कंबोडिया दर्शन 

सुरेश पाटणकर 
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

दक्षिण आशिया, दक्षिण (पूर्व) आशिया येथे बऱ्याच ठिकाणी कामानिमित्त जाण्याचा योग आला होता. भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, भूतान वगैरे प्रदेशांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड सांस्कृतिक परंपरा, वास्तू वगैरे; भारत यामध्ये अग्रणी! या वास्तू जपून ठेवण्याचा प्रयत्न भारतात चांगल्या प्रकारे होत आहे. यातील धर्माष्टिता बघायची झाल्यास हिंदू धर्म, बुद्ध धर्म आणि इस्लाम धर्माचा पगडा विविध ठिकाणी दिसतो. दक्षिण (पूर्व) आशियात मात्र मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, बाली, व्हिएतनाम वगैरे देशात मुख्यत्वेकरून बुद्ध धर्म आणि इस्लाम धर्म पसरला, फोफावला पण हिंदू धर्म फारसा रुजला नाही अशी, परिस्थिती आहे. याबाबतची काही उत्तरे मिळण्यासाठी कंबोडिया देश समजून घेण्यास हरकत नाही, म्हणून कंबोडियाची सहल करणाऱ्या समुदायाबरोबर जाण्यासाठी विमानातून प्रयाण केले. न कळणाऱ्या भाषेची, चिवचिवाटाची, विमान कर्मचाऱ्यांची गंमत ऐकत बॅंकॉक आणि नॉमपेन्ह येथे पोचलो. 

प्राचीन काळी भारतीयांनी बाहेर जाऊन आपल्या संस्कृतीचा प्रसार केला, हे सांस्कृतिक अवशेषांद्वारे सिद्ध करता येते. भारतीय आपल्या देशाच्या इतिहासासंबंधातच उदासीन वाटतात, तेव्हा परदेशात जाऊन भारतीयांनी इतिहास घडविला याकडे त्यांचे आस्थेने लक्ष गेले नसल्यास, आश्चर्य वाटू नये. श्रीलंका, ब्रह्मदेश, लाओस, व्हिएतनाम, थायलंड आणि कंबोडिया इत्यादी नावाने आज ओळखल्या जाणाऱ्या देशांत भारतीय संस्कृतीचा पुरेपूर ठसा उमटविला होता आणि थोड्याफार प्रमाणात तो इसवीच्या १४-१५व्या शतकापर्यंत दिसतो. कंबोडियात जाऊन तेथील भव्य, उत्तुंग आणि विस्तीर्ण, अनेक मजली मंदिरे पाहण्यासाठी आलेले पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे पहायला मिळतात. अलीकडच्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांची, अभ्यासकांची संख्या लक्षणीय झाली आहे. याचा अर्थ असा नव्हे, की आपणच ही मंदिरे निर्माण करण्यास कारणीभूत झालो असलो, तरी ती आपल्या विस्मरणात गेली होती. इतिहासकारांनी या एकेकाळच्या भारतीयांच्या वसाहतींचा इतिहास लोकांपुढे आणला. पण तो इतिहास अभ्यासकांपुरताच मर्यादित राहिला होता. आता तो जनसामान्यांपर्यंत जातो आहे. इतकी शतके त्याकडे भारतीयांचे लक्ष गेले नव्हते याला अनेक कारणे आहेत. 

मंदिरांच्या बांधकामाविषयी 
इसवीच्या सातव्या शतकापासून ते सुमारे तेराव्या शतकापर्यंत उभारली गेलेली मंदिरे पाहून, त्यावेळी प्रचंड दगड क्रेनशिवाय उंचावर चढवले गेले याचा पाश्‍चात्य अभ्यासक, जाणकार, हातावर हात ठेवून केवळ आश्‍चर्य करीत बसली नाहीत, तर ही बांधकामे कशी केली असतील याचा विचार करण्यास प्रवृत्त झाली. मंदिरे सामान्यतः पाषाणाची आहेत. धार्मिक वास्तू कदाचित लाकडात बांधलेल्या असतील. त्याहून आधीच्या तर विटातल्या असणार. चुन्याचा आणि विशिष्ट वनस्पती पासून काढलेल्या साखरेचा उपयोग विटांच्या बांधकामासाठी केलेला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वालुकाश्‍म (Sandstone), लॅटराईट या प्रकारचे दगड मोठ्या प्रमाणात वापरलेले आढळतात. यापैकी काही तर चार-चार टन वजन भरेल एवढे आहेत. अत्यावश्‍यक ठिकाणांच्या जोडणीसाठी लोखंडी पट्ट्यांचा (Clamps) उपयोग केला जाई. जवळपास तर कोठेही ना डोंगर आहे ना खाणी. सुदूर असलेल्या महेंद्र पर्वतावरून हा दगड आणला असावा. आसपासच्या कालव्यातून तराफांच्या आधाराने आधी ते आणले असणार. प्रत्येक राजाने राजधानीचे शहर उभारले आणि अनेक किलोमीटर लांबीच्या कालव्यांचे जाळे निर्माण केले होते, असा इतिहास आहे. 

