त्रुडोंचे 'भारत पर्यटन'

योगेश परळे 
मंगळवार, 20 मार्च 2018

वर्ल्ड व्ह्यू
खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या कॅनडाच्या नेतृत्वास भारताकडून मिळालेली वागणूक युरोपमधील देशांनाही थेट इशारा आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या घटकांचा येथील राजकारणात वाढणारा प्रभाव ही चिंतेची बाब आहे.
 

कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुडो हे गेल्या आठवड्यात भारतात आले. साबरमती आश्रमापासून ते ताजमहालपर्यंत अनेकविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. शीख धर्मीयांचे अत्युच्च श्रद्धास्थान असलेल्या अमृतसर येथील सुवर्णमंदिरास भेट देऊन त्यांनी तेथे पोळ्या लाटण्याची ‘सेवा’ही केली. मात्र इतर देशांच्या प्रमुखांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले नाही. भारतीय भूमीवर त्रुडो यांचे स्वागत पंतप्रधानांनी वा केंद्रीय मंत्रिमंडळामधील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने केले नाही. याचबरोबर ताजमहालला भेट देताना त्रुडो यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेटले नाहीत. त्रुडो यांचे स्वागत करणारे एखादे ट्‌विटही इतर वेळी ट्‌विटरवर अत्यंत सक्रिय असलेल्या भारतीय पंतप्रधानांनी केले नाही. त्रुडो यांच्या गुजरात दौऱ्यावेळीही मोदी त्यांच्यासमवेत नव्हते. त्रुडो यांच्या दौऱ्याच्या पहिल्या काही दिवसांत त्यांना भारतामधील सरकारच्या नाराजीची पूर्ण जाणीव नक्कीच झाली असेल. कॅनडाच्या पंतप्रधानांकडे करण्यात आलेले हे दुर्लक्ष हे जाणीवपूर्वक होते; यात काही शंका नाहीच. अर्थात त्रुडो यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदींशी झालेल्या त्यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांत सहा करार झाल्याचे घोषित करण्यात आले. याचबरोबर, यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये भारतीय पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेकडेही पाहणे गरजेचे आहे. 

‘‘या भेटीदरम्यान आम्ही संरक्षणविषयक सहकार्य तसेच दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद यांचा भारत व कॅनडासारख्या देशांना असलेल्या धोक्‍यावर चर्चा केली. या आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी भारत व कॅनडाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. जे राजकीय स्वार्थासाठी धर्माचा वापर करतात आणि फुटीरतावादाचा प्रसार करतात; अशांसाठी लोकशाही व्यवस्थेत कोणतीही जागा असू नये,’’ असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांच्या या विधानाच्या माध्यमामधून भारताकडून कॅनडास देण्यात आला. त्रुडो यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात केंद्र सरकारने दाखविलेली पूर्ण अनास्था आणि यानंतर फुटीरतावादास आश्रय देण्याच्या कॅनडाच्या धोरणासंदर्भात देण्यात आलेला हा इशारा; या दोन्ही अर्थातच एकाच धोरणाच्या बाजू आहेत. त्रुडो यांच्या दौऱ्यात त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून झाल्यानंतर अखेरच्या दिवशी मोदी यांनी त्रुडोंना हा इशारा देत त्यांची गळाभेट घेतली. 

खलिस्तानी दहशतवाद्यांना थेट आश्रय देणाऱ्या कॅनडाच्या नेतृत्वास भारताकडून मिळालेली ही वागणूक युरोपमधील देशांनाही थेट इशारा आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमधील विविध देशांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्या विखारी फुटीरतावादाचा प्रसार करण्यासाठी येथील व्यवस्था वापरली आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या घटकांचा येथील राजकारणात वाढणारा प्रभाव ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ‘वर्ल्ड सीख ऑर्गनायझेशन’ वा ‘सिख्स फॉर जस्टिस’ या खलिस्तानी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांना कॅनडामधील मवाळ व वेळप्रसंगी उत्तेजन देणाऱ्या राजकीय नेतृत्वामुळे अधिकाधिक पाठबळ मिळते आहे. आर्थिक पाठबळ आणि सोशल मीडियावरील विखारी प्रचारमोहिमांमुळे खलिस्तानचे गाडलेले भूत पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांस वेग मिळतो आहे. यामधूनच ‘रेफरेंडम २०२०’ सारख्या शीख समुदायास स्वयंनिर्णयाचा व स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा हक्क असल्याच्या प्रचारकी घोषणा होत आहेत. 

