जर्मनीचे बटाटे, बिअर, सॉसेजेस

मृणाल तुळपुळे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

प्रत्येक देशात असे काही खास पदार्थ असतात, की ते पदार्थ त्या देशाची ओळख ठरतात. जसे इटलीचा पास्ता आणि पिझ्झा, तसे जर्मनीचे बटाटा, बिअर आणि सॉसेजेस.    

अनेक देशांचा शेजार आणि नॉर्थ व बाल्टिक समुद्राचा किनारा लाभलेला जर्मनी हा अतिशय समृद्ध असा देश आहे. जर्मन खाद्यसंस्कृतीदेखील तितकीच समृद्ध आणि एकाहून एक चविष्ट व रुचकर पदार्थांनी नटलेली आहे. तेथील प्रत्येक भागात केले जाणारे पदार्थ अगदी खास आणि वेगळे आहेत. 

या देशात नेहमी खाल्ल्या जाणाऱ्‍या भाज्या म्हणजे गाजर, टर्निप, बीट, बीन्स, पालक, मटार, लाल भोपळा, अ‍ॅस्परॅगस आणि दोन-चार प्रकारचा कोबी. या भाज्या मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारची सूप, स्ट्यू, सॅलड आणि मुख्य पदार्थाबरोबर खाण्यासाठी वापरल्या जातात. तिथे अनेक प्रकारचे बटाटे मिळतात व रोजच्या दोन्ही जेवणात त्याचा एक तरी पदार्थ असतोच. जर्मनीत बटाटा वापरून किती वेगवेगळे पदार्थ केले जातात त्याची गणतीच नाही.

बटाट्याप्रमाणेच जर्मनीत कोबी खूप वापरला जातो व तो वापरून केलेला सावरक्राउट हा पदार्थ तिथे खूपच लोकप्रिय आहे. सावरक्राउट याचा अर्थ आंबट कोबी. जर्मनीमध्ये प्रत्येक घरात सावरक्राउट करून त्याच्या बरण्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात. ते सॅलडमध्ये, मीटबरोबर, ब्रेड रोल्स वा सँडविचेसमध्ये घालण्यासाठी असे अनेक प्रकारे वापरले जाते.

जर्मन स्वयंपाकात चिकन, मासे व वेगवेगळ्या प्रकारचे मीट वापरले जात असून बाल्टिक व नॉर्थ समुद्राकाठच्या प्रांतात मासे जास्त खाल्ले जातात व इतर प्रांतात चिकन वा पोर्क जास्त खाल्ले जाते. शाकाहारी असो वा मांसाहारी, जर्मन पदार्थ अजिबात मसालेदार आणि तिखट नसतात. त्यांना तिखटपणा मिळतो तो फक्त मिरपूड व मस्टर्ड सॉसमुळे. त्यात स्वादासाठी पार्सले, थाईम, जायफळ ही हर्ब्ज वापरली जातात. 

जर्मन बेकऱ्‍यांमध्ये हजारो प्रकारचे ब्रेड आणि शेकडो प्रकारच्या पेस्ट्रीज तयार केल्या जातात. सकाळच्या नाश्‍त्यासाठी त्यातलेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, पेस्ट्रीज, कोल्ड कट्स, जॅम, मार्मालेड असे पदार्थ व जोडीला चहा कॉफी असे घेतले जाते. पूर्वीच्या काळी दुपारचे जेवण साग्रसंगीत घेतले जायचे व रात्रीचे जेवण अगदी हलके असायचे; पण गेल्या काही वर्षांत ही पद्धत मागे पडली आहे. कामाच्या दिवशी दुपारचे जेवण अगदी हलके व रात्री घरी गेल्यावर कुटुंबीयांसमवेत व्यवस्थित जेवण असा पायंडा पडला आहे. या दोनही जेवणांच्या वेळी ब्रेड असतोच. प्रेत्सेल या ब्रेडचा आकार अगदी आगळावेगळा असून हा आंबट गोड चवीचा ब्रेड, पिठाला एक विशिष्ट प्रकारची गाठ मारून केला जातो.

