चंद्रगड ते आर्थरसीट 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 9 डिसेंबर 2019

किल्ले भ्रमंती
 

महाबळेश्‍वराच्या आर्थरसीटवर उभं राहिलं, की जणू काही पृथ्वीच्या गर्भात मिसळणाऱ्या खोल दऱ्या आणि त्यातून आकाशाकडं झेपावणारे उत्तुंग डोंगर अशा सह्याद्रीच्या विलक्षण रूपावरून नजर हटत नाही. या सर्वव्यापी दऱ्या डोंगरांची वैश्‍विक रूपं तीनही ऋतूत विलक्षण सुंदर असतात. 

सह्याद्रीच्या या विलोभनीय गूढ गर्भाचं आकर्षण मला फार पूर्वीपासून खुणावत आलं आहे. त्या दऱ्याखोऱ्यांच्या बेचक्‍यातल्या वाड्या-वस्त्या, या अफाट डोंगरांच्या चढा-उतारावरच्या घाटवाटांसारख्या मनात रूंजी घालायला आणि त्या अकल्पित अज्ञातात शिरण्याची ओढ मनाला आव्हान द्यायची. मग मन अस्वस्थ व्हायचं... या अस्वस्थतेपोटीच त्या अज्ञातात शिरण्याची ऊर्मी अंतर्मनात जन्म घ्यायची. आर्थरसीटवरून अनिमिष नेत्रांनी त्या अफाट दऱ्यांमधलं सौंदर्य टिपता टिपता त्या अज्ञातात शिरण्याचा बेत पक्का झाला आणि आकाराला आली 

'चंद्रगड ते आर्थरसीट मोहीम' 

ढवळ्या घाटाने 

कल्पनाच किती विलक्षण! अफाट डोंगरांमधल्या घनदाट अरण्यातल्या त्या हिरव्यागार आणि खोल दऱ्यांमधून महाबळेश्‍वराच्या माथ्यावर पोचायचं. 

खरं तर आज निसर्गाच्या उत्कट अनुभूतीचा हा रोमांच असला, तरी कधीकाळी इथल्या भूमिपुत्रांची ही जीवनवाहिनी होती. 'ढवळ्या घाट' हा दऱ्यांमधल्या कोकणातून क्षेत्र महाबळेश्‍वरी येणारा राबता मार्ग होता. देशावरल्या जोर खोऱ्यातून येण्यासाठी तर अजूनही काही प्रमाणात तो वापरात आहे. 

जोर खोऱ्यातून नव्हे, तर ढवळे गावातून चंद्रगडाच्या बाजूनं आर्थरसीट अशी आमची मोहीम निश्‍चित झाली. आर्थरसीट पॉइंटची जागा आज लोकांना माहिती आहे म्हणून निव्वळ आर्थरसीट हा उल्लेख करतोय. पण ब्रिटिश येण्यापूर्वी ही जागा वेगळ्या नावानं इथल्या भूमिपुत्रांच्या वहिवाटीत होती, तेव्हा हा परिसर 'मढीमहाल' या नावाने राबता होता. 

क्षेत्र महाबळेश्‍वराच्या मंदिराच्या मागच्या बाजूनं झाडीतल्या जुन्या वाटेनं (हल्लीच्या डांबरी रस्त्यानं नाही) सावित्री कडेटोकापाशी पोचायचं. मग तिथून आर्थरसीट हे कडेटोक गाठायचं. आर्थरसीटवर उभं राहिलं, की उजवीकडं खालच्या अंगाला एक तुटका सुळका दिसतो. तिथला आकार खिडकीसारखा भासतो म्हणून त्याला 'विंडो पॉइंट' म्हणायचं. आर्थरसीट कड्याच्या उजव्या भिंतीवरून जाणारी उतरती वाट चंद्रगडाकडं जाते. हाच 'ढवळ्या घाट' होय. आर्थरसीटच्या उजव्या भिंतीपासून सुरू होणाऱ्या डोंगररांगेच्या शेवटाला म्हणजे थेट उत्तरेला दिसणारा डोंगर म्हणजे चंद्रगड आणि तळातल्या दरीत दिसणारी सावित्री नदी आणि ते अफाट सावित्री खोरं. 

