स्वराज्याची मशाल : कोकणदिवा 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

किल्ले भ्रमंती

भर पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेला रायगड, म्हणजे तिन्ही लोकींचे सौंदर्य... होळी पौर्णिमेच्या रात्री रायगड पायथ्याच्या वाड्या-वस्त्यांवर पेटलेल्या होळ्या, त्यांचा लाल-पांढरा प्रकाश हे दृश्‍य रायगडावरून अनुभवणं म्हणजे अपूर्व आनंद सोहळा... देवदिवाळीच्या रात्री रायगडाच्या आसमंतातल्या डोंगर कपाऱ्यांतल्या वाड्या-वस्त्यांवरून गडावर येणारे दिवे... रायगडाचं हे वेगळं सौंदर्य कितीतरी वेळेला अनुभवलं... आणि त्यातूनच निर्माण झाली रायगडाभोवतीच्या सह्याद्रीच्या अंतरंगाची, शिखरांची, तिथल्या कडेकपाऱ्यांची, त्यातल्या वाड्या-वस्त्यांची ओढ... 

रायगडावरचा सूर्योदय किती वेळा पाहिला. ती प्रकाशाची अपूर्व उधळण म्हणजे सह्याद्रीच्या सौंदर्याची परमोच्च अनुभूतीच जणू! राजसदरेवर शिवरायांच्या राजसिंहासनाच्या अष्टकोनी चौथऱ्यामागं उभं राहिलं, की नगारखान्याच्या भव्य प्रवेशमार्गातून येणारा तो लालपिवळा प्रकाश, सूर्यबिंब वर येताना पूर्वेच्या तोरणा आणि राजगडाचं अपूर्व दर्शन... जणू काही सूर्य त्यांच्याच उदरातून वर येतोय! मग हा सूर्योदय कधी भवानी टोकापासून, कधी समाधीच्या खालच्या बाजूनं, कधी जगदीश्‍वराच्या समाधीकडच्या द्वारातून पाहिला. लिंगाण्याच्या सुळक्‍याआडून वर येणारा तो सूर्य अगदी पांढरा स्वच्छ होईपर्यंत भान हरपून पाहतच राहायचो. 

रायगडाभोवतीच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा तेवढ्याच सौंदर्यशाली आहेत. या सौंदर्यानुभूतीसाठी त्यांच्या अंगाखांद्यावर कितीतरी वेळा फिरलो, त्यांच्या पोटात कित्येकदा शिरलो. या कडेकपाऱ्यांतून रायगड आणखीनच सुंदर दिसतो. किंबहुना रायगडाच्या भक्कमतेचं आणि सौंदर्याचं, ही डोंगरशिखरं म्हणजे मर्मस्थानच आहेत. 

हल्ली आपण सहजपणे महाडकडून रायगडी जातो. अगदी चित दरवाजापर्यंत वाहन जातं. खरं तर पाचाड हा रायगडाचा मुख्य पायथा. ही पश्‍चिमेची वस्ती. पूर्वेला रायगडवाडी. पण गडपायथ्याचा घेरा, पूर्वेला छत्री निजामपूर ते पश्‍चिमेला अगदी कोंझरपर्यंत पसरलेला आहे. वाळुसरे, घेरोशी, वरंडोली, कोंझरान, उत्तरेची सोनारवाडी, सांदोशी, पूर्वेला वारंगी, वाळण, पाने असा रायगडाचा देखणा घेरा आहे आणि रायगडावर येणारे अनेक निसर्गसुंदर मार्ग या गावांना कवेत घेऊन येतात. माणगाव, निजामपूर, बिरवाडीकडूनही वाहनानं किंवा डोंगरवाटेनं रायगडाकडं येणारे रस्ते आहेत. रायगडाभोवतीचा हा आसमंत, या कोकणभूमीतून रायगडी जाणारे मार्ग; रायगडाचा वेगळाच भूगोल समोर उभा करतात. पण त्याहीपेक्षा डोंगरयात्रेचा वेगळा आनंद देशावरून रायगडाकडं येणाऱ्या दुर्गम मार्गांवर आहे. कोकणातल्या आणि देशावरून जाणाऱ्या अनेक वाटांनी गेलो आणि मग जाणवू लागली रायगडाची कल्पनेपलीकडची भव्यता आणि तितकीच दुर्गमता! 

