व्हेगन डाएट म्हणजे नक्की काय? 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 15 एप्रिल 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

आहार हा उत्तम आरोग्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत घटक असतो. दैनंदिन व्यवहारात शरीराला लागणाऱ्या ऊर्जेची गरज आहारातून भागवली जाते. ‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ या न्यायाप्रमाणे माणसामाणसांत आहाराबाबतसुद्धा विविधता आढळते. आहारातील पदार्थांची निवड, त्यांची चव, ती करण्याची पद्धत आणि प्रकार या साऱ्याबद्दल प्रत्येकाची आवड वेगळी असते. साहजिकच आहाराबाबत साऱ्या जगभरात खूप वेगळेपणा दिसून येतो. सर्वसाधारणपणे विचार केला, तर शाकाहारी आणि मांसाहारी असे आहाराचे दोन मुख्य प्रकार दिसून येतात. निसर्गातदेखील हत्ती, गेंडा, घोडा, हरिण, याक असे काही प्राणी हे फक्त गवत आणि झाडपाला खाणारे शुद्ध शाकाहारी असतात. तर सजीव प्राण्यांना मारून त्यांच्यावर ताव मारणारे वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा अशी काही मांसाहारी जनावरे असतात. मानवामध्ये मात्र आपल्या इच्छेने, धार्मिक संकल्पनांमुळे, कौटुंबिक आचारसंहितेमुळे, पचनाच्या तक्रारींमुळे, वैद्यकीय कारणांमुळे अनेकजण शाकाहारी बनतात, तर काही मांसाहारी. यामध्ये शाकाहारी व्यक्ती मांसाहार पूर्णपणे टाळतात, मात्र मांसाहारी व्यक्तीच्या आहारात माफक प्रमाणात का होईना शाकाहारी पदार्थ असतातच.

शाकाहाराची व्याख्या
जगात निर्माण होणारे वनस्पतिजन्य पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना सर्वसाधारणपणे शाकाहारी म्हटले जाते. 
शाकाहाराचे प्रकार - जागतिक स्तरावर ‘व्हेजिटेरियन सोसायटी’ ही शाकाहाराचा प्रसार होण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेने जगातील शाकाहारी व्यक्तींचे चार प्रकारात वर्गीकरण केले आहे. 
१. लॅक्‍टो-ओव्हो-व्हेजिटेरियन - यामध्ये तृणधान्ये, शेंगा, डाळी, फळे, भाजीपाला अशा वनस्पतिजन्य आहाराला प्राधान्य असते, पण प्राण्यांचे दूध आणि अंडी खायला मनाई नसते. या आहारातून कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे व्यवस्थितपणे मिळतात. मात्र चरबीयुक्त घटक कमी असल्याने मेदवृद्धी साहजिकच कमी प्रमाणात होते, असे मानले जाते. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, मधुमेही व्यक्ती यांच्यासाठी हा आहार उपयुक्त ठरू शकतो.
२. लॅक्‍टो व्हेजिटेरियन - या व्यक्ती वनस्पतिजन्य आहारासमवेत, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करतात, पण अंडी खात नाहीत. 
३. ओव्हो व्हेजिटेरियन - या व्यक्ती अंड्यांना शाकाहारी मानून ती खातात, मात्र दूध शाकाहारी नाही, असे मानून ते वर्ज्य ठेवतात. मात्र भाज्या, फळे, तृणधान्ये डाळी यांच्यावर अर्थातच जास्त भर असतो.
४. व्हेगन - या व्यक्ती दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि इतर सर्व प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य करतात. व्हेगन पद्धतीच्या विचारधारेत गाई आणि म्हशींचे दूध हे प्राण्यांच्या शरीरातून येत असल्याने प्राणीजन्य मानले जाते. तसेच या प्राण्यांचे दूध काढणे म्हणजे हिंसा होते, असे मानले जाते. शिवाय त्यांना जास्त दूध यावे म्हणून त्यांना भरपूर चारा दिला जातो. यातून पर्यावरणाची हानी होते. अशा विचारातून या आहारात दुधाला आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांना पूर्ण वर्ज्य केले आहे. 
    अंडे हा प्राण्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा पदार्थ असल्याने त्याला वर्ज्य मानले गेले आहे.    

