चंद्र आहे का आरोग्याच्या साक्षीला?

डॉ. अविनाश भोंडवे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

पान जागे फूल जागे, 
भाव नयनी जागला । 
चंद्र आहे साक्षीला ।।
चांदण्याचा गंध आला,
 पौर्णिमेच्या रात्रीला। 
चंद्र आहे साक्षीला ।।

कवी जगदीश खेबुडकरांचे हे एक चित्रपट गीत. पण युगानुयुगे या चंद्राच्या साक्षीने मानवाच्या कवी मनात प्रतिभेचे नवनवे हुंकार उमटले. चंद्राला प्रेमी जीवांचा सहचारी मानले, सुंदर चेहऱ्यांना चंद्राची उपमा दिली गेली. शतकानुशतके जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांनी चंद्राला देवत्व दिले, चंद्राच्या कलांवर दिनदर्शिका आणि पंचांगे निर्माण झाली, त्या त्या काळात प्रचलित असलेल्या विचारधारेनुसार माणसाच्या आयुष्यावर आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो असे मानले गेले. पौर्णिमा शुभ आणि अमावस्या अशुभ मानल्या गेल्या. 
 पण वैज्ञानिक संशोधनात चंद्र हा देव वगैरे नसून एक पृथ्वीपासून विलग झालेला एक भूभाग आहे हे सिद्ध झाले. त्यामुळे तो केवळ एक उपग्रह मानला गेला आहे. आज २०१९ मध्ये भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरले, अपोलो-११ यानातील अंतराळवीरांना चंद्रावर पाऊल रोवून ५० वर्षे झाली आहेत. येत्या काही वर्षात अमेरिकाच काय पण भारतासारखे देशही चंद्रावर माणसे पाठवतील अशी परिस्थिती आहे. मग चंद्राचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर कितपत उतरतो? याचा विचार कारायलाच हवा. चंद्राचे पृथ्वीवर आणि पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीवर होणारे दोन मुख्य परिणाम आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहेत. यानुसार-

 • समुद्रातील कोरल्स पौर्णिमेला अंडी आणि जननपेशी खूप मोठ्या प्रमाणात सोडतात.
 • चंद्र आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येते. 
 • मात्र याशिवाय चंद्राच्या कलांचा म्हणजेच तो पृथ्वीपासून किती जवळ आणि दूर जातो, याचा मानवाच्या जीवनातल्या काही घडामोडींवर परिणाम होतो असे मानले जाते. यामधील खालील गोष्टींवर वैज्ञानिक संशोधन झालेले आहे. त्यात
 • स्त्रियांची मासिक पाळी, त्यांना संतती होणे 
 • मानसिक परिणाम 
 • झोपेशी नाते 

या प्रमुख गोष्टी आहेत.

स्त्रियांची मासिक पाळी
 चंद्र पृथ्वीभोवतालची आपली एक प्रदक्षिणा २७ दिवस, ७ तास आणि ४३ मिनिटांत पूर्ण करतो. चंद्राच्या फेरीचा प्रत्येक चरण किंवा दशा (मून फेज सायकल) २९.५ दिवसांत पूर्ण होते. स्त्रियांची मासिक पाळी शास्त्रीयदृष्ट्या २८ दिवसांत येत असते. त्यामुळे या दोन्हीचा काहीतरी संबंध आहे, असे वैज्ञानिक प्रगती होण्यापूर्वी मानले जाणे साहजिकच होते. 

 अगदी १९७० च्या दशकात आणि त्यानंतर १९८० आणि १९९० च्या दशकात अनेक छोट्या मोठ्या संशोधनात दाखवून देण्यात आले, की चंद्राच्या शुक्ल पक्षातील वाढत्या कलांचा आणि स्त्रियांच्या बीजांडकोशातील अंडविमोचनाचा परस्पर संबंध असतो आणि त्यामुळे कृष्ण पक्षातील घटत्या कलांचा आणि पाळी येण्याचा, तसेच गर्भधारणा होण्याचा संबंध आहे असेही या संशोधनात सांगितले गेले होते.