आपण रायगडावर कुठंही उभं राहिलो, की उत्तर-दक्षिण आणि पूर्वेला दिसू लागतात अफाट डोंगर आणि त्यांची उत्तुंग शिखरं आणि पूर्वेला तळातून वाहणारी काळ नदी. पश्‍चिमेला त्या मानानं उंच डोंगर कमी. या तीनही दिशांच्या डोंगरदऱ्यांमधूनही रायगडाला येणाऱ्या अनेक प्रचलित-अप्रचलित दुर्गम वाटा आहेत. उत्तरेच्या डोंगररांगेतलं उंचच उंच डोंगर शिखर म्हणजे ‘कोकणदिवा’. त्याच्या पावलाखालची ‘कावल्या-बावल्याची खिंड’, अलीकडची ‘गारजाईची देवराई’, पायथ्याचं सांदोशी गाव. उत्तर-पूर्वेला लिंगाण्याचा सुळका. दक्षिणेला ‘गुयरीचा डोंगर’. त्याचा उत्तरेचा विस्तार म्हणजे ‘काळकाईचा डोंगर’ आणि त्याचं रायगडाकडचं टोक म्हणजे ‘पोटल्याचा डोंगर’, आणखी दक्षिण-पूर्वेला दुर्गम मंगळगड ऊर्फ कांगोरीचा किल्ला, असं रायगडाभोवतीचं सह्याद्री मंडळ. देशावरून रायगडावर जाण्याचा थरार काही औरच असतो. मग तोरण्याला वळसा घालून हर पूड पार करून सिंगापुराच्या नाळेतून दापोली-वाळणकोंडीचा डोह पार करून पाने-निजामपूरमार्गे रायगड असो किंवा मोहरीत जाऊन रायलींग पठार दर्शन करून अवघड ‘बोराट्याच्या नाळे’नं उतरून लिंगाण्याच्या पायथ्याच्या लिंगणमाचीतून पाने गावात उतरणं असो किंवा खडकवासल्याच्या बगलेतून खामगाव तेथून पाल्याचा घाट, वेल्ल्याच्या पेठेतून बोचेघळीची नाळ उतरून रायगड किंवा अन्नछत्र - मढ्या घाट - दहिवडमार्गे देशावर, अशा अनेक दुर्गम वाटांनी रायगडी गेलो आणि रायगडावरून आलोसुद्धा. 

वाघदरवाजापासून वारंगीचा कडा, भवानी टोकापासून हिरकणी टोक आणि हिरकणीपासून टकमकापर्यंत रायगड फिरताना हे सभोवतीचे डोंगर नेहमी बोलवायचे. मग त्यांच्याकडं जाण्याशिवाय पर्यायच नसायचा. 

बरीच वर्षं झाली या गोष्टीला. टकमक टोकावर उभं राहिलं, की उत्तरेकडचं उत्तुंग शिखर, ‘कोकणदिवा’ त्याचं नाव आणि त्याच्या बगलेतली ‘कावल्या-बावल्याची खिंड’ सारखी खुणवायची. ‘कोकणदिवा’ हा काही किल्ला नाही. पण रायगडावरून शिवकालात तिथं पेटणाऱ्या मशालीच्या उजेडाची का कुणास ठाऊक मोहिनी मनात घुमायची. त्या प्रकाशासाठी कोकणदिवा अनेक मार्गांनी चढून गेलो. कधी रायगडाच्या घेऱ्यातल्या सावरटला मुक्काम करून भल्या पहाटे सांदोशीपासून चढून गेलो. सांदोशीपासूनची चढण तशी खडी आणि अवघड. पण मला नेहमी याच वाटेनं जावंसं वाटतं. सांदोशीच्या अंगणातल्या धारातीर्थी वीरांच्या समाध्या जिवाजी नाईक (सर्कले) आणि मावळ्यांच्या शौर्याची आठवण करून देतात. मग अवघड असली तरी चढाईला एक जोम येतो. 

