काँटिनेंटल खाद्यपदार्थ

उमाशशी भालेराव
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
काँटिनेंटल म्हणजे युरोपमधील वेगवेगळ्या देशांतील खाद्यपदार्थ! काँटिनेंटल पाककृतीमध्ये कमीत कमी मसाले आणि मीठ, मिरपुडीचा वापर सर्वांत जास्त असतो. चीजही भरपूर प्रमाणात वापरले जाते. गोड पदार्थांत वेगवेगळ्या फळांचे टार्ट असतात व वेगवेगळ्या प्रकारचे केक केले जातात. अशाच काही काँटिनेंटल रेसिपीज...

काँटिनेंटल व्हेज स्ट्यू 
साहित्य : फ्लॉवर, बटाटा, गाजर, बीन्स, मटारचे दाणे, बेबी कॉर्न, ब्रोकोली, आवडल्यास मशरूम, सिमला मिरची अशा सर्व उपलब्ध भाज्या, एक बारीक चिरलेला कांदा, दोन तुकडे दालचिनी. 
व्हाईट सॉससाठी साहित्य ः चार चमचे मैदा वा कणीक, २ कप दूध, १ वाटी किसलेले चीज, मीठ, मिरपूड, बटर 
कृती : सर्व भाज्यांचे बेताच्या आकाराच्या तुकडे करून घ्यावेत. सर्व भाज्या थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्यात. शिजवतानाच त्यात दालचिनीचे दोन तुकडे घालावेत म्हणजे सर्व भाज्यांना दालचिनीचा स्वाद लागेल. दुसऱ्या पॅनमध्ये २ चमचे बटर वितळवून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात गरजेप्रमाणे पाणी (भाज्या शिजवल्यावर उरलेले पाणी घ्यावे) घालून सतत ढवळत शिजवावे. गाठी होऊ देऊ नये. या व्हाईट सॉसमध्ये शिजवलेल्या भाज्या व अंदाजे मीठ मिरपूड घालावे. शेवटी किसलेले चीज घालावे. स्ट्यू फार दाट वा फार पातळ नसतो. हा स्ट्यू बेक करावयाचा झाल्यास बेकिंग डिशला लोण्याचा हात लावून त्यात तयार स्ट्यू नीट पसरून त्यावर पुन्हा किसलेले चीज भुरभुरावे व ओव्हनमध्ये १८० अंशामध्ये १० ते १५ मिनिटे बेक करावे. वर घातलेले चीज वितळून ब्राऊन झाले, की बेक्‍ड स्ट्यू तयार झाला.

क्रेप 
फ्रान्समधील हा खास लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ आपल्या धिरड्याप्रमाणे असतो. 
साहित्य : पाव किलो मैदा, २ अंडी, चमचाभर तेल, मीठ, मिरपूड व आवश्‍यकतेनुसार दूध. 
कृती : मैदा चाळून घ्यावा, २ अंडी फोडून त्यात घालावी. चमचाभर तेल व चवीनुसार मीठ, मिरपूड घालून सर्व एकत्र कालवावे. आवश्‍यकतेप्रमाणे हळूहळू दूध घालून सैलसर भिजवावे. तासाभराने पॅनमध्ये थोडे बटर वितळवून त्यावर डावभर हे मिश्रण घालून धिरड्याप्रमाणे पसरावे. दोन्ही बाजूंनी खरपूस शिजवून घ्यावे. क्रेपवर आवडीचा जॅम अथवा मध घालून खातात. अथवा तऱ्हेतऱ्हेचे शिजवलेले मांसाचे तुकडे, अंडी, भाज्या अथवा चीज घालून दुमडून सर्व्ह करतात.

फ्रेंच ग्रातॅं दो फिनवा (बटाट्याचा एक प्रकार)  
साहित्य : सहा मोठे बटाटे, अर्धा लिटर दूध, २ अंडी, ७-८ लसूण पाकळ्या बारीक चिरून, १ वाटी किसलेले चीज, १ छोटा चमचा जायफळ पूड, १ चमचा बटर, मीठ, मिरपूड 
कृती : बटाटे स्वच्छ धुऊन, साल काढून त्यांच्या पातळ चकत्या कराव्यात. दूध उकळत ठेवावे. दोन अंडी फोडून छान फेटून दुधात मिसळावे. अर्धे चीज, मीठ, मिरपूड व जायफळ पूड मिसळून गॅस बंद करावा. ओव्हनमध्ये ठेवण्याच्या डिशला लोण्याचा हात लावून त्यावर बटाट्याच्या अर्ध्या चकत्या नीट पसरून मांडाव्यात. त्यावर बारीक चिरलेल्या लसणापैकी अर्धे लसूण पसरावे. त्यावर दूध, अंडे, चीझचे उरलेले मिश्रण ओतावे. नंतर त्यावर उरलेले चीज घालावे. व ओव्हनमध्ये १८० अंशावर पाऊण ते एक तास शिजवावे. गरमागरम सर्व्ह करावे.

