सडपातळ तरीही स्थूल भारतीय 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 8 एप्रिल 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

आपल्या भारताला आज जगातल्या मधुमेहाची राजधानी समजली जाते. मधुमेहाने पीडित जगभरातल्या रुग्णांपैकी ४९ टक्के रुग्ण भारतीय आहेत. आजमितीला सव्वासात कोटी भारतीयांना मधुमेह आहे आणि तज्ज्ञांच्या अनुमानानुसार २०२५ साली ही संख्या तब्बल साडेतेरा कोटींवर जाणार आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आय.सी.एम.आर.) इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्‍स ॲण्ड इव्हॅल्युशन आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थांनी २०१७ मध्ये केलेल्या अभ्यासपूर्ण सर्वेक्षणात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. त्यानुसार १९९२ ते २०१७ या पंचवीस वर्षाच्या कालावधीत भारतीयांना मधुमेह होण्याची शक्‍यता ६४ टक्‍क्‍यांनी वाढली.

वाढत्या मधुमेहाची कारणे
आर्थिक सुबत्ता : भारतीयांना वाढत्या प्रमाणात मधुमेह होण्याचे कारण म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांत वाढत गेलेली सुबत्ता असे मानले जाते. 
आकडेवारीचा विचार करायचा झाला, तर वर्ल्ड बॅंकेच्या अहवालानुसार १९९० साली भारतीयांचे दरडोई उत्पन्न २४,८६७ रुपये होते. २०१६ साली ते ३४० टक्‍क्‍यांनी वाढून १,०९,००० रुपये झाले. या वाढत्या उत्पन्नाबरोबर मधुमेही रुग्णांच्या संख्येत १२३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. या काळात अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीबरोबर बैठी कामे करण्याची प्रवृत्ती वाढली. यांत्रिकीकरण, संगणकीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि विविध ऐषोआरामाच्या साधनांची सहजतेने होणारी उपलब्धता यामुळे शारीरिक कष्ट खूपच कमी झाले. नेमके त्याचवेळेस जास्त प्रमाणात कॅलरीज असलेली जंकफूड्‌स आणि फास्टफूड्‌स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली. आर्थिक सुबत्तेबरोबर आलेली ही सुखासीनता आणि नवी खाद्यसंस्कृती आधी वजनवाढीत आणि त्यातून येणाऱ्या मधुमेहात परिवर्तित झाली.  
केंद्रीय आरोग्य खात्यांतर्गत २०१५-१६ मध्ये झालेल्या ‘राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात’ कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांत ०.८ टक्के स्त्रिया आणि १ टक्का पुरुषांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. पण त्याच काळातल्या उच्च उत्पन्न गटात मधुमेहाने आपले बस्तान याच्या तिपटीने वाढवल्याचे म्हणजे पुरुषांत २.७ टक्के आणि स्त्रियांत २.९ टक्के असल्याचे निष्पन्न झाले. 
आय.सी.एम.आर.ने २०१७ मध्ये केलेल्या भारतातील राज्यवार सर्वेक्षणात, चंडीगड या केंद्रशासित प्रदेशामध्ये दरडोई उत्पन्न सर्वांत जास्त म्हणजे ३४४४ डॉलर्स आहे, तिथे मधुमेहाचे प्रमाण सर्वांत अधिक म्हणजे १३.६ टक्के आहे. या उलट बिहार राज्यामध्ये दरडोई उत्पन्न सर्वांत कमी म्हणजे ६८२ डॉलर्स आहे. तिथे मधुमेहाचे प्रमाणही सर्वांत कमी म्हणजे ६ टक्के आहे. याचाच अर्थ पैशाची आवक वाढली की त्या गोडव्याने मधुमेह होण्याची शक्‍यताही तितकीच वाढते.
पण भारतातील शहरी भागात राहणाऱ्या, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींमध्येसुद्धा मधुमेह होण्याची तेवढीच शक्‍यता असते, असे ‘लॅन्सेट डायबेटिस ॲण्ड एंडोक्रायनॉलॉजी जर्नल’च्या ऑगस्ट २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद केलेले आहे. 
 वाढते वजन : आपले वजन आदर्श असल्यास स्थूलत्वामुळे होणारे आजार होत नाहीत. पण आदर्श वजन म्हणजे तरी काय असते? 
त्यासाठी ‘बॉडी मास इंडेक्‍स’ (बी.एम.आय.) ही संकल्पना समजून घ्यायला हवी. आपल्या किलोग्रॅममधल्या वजनाला मीटरमधील उंचीचा वर्ग करून भागले, की जो भागाकार येतो, त्याला ‘बीएमआय’ म्हणतात.
बॉडी मास इंडेक्‍स = (वजनाचे किलोग्रॅम) ÷ (मीटरमधील उंची)
सर्वसाधारणपणे या फॉर्म्युलामधून येणाऱ्या उत्तराचे वर्गीकरण खालील तक्‍त्याप्रमाणे करतात.
बी.एम.आय.      निष्कर्ष
१५ पेक्षा कमी     कमालीची कृशता
१५ ते १६           खूप कृश
१६ ते १८.५        कमी वजन
१८.५ ते २५        योग्य वजन
२५ ते ३०           अतिरिक्त वजनवाढ
३० ते ३५           जाड
३५ ते ४०           स्थूलत्व
४० पेक्षा जास्त    कमालीचे स्थूलत्व

