स्पोर्ट्‌स इंज्युरीज-एक नवे आव्हान 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 20 मे 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

क्रिकेट हा साऱ्या भारतीयांचा आवडता खेळ. आय.पी.एल. सारखी देशांतर्गत स्पर्धा असो किंवा ऑस्ट्रेलिया, इंग्लंडबरोबर आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना असो. त्याचे टीव्हीवरचे लाइव्ह सामने, सामन्या दरम्यान आणि नंतरचे विश्‍लेषण, क्रीडाविषयक बातम्या नेहमीच कान देऊन ऐकल्या जातात. अशा बातमीपत्रात डोक्‍यावर चेंडू बसून क्रिकेटपटूचा अंत, दोन खेळाडूंच्या टकरीत युवा क्रिकेटपटूचे निधन, फॉर्म्युला वन शर्यतीचा सम्राट मायकेल शूमाकर अपघातात कायमचा जायबंदी, अमुक अमुक खेळाडू जखमी झाल्यामुळे पुढच्या सामन्याला मुकणार! अशा अनेक बातम्या आपण ऐकतो.
काय असतात या क्रीडा दुखापती? संघाला गरज असताना या खेळाडूला का बरे तंबूत बसवतात? या साऱ्या गोष्टींचा समावेश असलेले क्रीडावैद्यक आणि क्रीडाक्षेत्रातील जखमा हे एक आता मोठे शास्त्र झाले आहे. एकीकडे बैठी जीवनशैली प्रचलित होत असताना, भारताचे क्रीडाक्षेत्रही चांगलेच विकसित होत आहे. केवळ व्यायाम किंवा विरंगुळा म्हणून नव्हे, तर एक करिअर म्हणून आज अनेक युवक या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल, कुस्ती, शरीरसौष्ठव असे अनेक क्रीडाप्रकार युवकांना उपजीविकेचे साधन म्हणून उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी सर्वस्वाला झोकून देऊन हिरिरीने प्रयत्न करणाऱ्या तरुणाईचे दर्शन घडू लागले आहे. आपले ईप्सित जिद्दीने साकार करण्यासाठी शरीराच्या क्षमता अमर्याद ताणल्यामुळे शरीरातील हाडामांसाला इजा पोचवणाऱ्या ‘स्पोर्ट्‌स इंज्युरीज’ मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागल्यात. या दुखापतींचे उपचार करणारे क्रीडावैद्यकशास्त्रसुध्दा आज चांगलेच प्रगत होते आहे. 

क्रीडा क्षेत्रातील दुखापती
खेळ खेळताना किंवा व्यायाम करताना शरीरातील स्नायू, हाडे, कुर्चा, त्वचा, स्नायुबंध (लिगामेंटस, टेन्डॉन्स) किंवा शरीरातील कोणत्याही अवयवांना होणाऱ्या इजा, दुखापती, जखमा म्हणजे स्पोर्टस इंज्युरीज.

इजांचे प्रकार
सर्वसाधारणपणे क्रीडाक्षेत्रात खालील प्रकारच्या इजा नेहमी आढळून येतात - त्वचेवर होणाऱ्या साध्या आणि खोल जखमा, सांधे निखळणे (डिसलोकेशन), स्नायू किंवा स्नायूबंध खूप वेगाने आणि तीव्रतेने ताणले गेल्यामुळे स्नायू मुरगळणे, लचक किंवा चमक भरणे (स्प्रेन), हाडांना मार लागून अस्थिभंग (हाडे फ्रॅक्‍चर होणे), मेंदूला मुका मार लागणे (कंकशन). 
निरनिराळ्या खेळात घडणाऱ्या घटनांमुळे होणाऱ्या इजा पाहता, त्यात बऱ्याचदा काही तत्कालीन घटनेमुळे होणाऱ्या तीव्र प्रकारच्या इजा (ॲक्‍यूट इंज्युरीज) असतात. उदाहरणार्थ - दोन खेळाडूंची धडक होणे, एखाद्या जड वस्तूचा मार लागणे, क्रिकेट किंवा फुटबॉल खेळताना वेगाने पडणे किंवा घसरून पडणे.
तर काही खेळ खेळताना किंवा व्यायाम करताना स्नायूंच्या पुन्हा पुन्हा अतिवेगवान आणि शक्तिशाली हालचाली होत राहतात. या हालचालींमुळे शरीरावर वरकरणी लक्षात न येणाऱ्या सूक्ष्म इजा सतत होत राहतात. कालांतराने या सूक्ष्म इजा आजाराचे रूप धारण करतात. यांना दीर्घकालीन इजा (क्रॉनिक इंज्युरीज) म्हणतात. उदाहरणार्थ - 