सावरटपासून कावळे गावापर्यंत जाऊन कावल्या-बावल्याच्या खिंडीनं कोकणदिवा करता येतो. ही चढाई सांदोशीच्या मानानं थोडी हलकी. तिसरीही एक वाट आहे. मानगडाच्या बाजूनं कुंभे बोगद्यातून कुंभे प्रकल्प पार करून घोळ ते गारजाई, असा अरण्य प्रवास करून गारजाईच्या देवराईतून कोकणदिवा करणं ही अरण्य डोंगर यात्रेची एक पर्वणीच. सांदोशीतून उभा कडा अंगावर येतो, तर कावळेच्या बाजूनं कड्याच्या कडेवरून जावं लागतं. आणि घोळ गारजाईच्या बाजूनं कोकणदिव्याला जाताना वळणावळणाची अरण्य-डोंगरयात्रा घडते. 

देशावरून कोकणात किंवा कोकणातून देशावर जातानाच्या अनेक वाटा या कोकणदिव्यावरून नजरेच्या टप्प्यात येतात. कोकणदिव्याच्या शिखराच्या पायथ्याशी जणू काही कोकणदिव्याच्या गर्भातच ‘कावल्या-बावल्या’ खिंड आहे. या चिंचोळ्या खिंडीत तत्कालीन चौकी पहाऱ्याच्या बांधकामाचे काही अवशेष दिसतात. खरं तर देश आणि कोकणातून येण्या-जाण्याच्या वाटेवरची ही चौकी. शिवोत्तर कालातल्या, संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतरच्या स्वराज्य प्रेरणेनं लढलेल्या एका शौर्यशाली युद्धाची ही खिंड साक्षीदार आहे. रायगडावरून या कोकणदिव्याकडं नजर गेली, की हे सारे संदर्भ मनात उचंबळून येतात आणि मग ठरतं कोकणदिव्याच्या माथ्यावरून रायगड पाहायचा. 

यावेळी सांदोशीतून किंवा सावरटच्या बाजूनं न जाता देशाकडील बाजूनं कुंभे प्रकल्पाच्या अंगानं, घोळ-गारजाईच्या जंगलातून कावल्या-बावल्याची खिंड गाठायची आणि मग कोकणदिवा चढून रायगडाला वंदन करायचं, हा बेत पक्का केला. कुठल्याही मोहिमेला निघायचं, की एखाद्या लहान मुलासारखी अधीरता का निर्माण होते हे तीन तपं झाली, तरी मला अजून कळलेलं नाही. 

आमचे रायगडाचे मित्र प्रकाश कदम आणि मंगेश शेडगे यांना निरोप गेले. यावेळी मंगेश प्रत्यक्ष बरोबर असणार होता. सगळी जुळवा-जुळवी करून शनिवारी दुपारी अंमळ उशिरानंच रायगडाच्या रोखानं निघालो. पाचाडला मुक्काम करून भल्या पहाटेच मोहिमेला मार्गस्थ व्हायचं असा बेत. 

पाचाड मुक्काम निश्‍चित. कोकणदिवा-सावरटच्या बाजूनं की सांदोशीमधून की मानगडाच्या बाजूनं कुंभे - घोळ - गारजाई असं करत की ताम्हिणी घाटातून एखादा मार्ग गारजाईपर्यंत सापडतो का? याचं द्वंद्व प्रवासभर काही मनातून जाईना. या द्विधा मनःस्थितीतच उशिरानं पाचाडी पोचलो. अंथरुणावर पाठ टेकली तरी मनातलं द्वंद्व काही मिटेना. तशातच डोळा लागला. पहाटेचे तीन वाजले असतील. खडबडून जागा झालो. सहकारी अजून पांघरुणात गुरफटलेलेच होते. एखाद-दुसरा माझ्या उठण्याची चाहूल लागून जागा होऊ लागला. मोहिमेवेळी भल्या पहाटे सहकाऱ्यांना उठवणं मोठं अवघड असतं. पण तितकंच ते गमतीचं असतं. कोणी वक्तशीर सहकारी माझ्या उठण्याची वाट पाहत असतो, तर कोणाला सगळे उठून आवरल्याचा पत्ताच नसतो. एकाच घरातली सारी भावंडं आवरून शाळेला जाताना जी गडबड उडते तसाच काहीसा प्रकार असतो. 

सगळ्यांचं आवरत आलं तरी अजून मंगेशचा पत्ता नव्हता. सगळे आवरून तयार होऊन रस्त्यावर आलो. महाडच्या बाजूनं लांबून मोटरसायकलचा क्षीण प्रकाश दिसू लागला. होय, तो मंगेशच होता. एवढ्या पहाटे खरं तर अपरात्रीच म्हणायला हवं, तो मोटरसायकलवरून महाडहून आला होता. गडकोटांच्या पायथ्याचे, अंगाखांद्यावरचे, बेचक्‍यातले माथ्यावरचे हे लोक इतक्‍या आत्मीयतेनं का वागतात? हा मला नेहमी पडणारा प्रश्‍न आहे. 