 गर्भलिंग निदान कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी भारतातही या गोष्टी सर्रास चालायच्या, पण इंटरनेटवर चंद्राच्या कलांप्रमाणे पाळी जुळवून घेतली तर मूल होण्याची शक्यता वाढते असे सांगणारी असंख्य वेबपेजेस आणि अॅप्स आजही उपलब्ध आहेत. मात्र, यात कुठलीही शास्त्रीय मीमांसा नसते, तर लोकांच्या अपत्यसंभवाबाबत असलेल्या भावनांचा गैरफायदा घेण्याची धंदेवाईक दृष्टीच जास्त आहे. नेपाळमध्ये २००५ मध्ये काही मर्यादित स्त्रियांवर केलेल्या एका संशोधनात चक्क असे दाखवले गेले, ''स्त्रियांचे मासिक ऋतुचक्र जर चंद्राच्या शुक्ल पक्षातील कलांप्रमाणे होत असेल आणि या काळात जर त्यांना गर्भधारणा झाली, तर त्यांना मुलगा होतो आणि कृष्ण पक्षातील कलांप्रमाणे ते होत गेल्यास त्यांना मुलगी होते.'' या तथाकथित संशोधनावर बरीच चर्चा झाली. कारण चंद्राच्या कलांप्रमाणे अशी तालबद्ध रीतीने पाळी नेहमी येणे शक्य नसते. मुळात स्त्रियांचे मासिक ऋतुचक्र हे २१ दिवसांपासून ३५ दिवसांपर्यंत असू शकते. स्त्रीचे वय, तिची सर्वसाधारण तब्येत आणि मानसिक तणाव याप्रमाणे पाळीचा कालावधी पुढे मागे होऊ शकतो. साहजिकच या संशोधनावर पडदा पडला.

 अमेरिकेमध्ये २०१३ मध्ये अधिक शास्त्रीय पद्धतीने झालेल्या एका संशोधनात इलियास, स्पानौडी आणि इतर यांनी ७४ स्त्रियांच्या एकूण ९८० मासिक पाळीच्या तारखा, त्यांचे अंडविमोचन आणि इतर संबंधित घटकांचा तब्बल वर्षभर अभ्यास केला. यामध्ये त्यांनी चंद्राच्या कलांचा, पौर्णिमा-अमावस्येचा आणि गर्भधारणेचा कसलाही सुतराम संबंध नाही असे स्पष्ट केले. 'पबमेड' या अमेरिकन सरकारच्या वेबसाइटवर हे संशोधन उपलब्ध आहे. 

चंद्र आणि झोप
‘चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?’

 अशी बालगीते म्हणून लहान मुलांना निजवण्याचा रिवाज आपल्याकडे पिढ्यान पिढ्या आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यामध्ये विरोधाभास आहे. चांदण्या रात्रीमध्ये झोप उशिरा लागते. चंद्रप्रकाशामुळे शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाच्या हार्मोनचे प्रमाण घटते आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो हे शास्त्राने मान्य केले आहे. चंद्रप्रकाशच नव्हे तर घरातील ट्यूबलाइट, दिवे, टेलीव्हिजनच्या पडद्याचा प्रकाश, संगणक किंवा मोबाईलमधून प्रसृत होणाऱ्या प्रकाश किरणांमुळेही हे मेलॅटोनिन कमी होऊन, झोप लागण्यावर विपरीत परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ज्यांना वेळेवर झोप येत नाही त्यांनी झोपण्यापूर्वी किमान एक तास टीव्ही, संगणक, मोबाईल बंद ठेवावेत असा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

 ‘स्लीप मेडिसिन' या निद्राविषयक संशोधनाला वाहिलेल्या जागतिक दर्जाच्या वैद्यकीय नियतकालिकात, नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधामध्ये चंद्रप्रकाश आणि झोप यांच्यातील संबंध अधोरेखित केला आहे. यामध्ये झोपेची कोणतीही तक्रार नसलेले, ३१ ते ५९ वयाचे १६० पुरुष आणि ३९ ते ६३ वयाच्या १६० स्त्रिया अशा एकूण ३२० जणांच्या झोपेच्या वेळांचा वर्षभर  अभ्यास केला गेला. यामधून काही रंजक गोष्टी समोर आल्या.

 • पौर्णिमेच्या काळात झोप लागण्याच्या वेळात ५ मिनिटे ते ३५ मिनिटे उशीर होतो.
 • पौर्णिमेच्या काळात झोप उशिरा लागण्याचे प्रमाण स्त्रियांत जास्त आहे.
 • या काळात झोप केवळ उशिरा लागते असे नव्हे, तर लागणारी झोप तुलनात्मक दृष्ट्या कमी गाढ असते. त्यात स्वप्ने जास्त पडतात आणि लवकर जाग येते.

 या झोप न लागण्याने आणि स्वप्ने पडण्याने कदाचित कवी जगताला काव्यस्फूर्ती मिळत असावी. म्हणूनच जगभरात कवितांमध्ये चंद्राचे 'रोमॅन्टिक' स्वरूप बघायला मिळते. 