व्हेगन आहारामध्ये पुन्हा काही उपप्रकार आहेत.
फक्त वनस्पतिजन्य पदार्थ -
यात फळे, भाज्या, तृणधान्ये, शेंगा, वनस्पतीच्या बिया आणि जाड कवचाचे पदार्थ(नट्‌स) हे केवळ वनस्पतिजन्य पदार्थ वापरले जातात.
उकडून किंवा कच्चे खाणे - (रॉ फूड व्हेगन) वरील वनस्पतिजन्य पदार्थ कच्चे किंवा ४८ अंश तापमानापेक्षा कमी उष्णतेने उकडून खाणे.
८०/१०/१० - यात ८० टक्के फळे आणि भाज्या वापरतात, तर तेलबिया १० टक्के आणि शेंगा, डाळी, तृणधान्ये १० टक्के वापरतात.
स्टार्च डाएट - यात फळेसुद्धा त्याज्य असतात. त्याऐवजी बटाटे, भात, कंदमुळे, भात आणि मका हे जिन्नस शिजवून खाल्ले जातात.
मिश्र पद्धत - यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत कच्ची फळे आणि भाज्या वापरतात आणि रात्रीच्या जेवणात उकडलेले बटाटे, भात, मका खाल्ला जातो.
जंकफूड व्हेगन - यात वनस्पतिजन्य फळे आणि भाज्या न वापरता प्रक्रियायुक्त चीज, फ्राईज, चिप्स, फळांचे डबाबंद रस वापरले जातात.
थ्राइव्ह डाएट - यामध्ये होल व्हीट आणि कच्चे वनस्पतिजन्य पदार्थ घेतले जातात.

व्हेगन आहार आणि महात्मा गांधी
 व्हेगन ही संकल्पना १९४४ साली इंग्लंडमध्ये उदयाला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. १९२० साली महात्मा गांधींनी इंग्लंडमध्ये व्हेजिटेरियन सोसायटी समोर एक व्याख्यान दिले. त्यात त्यांनी ‘नैतिकता आणि अहिंसा पायाभूत मानून शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा’ असे आवाहन केले होते. यामुळे प्रभावित झालेल्या वॉटसन यांनी ‘व्हेगन डाएट’ ही संकल्पना निर्माण केली. १९९४ साली ‘जागतिक व्हेगन संस्था’ इंग्लंडमध्येच स्थापन झाली. 
जगभरात या आहारपद्धतीचा प्रसार व्हावा, प्राणी जगताचे संरक्षण व्हावे आणि मानवी आरोग्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने १९९४ पासून दरवर्षी १ नोव्हेंबरला ‘जागतिक व्हेगन डे’ साजरा केला जातो. साहजिकच या वर्षी म्हणजे १ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘रौप्यमहोत्सवी व्हेगन डे’ साजरा होईल.

वैशिष्ट्ये
 व्हेगन आहार म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग करणे. या आहारपद्धती दूध, तूप, मध हे पदार्थ मिळवताना हिंसा होते, त्यामुळे ते खाऊ नयेत असे बिंबवले जाते.
 दुधाला पर्याय म्हणून सोयाबीन, नारळ आणि बदामाचे दूध या पद्धतीत घेतले जाते. लोण्याऐवजी व्हेगन मेयोनेज, तर चीज आणि पनीरऐवजी टोफू वापरले जाते. आहारात फळांचे रस जास्त प्रमाणात घेतले जातात. प्रथिनांसाठी कडधान्ये, डाळी, सोयाबीन व त्याचे पदार्थ वापरतात. स्निग्ध पदार्थांसाठी असंपृक्त वनस्पतिजन्य तेल मर्यादित प्रमाणात समाविष्ट करतात. अ, ब, क जीवनसत्त्वांची पूर्तता फळे, भाज्या आणि हातसडीचे तांदूळ, होल ग्रेन गव्हाच्या पोळ्या किंवा ब्रेडमधून होतो. तर ‘ड’ जीवनसत्वाकरिता सूर्यप्रकाशाचा वापर सांगितला जातो. 
या आहारातून जे पोषक घटक मिळत नाहीत, त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘सप्लिमेंट्‌स’च्या गोळ्या, औषधे वापरावी लागतात. या आहाराला सर्वत्र खूप प्रसिद्धी मिळून जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या पद्धतीला अनुसरू लागले आहेत. जागतिक स्तरावर असंख्य शहरात ‘व्हेगन सोसायटी’ निर्माण झाली असून त्यामध्ये केवळ मांसाहारच नव्हे, तर दूध पिण्यावरदेखील टीका करण्यात येते.