मोहीम सावरट की सांदोशी की घोळ-गारजाई अजूनही निर्णय होत नव्हता. सगळेजण सावरटच्या दिशेनं निघालो. रायगडाच्या घेऱ्यातल्या डोंगरवाड्यांचा हा प्रवास मला नेहमीच मोहवितो. कच्च्या-पक्‍क्‍या सडकांच्या, लाल फुफाटाच्या आडव्या-तिडव्या डोंगरवाटा पार करून सावरटला आलो. पण मन अजूनही वेगळ्या वाटेच्या शोधात होतं; सावरटपासूनची आडवी चढाई, सांदोशीपासूनचा खडा चढ अनुभवला होता. पहाटेच्या त्या गार वाऱ्यात लख्खकन प्रकाश पडला. मनात विचार आला, ताम्हिणी घाटातून आणखी एखादी अपरिचित अरण्य वाट गारजाईच्या देवराईपर्यंत घेऊन येते का पहावं? कारण देशावरची पूर्वी पुण्याच्या बाजूनं पिंपळेपाड्यापासून गारजाईपर्यंत केलेली वाट अनुभवली होती. पण ती फार दूरची होती. त्यासाठी पुण्याच्या बाजूनं पौड रस्त्यानं पिंपळेपाड्याकडून येणं सोईचं. त्यामुळं तो विचार सोडून दिला. 

मंगेशला म्हटलं, ताम्हिणी घाट चढूया, पुणे-गारजाई रुळलेल्या वाटेव्यतिरिक्त आणखी एखादी जवळची वाट घाटातून गारजाईपर्यंत नेते का शोधूया! मग असा विचार करून त्या भल्या पहाटे आमचं मंडळ रायगडाच्या घेऱ्यातून ताम्हिणी घाटात पोचलं. वळणावरच्या कित्येक वाटा, वाड्या धुंडाळल्या. पण जवळून गारजाईपर्यंतची वाट काही सापडेना. असेलही कदाचित, पण आम्ही विचारतोय ते गावकऱ्यांना उमजेना आणि ते सांगतायत ते आम्हाला समजेना. इतक्‍या वर्षांच्या भटकंतीत असे अनुभव अनेक वेळा घेतले आहेत. आम्हाला ज्या वाटा हव्या असतात, त्या आसपासच कुठं तरी असतात, पण संवादाच्या अर्थबोधाविना गवसत मात्र नाहीत. मग मोहिमेवरून परत येताना कोणीतरी स्थानिक भेटतो आणि सगळा उलगडा होतो. तोपर्यंत हा लांबचा फेरा झालेला असतो. मग राहावत नाही. जवळच्या वाटेची मोहीम होतेच... असो! 

तर ताम्हिणीतून गारजाईचा एखाद्या जवळच्या अपरिचित अनगड वाटेचा प्रयत्न सोडला आणि पुन्हा कोकणात उतरलो. एव्हाना सूर्योदय झाला होता. त्या उत्तर-दक्षिण आणि पूर्वेच्या डोंगररांगांकडं पाहिलं आणि निर्णय घेतला. आता शेवटच्या पर्यायानं म्हणजे घोळ-गारजाई जंगलवाटेनं कावल्या-बावल्या खिंड गाठायची आणि कोकणदिवा करून खाली सांदोशीत उतरायचं. खरं तर असा शोध प्रयत्नांमध्येच मोहिमेचा खरा आनंद मिळतो. कुणीतरी वाटांच्या शोधात सह्याद्रीत आडवं-तिडवं फिरायला हवं. मग आपणच का फिरू नये... 

घोळला जाण्यासाठी कुंभे प्रकल्पापर्यंत जायला हवं. मग ठेंगणा मानगड उजव्या हाताला ठेवून घाट रस्त्यानं कुंभे बोगद्यापर्यंत आलो. हा कुंभे बोगदा फार प्रेक्षणीय आहे. म्हणजे खरं तर भीतीदायक आहे. बोगदा अनगड आहे. कमी-जास्त कातरलेले दगड बोगदा संपेपर्यंत आपली साथ करतात. बोगदा संपला रे संपला, की लगेच पुढं खोल दरी आहे. पावसाळ्यात या बोगद्यापुढूनच प्रचंड जलप्रपात या दरीत झेपावत असतो. पावसाळ्यात हा बोगदा एकदातरी अनुभवावा असाच आहे. 

