सफर ग्रीसच्या बेटांची...! 

स्वाती देशपांडे 
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

सॅरोनिक आखात, अयोनियन समुद्र व एशियन समुद्र यांच्या निळ्या-हिरव्या पाण्यातून उगवलेली भूकमळे म्हणजे ग्रीसची बेटे! या बेटांना भेट दिल्याशिवाय व तेथील वैशिष्ट्ये जाणून घेतल्याशिवाय ग्रीसची सफर पूर्ण झाली, असे म्हणता येणार नाही. तशी ग्रीसच्या एकूण बेटांची संख्या सहा हजारच्या वर आहे व त्यांच्या स्थानानुसार त्यांचे सहा गट केले आहेत. यातील फक्त २३० बेटांवरच मानवी वस्ती आहे. पवित्र डेल्लोस बेटाच्या भोवती वर्तुळाकार पसरलेल्या बेटांना cyclades असे म्हणतात. यात एकूण १६ बेटे आहेत. यामध्येच प्रसिद्ध बेटे सॅंटोरिनी व मिकोनोस यांचा समावेश आहे. या दोघांबरोबरच काही महत्त्वाच्या इतर बेटांचीही ओळख आपण करून घेणार आहोत. 

मिकोनोस  
अथेन्सपासून फेरीबोटीने अडीच ते पाच तासात मिकोनोसला पोचता येते. फेरीबरोबरच विमानाचा पर्यायही उपलब्ध आहे. पण समुद्र अनुभवायचा तर फेरीचा पर्याय उत्तम! चहा-कॉफीबरोबर स्नॅक्सचा आस्वाद घेत मधून-मधून लागणाऱ्या छोट्या-छोट्या बेटांचे फोटो काढत, समुद्राच्या बदलत्या छटा अनुभवत किंवा संपूर्ण बोटीत फेरफटका मारत इतर लोकांशी संवाद साधत कधी पोचतो तेच कळत नाही. आम्ही मे महिन्याच्या मध्यात तिकडे गेलो होतो, तरी उतरल्या-उतरल्या उन्हाचा तडाखा व रखरखाट जाणवला. बोडक्‍या टेकड्यांकडे बघून वाटले, की इथे बघण्यासारखे काय आहे? हॉटेलवर पोचेपर्यंत ही समजूत कायम होती. समुद्राला लागून हॉटेल - हॉटेलच्या समोरच वारुणी व खाद्यपदार्थ मिळणारी मोठी रेस्टॉरंट्स‌, त्यापुढे बीच व पुढे समुद्र! संध्याकाळ झाल्यानंतर तरुण-तरुणींचा जल्लोष सुरू होतो. रंगीत दिवे, मोठ्या आवाजात लागलेली गाणी अथवा संगीत व त्या तालावर नाचणारी तरुणाई! रूक्ष हवा बदलून हवेत गारवा येतो. मरगळ जाऊन तरतरी येते. पार्टी डेस्टीनेशन का म्हणतात याचा प्रत्यय येतो. 

