पृथ्वीच्या दोन टोकांवरील भटकंती

मृणाल तुळपुळे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन : 
 

पृथ्वीवरील भूभागाची सात खंडांमध्ये विभागणी झाली आहे. त्यापैकी दक्षिण ध्रुवावर असलेला सातवा खंड म्हणजे अंटार्टिका. अत्यंत टोकाचे हवामान, प्रतिकूल वातावरण आणि दळणवळणांच्या साधनांचा अभाव यामुळे अंटार्टिकाची कोणालाच माहिती नव्हती; पण १८२० मध्ये दोन रशियन संशोधकांना याचा शोध लागला. सध्या तेथील निरनिराळ्या बेटांवर विविध देशांची संशोधन केंद्रे आहेत. 

अंटार्टिका खंड म्हणजे ९८% बर्फ असून तिथे मनुष्यवस्ती नाही; पण आपल्या पत्नीच्या आग्रहास्तव ‘एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती’ या पुस्तकाचे लेखक जयप्रकाश प्रधान यांनी तिथे जायचे ठरवले. तब्बल दीड महिन्याच्या त्यांच्या या सहलीमध्ये ‘हर्टीग्रूटेन’ कंपनीच्या १८ दिवसांच्या क्रूझचा अंतर्भाव होता. या सातव्या खंडावर पाय ठेवल्यानंतर त्या उभयतांना अक्षरशः जग जिंकल्याचा आनंद झाला, असे त्यांनी म्हटले आहे. अंटार्टिकाच्या तुलनेत आर्क्टिक प्रदेशात जाणे तसे सोपे आहे व त्यामुळे बरेच पर्यटक तिथे जातात.  

आर्क्टिक सर्कलच्या पलीकडचा भाग म्हणजे पृथ्वीचे उत्तरेकडील अखेरचे टोक. या उत्तर टोकावरील ‘नॉर्दन लाईट्स’चे मनोहारी दर्शन, हिमनगांची जागतिक राजधानी ‘ग्रीनलँड’ आणि लँड ऑफ फायर अँड आईस ‘आईसलँड’ म्हणजे एका वेगळ्याच दुनियेची सफर म्हणता येईल. पृथ्वीच्या गोलावरील सात खंड व ७८ देशांना भेट दिलेल्या लेखकांनी या पुस्तकाद्वारे वाचकांना जगाच्या या दोन्ही टोकांची सफर घडवून आणली आहे. 

परदेशात जायचे म्हणजे भोज्याला हात लावून परत यायचे नाही, हे लेखकांनी केलेल्या प्रवासाचे मुख्य सूत्र आहे. त्यांनी अंटार्टिका आणि आर्क्टिक प्रदेशात भरपूर भटकंती केली व तेथील संस्कृती, माणसे, निसर्गाची विविध रूपे हे सगळे जवळून अनुभवले. तिथे फिरताना स्वतःला आलेले अनुभव त्यांनी छायाचित्रांसह या पुस्तकात लेखनबद्ध केले आहेत. पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील शेवटचे गाव ‘प्युर्ट्रो विल्यम्स’, तर अंटार्टिकाचा गेटवे म्हणजे अर्जेंटिनामधील ‘उर्श्‍वाया’ हे गाव. उर्श्‍वाया मधील मुख्य आकर्षण म्हणजे ‘एंड ऑफ द वर्ल्ड ट्रेन ’. लेखकाने या ट्रेनचे वर्णन, त्यातून केलेला प्रवास, वाटेत दिसणाऱ्‍या गोष्टी हे सगळे अगदी विस्तृतपणे नमूद केले आहे. 

अंटार्टिकावर असलेल्या तीन जातींच्या पेंग्विन्सची तसेच अर्जेंटिनामधील ‘पेरिटो मेरिनो’ या ग्लेशियर्सची लहानसहान बारकाव्यांसह माहिती पुस्तकात दिली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्या भागात कसे जाल, केव्हा जाल, तेथील सुरक्षितता, तसेच त्या सफरीविषयीची थोडक्यात दिलेली माहिती फारच उपयुक्त ठरते. असे हटके अनुभव लोकांना नक्कीच वाचायला आवडतील. 

दक्षिण अमेरिकेतील चिली व अर्जेंटिना ही दोन महत्त्वाची राष्ट्रे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स हे पर्यटकांचे आवडते गाव. चिलीची राजधानी सँटियागो येथील एका बगिचात उभारलेले जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी व रविंद्रनाथ टागोर याचे संगमरवरी पुतळे लेखकाच्या नजरेतून सुटले नाहीत. ‘अर्जेंटिना पार कडून चिलीकडे’ हा लेखकाचा विलक्षण प्रवास अनुभव व ‘प्रवासात भेटलेल्या दोन अजब महिला’ हा भाग हायलाईट केल्यामुळे नजरेतून सुटणार नाही. गुलाबांचे शहर म्हणून ओळखले जाणारे चिलीमधील ‘प्युटो व्हरास’, पँटागोनियाची राजधानी ‘पुंटा एरेनास’, अवघ्या तीन हजार लोकवस्तीची ‘फॉकलंड आयलंडस’, अर्जेंटिनामधील ‘इल-कलाफते’ अशा आगळ्या वेगळ्या गावांचे अतिशय सुरेख वर्णन व माहिती या पुस्तकात वाचावयास मिळते. जगाच्या नकाशात अगदी उत्तरेला दिसणाऱ्या व ८१% बर्फाचे साम्राज्य असणाऱ्‍या ग्रीनलँड व त्याला लागूनच असणाऱ्‍या आईसलँडमध्ये लेखकाने खूप भटकंती केली. तेथील स्थानिक लोकांच्यात मिसळून त्यांचे राहणीमान, संस्कृती आणि चालीरीती समजावून घेतल्या. आर्क्टिक प्रदेशातील सामी जमातीच्या एका कुटुंबात, तर त्यांनी दोन दिवस वास्तव्य केले. 

‘मध्यरात्रीचा सूर्य ’ व ‘नॉर्दन लाईट्स’ ही निसर्गाची अभू‍तपूर्व रूपे अनुभवली. फिनिश लॅपलँडच्या जवळील रोव्होनिमी या गावी त्यांनी आर्क्टिक सर्कलची रेषा ओलांडली. तेथील त्यांच्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर बोर्ड लावला होता, ‘आज सूर्य उगवणार नाही व मावळणारही नाही. तो क्षितिजावर कायम राहील.’ रात्री पावणेबाराला हॉटेलजवळील चौकात चोवीस तासांचा उजेड लेखकाने प्रत्यक्ष अनुभवला. स्वतः अनुभवलेले असे अनेक प्रसंग व घटना त्यांनी या पुस्तकाद्वारे आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत. पुस्तकातील भाषा अतिशय बोलकी असल्यामुळे वाचताना आपण प्रत्यक्ष तिथेच आहोत असे जाणवते. जयप्रकाश प्रधान यांचे हे एक हटके असे पुस्तक म्हटले पाहिजे. त्यांनी केलेल्या अंटार्टिका आणि आर्क्टिक खंडावरील चित्तथरारक सफरींचे अनुभव भटकंतीची आवड असणाऱ्‍या लोकांना नक्कीच फायदेशीर ठरतील.  

संबंधित बातम्या