मग पुढच्या वळणावळणाच्या कच्च्या वाटेनं अर्धवट कुंभे प्रकल्प ओलांडून कुंभे, मग घोळच्या अलीकडच्या वाडीत पोचलो. तोपर्यंत सूर्य चांगलाच वर आला होता. ऊन जाणवू लागलं होतं. आता जंगलवाटेनं घोळ, तसंच पुढं गारजाई. कुंभ्याच्या पुढच्या अंगाच्या त्या वाडीतला एक चुणचुणीत मुलगा घोळपर्यंत यायला तयार झाला. कारण घोळ त्याचं आजोळ. मग घोळच्या पुढची जंगलवाट असली, तरी परिचयाची होती. मग गारजाईच्या देवराईतून कावल्या-बावल्याची खिंड, मग कोकणदिव्याचा उभा चढ. अशी आजची डोंगरयात्रा. 

कुंभे ते घोळ ही जंगलवाट पार करून घोळला पोचलो. इथं ताम्हिणीच्या बाजूनं धामण व्हाळपासून रेडे खिंडीतून येणारी वाट मिळते. थोडी घाई करायला हवी होती. कारण इथून पुढं जंगलवाटेनं गारजाईच्या देवराईतून वाडी डाव्या हाताला ठेवून कावल्या घाटात पोचणं आवश्‍यक होते. अखेरीस भल्या पहाटेपासून सुरू झालेला हा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचा अरण्य डोंगर प्रवास कावल्या-बावल्या खिंडीत येऊन विसावला. तोपर्यंत सूर्य डोक्‍यावर आला होता. चिंचोळी खिंड, चौकीचे उद्‍ध्‍वस्त अवशेष, दाट झाडीतल्या त्या ऐतिहासिक खिंडीजवळ क्षणभर विसावलो. देश आणि कोकणाला जोडणारी ही तत्कालीन सामरिकदृष्ट्या महत्त्वाची खिंड. शिव आणि शिवोत्तर काळातल्या अनेक शौर्यशाली युद्ध प्रसंगांची साक्षीदार... खरं तर एक प्रेरणास्थळ, एक धारातीर्थ! अशी अनेक धारातीर्थे सह्याद्रीच्या अंतरंगात दडून बसली आहेत. धडपडल्याशिवाय, दमल्याशिवाय आणि चुकल्याशिवायसुद्धा तिथपर्यंत पोचता येत नाही. म्हणूनच चुकत चुकत हा होईना भटकायचंच, तरच हा सह्याद्री कळतो. 

कावल्या-बावल्याची खिंड ओलांडून कोकणदिव्याच्या पायथ्याशी पोचलो. आजूबाजूला सह्याद्रीच्या विलोभनीय डोंगररांगा आकाशाच्या निळाईत मिसळून गेल्या होत्या. 

कोकणदिव्याची चढाई फार अवघड नसली, तरी सोपी मात्र नक्कीच नाही. पण भक्कम काळा कातळ चढाईला आधार देतो. हातापायांची बोटं दगडांच्या खोबण्यांत रुतवत वर चढावं लागतं. हळूहळू डोंगरमाथ्यांबरोबर त्यातल्या दऱ्याही दिसू लागतात. असं येंगत, प्रस्तर चढत एकमेकांना धीर देत आम्ही सगळे अखेरीस कोकणदिव्याच्या माथ्यावर पोचलो. भान हरपून टाकणारं दृश्‍य. कोकणदिव्याच्या माथ्यावर फडफडणारा तो एकमेव भगवा ध्वज, आजूबाजूला दिसणाऱ्या सह्याद्रीच्या अप्रतिम डोंगररांगा आणि कोकणदिव्यावरून दिसणारा विलक्षण सुंदर रायगड. रायगडाच्या प्रचंड पठारावरचा नगारखाना कोकणदिव्यावरून स्पष्ट दिसतो. रायगडाची अशी वेगवेगळी रूपं त्याच्या आसपासच्या डोंगरमाथ्यावरून पाहणं हा एक अपूर्व सोहळा असतो. कोकणदिव्यावरून रायगड कसा भव्य दिसतो हे त्या माथ्यावरूनच पाहायला हवं. अशी अपूर्व दुर्ग दृश्‍य उंच डोंगर माथ्यावरून पाहिली, की आपल्या नकळतच आपले डोळे एका विलक्षण तृप्तीनं पाणावतात, हे मी अनेक वेळा अनुभवलंय. कोकणदिव्यावरून रायगड पाहताना तसंच काहीसं आत्ता घडत होतं. आम्ही सहकाऱ्यांनी एकमेकांकडं पाहिलं. साऱ्यांची अवस्था एकसारखीच होती... 

