पॅरिसच्या बाबतीत ठाऊक होते आणि तोच अद््‌भुत अनुभव आम्ही तिघेही इथे घेत होतो. मघाशी दिवसाच्या उजेडात भव्य दिसणारी ती पार्लमेंटची बिल्डिंग आता दिव्यांनी सजवल्यानंतर, तिच्यावर सोन्याचा मुलामा दिल्यासारखी, पिवळी धमक दिसत होती. त्या अंधाराच्या बॅकग्राउंडवर तर ती अतिभव्य भासली आणि तिचे डॅन्यूबच्या पाण्यात पडलेले ते प्रतिबिंब तर शब्दांत सांगताच येणार नाही. ते दृश्य डोळे भरून पाहिल्यावर आम्ही शुद्धीत आलो आणि मग लक्षात आले, की जसे एखाद्या सुंदर स्त्रीला शृंगार करताना वेगवेगळ्या अलंकारांचा साज चढवला जातो... कानातले, नाकातले, गळ्यातले, हातातले; तसेच या पार्लमेंट हाउसच्या आजूबाजूला असलेले भव्य ब्रीजसुद्धा तितक्याच ताकदीने सुंदर दिसत होते. त्या सर्व ब्रिजेसवर केलेल्या लाइटिंगबरोबरच विविध रंगांची मुक्त उधळण पाहून असे वाटले, की परमेश्वराने हे सौंदर्य साठवून ठेवण्यासाठी दिलेले दोन डोळे किती अपुरे आहेत. ते सौंदर्य पाहून मन भरत नव्हते. किती पाहू, कुठे कुठे पाहू आणि कसे पाहू? असे मन सैरभैर झाले होते. मग भानावर आल्यावर एक मनसोक्त फोटो सेशन झाले व नदीच्या साथीने वॉकपण सुरू झाला. आम्ही आता बोट राईड घेण्यासाठी निघालो होतो. नदीचा तो साज शृंगार अनुभवताना ४५ मिनिटे संपून, आम्ही बोटीपर्यंत कधी पोचलो ते कळलेच नाही. तपस्या आम्हाला लीड करत होती. आमची बोट बरोबर नऊ वाजता सुरू झाली. आता नदीच्या बाजूने त्या रात्रीच्या अंधारात सजलेल्या वास्तू बघण्याची ही पर्वणीच होती. लांबवर, जिथपर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत, नदीच्या त्या प्रचंड पात्रात, या बाजूने त्या बाजूला जाणारे ते महाकाय पूल. त्यावर हळुवार सोडलेले विविध रंग, त्याच्या भोवती गुंफलेल्या लाइटच्या माळा. हा अनुभव खरोखरच स्वर्गीय होता. खूप भूक लागल्यानंतर एखाद्या सुगरणीच्या हातचे जेवण जेवल्यावर जे समाधान मिळेल, तसेच मिळवल्याचा अनुभव, आज मी या डोळ्यांची भूक त्या अवर्णनीय सौंदर्याने भागवून घेत होतो. आज काहीतरी नवीन आणि मस्त पाहिल्याच्या समाधानात आणि आजच्या दिवसाचे आभार मानून, आम्ही कधी झोपेच्या अधीन झालो कळलेच नाही.

मला आवडलेला सगळ्यात सुंदर देश म्हणजे क्रोएशिया. अप्रतिम सौंदर्याने नटलेला डोंगर, दऱ्या, नद्या, झरे, तलाव, धबधबे, शांत समुद्र किनारे, हजारो बेटे आणि सुंदर हवामानाचा हा देश. या देशाला परवा परवापर्यंत फारसे लोक ओळखतसुद्धा नव्हते. परंतु, त्यांच्या फुटबॉल टीमने या वर्षी फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मारलेली जोरदार धडक, त्यांना जगभर प्रसिद्धी देऊन गेली. हा देश छोटासा जरी असला आणि त्या मानाने तरुणसुद्धा असला, तरी त्यांच्या नावावर बऱ्याच गोष्टी नमूद झालेल्या आहेत. जसे निकोला टेस्लाचा जन्म क्रोएशियात झाला होता. बॉल पॉइंट पेनचा शोध क्रोएशियात लागला. सर्व जगात प्रसिद्ध झालेल्या टायचा जन्म क्रोएशियात झाला. डबल एन्ट्री बुक कीपिंगचा पाया क्रोएशियातच रचला गेला. जगातले सगळ्यात लहान लोकसंख्येचे गाव हम (कणच) हे क्रोएशियातच आहे. झादार शहरात नैसर्गिक साधनांचा वापर करून केलेला सी ऑर्गन...

आज इथेच थांबतो. परत भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर..

संबंधित बातम्या