बांटे श्राय  
याची संकल्पना व बांधकाम हे यज्ञवराह व त्याचा भाऊ विष्णुकुमार यांनी केलेले आहे. बांटे श्राय म्हणजे महिलांचा बालेकिल्ला हे नाव त्यातील भावपूर्ण स्त्री शिल्पामुळे स्थानिक मंडळींनी दिल्याचे सांगितले जाते. यज्ञवराह नामक या ब्राह्मणाला हे बांधकाम करणे शक्‍य झाले. तो पहिल्या हर्षवर्धनचा नातू आणि पाचव्या जयवर्मनचा शिक्षक होता. एका मोठ्या अधिष्ठानावर (ओट्यावर) तीन देवालये आहेत. एका ओळीत! त्यातील मधले आहे ते अगदी भारतीय मंदिरासारखे म्हणजे गाभारा, छोटा मंडप आणि मुखमंडप (porch) अशी याची रचना आहे. १९१४ मध्ये फ्रेंचांचे लक्ष इकडे वेधले गेले. आंद्रे मालरॉ या फ्रेंच इसमाने या मंदिरातील चार मूर्ती पळविल्या. त्याला पकडलेही गेले, कैदही झाली. (पुढे फ्रेंच मंत्रिमंडळात तो सांस्कृतिक मंत्री झाला!) तीन मंदिरांच्या समोर पायऱ्या असून त्यांच्या आजूबाजूस छोटे कठडे आहेत. त्यावर हनुमान, गरुड यांच्या चुन्यातील (stacco) प्रति आहेत. शिखराच्या कोपऱ्यावर मकरमुखातून उद्‌भूत होणारे नाग वा गरुड दिसतात. त्यामुळे कोपरे लक्षवेधी ठरतात. ही मंदिरे तशी छोटेखानी आहेत. येथील त्रिकोणी कमानीत नरसिंह, त्रिशुंड हत्तीवरील इंद्र, कैलास व रावण, मदनदहन, कंसवध असे देखणे प्रसंग आढळतात. 