ख्रिश्चन काजोचेन या स्वित्झर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ बेझलमधील शास्त्रज्ञाने २०१३ मध्ये २० ते ३१ वर्षाचे १७ तरुण आणि ५७ ते ७४ वयाच्या १६ वडीलधाऱ्या स्वयंसेवकांवर प्रयोग केले. झोपेबाबत कोणताही त्रास नसलेल्या या लोकांना त्यांनी खिडक्या नसलेल्या बंद खोलीत पौर्णिमेआधी २ दिवस, पौर्णिमा आणि त्यानंतर दोन दिवस असे सलग ५ दिवस ठेवले. त्यांच्या झोपेचा आणि शरीरातील मेलॅटोनिन आणि कॉर्टिसॉल या घटकांचा अभ्यास केला गेला. या व्यक्तींमध्येही अंगावर चंद्रकिरण न पडता, बंद अंधाऱ्या खोलीत पौर्णिमेच्या दरम्यान ५ ते २० मिनिटे झोप उशिरा लागण्याचा परिणाम दिसून आला. या काळात या व्यक्तींमधील मेलॅटोनिनचे प्रमाण घटल्याचेही त्यांना दिसून आले. त्यातून त्यांनी सिद्ध केले की, अंगावर चंद्रप्रकाश पडो वा ना पडो, चंद्राच्या कलांचा झोपेवर परिणाम होतोच. 

चंद्र आणि मानसिकता
 चंद्राचा माणसांच्या वागण्यावर चांगला वाईट परिणाम होतो हे आजही मानले जाते. इंग्रजी भाषेत वेड्या व्यक्तीला 'ल्युनॅटिक' आणि वेडाला 'ल्युनसी' म्हटले जाते. यातील 'ल्युना' या मूळच्या लॅटिन भाषेतल्या शब्दाचा अर्थ चंद्र आहे. पौर्णिमेच्या रात्री सैतान लांडग्याचे (वेअरवुल्फ) रूप धारण करतो असे पाश्चात्त्य मानतात, तर अमावस्येच्या रात्री भुताखेतांचा वावर वाढतो असे आपल्याकडे मानले जाते. 

 पौर्णिमेच्या सुमारास वेडांचे झटके येणे, अपस्माराच्या रुग्णांना फिट्स येणे यावर आजही लोकांचा विश्वास असल्याचे आढळते.

 • १९८४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात मानवी मनातील अविचारांच्या लाटा पौर्णिमेच्या काळात चंद्राच्या वाढत्या गुरुत्वाकर्षणामुळे उन्मुक्तपणे वाढतात असे प्रतिपादित केले होते.
 • २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात सरकारी रुग्णालयांच्या आकडेवारीत मानसिक विकारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यक्तींमध्ये पौर्णिमेच्या सुमारास २३ टक्क्यांनी वाढ होते असे दाखवून दिले होते.
 • मात्र याउलट १९९८ मध्ये 'सायकियाट्री जर्नल'मध्ये वेडाच्या झटक्यांचा, आत्महत्येच्या प्रयत्नांचा चंद्राच्या कलांशी कोणताही संबंध नसतो असे ठासून सांगण्यात आले होते.
 • २०१९ मध्ये अमेरिका आणि स्वित्झर्लंडमधील निरनिराळ्या १५ रुग्णालयांतील मानसोपचार विभागात उपचारांसाठी दाखल झालेल्या तब्बल १७,९६६ रुग्णांच्या १० वर्षाच्या वैद्यकीय इतिहासाचे बारकाईने विश्लेषण केले गेले. त्यातून अखेरीस चंद्राच्या वाढत्या किंवा घटत्या कलांचा, पौर्णिमा अमावस्येचा कसलाही संबंध नसतो असे सिद्ध करण्यात आले. या संशोधकांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ''आपल्या विपरीत वागण्याचे मूळ कारण स्वतःमध्ये नसून इतर बाह्य परिस्थितीमध्ये आहे, असे सांगण्याच्या अशास्त्रीय अट्टाहासामुळे या समजुती निर्माण झाल्या आहेत.''

  मानवाच्या मनात आजही चंद्राबाबत तरल भावना आहेत. ''उगवला चंद्र पुनवेचा, दाही दिशा कशा या फुलल्या'' असे म्हणत तो आपले रसिकत्व जपतच राहील. मानवाने आपले पाय चंद्रावर ठेवले म्हणून जगात कुठेही चंद्राबद्दलचे मनातले प्रेम कमी होणार नाही.
शुक्रतारा मंद वारा, 
चांदणे पाण्यातूनी।
चंद्र आहे स्वप्न वाहे, 
धुंद या गाण्यातूनी।
 
 असे तो म्हणतच राहणार आहे आणि आपल्या भावविश्वाला ''तू असा जवळी रहा'' असे बजावत सजवतच राहणार आहे. परंतु, चंद्रामुळे आपल्या जीवनावर आणि आरोग्यावर काही शुभाशुभ परिणाम होतात, अशा अशास्त्रीय विचारांचा पगडा त्याने अव्हेरला पाहिजे. कारण विज्ञानाच्या अत्युच्च कामगिरीने सज्ज झालेल्या चांद्रयानाने काबीज केलेला चंद्र, आज नक्कीच शास्त्रीय विचारांच्या साक्षीला असणार आहे.

संबंधित बातम्या