हंगेरियन एग्ज अँड पोटॅटोज  
साहित्य : तीन उकडलेली अंडी, ३ मोठे बटाटे, ३ चमचे बटर, १ कप दही, मीठ, मिरपूड, अर्धा कप ब्रेडक्रम्स, थोडी मिरचीपूड. 
कृती : बटाटे उकडून घ्यावेत (फार ठिसूळ उकडू नये). गार झाल्यावर सोलून जाड गोल चकत्या कराव्यात. उकडलेली अंडी सोलून त्यांच्याही चकत्या कराव्यात. ३ चमचे लोणी वितळवून घ्यावे. त्यात दही व मीठ, मिरपूड घालून कालवून ठेवावे. बेकिंग डिशला लोण्याचा हात लावून त्यात बटाट्याच्या अर्ध्या चकत्या मांडाव्यात. त्यावर लोणी-दही मिश्रण पसरावे. त्यावर अंड्याच्या चकत्या मांडाव्यात व पुन्हा लोणी-दही मिश्रण त्यावर घालावे. पुन्हा उरलेल्या बटाट्याच्या चकत्या मांडून उरलेले लोणी-दही मिश्रण त्यावर पसरावे. सर्वांत शेवटी त्यावर ब्रेडक्रम्स पसरावे. आवडल्यास त्यावर थोडी तिखटपूड घालावी. ओव्हनमध्ये १८० अंशावर २० ते २५ मिनिटे बेक करावे आणि गरमागरम सर्व्ह करावे.

व्हेजिटेबल रिसोटो 
हा भाताचा प्रकार आहे. इटालियन तांदूळ जाड असतो व त्याचा भात मऊ व चिकट होतो. तसा तांदूळ इथे उपलब्ध नसल्याने आपण इथे उपलब्ध असणारा बुटका जाड तांदूळ घ्यावा. 
साहित्य : दीड वाटी बुटका जाड तांदूळ, अर्धी वाटी बटर, १ कांदा बारीक चिरून, अर्धी वाटी बारीक चिरलेले बीन्स, अर्धी वाटी अमेरिकन कॉर्नचे दाणे, पाऊण वाटी टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ, मिरपूड, साखर, अर्धी वाटी किसलेले चीज, थोडी चिरलेली पार्सले (नसल्यास कोथिंबीर घ्यावी), व्हाइट वाइन अथवा व्हेज स्टॉक 
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास निथळत ठेवावा. पॅनमध्ये बटर वितळवून त्यात कांदा गुलाबी रंगावर परतावा. नंतर त्यात बीन्स, मक्‍याचे दाणे घालून परतावे. नंतर तांदूळ व टोमॅटो प्युरी घालून पुन्हा थोडे परतावे. शक्‍य असल्यास व्हाइट वाइन, नाहीतर व्हेजिटेबल स्टॉक अथवा पाणी घालून (हळूहळू थोडे थोडे घालावे) भात शिजवावा. शिजवतानाच त्यात मीठ, मिरपूड, थोडी साखर घालावी. भात शिजत आला, की त्यात किसलेले चीज घालावे. (काही जण थोडे क्रीमही घालतात) नंतर फार ढवळू नये. भात शिजल्यावर सर्व्ह करताना थोडी पार्सले वा कोथिंबीर घालावी. हा भात मऊमऊच असतो. वेगळ्या चवीचा हा भात मस्त लागतो.