जेवणानंतर वा दुपारच्या चहाच्या वेळी पेस्ट्रीज वा वेगवेगळ्या प्रकारचे केक्स खाल्ले जातात. या केक्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सफरचंद, प्लम्स, चेरी, स्ट्रॉबेरी अशी ताजी फळे वापरलेली असतात. विविध प्रकारचे चॉकलेट केक्स आणि ब्लॅक फॉरेस्ट केक हे जर्मन केक्स तर जगप्रसिद्धच आहेत. तिथल्या डोनट्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मधे भोक पाडलेले नसते, डोनट्सच्या आत जॅम किंवा काहीतरी गोड सारण भरलेले असते.

जर्मनीतला असाच आणखी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे सॉसेजेस. ऐकून आश्‍चर्य वाटेल, पण तिथे जवळपास हजार प्रकारचे सॉसेजेस केले जातात. ते नुसते खाल्ले जातात, तसेच ते वापरून वेगवेगळे चविष्ट पदार्थ केले जातात. त्यापैकी काही पदार्थ म्हणजे ग्रील्ड सॉसेजेस, सॉसेज स्ट्यू, सॉसेज बटाटा सॅलड व बेक्ड भाज्यांबरोबर बेक केलेले सॉसेज. थंडीच्या दिवसात खाण्यासाठी तिथे सॉसेज हॉटपॉट हा पदार्थ हमखास केला जातो.

असे म्हटले जाते, की जर्मनीत पाण्यापेक्षा बिअर स्वस्त आहे. तिथे बिअर हे एक लोकप्रिय पेय असून त्याचे असंख्य प्रकार अस्तित्वात आहेत. बिअरला जर्मनीत इतके महत्त्व आहे, की म्युनिक येथे दरवर्षी बिअरचा उत्सव साजरा केला जातो व तो ऑक्टोबरफेस्ट म्हणून ओळखला जातो. सॉसेजेसचे प्रकार, बटाट्याचे डम्पलिंग्ज, प्रेत्सेल, श्‍निटत्सेल हे ऑक्टोबरफेस्टच्या वेळी केले जाणारे काही खास पदार्थ आहेत. बिअरचा पिण्याव्यतिरिक्त पंच करण्यासाठी, मीटच्या मॅरिनेशनमध्ये, सॅलड ड्रेसिंगमध्ये, गोड पदार्थांत, तसेच स्ट्यूमध्ये उपयोग केला जातो. 

सध्या पुण्यात आलेली आमची जर्मन पाहुणी कॅट्रि हिच्याकडून जर्मन खाद्यसंस्कृतीबद्दल व काही खास जर्मन खाद्यपदार्थांबद्दल अशी सगळी माहिती ऐकायला खूप मजा आली.  

बिअर आणि बेरीज पंच
साहित्य : प्रत्येकी अर्धा कप स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि चेरी, ३ कप थंड बिअर, १ कप लेमोनेड, १ कप बर्फाचा चुरा, १ कप अ‍ॅपल ज्यूस, १ मोठा चमचा पिठीसाखर, लिंबाच्या चकत्या.
कृती : बेरीजचे लहान तुकडे करावेत. पंच बाऊलमध्ये अ‍ॅपल ज्यूस, लेमोनेड व पिठीसाखर एकत्र करून साखर विरघळेपर्यंत ढवळावे. त्यात बर्फाचा चुरा व बिअर घालावी. बेरीजचे तुकडे व लिंबाच्या चकत्या घालून एकत्र करावे.

स्पाट्त्सेल (जर्मन पास्ता)
साहित्य : एक कप मैदा, पाव कप दूध, २ अंडी, २ मोठे चमचे बटर, १ मोठा चमचा बारीक चिरलेली पार्सले.
कृती : एका बाऊलमध्ये अंडी फोडावी. त्यात दूध, मीठ व मिरपूड घालून फेटावे. त्यात मैदा घालून पीठ भिजवावे. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आली, की स्पाट्त्सेल मेकरमधून भिजवलेले पीठ दाबून पाण्यात पाडावे. स्पाट्त्झेल मेकर हा मोठ्या भोकाच्या किसणीसारखा असतो व उकळत्या पाण्यात त्यावरून पिठाचा गोळा किसून टाकला जातो. पिठाचे तुकडे शिजले, की तरंगून वर येतील. ते चाळणीत काढावे. पॅनमध्ये बटर गरम करून त्यात तयार स्पाट्त्सेल परतावे व वरून पार्सले घालून सर्व्ह करावे.

