प्रवाशांसाठी उपयुक्त ‘टिप्स’

मृणाल तुळपुळे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

‘जेपीज् भटकंती टिप्स’ या पुस्तकाचे लेखक जयप्रकाश प्रधान यांनी आपल्या पत्नीसह युरोपची पहिली सहल केली आणि त्यानंतर झपाटल्यासारखे ते एकामागोमाग एक देश पालथे घालू लागले. आजपर्यंत त्यांनी तब्बल ७८ देशांत प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारचे अनुभव आले आणि त्यातूनच पर्यटनाबद्दलची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली. सहलीचे आयोजन करताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या टाळाव्या, हे त्यांना उत्तम प्रकारे समजले. प्रवासात उपयुक्त अशा टिप्स देणारे हे पुस्तक अशाच अनुभवातून साकारले आहे.

या पुस्तकात सहलीचे नियोजन करण्यापासून ते सहल संपवून परत घरी पाऊल टाकेपर्यंतच्या सर्व गोष्टींचे अचूक मार्गदर्शन केले आहे. अतिशय उपयुक्त अशा या टिप्समुळे प्रवास नक्कीच आनंददायी होईल आणि तो निर्विघ्नपणे पार पडेल यात काही शंकाच नाही. प्रत्यक्ष प्रवास न करणाऱ्‍यांना, तर प्रवासातील गमतीदार अनुभव व नियोजन आयोजनाच्या टिप्स वाचून पर्यटनाची प्रत्यक्ष मजा अनुभवता येईल.

पुस्तकामध्ये सहलीची निवड कशी करावी, व्हिसा कसा काढावा, ट्रॅव्हल इन्शुरन्सचे महत्त्व, सामानामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात, प्रवासाची प्रत्यक्ष तयारी कशी करावी, इमिग्रेशन व सिक्युरिटीचे नियम तसेच परदेशात पाळावयाचे मॅनर्स याची विस्तृतपणे दिलेली माहिती अतिशय उपयुक्त ठरते. त्यापैकी ‘प्रवासाचे विविध मार्ग’, ‘स्वच्छता ठेवा व शिस्त पाळा’ आणि ‘पर्यटनातील मॅनर्स’ ही तीन प्रकरणे तर पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. परदेशी गेल्यावर त्यांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे त्यावरून समजते.

भारतीय लोक परदेशात गेल्यावर रेस्टॉरंटमधील टेबल मॅनर्स कसे पाळत नाहीत, वेळा कशा पाळत नाहीत, विमानात व विमानतळावर कसे वागतात याचे निरीक्षण करून लेखकांनी त्याचे अगदी तंतोतंत वर्णन केले आहे. ते वाचून आपले काय चुकते, ते तर कळतेच पण त्याचबरोबर अनेक गोष्टी नव्याने कळतात व पुढच्या प्रवासात त्या पाळण्याचे भान रहाते.

लेखक लंडनहून मुंबईला येताना त्यांनी बघितलेला एक प्रसंग सांगितला आहे. विमानतळावर बोर्डिंगची घोषणा व्हायच्या आधीच भारतीय प्रवासी गेटसमोर गोळा झाले होते. कोणत्या ओळीतल्या प्रवाशांनी गेटसमोर यावे याचे निवेदन करूनही कोणी ऐकत नव्हते. जणू काही पुढे घुसणाऱ्‍यांनाच बसायला सीट मिळणार होती. शेवटी विमानतळावरील कर्मचाऱ्‍यांनी तो उद्योग बंद केला आणि काय घालायचा तो गोंधळ घाला ही भूमिका घेतली.

असाच स्वित्झर्लंडमधला एक अनुभव. तेथील अधिकृत पर्यटन माहिती केंद्रामधील अधिकाऱ्‍याने सांगितले, की तिथे भारतीय पर्यटकांची संख्या प्रचंड आहे हे स्वागतार्हच आहे; पण त्याचबरोबर तेथील कचरा व अस्वच्छतादेखील खूप वाढली आहे. त्यामुळे माउंट टिटलिस येथे आम्ही हिंदीतून फलक लावले आहेत. हिंदीतील फलक वाचून तरी तिथे कचरा टाकू नये हे आपल्या लोकांना समजायला पाहिजे. यावरून माउंट टिटलिस येथे लावलेले हिंदी फलक म्हणजे भूषण की दूषण असा प्रश्‍न पडतो.

बरेच वेळा सर्व कुटुंबाला विमानात एकत्र बसायची इच्छा असते; पण पती, पत्नी, मुले याच्या सीट्स लांब लांब असतात. अशावेळी सीटची आपापसात ठरवून अदलाबदल केली जाते व त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण होतो. अशावेळी एअर होस्टेसची मदत घेणे इष्ट ठरते. हे सगळे प्रसंग वाचून परदेशात जाताना व तिथे गेल्यावर कोणत्या गोष्टी करू नयेत हे समजते.

हे सगळे अनुभव आणि प्रसंग सांगताना भारतीय पर्यटकांना कमी लेखणे असा लेखकाचा बिलकूल हेतू नाही. ते निव्वळ अनुभव आहेत व त्यापासून इतर पर्यटकांनी काही शिकावे हा त्यामागचा साधा सरळ उद्देश आहे.

या पुस्तकाबाबत एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करावासा वाटतो व तो म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिलेला ‘जेपीज फायनल ब्रीफ’ हा परिच्छेद व मधल्या मधल्या पानांवर ठळक अक्षरात लिहिलेला चौकोनातला मजकूर. हे उतारे पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे आहेत. याच बरोबर पुस्तकाच्या शेवटी दिलेली प्रवासात गरज पडतील अशा अ‍ॅप्स व साइट्सची माहितीदेखील खूपच उपयुक्त अशी आहे. आपण परदेशात जातो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे आपल्या वागण्यामुळे देशाची प्रतिमा खराब होऊ नये याची प्रत्येक पर्यटकाने दक्षता घ्यायला पाहिजे. भटकंतीतील टिप्स वाचून त्याचे काटेकोरपणे पालन केले, तर सहल नक्कीच सुखावह व सोपी होईल. जेपीज भटकंती टिप्स हे पुस्तक म्हणजे पर्यटकांसाठी एक कायम स्वरूपी असे उत्तम ‘गाइड’ आहे.

संबंधित बातम्या