कोकणदिव्याचा माथा तसा फार मोठा नाही किंवा तटबंदी, बुरुजाचे अवशेषही नाहीत. पण देश आणि कोकणाचा फार मोठा प्रदेश इथून नजरेस पडतो. हे एक महत्त्वाचं टेहळणी संरक्षणाचं ठाणं होतं. कोकणदिव्याच्या माथ्यावरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा आणि त्यातले दुर्ग कितीही वेळा आणि कितीही वेळ पाहिले तरी मन भरत नाही. 

पण आता निघणं भागच होतं. कारण कावल्या-बावल्याच्या खिंडीपर्यंत कोकणदिवा उतरणं तसं अवघड आणि जोखमीचं होतं. कारण उभा कातळ चढणं सोपं, पण उतरणं मात्र अवघड... त्यात परतीला सांदोशीत उतरायचं होतं. कोकणदिव्याच्या माथ्यावरून कावल्या-बावल्याच्या खिंडीत उतरून मग कातळ-जंगल वाटेनं सांदोशीत पोचायला किमान चार ते पाच तास लागणार होते. कावळे खिंडीतून सांदोशीत उतरणं तसं सोपं नाही. तीव्र उतार, पाण्याची वाट, मोठाले खडक, अस्ताव्यस्त झाडे, दरीतल्या बेचक्‍यातला उष्मा सारं काही स्वागताला होतं. का कुणास ठाऊक, पण प्रत्येक वेळचा माझा अनुभव आहे, कोकणदिव्यावरून कावळे खिंडीतून सांदोशीत उतरताना खिंडीपर्यंत विशेष काही वाटत नाही. पण खिंडीपासून सांदोशीची वाट संपता संपत नाही. 

कावल्या-बावल्याच्या खिंडीत पोचलो, तेव्हा दुपार कलतीकडं सरकू लागली होती. उतरणीच्या निम्म्या रस्त्यातच अंधार होणार होता, हे नक्की. त्यात दोन-तीन ठिकाणी पाण्याच्या वाटा जरा अवघड आहेत. एक-दोन ठिकाणी दिवसासुद्धा थोडं हरवल्यासारखं होतं. पण हे सगळं असतं म्हणूनच तर दुर्ग डोंगर भटकंतीत मजा असते. 

खिंडीतून सांदोशीच्या उताराला लागलो. पाण्याचे प्रवाह सुकल्यामुळं मोठमोठे कातळ आता उघडे पडले होते. त्यातूनच उतरण्याची वाट होती. दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, तसंच असतं. एकदा डोंगराच्या पोटात शिरलो ना, मग कळतं, दरी आणि त्यातल्या झाडीचा आवाका... दुरून फक्त झाडांची हिरवी रेष दिसते, पण त्या दरीच्या गर्भात उतरलं, की मग विलक्षण अंतरंग आणि त्याची खोली कळते. सह्याद्रीच्या पोटातल्या अशा किती दऱ्या फिरलो. कधी माणसांपासून माथ्यापर्यंत तर कधी माथ्यापासून माणसांपर्यंत... माणसांच्या ओढीनं या दऱ्यांमधून भूमीवर उतरताना दूरवरच्या वाडीतला दिवा किती जवळचा वाटतो आणि ती अनोळखी वाडी किती आपली वाटते, हे दरीच्या गाभाऱ्यात शिरल्यावरच कळतं. 

सांदोशीचा पहिला उतार संपला. कलती दुपार असली तरी वारा ठप्प होता. दरीत उष्मा साचून राहिला होता. तहान तहान होत होती. पण प्रत्येक तहानेला पाणी पिणं शक्‍य नसतं. ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पुरलं पाहिजे. कित्येक वेळा गरज लागली, तर पाणी आहे एवढ्यानंच तहान भागते आणि कधी पाणी संपत आलं, या जणिवेनं तहान जास्तच लागते. 