 •  टेनिसमध्ये हातांच्या कोपऱ्यांवर पडणाऱ्या ताणामुळे होणारा टेनिस एल्बो. 
 •  बॉक्‍सिंगमध्ये मनगटे आणि खांद्यावर पडणारा ताण. 
 •  क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या खांद्यावर, पाठीवर पडणाऱ्या ताणामुळे होणारी खांदेदुखी किंवा पाठदुखी. 
 •  खेळाचा अतिसराव आणि जास्त शक्तीचे व्यायाम करत राहण्यामुळे स्नायूंची व हाडांची झीज होऊन निर्माण होणारे त्रास.
 •  स्नायूंमधील चमक, हाडांना लागलेला आधीचा मार, हे त्रास पूर्ण बरे व्हायच्या आधीच खेळ सुरू करणे.
 •  धावपटूंनी चुकीचे बूट वापरल्यामुळे होणारे घोट्याचे, नडगीचे, पोटरीचे त्रास.
 •  व्यायामांमध्ये अशास्त्रीय किंवा चुकीचे तंत्र वापरल्यामुळे स्नायूंना सतत सूक्ष्म इजा होत ती दीर्घकालीन स्वरूप धारण करते. 

विशेष प्रकार 
क्रीडाक्षेत्रात घडणाऱ्या इजांचे सर्वेक्षण केल्यास त्वचा, स्नायू, लिगामेंट, स्नायूबंध अशा मांसल भागांच्या इजा आणि हातापायांची हाडे, कवटी अशा टणक किंवा कठीण भागाला होणाऱ्या इजा हे दोन मुख्य आणि विशेष प्रकार आढळून येतात. 
 मांसल भागांच्या इजा : यात खुल्या जखमा आणि वरून जखम न होता कातडीच्या आतील मांसल भागाला होणाऱ्या इजा म्हणजे अंतर्गत इजा असे उपप्रकार असतात. खुल्या जखमांत खरचटणे, खोक पडणे, त्वचा कापली जाऊन जखम होणे, हाता-पायांची कातडी घासली जाऊन तळहाताला किंवा तळपायांना फोड येणे अशा गोष्टी असतात. तर अंतर्गत दुखापतींत स्नायूंना ताण पडणे, मुका मार लागणे, रक्त साकळणे, सांधा मुरगळणे, स्नायूंवर किंवा स्नायूबंधांवर ताण पडून चमक किंवा लचक भरणे असे प्रकार येतात. क्वचित प्रसंगी स्नायूबंध फाटणे (लिगामेंट टेअर) अशी इजाही होते. या प्रकारात अंतस्थ रक्तस्राव किंवा जखमासुद्धा होतात. खेळताना एखादा सांधा पिरगळला जाऊन तो निखळणे हीदेखील अंतस्थ दुखापतच असते.  विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहिःस्थ इजा अंतस्थ इजांपेक्षा कमी धोकादायक असतात. पण बहिःस्थ इजांनी तीव्र वेदना होतात. 
 