मिकोनोसला वाऱ्याचे बेट म्हणतात. त्याला एकूण २५ समुद्रकिनारे लाभले आहेत. पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. उत्फुल्ल रात्रजीवन, समलैंगिक, द्वैलैंगिक व लिंगबदल केलेल्या लोकांसाठी मिकोनोस प्रसिद्ध आहे. ग्रीक पुराणानुसार याचा पहिला शासक मिकोनोस हा देव अपोलोचा पुत्र किंवा प्रप्रौत्र व स्थानिक हिरो होता. त्याच्यावरूनच या प्रदेशाला नाव मिळाले. इथला प्रदेश हा खडकाळ आहे. ग्रॅनाईटचे काही कडे आहेत. काही वाऱ्याच्या जोराने झिजले आहेत. १९ व्या शतकात येथे उच्च दर्जाची माती व बॅरीटच्या खाणी होत्या, येथे दररोज ४५०० क्‍युबिक मी. पाणी शुद्ध केले जाते, स्थानिक व पर्यटक यांच्या वापरासाठी! वर्षातील ३०० दिवस येथे सूर्यप्रकाश असतो. जून, जुलै, ऑगस्ट हा पर्यटनाचा काळ. ऑक्‍टोबर ते मार्च पावसाळा असतो. पण जगभरातून लोक इथे येतात, ते इथला उन्हाळा अनुभवण्यासाठी व मौजमस्ती करण्यासाठी. येथील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे लिटिल व्हेनिस व पॅनॅजिआ! कडे उतरून खाली आलो, की समुद्रसपाटीवर एक अद्‌भुत दुनिया वसली आहे. समुद्राच्या पाण्याशेजारी वसलेली अनेक उपहारगृहे! सर्व उत्साही जनता तिथे मासे व वारुणी यांचा आस्वाद घेत समुद्री वातावरण अनुभवत असतात. रंगीबेरंगी वस्तूंची दुकाने व अप्रतिम निसर्गदृष्ये यांचे फोटो काढण्यात पर्यटक रमून जातात. थोड्या उंचावर चढून गेल्यावर छोरा भागात प्रसिद्ध पवनचक्‍क्‍या एका ओळीत उभ्या दिसतात. व्हबेनेशिअन्सनी १६ व्या शतकात गहू दळण्यासाठी पवनचक्‍क्‍या उभारल्या, त्यातल्या सात एकाच ठिकाणी आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत यांचा वापर होत होता. निळ्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर पवनचक्‍क्‍या उठून दिसतात. तिथूनच जरा पुढे गेले, की खाली समुद्र दिसतो. नव्या उत्साहाने फोटोसेशन सुरू होते. पॅनॅजिया चर्च अति प्रसिद्ध! येथे एकूण ३६५ चर्च आहेत. संपूर्ण पांढऱ्या रंगात हे रंगवले आहे. निळे आकाश - निळे पाणी यांच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा वापर सगळीकडे मुबलक प्रमाणात केला आहे. अरुंद गल्ल्यांतून रंगीबेरंगी मालाने भरलेली दुकाने अतिशय कलात्मकरीत्या उभी केली आहेत. थोडीशी कच्च्या रस्त्याने पायपीट केल्यावर लाइट हाउस दिसते. तिथूनही वेगळाच नजारा दिसतो. मिकोनोसचे शुभचिन्ह म्हणजे अवचित दृष्टीस पडणारे पेलिकन्स! स्थलांतरित पक्ष्यांचा एक मोठ्ठा थवा मायदेशी परतला तेव्हा एक जखमी पक्षी मागे राहिला. स्थानिक कोळ्यांनी त्याची शुश्रूषा केली व त्याला मोकळे सोडले. पण तो परत गेला नाही, तिथेच राहिला. त्याचे नाव पेट्रोस ठेवले होते. तो ३० वर्षे तिथे राहिला. १९८६ मध्ये तो गेला तर संपूर्ण मिकोनोस अंत्यविधीला हजर होते. तेव्हा दोन पेलिकन्स दोन भिन्न ठिकाणांहून मिकोनोसला भेट मिळाले. नंतर अजून एक जखमी पेलिकन सापडला. त्याचे नाव निकोलस ठेवले. अशा प्रकारे तिथे आता तीन पक्षी आहेत. ते मिकोनोसचा आकर्षण बिंदू आहेत. 

सॅंटोरिनी  
मिकोनोसपासून फेरीने दोन तासांच्या अंतरावर सॅंटोरिनी आहे; तेही तितकेच प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. फेरीने जाताना वाटेत नेक्‍सस बेट लागते. इथेच महान दरवाजा उभा आहे. मोकळे आकाश व अथांग समुद्र यांच्यामध्ये उभा असलेला दरवाजा लांबूनही लक्ष वेधून घेतो. एका अपूर्ण मंदिराचा दरवाजा म्हणजेच ही चौकट, साडेतीन मी. रुंद व सहा मी. उंच आहे. २५०० वर्षांपूर्वी येथे ग्रीक देव अपोलोचे मंदिर उभारायला सुरुवात केली होती, पण ते मंदिर अपूर्णच राहिले, आता फक्त त्याचे अवशेष शिल्लक आहेत. याच ठिकाणी टायगर जिंदा है या सिनेमाच्या स्वॅगसे करेंगे सबका स्वागत या गाण्याचे चित्रीकरण झाले होते. 