अंकोर वॅट  
हे भव्य, विशाल, उत्तुंग आणि प्रचंड मंदिर उभारणारा द्वितीय सूर्यवर्मन शैव संप्रदायाचा बहुधा अनुयायी असलेला हा सूर्यवर्मा, वैष्णव पांचरात्राचा अनुयायी होऊन त्या काळातील जगातील सर्वात मोठे विष्णू मंदिर उभारण्यास कसा उद्युक्त झाला? कृष्णाशी साम्य दाखविण्यासाठीही त्याने असे केले असावे. या मंदिराची संकल्पना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्यांचे नाव कळते ते दिवाकर पंडित यांचे. हा सहाव्या जयवर्मन आणि पहिला धरणीन्द्रवर्मा यांच्या काळापासूनचा आणि सूर्यवर्माच्या दरबारात असलेला विद्वान होय. या मंदिराच्या लांबचलांब भिंतीवर हिंदू परंपरेतील अनेक मिथके आणि दंतकथा अर्धउठावातील शिल्पाकृतीद्वारे गोचर केलेल्या आहेत. विशेषतः रामायण आणि महाभारत या महाकाव्यातील प्रसंगावर आधारलेली कथा शिल्पे ओवरीतील भिंतीवर अवतरली आहेत. यातील काही हरिवंश व भागवत वा पुराणावर आधारलेली आहेत. त्यामुळे हिंदू मनाला भावणारी आहेत. एक मात्र खरे, की बोलक्‍या आणि इतक्‍या विस्ताराच्या शिल्पाकृती भारतातही आढळणार नाहीत. या कथांसाठी कोणत्या ग्रंथाचा आधार घेतला गेला होता, हे काही सांगता येत नाही. त्यातील पात्रांची नावे शिलालेखात आढळत नाहीत. पण काही थोडक्‍या प्रमुख पात्रांची आणि स्वर्ग आणि नरकांची नावे मात्र आढळतात. कोडेज्‌ या तज्ज्ञांचे मत असे, की कलेसाठी कला असा ख्मेर मंडळींचा दृष्टिकोन नव्हता, तेव्हा मंदिराला जिवंत करण्यासाठी ही शिल्पे कोरली असावीत. येथील अप्सरा, नृत्यांगनांमुळे भौतिक वास्तूंना स्वर्गाच्या प्रासादाचे स्वरूप व्हावे, हा उद्देश असावा. अंकोर वॅट येथील सूर्यवर्माच्या जीवनातील प्रसंगाचे आणि अंकोर थॉम येथील सातव्या जयवर्माच्या संबंधातल्या शिल्पांमुळे या राजांचे तेथील प्रत्यक्ष वास्तव लक्षात येते आणि जिवंत असल्याचा भास होतो. बोश या तज्ज्ञांचे या बाबतीत म्हणणे असे, की राजेलोकांचा प्रभाव, मोठेपणा आणि महत्त्व वाढवण्यासाठी हा सारा खटाटोप असावा. मॉरिस ग्लेजचे प्रतिपादन असे, की ही मंदिरे राजा वा अधिकारी व्यक्तींच्या वैयक्तिक वास्तू होत्या आणि त्यांनी त्या पुण्यप्राप्तीसाठी उभारल्या असणार! तिसऱ्या परकोटात कथानकशिल्पे ज्यांनी पाहिली तो तर आश्‍चर्याने चक्रावूनच गेला होता आणि आजच्या पर्यटकांचीही तीच अवस्था होते. या सर्व शिल्पाकृतीवर, त्यासंबंधीच्या कथांवर, सौंदर्यावर दोनशे वर्षांत अनेकांनी लिहिले आहे. लुई फिनोट आणि हेन्री परमेंटिहर यांनी तर एकूण ६०८ फोटोसहित खंड प्रसिद्ध केले होते. लोक लिहीत होते आणि अजूनही लिहीत आहेतच. 

सुमारे ४८.३५ मीटर लांबीच्या पट्ट्यावर कुरुक्षेत्रामधील युद्धातील प्रसंग कोरले आहेत. या पट्ट्याचे दोन भाग कल्पून उत्तरेकडच्या भागात कौरव सैन्य दाखविले आहे आणि दक्षिणेकडे पांडव सैन्य दाखवले आहे. प्रारंभी दोन्हीकडील बाजू शांत आहेत. या पट्ट्यांचा बरोबर मध्यभाग म्हणजे लढाईचे केंद्र, जेथे सैन्य एकमेकांवर तुटून पडली आहेत. शिल्पमय कथानकाच्या प्रारंभीच शरपंजरी पडलेले भीष्म पितामह आहेत. मध्यात आहे तो अर्जुनाचा रथ. हा सहज ओळखता येतो, कारण याचा सारथी आहे चतुर्भुज कृष्ण. 

दक्षिणेकडील ओवरीच्या पश्‍चिम भागावरील सूर्यवर्मनची शाही मिरवणूक दिसते. एका शिल्पात समोर बसलेल्या चार मंत्र्यांकडे डाव्या हाताने सूर्यवर्मन काहीतरी आज्ञा देतो आहे, असे दिसते आणि पुढील शिल्पात तो गजारुढ होऊन सैन्यासह मिरवणुकीत सहभागी होतो आहे, असे दिसते. पुढे कंबोडियातील मंदिरावर अशी शिल्पे कोरण्याची परंपरा सुरू झाली. काही वर्षांनंतर ती बयॉन येथेही प्रत्यायास येते. येथे फक्त राजा आणि पुरोहित यांच्याच अंगावर अलंकार आहेत. राजाच्या मागील बाजूस ऋषी (पंडित) बसलेले आहेत. डोकीवर बुचडे आहेत आणि कमरेला लंगोटी आहे. एकाने तर वल्कलेच नेसली आहेत. सम्राटाभोवती अनेक चाकर आढळतात, तसेच मोर कोरलेले आणि चार चौऱ्या आहेत. विशेष म्हणजे या १९ अधिकाऱ्यांची आणि राज्यपालांची नावेही आहेत. वीरसिंहवर्मा, धनंजय, जयेंद्रवर्मा, वीरेन्दाधिपतीवर्मा, बीरयुधवर्मा, जययुधवर्मा, महिपतिन्द्रवर्मा इत्यादी. विशेष म्हणजे यांची खाती, आयुधे, छत्र संख्या यांचीही माहिती दिलेली आहे. 