उताराच्या दुसऱ्या टप्प्याला लागलो आणि एका कातळापलीकडून धडपडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला... सगळेच सावध झालो. पुन्हा आवाज आला आणि क्षणार्धात मोठ्या पंखांचा पांढराशुभ्र पक्षी जिवाच्या आकांतानं उडण्याचा प्रयत्न करताना दिसला, पण पसरलेल्या पंखांसह जमिनीवर पडला. त्याच्या धडपडीचा अर्थभेद झाला... पाणी... पावसाळ्यानंतर रोरावणारे जलप्रपात भूमीच्या पोटात कुठं गडप होतात कुणास ठाऊक? पण उत्तर हिवाळ्यापासून ऐन उन्हाळ्यात या डोंगरदऱ्यांत पाण्याची किंमत कळते. पक्षी पाण्यावाचून गलितगात्र झाला होता. आत्ता पाणी मिळालं नाही, तर तो पुढं उठूही शकणार नव्हता... मग पाण्याच्या शोधात त्याचं जाणं तर दूरच! आमची तहान त्या पक्षाच्या कंठात अडकली... आ वासलेल्या त्या बाकदार चोचीत पाण्याच्या बाटल्या रित्या होऊ लागल्या. थोडं चोचीत थोडं भूमीवर... माणसाच्या वाऱ्यालाही न राहणारा तो पक्षी, पाणी पोटात जाताना ज्या नजरेनं पाहत होता... त्याचे ते डोळे... जणू विश्‍वभरलं कारुण्य... पक्ष्यापासून थोडं दूर थांबलो. उशीर होत होता, पण जाववत नव्हतं. काही वेळ गेला, त्याची उठण्याची धडपड सुरू झाली. पंख पसरू लागला. काही क्षण असेच गेले. उठणं, पंख पसरणं, परत उठणं, पंख पसरणं... काही पावलं चालला... एका कातळावर विसावला... एक भरारी घेतली... दुसऱ्या कातळावर विसावला... डौलदारपणे पंख पसरले... एक चीत्कार रानात घुमला... पाय मुडपले आणि आकाशात भरारी घेतली... अपूर्व दृश्य! जणू आमच्याच पंखात बळ भरलं... 

या सोहळ्यातच सांदोशीकडं उतरायला पुन्हा सुरुवात केली. आता दरी काळवंडू लागली होती. पानांमागून रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. वारा अजूनही पडलेलाच होता. अंगभर घाम साचून राहिला होता. जणू काही अंधाराच्या गर्भातली अंतहीन उतरण सुरूच होती. अखेर सांदोशी टप्प्यात आलं. जुनी-नवी भात-खाचरं आडवी येऊ लागली. दूरवर कुत्र्याचं भुंकणं ऐकू येऊ लागलं. झाडीमागून अधून-मधून चमकणारे दिवे दिसू लागले आणि सांदोशी नजरेच्या टप्प्यात आलं. बरीच रात्र झाली होती. सांदोशीत पोचलो. उतरत्या छपरांच्या घरांचं सांदोशी गाव आधी, मग गाव ओलांडल्यावर स्वराज्य निष्ठ वीरांच्या समाध्या लागल्या. अनेक वीरांच्या समाध्या... हे सारे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले... शिव आणि शिवोत्तर काळातली युद्धे हे लढले. शिवकालानंतरही महाराजांच्या प्रेरणेनं ते लढले... ते जिवाजी सर्कले (सरखेल?), त्यांचे सहकारी, त्यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या या समाध्या... गोदाजी जगतापांच्या पराक्रमाचा हा परिसर... त्या आडरानी त्या आडरात्री सांदोशीच्या पुढ्यात त्या समाध्यांना साष्टांग दंडवत घातला. डोळ्यातले थेंब पापण्यात घट्ट धरून ठेवले. त्या अज्ञ अंधारात आकाशात झेपावलेल्या उंच कोकणदिव्याकडं पाहून नतमस्तक झालो... जणू कोकणदिव्याच्या माथ्यावर प्रकाशमान मशाल पेटल्याचा भास झाला.     

संबंधित बातम्या