मिकोनोसला उतरल्यावर जसा अनुभव येतो तसाच सॅंटोरिनीला उतरल्यावर येतो. पण अनुभवाने माहीत असते, की इथेही एक जादूई दुनिया आपली रहस्ये उलगडायला उत्सुक आहे. फिरा, इया, थिरा असे इथले भाग आहेत. फिरा ही इथली राजधानी आहे. दगडी कड्यावर तीन घंटा असलेले चर्च (कॅथॉलिक) उभे आहे. वरून खालचा समुद्र परत परत पाहावासा वाटतो. थिरा हे एका ज्वालामुखी नसलेल्या लाइमस्टोनच्या दगडावर उभे आहे. इया ही बेटावरील सर्वांत जुनी वसाहत. इथेच निळा डोम असलेले पांढरे चर्च पॅनोमारीआ उभे आहे. नॅशनल जिऑग्राफिक मॅगझीनने इथूनच काढलेला फोटो टाकल्यापासून ते आणखीनच प्रसिद्ध झाले आहे. अनेक हिंदी-इंग्रजी सिनेमात या ठिकाणांचे चित्रीकरण आहे. पांढऱ्या शुभ्र घरांमधून छोट्या छोट्या अरुंद गल्ल्या आहेत. चढ-उतार करण्यासाठी छोट्या पायऱ्यांचे रस्ते आहेत. बऱ्याचशा घरातून रेस्टॉरंट्‌स, हॉटेल्स केलेली आहेत. जगभरातून येणारे पर्यटक इथे निवास करतात. उंचावरून खाली तिन्ही बाजूला समुद्र दिसतो. छोटी छोटी बेटे, बोटी व सूर्याचा लालिमा पसरवणारा परतीचा प्रवास सर्वच दृश्य वेड लावणारे आहे. नशीब चांगले असेल, हवामान अनुकूल असेल तर अप्रतिम सूर्यास्त दिसतो. इमरोव्हिंगली या खेड्यातून सर्वांत छान सूर्यास्त दिसतो. या भागाला व्ह्यूइंग बाल्कनी म्हणतात. कारण इथून पूर्ण कॅल्देरा दिसतो. पूर्वी या भागाचा वापर समुद्री चाच्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा. आज या भागात सॅंटोरिनीमधली सर्वांत महाग हॉटेल्स आहेत. ऍम्मोडी बंदराकडे (खाली) उतरण्यासाठी कठीण अशा २०० पायऱ्या आहेत. तशाच प्राचीन थिराकडेही जायला ५८८ पायऱ्या आहेत. आपल्या कोकणात जशी घाटी असते तशाच या पायऱ्या आहेत. या रस्त्याला डाँकी ट्रेल म्हणतात. कुणी उत्साही मंडळी चालत तर कुणी गाढवावर बसून या मार्गाचा आनंद घेतात. ही गाढवेही घोड्यासारखीच चांगली देखणी व तगडी असतात. इथूनच केबल कारचीही सोय आहे. पिर्गोस येथील अर्धवर्तुळाकार छते असलेली घरे प्रसिद्ध आहेत. इथूनच सॅंटोरिनीमधल्या सर्वांत उंच पॉइंटवर जायला रस्ता आहे. त्या पर्वताचे नाव प्रोफिटीस असे असून तो समुद्रसपाटीपासून ५८४ मी. उंचावर आहे. प्राचीन थिरामध्ये कड्यावर पुरातत्त्व ठिकाण आहे. ख्रिस्तपूर्व नववे शतक ते इ.स. ७२६ पर्यंत इथे मानवी वस्ती होती. हेलेनिस्टीक, रोमन व बिझन्टाईन संस्कृतीचे अवशेष येथे पाहायला मिळतात. यात देवळे, घरे, अगोरा, थिएटर व व्यायामशाळा इत्यादींचे अवशेष आहेत. थिरामध्ये प्रागैतिहासिक म्युझियममध्ये आकृतीरी या गावातील अवशेष पाहायला मिळतात. यातील निळ्या माकडांचे चित्र प्रसिद्ध व दुर्मीळ आहे. तसेच सोन्याची तयार केलेली बकरीही प्रसिद्ध आहे. सॅंटोरिनीमध्ये समुद्र अन्न व काही स्थानिक पदार्थ पर्यटकांकडून आवर्जून चाखले जातात. बिनपाण्यावर वाढलेली पांढरी वांगी व छोटे टोमॅटो यांची चव खास आहे. वांगी तर कच्ची खाण्याइतकी गोड असतात. तसेच येथे उत्तम प्रतीचा मध व बकरीचे चीजही मिळते. येथे पांढऱ्या व लाल द्राक्षांची लागवड केली जाते. द्राक्षांचे मळे व वायनरीज यांनाही अनेक पर्यटक भेट देतात. 