पूर्वेकडील भागात तीन आभासी पट्ट्यात स्वर्ग आणि नरक यांचे चित्रीकरण आहे. सगळ्यात तळाशी वेगवेगळ्या पापासाठी वेगवेगळ्या नरकांची योजना केलेली आहे. त्यांची नावे आणि त्यासाठीचे पाप सशिल्प दाखविले आहे. उदा. जे श्रीमंत असूनही पापात लोळतात त्यांचेसाठी ‘अविची’ नरक आहे. त्यांना काटेरी झाडावर लटकवले जाते वा खाली पाडून त्याची साल काढली जाते. दुसरा ऋिमनिकाय, जे देवांचा, अग्नीचा, गुरूंचा, माता-पित्यांचा, ब्राह्मणांचा अपमान करतात त्यांना कीटकांच्या पेवातच फेकले जाते व वर येण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या टाळक्‍यात दंडुके घातले जातात. तिसरा नरक आहे वैतरणी जे पापी विज्ञानाची अवहेलना करतात. चोर, विश्‍वासघातकी यांच्यासाठी हा असतो. असा तऱ्हेने ख्मेर मतानुसार ३५ प्रकारचे नरक आहेत. त्यांची नावे व शिक्षा हे सशिल्प दाखविलेले आहे. अगदी झाडे तोडणे, फुले तोडणे, चोरणे, छिनालपणा करणे इत्यादीसाठीही नरकांची योजना केलेली आहे. एक शिल्प आहे, ज्यात पृथ्वीवरून आलेल्यांना चित्रगुप्त शिक्षा सांगतो आहे. त्याच्या हातातील काठीने तो पापी लोकांच्याकडे निर्देश करतो आहे. पुढे एका शिल्पात रेड्यावर बसलेला अठरा हातांच्या यमराजाचे भव्य शिल्प आहे. 

पूर्वेकडील ओवरीच्या दक्षिणेकडील भागात समुद्रमंथनाचे शिल्पांकन केलेले आहे. घुसळण करणाऱ्या रवीपुढे साक्षात विष्णू आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या दोन हातात तलवार आणि चक्र आहे, तर खालचे हात मंथन दोरीवर आहेत. ही रवी (मंदार पर्वत) जमिनीत रुतत जाऊ नये म्हणून विष्णूचाच अवतार असलेल्या कासवाच्या पाठीवर ती टेकलेली आहे. वासुकीच्या एका बाजूस देव व दुसऱ्या बाजूस दानव आहेत. 

पूर्वेकडील ओवरीच्या उत्तर भागात विष्णूची असुरांबरोबर लढाई दाखविलेली आहे. शिल्पपटातले असूर चिलखत आणि टोपी घालून निरनिराळ्या प्राण्यावर स्वार होऊन विष्णूला घेरतात. विष्णू-कृष्णाच्या दोन्ही बाजूने हे सैन्य त्यांच्यावर चालून जाते आहे. गरुडारुढविष्णू या सर्व असुरांविरुद्ध एकटा झुंजतो आहे. त्याच्या वरच्या दोन हातांत चक्र आणि शंख आहे, तर खालच्या दोन हातात धनुष्यबाण आहे. विष्णूच्या सभोवार चार असुर मरून पडले आहेत. हरिवंशात सांगितल्याप्रमाणे ते आहेत, मुला, निसुंद, हयग्रीव आणि पंचनद. समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमृतासाठीची ही लढाई झाली. 