चरबीचे प्रमाण : वरील तक्‍त्यात दिल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा बीएमआय २३.५ असेल, तर तो आपले वजन आदर्श आहे असे समजेल. पण प्रत्यक्षात -
 एखाद्या व्यक्तीचे वजन तक्‍त्यानुसार बरेच जास्त असेल, पण त्याच्या शरीरात स्नायूंचे प्रमाण भरपूर, पण चरबीचा थर अगदी अल्प असेल, तर ती व्यक्ती स्थूल समजली जात नाही आणि त्याला मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. 
 एखाद्या व्यक्तीचे वजन जरी तक्‍त्याप्रमाणे आदर्श असेल, पण त्याच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त आणि स्नायूंचे प्रमाण अत्यल्प असेल, तर तो बी.एम.आय. योग्य असूनही स्थूल समजला जातो आणि त्याला मधुमेह होण्याची शक्‍यता पहिल्या प्रकारापेक्षा जास्त असते. 
 दुर्दैवाने आपण सारे भारतीय या दुसऱ्या प्रकारात मोडतो. म्हणजे दिसायला सडपातळ पण प्रत्यक्षात स्थूल.  
आणि त्याचवेळेस आपल्यापेक्षा जाडजूड दिसणारा युरोपियन, अमेरिकन किंवा आफ्रिकन माणूस प्रत्यक्षात चरबीचे प्रमाण कमी असल्याने सडपातळ असतो. त्यामुळेच भारतीयांना मधुमेह होण्याची शक्‍यता या ‘श्वेत आणि कृष्णवर्णीय माणसांपेक्षा’ कित्येक पटीने जास्त असते. याबाबत झालेल्या प्रदीर्घ संशोधनात आढळून आले की- 
१.    भारतीय वंशाच्या व्यक्तींमध्ये अतिरिक्त चरबी पोटावर आणि नितंबावर जमा होते, 
२.    भारतीयांच्या कंबरेचा घेर जन्मतः कमी असतो आणि पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत कंबरेपासून पायांची लांबी कमी असते. 
३.    या गोष्टींचा परिणाम म्हणून भारतीयांत
 शरीरातील नैसर्गिक इन्सुलिनच्या कार्याला होणारा अवरोध जास्त असतो आणि त्यामुळे इन्सुलिन खूप जास्त प्रमाणात स्त्रवते. 
    सी-रीॲक्‍टिव्ह प्रथिनांची पातळी जास्त राहते.
    ॲडिपोनेक्‍टिनची पातळी खालावलेली राहते.
    शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी अधिक राहते. त्यातील एचडीएलची पटली कमी आणि एलडीएल तसेच ट्रायग्लिसेराइडसची पटली ओसंडून वाहते.
 आणि या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीय नागरिकांत मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण खूपच जास्त आहे.  

जनुकीय कारणे : डॉ. जेम्स नील या अमेरिकन आनुवंशिक शास्त्राच्या संशोधकाने १९६२ मध्ये केलेल्या संशोधनात याबाबतची काही ऐतिहासिक जनुकीय कारणे मांडण्यात आली. यानुसार मध्ययुगीन काळात भारतात असलेला अन्नाचा दुष्काळ यासाठी कारणीभूत आहे, असे मत त्यांनी मांडले. त्याकाळात अन्नाचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात असायचे. सबब जेव्हा अन्न जास्त मिळेल ते लगेच चरबीत रूपांतरित करायचे आणि पोटावरील आणि कंबरेवरील भागात जमा करून ठेवायचे गुणधर्म भारतीयांच्या जनुकात मुरले असावेत, असा कयास त्यांनी केला आहे. याला ‘थ्रिफ्टी जीन हायपोथेसिस’ म्हणतात.

