गर्भाशय शस्त्रक्रिया

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 6 मे 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

मानवी जन्माच्या प्रवासाची सुरुवात आईच्या पोटात म्हणजेच गर्भाशयात नऊ महिने वास्तव्य करूनच होते. मातृत्व आणि स्त्रीत्व या दोन्ही भूमिकांच्या अनुषंगाने गर्भाशयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. साहजिकच गर्भाशय हा स्त्रियांच्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव ठरतो. मात्र, काही आजारांत किंवा काही विशिष्ट शारीरिक त्रासांमुळे हे गर्भाशय शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागते. या शस्त्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत ‘हिस्टरेक्‍टॉमी’ म्हणतात. 

गर्भाशय काढण्याची कारणे 
काही आजारांमध्ये रुग्ण स्त्रीचे प्राण वाचवण्यासाठी किंवा एखादा मोठा आजार पुढे प्राणघातक ठरू नये याकरिता गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून ते काढावे लागते. 
फायब्रॉइड्‌स ः गर्भाशय म्हणजे स्त्रीच्या ओटीपोटात एक मांसल पिशवी असते. बाहेरून मांसल भाग आणि आत पोकळी अशी त्याची रचना असते. काही स्त्रियांमध्ये या बाह्य मांसल भागावर किंवा त्यांच्याशी संलग्न असलेल्या मांसल गाठी होतात. त्यांना ‘फायब्रॉइड्‌स’ म्हणतात. या गाठींमुळे काही स्त्रियांना मासिक पाळीत जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. तर क्वचित प्रसंगी हजारात एखाद्या स्त्रीमध्ये फायब्रॉइड्‌सचे रूपांतर कर्करोगात होऊ शकते.  
 
गर्भाशय खाली सरकणे (प्रोलॅप्स) : गर्भाशय खाली सरकण्याला स्त्रियांच्या भाषेत अंग बाहेर पडणे म्हणतात. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातली मूळची जागा सोडून खाली उतरते. ओटीपोटातले गर्भाशयाला बांधून ठेवणारे स्नायू दुबळे झाल्यामुळे हे घडते. जास्त बाळंतपणे, एखाद्या प्रसुतीत खूप वेळ लागून बाळ बाहेर पडताना गर्भाशय ताणले जाणे, अशक्तपणा, उतारवय ही त्याची कारणे आहेत. खाली उतरण्याच्या पायरीनुसार तक्रारींचे स्वरूप कमी जास्त ठरते. ही तक्रार रजोनिवृत्तीच्या नंतर विशेषतः पन्नास-पंचावन्न वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये आढळते.

डिसफंक्‍शनल युटेराईन ब्लीडिंग : पाळीमध्ये कमालीचा जास्त रक्तस्राव होणे किंवा पाळी दर वेळेस कमी दिवसांत सतत लवकर येत राहणे. 
एंडोमेट्रिओसिस : गर्भाशयातील पेशी आणि उतींसारख्या उती (युटेराईन लाईक टिश्‍यू) स्त्रीच्या गर्भाशयाव्यतिरिक्त इतर अवयवात मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. या आजारात बीजनलिका, बीजांडकोश, गर्भाशयाचे स्नायूबंध, पोटाची आवरणे, मूत्राशय, योनीमार्ग, गुदाशय, आंत्रपुच्छ अशा ठिकाणी या उती आढळून येतात.
ॲडिनोमायोसिस : गर्भाशयाच्या मांसल भागाचे दोन स्तर असतात. आतल्या अस्तराला एंडोमेट्रियम, तर बाहेरील आवरणाला मायोमेट्रियम म्हणतात. काही महिलांमध्ये गर्भाशयाचे आतल्या अस्तराच्या पेशींची वाढ होऊन मायोमेट्रियममध्ये शिरतात. त्यानंतर मायोमेट्रियमचीदेखील वाढ होते आणि ते फुगीर बनते. साहजिकच गर्भाशयाचा आकारही बराच फुगीर दिसतो. यामुळे पाळीला खूप रक्तस्राव होणे, पाळीमध्ये पोटात खूप दुखणे, शारीरिक संबंधाच्या प्रसंगी असह्य वेदना होणे अशी लक्षणे दिसतात.  

सतत जंतुसंसर्ग/सूज येणे : अनेक स्त्रियांमध्ये स्त्री-रोगतज्ज्ञाने रुग्ण महिलेची आतून तपासणी केल्यावर गर्भाशयाचे मुख खरबरीत, लालसर आणि सुजलेले दिसते. या आजारांमध्ये जंतुदोष होऊन योनीदाह, मायांगाला खाज येणे, पांढरा स्राव जाणे अशी लक्षणे दिसतात. याकडे दुर्लक्ष केल्यास, कर्करोग होण्याची शक्‍यता असते. हा जंतुदोष शरीरात इतरत्र पसरून गर्भाशयाच्या भोवतालच्या अवयवांना सूज येऊ शकते. परिणामतः कंबरदुखी, वरचेवर बारीक ताप येणे, लैंगिक संबंधाच्या वेळी पोटात दुखणे, पांढरा स्राव, पाळीचे वेळी पोटात खूप दुखणे असे त्रास होतात.

गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग : गर्भाशय मुखामधील पेशी जास्त प्रमाणात वाढल्याने हा कर्करोग होतो. मात्र, सुरुवातीला या कर्करोगाची काहीच लक्षणे दिसत नाहीत. काही काळानंतर कर्करोगाच्या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पसरतात आणि लक्षणे दिसू लागतात. ह्यूमन पॅपीलोमा व्हायरस (एच.पी.व्ही.) या विषाणूचे इन्फेक्‍शन, धूम्रपान, कमी वयात शारीरिक संबंध येणे, एकापेक्षा जास्त जणांशी शारीरिक संबंध असणे, जास्तवेळा प्रसूती होणे, गर्भनिरोधक गोळ्या अनेक वर्षे घेणे अशी हा कर्करोग होण्यामागची कारणे आढळून येतात. सर्वसाधारणपणे ४० ते ५० वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण जास्त दिसून येते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान होण्यापूर्वी १० ते २० वर्षे तो पूर्वप्राथमिक स्थितीमध्ये असतो.

बीजांडकोशाचा कर्करोग
अवघड प्रसूती : अशा बाळंतपणात गर्भाशयाच्या स्नायूंना इजा होऊन ते फाटणे. 
पोस्ट पार्टम हिमरेज : प्रसूतिपश्‍चात खूप जास्त रक्तस्राव होऊन मातेचा जीव धोक्‍यात येणे.
जन्मजात दोष : जन्मतःच गर्भाशय आणि योनीमार्ग यांना जोडणारा भाग अयोग्य असल्यास क्वचितप्रसंगी गर्भाशय काढावे लागते.
मानसिक आजार : गंभीर मानसिक आजार असलेल्या युवतीला जर स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेता येत नसेल, तर ते विशेष वैद्यकीय समितीच्या शिफारशीने कोर्टाच्या परवानगीने काढले जाते. 

शस्त्रक्रियांचे प्रकार
 गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेचे म्हणजे हिस्टरेक्‍टॉमीचे तीन मुख्य प्रकार असतात.
१) टोटल हिस्टरेक्‍टॉमी : यामध्ये गर्भाशय आणि गर्भाशयाचे मुख (सर्व्हिक्‍स) शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जाते.  
२) सबटोटल किंवा पार्शल हिस्टरेक्‍टॉमी : यामध्ये गर्भाशयाचा मुख्य भाग काढला जातो, मात्र गर्भाशयाचे मुख ठेवले जाते.  
३) रॅडिकल हिस्टरेक्‍टॉमी : गर्भाशयाच्या किंवा त्याच्या मुखाच्या कर्करोगामध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते.  

संभाव्य धोके आणि गुंतागुंत
 कोणतीही शस्त्रक्रिया कितीही साधी किंवा उच्च पातळीची असली, तरी त्यात अनेक धोके उद्‌भवू शकतात आणि ऐनवेळी अनेक गुंतागुंतीचे प्रसंग घडू शकतात. गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेतही असेच काही संभाव्य धोके उद्‌भवू शकतात.  

 • भुलीच्या औषधाला रिॲक्‍शन येणे.
 • मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे.
 • शस्त्रक्रियेदरम्यान आजूबाजूच्या अवयवांना इजा होणे- उदा. मूत्रनलिका, मूत्राशय, आतडे इत्यादी.
 • जंतुसंसर्ग.
 • शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन त्या रक्तप्रवाहातून फुफ्फुसांसारख्या महत्त्वाच्या अवयवात पोचणे.
 • योनीमार्ग सैलावणे.
 • बीजांडकोशाचे कार्य कमी होणे (ओव्हेरियन फेल्युअर).
 • बीजांडकोश काढावे लागल्यास स्त्रीला रजोनिवृती येणे.
 • जखमा न भरणे.
 • दोन भिन्न अवयवांना छिद्र पडून ते एकत्रित होणे. याला फिस्च्युला म्हणतात. गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर मूत्रमार्ग आणि गुदाशय यांच्यात किंवा योनीमार्ग आणि गुदाशय किंवा योनीमार्ग आणि मूत्राशय यांच्यामध्ये असे फिस्च्युला उद्‌भवू शकतात.
 • आतड्याची हालचाल बंद होणे - शस्त्रक्रियेदरम्यान आतड्यांची हालचाल थांबते. शस्त्रक्रिया झाल्यावर ती पुन्हा सुरू होत असते. पण असे न झाल्यास पोट फुगू लागते. 

शस्त्रक्रियेनंतर
 शस्त्रक्रियेतून बरे होण्याचा काळ प्रत्येक रुग्णामध्ये त्याच्या वयाप्रमाणे आणि सर्वसाधारण तब्येतीनुसार वेगवेगळा असू शकतो. शस्त्रक्रिया ज्या आजारासाठी केली गेली, त्या आजाराची व्याप्ती यात महत्त्वाची असते. साधारणपणे ३ ते ७ दिवस रुग्ण महिलेला रुग्णालयात राहावे लागते आणि एक ते दोन महिन्यात तिची तब्येत पूर्ण ठणठणीत होते. शस्त्रक्रियेतून बरे होईपर्यंत जड वजन उचलणे, लैंगिक संबंध ठेवणे, टबबाथ घेणे, टॅम्पून वापरणे या गोष्टी टाळाव्या लागतात.