कॅनडासारख्या देशांमधून खलिस्तानच्या भावनिक मुद्यासाठी उभे केले जाणारे आर्थिक पाठबळ आणि प्रचारमोहिमांमुळे पंजाब राज्यात खलिस्तानचा मुद्दा जिवंत ठेवणाऱ्या दल खालसा आणि दमदमी तकसाल यांसारख्या फुटीरतावादी संघटनांना प्राणवायूच मिळतो आहे. सुवर्ण मंदिरात भारतीय लष्कराने १९८४ मध्ये राबविलेले ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ आणि यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली या शिखांसाठी भळभळत्या जखमा आहेत. मात्र या दुःखद घटनांचा वापर करून या कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरविले जात आहे. त्यांनी केलेल्या ‘बलिदाना’निमित्त त्यांच्या कुटुंबीयांचा आज सन्मान केला जात आहे. किंबहुना दल खालसाने काश्‍मिरी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यापर्यंत मजल गाठली आहे. 

पंजाबमधील या निद्रिस्त ज्वालामुखीस पुन्हा जिवंत करण्याचे पाप युरोप, कॅनडा आणि अमेरिकेमधील गुरुद्वारांमधून जमविल्या जाणाऱ्या भक्कम आर्थिक पाठबळामधून केले जात आहे. बैसाखी आणि इतर तत्सम सणांनिमित्त गोळा करण्यात येत असलेल्या देणग्या या खलिस्तान चळवळीसाठी वळविल्या जात आहेत. खलिस्तानच्या या भस्मासुराला आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे आर्थिक उत्तेजनही अर्थातच आहे. खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि बब्बर खालसा या थेट दहशतवादी संघटनांना पंजाबमध्ये भारतविरोधी दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी आयएसआयची थेट मदत मिळते आहे. भारताबाहेरील शीख समुदायामधील घटकांच्या माध्यमामधूनच हे आव्हान अधिकाधिक जटिल होते आहे आणि या आव्हानाचे गांभीर्य अर्थातच कॅनडामध्ये सर्वाधिक आहे. त्रुडो यांना भारतात मिळालेल्या वागणुकीचे हे मुख्य कारण आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग व त्रुडो यांच्यामध्येही झालेल्या भेटीमध्ये खलिस्तानी दहशतवाद व कॅनडामध्ये त्यास मिळणाऱ्या उत्तेजनाचा मुद्दाच प्रमुख ठरला. कॅनडामध्ये सक्रिय असलेल्या ९ दहशतवाद्यांची नावेच त्रुडो यांना यावेळी देण्यात आली. भारत वा अन्य कोणत्याही देशांमधील फुटीरतावादास उत्तेजन देण्याचे कॅनडाचे धोरण नसल्याचे त्रुडो यांनी यावेळी सांगितले. कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांस उत्तेजन देत असल्याचे स्पष्ट करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॅनडामधील मंत्र्यांची भेट घेण्यास गेल्या वर्षी थेट नकार दिला होता. या पार्श्‍वभूमीवर त्रुडो व त्यांच्यामधील ही भेटही अत्यंत संवेदनशील ठरली. 

कॅनडामधील लोकसंख्येमध्ये शीख समुदायाचे प्रमाण साधारणतः १.५% इतके आहे. कॅनडामधील शीख समुदायामध्ये खलिस्तानचा मुद्दा जिवंत राहिल्यामुळे भारतामध्ये संतप्त पडसाद उमटत आहेत. भारताच्या या तीव्र नाराजीची दखल कॅनडाला घ्यावी लागेल, यात काहीही शंका नाही. त्रुडो यांना मिळालेल्या वागणुकीमधून भारताची ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे. त्रुडो यांना जवळजवळ कॅनडामधून येणाऱ्या इतर पर्यटकांसारखेच वागविण्यात आले. भारताच्या भावनांची गंभीर दखल न घेतल्यास कोणत्याही देशाने भारताकडूनही सन्मानाची अपेक्षा ठेवू नये, हाच त्रुडो यांच्या भारतभेटीमधून देण्यात आलेला इशारा आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या