हा ढवळ्या घाट चंद्रगडापासून चढलोही अनेक वेळेला आणि उतरलोही तितक्‍याच वेळेला. पण चंद्रगडाच्या बाजूनं ढवळ्या घाट चढून येण्याची मजा काही औरच आहे. म्हणूनच आज मुक्कामपोस्ट ढवळे. उद्या भल्या सकाळी चंद्रगड, मग तो उतरून ढवळ्या घाटानं आर्थरसीट... 

दुपारीच कोल्हापूर सोडलं. सातारा-मेढा-केळघर घाटमार्गे महाबळेश्‍वर करून आंबेनळी घाटानं पोलादपूरच्या अलीकडच्या कापडे फाट्यावर पोचेपर्यंतच दिवस बुडून गेला. इथं आमचा मित्र प्रकाश कदम स्वागताला हजर... उमरठ-ढवळे-कामथे-कुडपण प्रतापगड- किन्हेश्‍वर या परिसरातला आमचा तो पालकच. त्याच्याबरोबर आमची भटक्‍यांची वरात ढवळे गावात रवी मोरे यांच्या घरी दाखल झाली. डोंगरकड्याला बिलगून असलेली ही शेवटची वाडी. खरं तर इथूनच ढवळे घाटाला सुरुवात होते. रवीच्या सारवलेल्या उबदार घरात आम्ही आपले संसार उघडून पथाऱ्या पसरल्या. सगळ्या सॅक भिंतीला लावल्या, कॅरीमॅटची नक्षी तयार झाली. मिळेल तिथल्या आणि मिळेल तेवढ्या जागेत समाधान मानायचं आणि असीम शांततेत उद्याच्या क्षितिजाची स्वप्नं पाहायची हे मी डोंगरपोटातल्या या वाड्यातल्या अशा मातीच्या घरांमध्येच शिकलो. 

वारा पहाटे आपली दिशाही बदलतो आणि स्वभावही. पहाटवाऱ्यात नव्या क्षितिजांची साद असते. वाडी हळुहळू जागी होऊ लागली. अंगणात आणि घरात धूर दाटू लागला. चुलीत सारलेल्या लाकडांच्या गाठींची तडतड होऊ लागली. एकमेकांच्या उठण्याचा अंदाज घेत सगळे तयार झाले. पूर्वेचा गर्भ आरक्त होऊ लागला होता. घड्याळाच्या भाषेत म्हटलं, तर सकाळचे सहा वाजले होते. आता चंद्रगडाकडं निघायला हवं होतं. तसा ढवळ्यातून चंद्रगड पूर्णपणे नजरेच्या टप्प्यात येत नाही. चंद्रगडाची चढाई फारशी नाही, पण शेवटचा टप्पा मात्र उभा आणि घसाऱ्याचा आहे. माथा तसा छोटाच त्यातही उंच सखल. वर एक शंकराची पिंड, उद्‌ध्वस्त दरवाजाच्या बाजू भिंती, चार दोन पाण्याची टाकी अशाच दुर्ग खुणा; परंतु चंद्रगडावरून दिसणारं रायरेश्‍वराचं अवाढव्य पठार, चंद्रगडाच्या उतरंडीचं नाखिंदा टोक, त्याच्या वायव्येची अस्वलखिंड, चंद्रगडाच्या पूर्वेचं कोळेश्‍वराचं पठार, आग्नेयेचं उत्तुंग आर्थरसीट हे सारं सह्याद्री दर्शन विलक्षणच. 