इ.स. पूर्व १६५० मध्ये ज्वालामुखीचा मोठा उद्रेक होऊन वीस मैल उंचीचा लाव्हाचा स्तंभ कारंज्यासारखा उडायला लागला. त्यावेळी हे बेट मधोमध भंगून अर्धचंद्राच्या आकाराचे झाले. क्रीट बेटावरची दोन हजार वर्षे नांदलेली संस्कृती (मिनोअन) या स्फोटामुळेच लयाला गेली. क्रीट हे ग्रीसचे सर्वांत मोठे व जगात ८८ व्या क्रमांकावर असलेले बेट आहे. युरोपची सर्वांत पुढारलेली संस्कृती या बेटावर नांदत होती. १९५६ च्या भूकंपाने फिरा व इया हे दोन्ही भाग नेस्तनाबूत झाले होते. सॅंटोरिनीचे आजचे रूप बघता हा भूतकाळ खरा वाटत नाही. या उद्रेकामुळेच इथे वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर लाल, पांढरी व काळी वाळू किंवा गोटे निर्माण झाले व ते किनारे त्या त्या नावाने ओळखू यायला लागले. उदा. पेरीसा हा काळ्या जाड वाळूचा समुद्र तट आहे. हा बीच सलग सहा किमीचा असून इथे समुद्रखिळेही उपलब्ध आहेत. लाल बीच हा लाल टेकड्यांनी वेढलेला आहे. याच्या किनाऱ्यावर लाल गोटे आहेत. इथे पाण्याच्या खाली समुद्रीजीवन अनुभवता येते. निआ कामेनी येथे १३० मी. उंच टेकडीसारखे ज्वालामुखीचे मुख पाहता येते. पालिआ कामेनी इथे गरम पाण्याचे झरे आहेत. हे पाणी लालसर-शेंदरी दिसते व उपचाराकरिता प्रसिद्ध आहे. ही दोन्ही बेटे लाव्हा व राखेमुळे निर्माण झाली आहेत. निआ कामेनीला अलीकडचा उद्रेक १९५० मध्ये झाला होता. 

इ.स.पू. १६५० चा उद्रेक हा जगातील सर्वांत मोठ्या उद्रेकांपैकी एक समजला जातो. ज्या उद्रेकामुळे सॅंटोरिनीचा भूगोल बदलला, त्याच्या स्मरणार्थ येथे आयफेस्टीआ नावाचा उत्सव दर सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो. यावेळी होणारी आतषबाजी अपूर्व असते. आकृतीरी गावात पुरातत्त्व विभागाची साइट आहे. ज्वालामुखीच्या भयाने सर्व लोक गाव सोडून गेले. जमिनीखाली घरे, त्यांचे दुमजली खांब, त्यांची शौचालये, ड्रेनेज सिस्टीम सर्व पाहायला मिळते. माहिती द्यायला मार्गदर्शक असतात. गरम-गार पाण्याचे नळ, अनेक मजली इमारतींचे भव्य खांब, रस्ते, चौक, कमोड सर्व पाहताना मनात संमिश्र भावना दाटतात. (मोंहेंजोदडोच्या सिंधू संस्कृतीची आठवण हटकून येते.) या ठिकाणाची तुलना इटलीतल्या पाँपेइशी करतात. येथील काही भित्तिचित्रांचे रंगही अजून ताजे आहेत. त्यात वसंतऋतू, डॉल्फिन्स, काळवीट, केशरकाढणी इ. चित्रे खास आहेत. येथील वसाहतीचा कालावधी आहे ख्रिस्तपूर्व १६२७, कांस्ययुग! 

सॅंटोरिनीमध्ये पुष्कळ टूर्स करता येतात. फोटोग्राफी टूर, मासेमारी टूर, हॉट स्प्रिंग्ज टूर, व्हॉल्कॅनो टूर इ. हेलिकॉप्टरमधूनही ३० मिनिटांची सैर करता येते. त्यातून कॅल्डेरा, दगडी सुळके, ज्वालामुखी, द्राक्षाचे मळे, पांढरीशुभ्र घरे इ. सुंदर दृश्‍ये दिसतात. सॅंटोरिनीमधली जुन्या घरांची वस्तीही पाहण्यासारखी आहे. इथेच काही जुन्या गुहाही पर्यटकांसाठी प्रेक्षणीय आहेत. तसेच काही गुहा राहण्यासाठीही उपलब्ध आहेत. सॅंटोरिनी हे वेडिंग डेस्टीनेशन आहे. 