जन्मजात वस्तुस्थिती
२००३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉ. याज्ञिक आणि इतर यांनी केलेल्या एका मूलभूत संशोधनात गर्भवती मातेचे आरोग्य आणि जन्मलेल्या बाळांची शारीरिक स्थिती याबाबत एक व्यापक अभ्यास केला गेला. यात पुणे परिसरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या ६३१ गर्भवती महिलांची आणि त्यांच्या बाळांची काळजीपूर्वक तपासणी केली गेली. त्याचवेळेस इंग्लंडमधील प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्ट्या उच्चवर्गातील घटक असलेल्या साऊदॅम्प्टनमधील प्रिन्सेस ॲन हॉस्पिटलमधल्या ३३८ गर्भवती आणि त्यांच्या नवजात अर्भकांचीसुद्धा तशीच तपासणी करून निरीक्षणे नोंदवण्यात आली. (कृपया वरील तक्ता पहा)
 या बालकांमधील चरबीचे प्रमाण पाहण्यासाठी बेंबीपाशी असलेला पोटाचा घेर, दंडाच्या मध्यभागाचा घेर आणि पाठीवरच्या खवाट्यावरील त्वचेची जाडी यांची मापे घेतली गेली. त्यामध्ये भारतीय बाळांच्या पोटातील अवयवांचे आकारमान लहान असते, शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी असते, पण आईच्या गर्भात असताना त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण व्यवस्थित राखले जाते. 
 म्हणजेच शरीराचे आकारमान सडपातळ पण चरबीचे प्रमाण जास्त हे ‘थीन फॅट इंडियन’ नावाने प्रसिद्ध झालेले सूत्र आईच्या उदरात असल्यापासून जन्माला आल्यानंतरही कायम राखले जाते. त्यामुळेच भारतीयांमध्ये शरीरातील नैसर्गिक इन्सुलीनला अवरोध (इन्सुलिन रेझिस्टन्स) निर्माण होतो. असा निष्कर्ष काढला गेला. 
 थोडक्‍यात, आपण भारतीय कितीही सडपातळ राहिलो, तरी स्थूल असतो आणि आपल्याला मधुमेह होण्याची शक्‍यता असतेच. मधुमेह तज्ज्ञांच्या मते जगात मधुमेह होण्याचे जे सरासरी वय आहे, त्यापेक्षा कमी वयातच भारतीयांना मधुमेह होतो. 

उपाय
भारतीयांनी नियमितपणे शारीरिक व्यायाम करून आपले वजन आणि पोटाचा-कंबरेचा घेर प्रमाणात ठेवला पाहिजे. आपला बी.एम.आय. साधारणपणे २३.५ एवढा राखायला हवा, पोटाच्या आणि कंबरेच्या घेराचे गुणोत्तर १ एवढे हवे आणि शरीरातील चरबीचे प्रमाण पुरुषांनी १४ ते २० टक्के आणि महिलांनी २० ते २७ टक्के राखावे. 
यामध्ये व्यायाम म्हणजे चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग असे एरोबिक व्यायाम रोज किमान अर्धा तास करावेत. याने शरीरातील अतिरिक्त चरबी उष्मांक निर्माण करण्यासाठी वापरली जाऊन ती कमी होते. आणि त्याचबरोबर व्यायामशाळेतील वजने वापरणे किंवा जोरबैठका, पुशअप्स, डंबेल्स अशा प्रकारचे व्यायाम अर्धा तास किमान करावेत. यामुळे शरीरातील मांसल स्नायूंचे आकारमान वाढेल. 
आहाराबाबत कोणत्याही प्रचलित ‘फॅड डाएट’च्या नादी न लागता, आपल्या शरीराला आवश्‍यक असलेल्या एकूण कॅलरीजप्रमाणे ‘मान्यताप्राप्त आहारतज्ज्ञा’कडून आपला आहार आखून घ्यावा. आणि दिवसातून दर ४ तासांनी याप्रमाणे ४-५ वेळा खावे.
 तज्ज्ञांच्या मते, जनुकीय कारणांनी जरी मधुमेह होण्याची शक्‍यता असेल, तरी व्यायाम करून उपर्निर्दिष्ट सर्व ‘मापे आणि आकडे’ व्यवस्थित राखले, तर मधुमेह कदाचित होईलही, पण तो उतार वयात होईल आणि त्यामध्ये विशेष गुंतागुंत (कॉम्प्लिकेशन्स) नसेल, असेही सप्रमाण सिद्ध झाले आहे.
 भारतीयांचा सडपातळ स्थूलपणा हा जन्मजात असल्याने लहान मुलांच्या आहाराबाबत आणि वजनाबाबतही अशीच काळजी घ्यावी. 
 

संबंधित बातम्या