पुढील ओवरीत बाणासूर माघार घेतो. श्रीकृष्ण, अनिरुद्ध व उषासह द्वारकेस परत जातो, अशीही शिलाबद्ध केलेली आहे. अंकोरवॅटमधील ही महत्त्वाची शिल्पकथा आहे. बाणासुर सहस्र हातांचा आहे. त्याच्या मोठ्या रथाला प्रचंड व्याल (ड्रॅगन) जुंपलेले आहेत. मौजेचे म्हणजे येथे वाद्यवृंदही दिसतो. म्हणजे बाण आत्मविश्‍वासाने वाजत गाजत युद्धभूमीवर पोचला आहे. देव आणि गरुडारुढकृष्ण यांचे सैन आहे. टोकदर मुकुट घातलेले देव आहेत. कृष्णाला खूप हात आहेत; त्यात बाण, भाला, चक्र, शंख, गदा, वज्र, ढाल, धनुष्य ही आयुधे आहेत. ही बाणासुर युद्धाची कथा संपते, जेव्हा कृष्ण शिवाला जाऊन भेटतो. हा प्रसंग पश्‍चिम टोकास कोरलेला आहे. उच्चारानुसार बसलेला शिव चीनी तोंडवळ्याचा आहे. कृष्ण त्याच्यासमोर हात जोडून बसलेला आहे. 

उत्तरेकडील ओवरीच्या पश्‍चिम भागावर देव असुरांच्या लढाईचे शिल्पांकन आहे. बळी या सद्रुणी दैत्याला प्राधान्य दिलेले आहे. आपल्या तपाच्या आणि भक्तीच्या जोरावर त्याने विलक्षण सामर्थ्य प्राप्त करून घेतलेले असते. उन्मत्तपणे त्याने देवांना आवाहन दिलेले असते. पश्‍चिमकडील ओवरीच्या उत्तर बागावर सुमारे ५२ मीटर लांबीच्या पट्ट्यावर राम रावण युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे. विशेष म्हणजे राम आणि त्याचे सैन्य जमिनीवरून लढते आहे. रावण त्याचे अधिकारी सजवलेल्या रथावर आरुढ आहेत. रथाला घोडे व सिंह जुंपलेले आहे. हत्ती मात्र एकच आहे. त्यावर मोहादर राक्षस बसलेला आहे. हनुमानाच्या खांद्यावर राम उभा असून त्यावर बाणांचा वर्षाव होतो आहे, इथे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. बिभीषण ओळखला जातो, तो राक्षसांच्या पिसाऱ्याच्या शिरस्त्राणयामुळे. त्यांच्यापासूनच वीस हातांचा दहा तोंडाचा आणि विशेष म्हणजे चार पायांचा रावण उभा दिसतो. 

प्रिह खान मंदिर 
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. या शहराचा आणि मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे. एका छोट्या वास्तूत एक शिलालेख उपलब्ध झाला. तो साधारणतः अकराव्या शतकाच्या प्रारंभीचा (१०१०) आहे, पहिल्या सूर्यवर्मनच्या काळातील. पहिल्या ओळीत शिवाला वंदन केले आहे आणि दुसऱ्या ओळीत बुद्धाला. येथे बहुदा अकोरवासी व चाम यांच्यात घनघोर लढाई झाली होती, ती ही जागा असणार. येथे चाम राजा मारला गेला. शिलालेखात हे मंदिर राजाच्या वडिलांच्या म्हणजे धरणीन्द्रवर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले होते. 

या मंदिराच्या पूर्वेला आणि पश्‍चिमेला रस्ते असल्यामुळे पूर्वेकडून मंदिर पाहात पाहात पश्‍चिमेला बाहेर पडता येते. 

निक पॉन मंदिर  
हे मंदिर जयवर्मा सातवा याने निर्माण केलेले असे समजले जात असले, तरी मुळात ही हिंदू वास्तू होती. उत्तरेकडच्या हौदाच्या काठाने मधल्या बेटाकडे गेले, की वर्तुळाकृती अधिष्ठानाच्या भोवती दोन भल्या मोठ्या नागांनी वेढा घातलेला दिसतो. या बेटाच्या पूर्वेला उडू शकणाऱ्या घोड्यांचे मोठे शिल्प आहे. या परिसरात विष्णू मूर्ती आणि काही शिवलिंगही आढळतात. बहुदा आधी हिंदू वास्तू होती त्याच्या या खुणा आहेत. 