डेलोस  
हे बेट जागतिक वारसा स्थळाच्या यादीत आहे. पौराणिक, ऐतिहासिक व पुरातत्त्व महत्त्व असलेले बेट आहे. याचे पावित्र्य राखण्यासाठी अथेन्सने खूप प्रयत्न केले. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकानंतर या बेटांवर मरण्यास व जन्म देण्यास बंदी घालण्यात आली. तसेच व्यापारी दृष्टिकोनातूनही उदासीनता ठेवली गेली. अपोलो (संगीत, सत्य, काव्य, सूर्य व प्रकाश इ.चा देव) व आर्टिमीस (पावित्र्य, जंगली पशू, शिकार, संतती जन्म, वनस्पती यांची देवी) या जुळ्या भावंडांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. या बेटावर अपोलोचे डोरिक शैलीतले मंदिर होते. अपोलोच्या पुतळ्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. हात, पाय वगळता धड, हात तिथल्या म्युझियममध्ये आहे, तर पाय ब्रिटनच्या म्युझियममध्ये आहेत. ख्रिस्तपूर्व ६०० मध्ये नेक्‍सच्या लोकांनी अपोलोला मार्बलचे सिंह अर्पण केले होते. त्यातील सात शिल्लक आहेत. बेटावरच्या श्रीमंत तसेच सामान्य लोकांची घरे, दुकाने, मार्बल थिएटर, पवित्र तलाव, विहिरीतला पवित्र झरा इ. अनेक खुणा शिल्लक आहेत. लोक आवर्जून ही पुरातत्त्व जागा बघायला जातात. उंच स्तंभ असलेली व मोझॅक फरशी असलेली घरे अचंबित करतात. येथेच डायेनिससचे (वारुणी व ऊर्जा देव) देऊळ आहे. त्याच्या शेजारीच त्याचे प्रतीक असलेले भव्य पुल्लिंग भग्न अवस्थेत एका खांबावर स्थित आहे. ‘हाउस ऑफ डायोनिसस’मध्ये फरशीवर तो काळ्या चित्त्यावर स्वार दाखवला आहे. ‘हाउस ऑफ डॉल्फिन्स’मध्ये फरशीवर डॉल्फिन्स दाखवले आहेत. डेलोस सिनेगॉग हे सर्वांत जुने सिनेगॉग आहे. समुद्र किनाऱ्याला लागून क्‍लिओपात्राचे घर आहे. तेथे दोन स्त्री-पुरुषांचे शिर नसलेले पुतळे आहेत. इसिस देवतेचे मंदिरही आहे. डेलोसचे म्युझियम अतिशय सुंदर आहे. या बेटावर रात्री राहायला परवानगी नाही. 

या बेटांव्यतिरिक्त इतर अनेक बेटे पाचूच्या किंवा नीलमण्याच्या कोंदण्यात बसविल्यासारखी भिन्न भिन्न वैशिष्ट्यांसकट सौंदर्यपूर्ण रीतीने शोभत असतात. विस्तार भयास्तव हे वर्णन इथेच थांबवावे लागत आहे. 

सॅंटोरिनी काय किंवा मिकोनोस काय, पर्यटकांची इतकी गर्दी असूनही कुठे हुल्लडबाजी किंवा बेशिस्तपणा दिसत नाही. अतिशय स्वच्छंद वातावरण असूनही प्रत्येक जण मर्यादेत राहून आपला-आपला आनंद घेत असतो. एखादा अपवाद वगळता सगळीकडे कमालीची स्वच्छता आहे. सर्व घरे, रस्ते व कठडेही पांढऱ्याशुभ्र रंगाने रंगवलेले असतात. प्रत्येक जण आपल्या दुकानासमोरचे अथवा घरासमोरचे कठडे वरचेवर पांढरे करत असतो. पर्यटकांच्या पायाखालचे रस्तेही आश्‍चर्यकारकरीत्या चकाचक असतात. दोन्ही ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून जगप्रसिद्ध असण्यामागे हेही कारण आहे. निसर्गसौंदर्याची उधळण तर आहेच, पण मेहनतीने व कलात्मक दृष्टीने त्यात अजूनच भर टाकली आहे. समुद्राचे पाणी कचराविरहित नितळ पारदर्शी आहे. समुद्राच्या पाण्यात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे एक भले मोठे विवर तयार झाले आहे, त्यामुळे इथल्या समुद्राचा उल्लेख ‘कॅल्डेरा’ असाच करतात. अंधार पडल्यानंतर ही बेटे प्रकाशाच्या ठिपक्‍यांनी उजळून निघतात. रात्रीच्या काळोखात हे ठिपके कॅल्डेराला एक नवीन रूप बहाल करतात.    

संबंधित बातम्या