हाडांच्या इजा : 

 • डोक्‍याला मार लागून येणारे टेंगूळ, 
 • सांध्याला दुखापत होऊन सांध्यात रक्त साकळणे किंवा पाणी होणे, 
 • मार लागून मज्जातंतूंना दुखापत होणे, 
 • हाडांना इजा होऊन तडा जाणे (क्रॅक फ्रॅक्‍चर), हाडांचे तुकडे पडणे (फ्रॅक्‍चर) किंवा त्यांचा आकार बदलणे (बोन डीफॉर्मिटी)

मज्जासंस्थेच्या इजा : अनेकदा खेळताना मेंदूला किंवा मज्जासंस्थेला दुखापती होतात. यामध्ये चक्कर येऊन पडणे, डोक्‍यावर आघात होऊन मेंदूला मुका मार लागणे, उन्हात खेळल्याने डीहायड्रेशन होऊन उष्माघात होणे, श्वास कोंडला जाऊन मेंदूला मिळणारा प्राणवायू कमी होणे, खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन किंवा रक्तदाब कमी होऊन मेंदूचा रक्तपुरवठा बंद होणे. तसेच मेंदूत रक्तस्राव होऊन किंवा रक्ताची गुठळी होऊन मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे असे अनेक प्रकार येतात.
 डीहायड्रेशन : कोणताही खेळ खेळताना शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. अशा वेळेस खेळाडूने शरीराला आवश्‍यक त्या प्रमाणात पाणी आणि क्षार न घेतल्यास शरीरात निर्जलीकरण होऊन रक्तदाब कमी होणे, मेंदूला प्राणवायू, क्षार, रक्तपुरवठा कमी होतो.   
 निदान : क्रीडाक्षेत्रातल्या या इजांचे निदान आणि उपचार प्रशिक्षित आणि मान्यताप्रत डॉक्‍टरांकडून करावे लागते. निदान करताना खेळाडूशी त्याच्या खेळण्याबाबतची माहिती आणि वैयक्तिक तंत्राबाबत चर्चा करून त्याच्या इजेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आधी जखमांची चाचपणी करावी लागते. यावरून प्राथमिक निदान झाल्यावर रक्त तपासणी, एक्‍सरे, एमआरआय अशा विशेष तपासण्या करून घ्याव्या लागतात.
 टाळायच्या गोष्टी : खेळाडू पळताना पडल्यास त्याला पळायला लावणे, त्याच्या सांध्याला मसाज करणे, गरम पाण्याने शेकणे, सांध्यावर काही वेदनाशामक मलमे किंवा मद्य चोळणे अशा गोष्टी येतात. त्या मुळीच करू नयेत.

उपचार
खेळाडूला झालेल्या दुखापतीनुसार त्याच्या इजांचे उपचार करावे लागतात.
 खुल्या जखमा - जखम स्वच्छ करणे, आवश्‍यकतेनुसार टाके घालणे, ड्रेसिंग करणे. 
 मुका मार - अवयवांना विश्रांती, औषधे.
 सांध्यात रक्तस्राव, पाणी जमा होणे - औषधे, शस्त्रक्रिया.  लिगामेंट टेअर - शस्त्रक्रिया.  चमक, सांधा मुरगळणे - विश्रांती, औषधे.  हाडांच्या दुखापती - प्लास्टर, विश्रांती, नंतर विशेष व्यायाम - फिजिओथेरपी.  ब्लिस्टर्स - औषधे, पादत्राणांमध्ये सुधारणा.  डीहायड्रेशन - पाणी, ओआरएस, सलाईन.  मेंदूचा मार आणि दुखापती - मज्जासंस्थेचे विशेष उपचार, शस्त्रक्रिया.
याशिवाय टेनिस एल्बो, पाठ दुखणे, मणक्‍यांचे त्रास, सांधे निखळणे व इतर त्रास, खेळताना विशेष कौशल्यपूर्ण हालचाल करताना होणाऱ्या वेदना किंवा अडथळे यासाठी क्रीडावैद्यकशास्त्रानुसार विशेष शस्त्रक्रिया केल्या जातात.