व्हेगन आहाराचे फायदे
 व्हेगन आहारामध्ये भाज्या-फळांच्या स्वरूपात तंतुमय पदार्थ(फायबर), अँटीऑक्‍सिडंट्‌स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे :-
१.     बॅड कोलेस्टेरॉल म्हणून गणल्या जाणाऱ्या एल.डी.एल.चे प्रमाण २१ टक्‍क्‍यांनी कमी होते. याचा परिणाम हृदयविकाराची शक्‍यता कमी होण्यात होते.
२.     उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.
३.     मधुमेह सहज ताब्यात राहतो आणि त्याचे दुष्परिणाम टळतात.
४.     खाण्यातून तेल, तूप कमी गेल्याने वजन नियंत्रणात येते आणि लठ्ठपणा कमी होऊ लागतो.

तोटे
 यामध्ये सुरुवातीला वजन कमी होते, पण वनस्पतिजन्य आहार घेता घेता अति शर्करायुक्त गोडाचे पदार्थ, तेलकट आणि तळीव पदार्थ जास्त खाण्याकडे कल वाढतो आणि उलट वजन वाढ होऊ लागते. 
 या आहारात अत्यावश्‍यक अमिनो ॲसिड्‌स, कॅल्शिअम, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फोलेट्‌स, लोह, बी-12 आणि डी-3 हे घटक खूपच कमी मिळतात. परिणामत: या व्यक्ती पांढुरक्‍या पडतात. स्नायू दुबळे पडून, हाडे कमकुवत होऊन कृश दिसू लागतात. उतार वयात हाडे त्यांच्या ठिसूळपणामुळे किरकोळ धक्‍क्‍यानेसुद्धा सहजपणे मोडतात. या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने घटते आणि त्यांना साथीचे आजार सहजासहजी होऊ शकतात.  

आवश्‍यक अन्नघटक
आपल्या शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची गरज असते. ही प्रथिने २२ प्रकारच्या अमिनो ॲसिड्‌सपासून बनलेली असतात. त्यातील नऊ अत्यावश्‍यक असतात. यांना ‘इसेन्शिअल अमिनो ॲसिड्स’ म्हणतात. ही मानवी शरीरात तयार होत नाहीत, त्यामुळे ती आहारातूनच मिळवावी लागतात. ती प्राणिजन्य पदार्थांपासूनच मिळतात. सोयाबीन वगळता इतर वनस्पतिजन्य पदार्थांत यांचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे व्हेगन डाएटच्या उपयुक्ततेला याबाबतीत थोड्या मर्यादा येतात.
बी-12 जीवनसत्त्व - आपल्या शरीरातील मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि बऱ्याच चयापचय क्रियांसाठी बी-12 या जीवनसत्त्वाची गरज भासते. शाकाहारी पदार्थात बी-12 चा अभाव असतो. त्यामुळे अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, स्नायूचे दुखणे असे त्रास जाणवू शकतात. मात्र, बाह्य औषधोपचारांच्या योगे हे त्रास नियंत्रित करता येतात.
 व्हेगन पद्धती ही केवळ आहारपद्धती नसून शेकडो वर्षांचा इतिहास असलेली एक अहिंसावादी जीवनपद्धती आहे. हिंसाचाराला विरोध करत आणि अहिंसेची तत्त्वे जगाला शिकवणारे भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. मात्र, गेल्या दशकात या पद्धतीचा अंगीकार जगभरात विशेषतः अमेरिकेत जास्त होऊ लागला असून त्याला एक नवा ‘डाएट फंडा’ असे स्वरूप आले आहे. अमेरिकेतील जीवनपद्धतीचे अंधानुकरण करणाऱ्या कित्येक लोकांनी भारतातदेखील हा प्रवाह आणला आहे. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी ज्या असंख्य फॅड डाएट्‌सचा सुळसुळाट झाला आहे, त्यातच याची गणना होऊ लागली आहे, याचे वैषम्य वाटते.
 

संबंधित बातम्या