अंकोर थॉम आणि बयॉन मंदिर  
सातव्या जयवर्माने ठरविले, की राजधानीचे शहर सर्व दृष्टीने सुरक्षित करायचे. त्याचेच नाव आता अंकोर थॉम असे पडले. ख्मेरांनी उभारलेल्या नगरांपैकी सगळ्यात विशाल अशी ही नगरी होय. या नगरीला जयतटाक या अतिविशाल तलावातून, पाणीपुरवठा केला जाई. पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण याची उत्तम व्यवस्था केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. अंकोर थॉम नगरीच्या केंद्रस्थानी बयॉन मंदिर आहे. हे प्रतिक आहे राजाच्या सामर्थ्याचे आणि अजरामर व्हावे अशा त्यांच्या दुर्दम्य इच्छेचे. सर्वांत आतल्या भिंतीपाशी एक १२ फूट उंचीची नागाच्या वेटोळ्यावर बसलेली बुद्धाची मूर्ती दिसते. या नागाचे नाव मुचलिंद आणि तो आपल्या सात फण्यांच्याद्वारे बुद्धाच्या डोक्‍यावर सावली धरून आहे. सातव्या जयवर्मनने अनेक मोठ्याल्या वास्तू उभारल्या पण तो स्वतः मात्र लाकडी राजवाड्यात राहात असे. प्रथेप्रमाणे लोकांसाठी सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टिकोनातून मंदिरे बांधली गेली. काळानुसार या व्यवस्थेचा ढाचा बदलला, शेती थांबली, निसर्गाने त्याच्या पद्धतीने जंगल निर्माण केले, ते जंगल दाट झाले, पण मंदिरे दुर्लक्षित राहिली. जंगलाची वाढ इतक्‍या जोमाने जाली, की साग आणि इतर प्रजातींची झाडे ६० ते ७० फूट उंच वाढली. व्याख्येप्रमाणे जंगल अतिदाट स्वरूपाचे आहे. अशा तऱ्हेच्या जंगलांतून देवळांचा शोध लागणे हेच महत्त्वाचे! प्रत्येक मंदिराभोवती साधारण ७० ते १०० फूट रुंदीचे कालवे चारही बाजूंनी फिरवले गेलेले आहेत. मंदिरांकडे जाण्यासाठी जुना पूल आहेच पण नवीन तरंगता पूलदेखील बांधला आहे. 

कंबोडियातील इतर भटकंतीत मुख्यत्वेकरून राजवाडा, रशियन मार्केट आणि जेनोसाईड म्युझियम बघण्याचा मानस पूर्ण झाला. कंबोडियन संस्कृतीवर बऱ्याच प्रमाणात हिंदू धर्माचा पगडा होता, पण आता तेवढा दिसत नाही. नॉमपेन्ह याचा अर्थ स्त्री राज्यातील टेकडी वगैरे. राजाचा राजवाडा म्हणजे जुन्या वास्तूचा उत्तम नमुना आहे. नोकरशाहींची कामाची पद्धत गमतीशीर दिसली. आठवड्याचे पहिले तीन दिवस सरकारी नोकर त्यांच्या कचेरीत काम करतात. अपुरा पगार आणि विशेष बोनस नाही अशा तुटपुंज्या मिळकतीत ते पुढील तीन दिवस खासगी कंपन्यांची कामे करून जास्त पैसे मिळवितात. एकंदरीतच नाग संस्कृती किंवा नागांच्या प्रतिकृती, मूर्ती जास्त प्रमाणात राजवाड्यात दिसल्या. प्रत्येक वास्तूत नागाच्या प्रतिकृती हा स्थायी भाव आढळला. त्याच वेळेस हिंदू आणि बुद्ध संस्कृतीचा पगडा सारखाच असून मिश्र व्यवस्था निर्माण झाली आहे. चार नद्यांचा संगम या शहरात दिसतो. पाण्याला पुष्कळ महत्त्व दिले जाते. काम करण्याच्या पद्धतीत सात दिवसांच्या सात रंगांनादेखील महत्त्व दिले आहे. राजवाड्याच्या सुरुवातीसच कैलासपतीचे झाड शुभ म्हणून रुजविले आहे. फ्रेंचांनी ७० वर्षे राज्य केले, त्यांच्या काही खुणा आणि वास्तू तिथे दिसल्या. त्यानंतर कम्युनिस्ट राजवटीत १९७५ मधील जेनोसाईडच्या खुणादेखील जपून ठेवल्या गेल्या आहेत. 