बरे होण्याच्या काळात अधूनमधून क्वचित पोट दुखणे, शौचाला खडा होणे, अंगावरून लाल किंवा पांढरे जाणे किंवा मूत्र विसर्जनास त्रास होणे अशा तक्रारी आढळतात. मात्र, औषधोपचाराने त्या बऱ्या होतात.

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्त्रियांना शारीरिक लैंगिक संबंध ठेवायला अडथळा नसतो. मात्र, काही स्त्रियांच्या बाबतीत योनीमार्गात कोरडेपणा जाणवणे आणि लैंगिक इच्छा न होणे असे घडू शकते. याबाबतीत आपल्या स्त्री-रोग तज्ज्ञांशी चर्चा केल्यास अनेकदा काही उपचार आणि समुपदेशनाने या अडचणी टळू शकतात.    

अनेक स्त्रियांमध्ये शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडते, मात्र त्यानंतर रजोनिवृत्ती आल्यावर हाडे ठिसूळ होणे, वजन वाढणे, नैराश्‍य येणे अशा विकारांना सुरुवात होते. 

पर्यायी उपचार
 गर्भाशयासंबंधित आजारांमध्ये शस्त्रक्रिया करण्याऐवजी काही रुग्णांत पर्यायी उपचार अवलंबिता येऊ शकतात. यामध्ये -

 • फायब्रॉइड्‌समध्ये कर्करोगाची शक्‍यता खूप कमी असते. अशा रुग्णांत नियमित तपासण्या करत काही वर्षे वाट पाहता येते.
 • फायब्रॉइड्‌सच्या उपचारात लेझर किंवा क्रायोसर्जरी वापरून ती नष्ट करता येतात. 
 • अंगावरून लाल जाण्याची किंवा पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होणाऱ्या रुग्णांत, म्हणजे डिसफंक्‍शनल युटेराईन ब्लीडिंगमध्ये हार्मोन्सची औषधे देऊन हा त्रास सुरुवातीला नियंत्रणात येऊ शकतो. 
 • डायलेटेशन आणि क्‍युरेटाज किंवा एंडोमेट्रियल ॲब्लेशन करून पाळीमध्ये अंगावरून जास्त जाण्याच्या त्रासाचा इलाज करता येतो.
 • एंडोमेट्रियोसिसमध्ये लॅपॅरॉस्कोपिक तंत्रज्ञान वापरून त्रास सुसह्य करता येतो.
 • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात ‘सर्व्हायकल कोनायझेशन’ तंत्र वापरून कर्करोगाच्या पेशी काढून टाकता येतात. मात्र, आजार जास्त वाढल्यास त्याचा उपयोग होत नाही. 

     काही स्त्रियांना अतिरक्तस्रावाचा त्रास होतो. विशेषतः चाळिशीनंतर पाळीच्या तक्रारी जास्त प्रमाणात आढळून येतात. सोनोग्राफी, पॅप स्मिअर टेस्ट, क्‍युरेटिंग म्हणजे पिशवी धुणे इत्यादी केल्यावर अंतर्स्राव असंतुलित असल्याचे निदान होते. अशा वेळी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करता येतो. उदा. विशिष्ट औषधे, अंतर्स्रावांच्या गोळ्या, प्रोजेस्टेरॉन असलेले गर्भाशयवलय (मिरेना) यांचा वापर करता येतो. बलून थेरपी, एन्डोमेट्रियल रिसेक्‍शन अशा उपचारांनी गर्भाशय वाचवता येते.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, हे पर्यायी उपचार तज्ज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. हे उपचार कायम करायचे, की तात्पुरते याचा निर्णय डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच ठरवावा. गर्भाशयातील छोटी गाठ, अंगावरून पांढरे पाणी जाणे अशा क्षुल्लक कारणांसाठी काही महिला शस्त्रक्रियेचा आग्रह धरतात, तर खूप त्रास होत असूनही; भीती, संकोच आणि कित्येकदा केवळ निष्काळजीपणा यामुळे स्त्रिया डॉक्‍टरांकडे जात नाहीत किंवा दुखणे अंगावर काढतात. शेवटी अगदीच असह्य झाल्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांकडे येतात. अशा वेळी त्यांची तब्येत ढासळलेली असते, गाठी खूप वाढलेल्या असतात, साहजिकच शस्त्रक्रियाही गुंतागुंतीची होऊ शकते. अतिकाळजी किंवा अतिनिष्काळजीपणा दोन्हीही अनाठायी असतात. योग्य वेळी आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य उपाययोजना अंमलात आणणे कोणत्याही उपचारासाठी महत्त्वाचे असते.   

संबंधित बातम्या