बटाट्याचे डम्पलिंग्ज आणि बटर सॉस
साहित्य : मध्यम आकाराचे ७ ते ८ बटाटे, १ कप मैदा, ३ अंडी, अर्धा कप किंवा लागेल त्याप्रमाणे ब्रेड क्रंब्ज, चवीला मीठ, अर्धा टीस्पून जायफळाची पूड, पाणी.
कृती : बटाटे उकडून त्याचे साल काढावे. त्यात अंडी फोडून घालावीत. मैदा, मीठ व जायफळाची पूड घालून एकत्र कालवावे. गरजेप्रमाणे ब्रेड क्रंब्ज घालावेत. या मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे गोळे वळून उकळत्या पाण्यात टाकावेत. सात ते आठ मिनिटे शिजू द्यावे. गरम डम्पलिंग्ज बरोबर बटर सॉस द्यावा.
बटर सॉस कृती : एका पॅनमध्ये अर्धा कप बटर गरम करावे व त्यात एक मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा लालसर होऊन तो शिजेपर्यंत परतावा. त्यात दोन चमचे ब्रेड क्रंब्ज घालून एकत्र करावे.

सावरक्राउट
साहित्य : मध्यम आकाराचा १ हिरवा किंवा जांभळा कोबीचा गड्डा आणि दीड टेबलस्पून मीठ.
कृती : सावरक्राउट शक्यतो काचेच्या बरण्यांमध्ये आंबवण्यासाठी ठेवला जातो. त्यामुळे सर्वप्रथम त्या बरण्या स्वच्छ करून पुसून ठेवाव्यात. कोबी उभा व पातळ चिरावा. एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेला कोबी व मीठ एकत्र करावे व त्याला पाणी सुटेपर्यंत हाताने बराच वेळ कालवावे. पाण्यासकट कोबी बरणीत भरावा. या पाण्यामुळे कोबी आंबण्यास मदत होते. बरणीवर मलमलचे कापड टाकून रबरबँड लावावे व सूर्यप्रकाश लागणार नाही अशा ठिकाणी ती बरणी ठेवावी. पाच ते सात दिवसांनी कोबी आंबून मस्त चवीचा सावरक्राउट खाण्यासाठी तयार होतो. 

सॉसेज हॉटपॉट
साहित्य : सहा सॉसेजेस, २ कप मीट स्टॉक, १ कप टोमॅटोचे तुकडे, २ बटाटे, २ गाजरे, १ कांदा, चवीला मीठ व मिरपूड, कोणत्याही सूपची १ क्यूब, १ टेबलस्पून बटर व १ तेजपत्ता.
कृती : सॉसेजेसच्या पाव इंच जाडीच्या चकत्या कराव्यात. बटाटे व गाजराची साले काढून चौकोनी तुकडे करावे. कांदा बारीक कापावा. एका पॅनमध्ये बटर घालून त्यात कांदा व तेजपत्ता परतावा. त्यात टोमॅटो, बटाटा, गाजराचे तुकडे आणि मीट स्टॉक घालावा. मंद आचेवर भाज्या शिजू द्याव्या. शेवटी कुस्करलेली सूप क्यूब व सॉसेजेसच्या चकत्या घालून एक उकळी आणावी.

चिकन श्‍निटत्सेल
साहित्य : चिकन ब्रेस्ट बोनलेस, चवीला मीठ आणि मिरपूड, १ कप मैदा, २ अंडी, १ टेबलस्पून मस्टर्ड, २ कप ब्रेड क्रंब्ज, २ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून बारीक चिरलेली पार्सले, १ लिंबू.
कृती : चिकन ब्रेस्टचे दोन आडवे तुकडे करावे. त्याला मीठ, मिरपूड व मस्टर्ड लावून तासभर ठेवावे. अंडी फोडून त्यात थोडे मीठ घालावे. चिकनचे तुकडे अंड्यात बुडवावेत व नंतर मैद्यात घोळवावेत. त्यावर ब्रेड क्रंब्ज दाबून लावावे. तव्यावर बटर घालून त्यात चिकनचे तुकडे शॅलोफ्राय करावेत. दोन्ही बाजूंनी लालसर झाल्यावर बशीत काढावेत व त्यावर पार्सले घालावी. जोडीला लिंबाच्या फोडी द्याव्यात.

संबंधित बातम्या