मुख्य मंदिराच्या म्हणजे ''अंकोर वॅट''च्या दिशेने प्रयाण करण्याच्या आधी तीन दिवसांसाठीचे ६७ अमेरिकन डॉलर्स भरून तिकीट घ्यावे लागते. १ जानेवारी २०१८ पासून या विभगात २.३ दशलक्ष पर्यटक येथे आले आणि एका बोर्डावर हा आकडा सारखा अपडेट केला जातो. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आणि व्यावसायिक पद्धतीने येथे मंदिरे दाखविली जातात. 

कंबोडियामध्ये १९७५ मध्ये झालेल्या जेनोसाईड प्रसंगांमुळे त्यांना पुष्कळ भोगावे लागले हे सत्य आहे. अमेरिका आणि इतर देशांनी कंबोडियाला यातून बाहरे काढले. तरीसुद्धा अंगभूत शिस्त या लोकांमध्ये रुजलेली दिसते. संपूर्ण शहर फिरताना एकदासुद्धा कोणत्याही मोटारीने हॉर्न वाजविला नाही. त्यामुळे फारच चुकल्यासारखे वाटत होते. कारण भारतातील ड्रायव्हर्स हॉर्न वाजविण्यात तज्ज्ञ आणि धन्यता मानणारे अशी सवय आपल्याला आहे. कंबोडियात ९० वर्षे फ्रेंचांनी वसाहतीतून काम केले. स्वातंत्र्यानंतर राजाभिमुख व्यवस्था असली, तरी भारतापासून लोकशाहीची व्यवस्था त्यांनी अंगीकारलेली आहे आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. एकंदरीतच शहर आणि रस्त्यांवरील स्वच्छता अंगभूत शिस्तीमुळे चांगलीच आहे. कंबोडिया देशाची लोकसंख्या साधारण दीड कोटी म्हणजे भारताच्या एक टक्का एवढी आहे. 

जे हिंदू राजे होते त्यांनी मंदिरे बांधली पण पुढील काळात त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारल्यामुळे बुद्धिझमचा ढाचा देशात निर्माण झाला. बऱ्याचशा मंदिरांमधील मूर्ती फ्रेंच वसाहतींनी काढून पॅरिसच्या म्युझियममध्ये ठेवल्या. कंबोडिया या दक्षिण (पूर्व) देशावर पूर्वी थायलंड देशाचे राज्य होते. आता बऱ्याच वर्षांनी त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यावर पश्‍चिमी संस्कृतींचा बराच प्रभाव झालेला दिसतो. 

कंबोडिया देशाची सहल करण्यामागचा उद्देश सफल झाला, त्याचे मुख्य कारण म्हणजे डॉ. देगलूरकरांसारखी अनुभवसमृद्ध व्यक्ती मंदिरांची पूर्वपीठिका सांगण्यासाठी आम्हाला लाभली. उत्खनन शास्त्राप्रमाणे मूर्तींचा अभ्यास, देवतांचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास केला जाऊन ऊहापोह करताना शोध निबंध सादर करतात. माझा उद्देश, पर्यावरण अभियंता या नात्याने, इतिहासाचा अभ्यास म्हणून नव्हता, पण हिंदू राजांनी इसवी सन ७०० ते इसवी सन १२०० या काळामध्ये बांधलेली शिल्पे बघणे हेच मुख्य आकर्षण होते. 

साधारण दहा परिसरांमधील ६० ते ७० मंदिरे पाहिली. बऱ्याच ठिकाणी मूर्ती गायब झालेल्या, ढासाळलेले सांगाडे जरी अनुभवास आले, तरी येथे मंदिरे होती हा सुखद अनुभव सर्वांनी घेतला. राजकीय, नोकरशाही, आंतरदेशीय संस्था, त्यांच्या अपेक्षा वगैरेचे पुष्कळ अडथळे आहेत याची जाणीव ठेवून आपला हा सांस्कृतिक वारसा जपायला अग्रक्रम भारत सरकारने द्यावा असे वाटते. पुढील पिढ्यांना त्याचा अनुभव मिळेल. त्याचप्रमाणे डॉ. देगलूरकरांसारखा अभ्यासक विवेचक आणि त्यांचे नियोजित पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या प्रक्रियेत आमचा सहभाग हेच या सहलीचे फलित होय. एकदा तरी अनुभवा हेच सर्व सुहृदांना सांगणे! 

(संदर्भ : १) डॉ. देगलूरकर सरांची टिपणे २) इतर माहिती)

संबंधित बातम्या