इटालियन मिनिस्ट्रोन सूप 
इटालियन पदार्थांपैकी पिझ्झा व मॅकरोनी पास्ता हे दोन पदार्थ सर्वांच्या परिचयाचे आहेत. सर्वच इटालियन पदार्थांत ऑलिव्ह ऑइल, हर्ब्ज, लसूण, चीज यांचा भरपूर वापर असतो. 
साहित्य : पाव वाटी ऑलिव्ह ऑइल (अथवा बटर), १ कांदा बारीक चिरून, ५-६ लसूण पाकळ्या बारीक चिरून, थोड्या गाजराच्या बारीक फोडी, बारीक चिरलेले थोडे बीन्स, थोडी बारीक चिरलेली सेलरी, १ वाटी शिजवलेली मॅकरोनी, ४-५ चमचे टोमॅटो प्युरी, ३ कप चिकन स्टॉक अथवा व्हेजिटेबल स्टॉक, चवीनुसार मीठ, मिरपूड, साखर व अर्धी वाटी किसलेले चीज. 
कृती : बटर वितळवून (अथवा ऑलिव्ह ऑइल घ्यावे) त्यात कांदा, लसूण परतावा. त्यावर गाजराच्या फोडी व बारीक चिरलेल्या बीन्स घालाव्या. त्यावर चिकन स्टॉक अथवा व्हेज स्टॉक (स्टॉक नसल्यास पाणी) घालून भाज्या शिजवाव्यात. नंतर त्यात टोमॅटो प्युरी, शिजवलेली मॅकरोनी, मीठ, मिरपूड, साखर घालावी. नंतर सेलरी घालून सूप थोडे दाट होईपर्यंत उकळावे. शेवटी चीज घालून सर्व्ह करावे. (यात आवडीनुसार चिकन, बेकन, हॅमचे तुकडे वा थोडा शिजवलेला भातही घालतात)

पास्ता फ्लोरॅटाइन  
साहित्य : दोनशे ग्रॅम स्पॅगेटी, ३ चमचे बटर (अथवा ऑलिव्ह ऑइल), ४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरून, १ कांदा बारीक चिरून, ३ वाट्या बारीक चिरलेला पालक, १ वाटी क्रिम, अर्धी वाटी किसलेले चीज, मीठ, मिरपूड आणि थोडी जायफळपूड 
कृती : एका मोठ्या पातेल्यात ६-७ वाट्या पाणी घालून उकळी आल्यावर त्यात स्पॅगेटी घालावी (सबंध स्पॅगेटी घालावी, मोडू नये). थोडे मीठ टाकून स्पॅगेटी शिजवून घ्यावी. शिजल्यावर चाळणीत निथळून त्यावर थंड पाणी घालावे. नंतर थोडे तेल लावून ठेवावे, म्हणजे स्पॅगेटी न चिकटता छान मोकळी राहते. एका नॉनस्टिक पॅनमध्ये बटर वितळवून त्यात लसूण व कांदा परतून घ्यावा. सोनेरी रंगाचा झाल्यावर त्यात चिरलेला पालक, मीठ, मिरपूड घालून शिजवावे. पालक मऊ शिजल्यावर त्यात क्रिम, अर्धे चीज व जायफळपूड घालून एक मिनिट शिजवावे. नंतर त्यात शिजवून ठेवलेली स्पॅगेटी घालून अलगद ढवळावे. नंतर सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यावर उरलेले चीज पसरून गरमागरम सर्व्ह करावे.

मेक्‍सिकन चीज एनचिलाडाज  
साहित्य : टॉर्टियासाटी : एक वाटी मक्‍याचे पीठ, १ वाटी मैदा, १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल (किंवा रिफाइंड तेल चालेल) चवीनुसार मीठ, तळण्यासाठी रिफाइंड तेल 
रेड सॉससाठी : एक मोठा कांदा बारीक चिरून, पाव चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा ओरेगॅनो (नसल्यास ओवा चालेल.) पाव चमचा जिरेपूड, २ मोठे चमचे तेल, ३ मोठे चमचे लाल रंगाची तिखटपूड (ही लाल पेप्रिकाची पूड असते.), ३ कप टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ, साखर, १ चमचा मैदा व थोडे पाणी. 
सारणासाठी ः दोन वाट्या किसलेले चीज, १ कांदा बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून व मीठ 
कृती : प्रथम टॉर्टियासाठी दिलेले साहित्य एकत्र करून पाण्याने घट्ट भिजवावे. त्या पिठाच्या लहान फुलक्‍याच्या आकाराच्या पोळ्या लाटून त्यांना मधे मधे काट्याने टोचावे म्हणजे फुगणार नाहीत. या पोळ्या डाग पडू न देता हलक्‍या शेकाव्यात. दुसरीकडे रेड सॉस करण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून तेल तापले, की कांदा, लसूण, ओरेगॅनो, जिरेपूड, तिखटपूड व टोमॅटो प्यूरी टाकून उकळी येऊ द्यावी. मीठ, साखर‌ व थोड्या पाण्यात मैदा विरघळवून ते घालावे. सॉस दाट झाला की उतरवावे. सारणासाठी दिलेले साहित्य एकत्र करून ठेवावे. कढईत तेल तापवून शेकून घेतलेल्या टॉर्टिया रंग बदलू न देता हलक्‍या तळून घ्याव्यात. गरम असतानाच त्यावर थोडे थोडे सारण घालून वळकटी करावी. सर्व वळकट्या तयार झाल्या, की बेकिंग डिशला लोण्याचा हात लावून सर्व वळकट्या त्यात मांडाव्या. त्यावर रेड सॉस घालावा. त्यावर किसलेले चीज भुरभुरावे आणि ओव्हनमध्ये १८० अंश तापमानाला १५ ते २० मिनिटे बेक करावे. (चीज भरपूर घालावे.) गरमागरम सर्व्ह करावे. 