प्रतिबंधक उपाय

 • खेळण्यासाठी, स्पर्धांसाठी, क्रीडा प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी मैदाने, धावपट्ट्या, हिरवळी, स्टेजेस, कोर्ट्‌स योग्य त्या दर्जाची असावीत.
 • खेळाडूंनी आपली वस्त्रे, पादत्राणे, गरजेनुसार प्रतिबंधक शिरस्त्राणे, ग्लोव्हज, मोजे, पॅड्‌स, खेळण्याची उपकरणे, खेळताना वापरली जाणारी क्रीडासामुग्री दर्जेदार, प्रमाणित आणि त्या त्या खेळाडूच्या शरीराप्रमाणे योग्य स्वरूपाची वापरावीत. 
 • उच्च पातळीवरील स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांमध्ये खेळाचे तंत्र आणि त्यातील बायोमेकॅनिकल बारकावे कटाक्षाने पाळावेत.
 • प्रत्येक खेळाडूने आणि व्यायाम करणाऱ्या व्यक्तीने आपला आहार योग्य उष्मांकांचा आहे ना, याचा विचार करून परिपूर्ण आहार घ्यावा. त्यातून मिळणारी जीवनसत्त्वे, लोह आणि कॅल्शियमसारखी खनिजे खेळाडूंच्या सर्वांगीण कामगिरीसाठी गरजेची असतात.
 • खेळाडूंसाठी पाणी ३ ते ५ लिटर आवश्‍यक असते. वातावरणाचे तापमान, आर्द्रता याप्रमाणेच खेळाची गतिमानता आणि एकूण क्रीडांगणावर व्यतीत होणारा वेळ यावर ते अवलंबून असते.   
 • वैयक्तिक स्वरूपाचा असो किंवा स्पर्धात्मक असो, शालेय, महाविद्यालयीन किंवा प्रौढ व्यक्तींचा असो, व्यायाम करताना खालील गोष्टींचे पालन काटेकोरपणे करावे.
 •  प्रत्येक खेळाडूने आणि व्यायामपटूने निष्णात ट्रेनरचा सल्ला घेऊन आपल्या तंत्रातील योग्यायोग्यतेची खात्री करत राहावे.

 प्राथमिक उपचार : क्रीडावैद्यकतज्ज्ञाला दाखवून इलाज करण्याआधी काही प्राथमिक उपचार करणे आवश्‍यक असते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या तसेच अव्यावसायिक खेळांदरम्यान एखाद्या खेळाडूला काही इजा झाल्यास काही प्राथमिक उपचारांची माहिती प्रत्येकाला असावी लागते. या उपचारात -  इजा झालेल्या अवयवाला आराम देणे.  मार लागल्यास बर्फाने किंवा आईसपॅकने शेकणे.  हातपायांना किंवा सांध्याला मार लागून सूज आल्यास कॉम्प्रेशन बॅण्डेज बांधणे.  इजा झालेला पाय किंवा हात उंचावून ठेवणे.  फ्रॅक्‍चर असल्यास तो अवयव निश्‍चल करणे गरजेचे असते. त्यासाठी एखादी फळी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची स्लॅब तात्पुरत्या स्वरूपात वापरावी लागते.  खेळाडू बेशुद्ध झाल्यास किंवा त्याचे एकाएकी हृदय बंद पडल्यास, कार्डिओ-पल्मनरी-रीसासायटेशन (सीपीआर) हे विशेष तंत्र मैदानावरच ताबडतोब वापरण्याची गरज असते. यामध्ये श्‍वासोच्छ्‌वास सुरळीत करणे आणि हृदयक्रिया पूर्ववत आणणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

 खेळताना होणाऱ्या बारीकसारीक दुखापतीबाबत ट्रेनर आणि क्रीडावैद्यकतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
 कोणत्याही खेळाचे किंवा विशेष व्यायामाचे प्रशिक्षण घेताना आधी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीची तपासणी करून आपण त्या खेळाकरिता किंवा व्यायामासाठी समर्थ आहोत याची खात्री करून घ्यावी. 
 क्रीडाक्षेत्रातल्या वाढत्या संधीमुळे खेळाडूंची संख्या जशी वाढते आहे, तशीच दुखापतींचीसुद्धा. दुखापती झाल्यानंतर त्यावर उपाय करण्याऐवजी या दुखापती कशा टाळता येतील याबाबत क्रीडावैद्यकतज्ज्ञांनी वेळोवेळी खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि संघटकांकरिता मार्गदर्शन शिबिरे घेतली पाहिजेत. त्याशिवाय खेळाडूंची कारकीर्द दुखापती विरहित होणार नाही.

संबंधित बातम्या