टोस्टाडाज
साहित्य : एक वाटी मक्‍याचे पीठ, १ वाटी मैदा, १ वाटी कणीक, २ मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल (किंवा रिफाइंड तेल), मीठ. 
टॅपिंगसाठी ः चिकनचे शिजवलेले तुकडे अथवा आवडीच्या दोन भाज्या, थोडी लांबट चिरलेली लेट्यूस अथवा कोबीची पाने, थोडा बारीक चिरलेला पातीचा कांदा, वाटीभर किसलेले चीज. 
कृती : कणीक, मैदा, मक्‍याचे पीठ एकत्र करून त्यात तेल, मीठ व आवश्‍यकतेनुसार पाणी घालून घट्ट कालवावे व मळावे. या पिठाच्या लहान लहान पुऱ्या लाटून त्यांना काट्याने टोचावे म्हणजे फुगणार नाही. या पुऱ्या गरम तेलात मंद आचेवर कडक तळाव्यात. प्रत्येक पुरीवर चिकनचे वा शिजवलेल्या भाज्यांचे तुकडे पसरून वर लेट्यूसची पाने व कांदा घालावा. मीठ, मिरपूड व चीझ घालून सर्व्ह करावे.

ब्रेझिलिअँ (सफरचंद-ब्रेडचे पुडिंग)  
साहित्य : शंभर ग्रॅम बटर, १०० ग्रॅम वाळलेला गोड ब्रेड (साधा चालेल), १०० ग्रॅम साखर, ६ सफरचंदे, अर्धा लिटर दूध, ३ अंडी, व्हॅनिला इसेन्स. 
कृती : वाळलेल्या गोड ब्रेडचे तुकडे करावे. एका भांड्यात बटर, ब्रेडचे तुकडे, साखर व व्हॅनिला इसेन्स एकत्र करावा. अर्धा लिटर दूध उकळून ते लोणी-ब्रेड-साखरेच्या मिश्रणावर ओतावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात तीन अंड्यांतील पिवळे बलक मिसळावे. अंड्यातील पांढरे बलक खूप फेटून मिसळावे. ओव्हनमध्ये ठेवायच्या डिशला लोण्याचा हात लावून त्यात अर्धे मिश्रण ओतावे. ६ सफरचंदांच्या साली काढून फोडी करून शिजवून घ्याव्यात. या सफरचंदाच्या 

स्विस पोटॅटो रोस्टी  
साहित्य : बटाटे, चमचाभर बटर, मीठ, मिरपूड
कृती : बटाटे स्वच्छ धुऊन साल काढून किसून घेणे. नॉनस्टिक पॅनवर चमचाभर बटर वितळवून त्यावर थोडा कीस पसरून घालणे (साधारण पुरीच्या आकाराचे) दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून घेणे. वर मीठ, मिरपूड घालणे. चुरचुरीत ब्राऊन रंगाची जाळी तयार होते. स्वित्झर्लंडमध्ये हा पदार्थ फार लोकप्रिय असून बहुधा सकाळी ब्रेकफास्टला खातात. (आपल्याला उपवासालाही चालेल असा हा पदार्थ आहे. रताळ्यापासूनही करता येईल.) शिजवलेल्या फोडी त्या मिश्रणावर घालाव्यात व त्यावर उरलेले मिश्रण ओतावे. ओव्हनमध्ये १८० अंशावर ३० ते ४० मिनिटे बेक करावे. हे पुडिंग गरम किंवा गार आवडीप्रमाणे सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या