पुन्हा ढवळ्या घाटाला लागण्यासाठी चंद्रगड निम्मा उतरावा लागतो. मग उताराच्या डावीकडचा आडवा ट्रॅव्हर्स, मग तीव्र उतारानं पाण्याची वाट जणू दरीचा तळ. मग मोर्चा एकशेऐंशी कोनात वळवून गर्द झाडीतली खडी चढाई. हा परिसर म्हणजे 'म्हसोबा खिंड'. हा झाडीतला वळणावळणाचा परंतु खडा चढ चढून आलो, की थोडं मोकळं वन. इथं आहे 'बहिरीची घुमटी'. जोर खोऱ्यातून येणारी लांबची, परंतु सोपी अरण्यवाट इथंच येऊन पोचते. सकाळी सहा वाजता निघालेली ही सह्यमोहीम. इथं पोचेपर्यंत एक वाजला होता. या बहिरीच्या घुमटीपाशी बऱ्यापैकी मोकळी जागा आहे. चढा-उतराईच्या कोणाही भटक्‍याला इथं विश्रांतीची इच्छा होतेच. 

या बहिरीच्या घुमटीपासून पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर एक पाण्याचं टाकं आहे. चंद्रगड ते आर्थरसीट एवढ्या टप्प्यातलं हे एकमेव पाण्याचं टाकं. चंद्रगड ते आर्थरसीट या वाटेवर जुन्या ढवळे घाटाच्या अस्तित्वाच्या काही आश्‍चर्यकारक स्थापत्य खुणा आढळतात. म्हसोबा खिंडीच्या वरच्या अंगाला विरळ झाडीच्या आडव्या पट्ट्यात दगडात खोदलेल्या अनगड पायऱ्या, बहिरीच्या वाटेच्या अंगाला चौकीचे ताशीव अवशेष हे पाहात आणि पार करतच आपली आर्थरसीटच्या दिशेनं चढाई सुरू असते. 

बहिरीच्या घुमटीपासून आर्थरसीटकडं टोकापर्यंतच्या चढाईला किमान दीड ते दोन तास लागतातच. बहिरीच्या घुमटीपासून पुन्हा दाट झाडीत शिरायचं. तळ आणि माथा दोन्ही दिसेनासा होतो. गर्द झाडीतली ही नागमोडी चढाई तशी फार खडी नाही. ही चढाई अचानक एका कातळ भिंतीपाशी संपते आणि वरच्या आणि खालच्या डोंगररांगा त्यातल्या दऱ्यांसह समोर उभ्या ठाकतात. डावीकडचा उंच आर्थरसीट आता स्पष्ट दिसू लागतो. आर्थरसीट कडेलोट टोक नजरेच्या टप्प्यात आलं तरी तिथपर्यंत पोचण्यासाठी अजून बरीच चाल आहे. पुन्हा एकदा झाडीत शिरून मग दोन्हीकडं दरी असणाऱ्या डोंगरदांडावरून डावीकडं चढत जाऊन आर्थरसीटच्या कातळ भिंतीला भिडायचं. मग हातापायांची बोटं दगडांच्या खोबण्यात रुतवत वीसेक फुटाचं सोपे प्रस्तरारोहण करायचं मग आर्थरसीटच्या माथ्यावर आरूढ व्हायचं. 

पहाटेपासून सुरू झालेली ढवळ्या घाटाची चढाई आता अंतिम टप्प्यात पोचली होती. 

ढवळ्याच्या अंगणातून चंद्रगड किती उंच भासायचा. आता तो दऱ्यातल्या डोंगररांगांमध्ये पार मिसळून गेला होता. चंद्रगड उतरून खोल खिंडीच्या पोटात शिरलो आणि पुन्हा हिरवाईच्या चढानं बहिरीच्या घुमटीपर्यंत पोचलो. आता ती खिंड आणि हिरवाई एकरूप होऊन गेली होती. डोंगरयात्रांचं हे असंच असतं. उंची-खोली, चढाई-उतराई आणि हिरवाई यातून पार झाल्यानंतरच कळते त्याची व्याप्ती आणि सौंदर्य... आणि हो... पाच नद्या उगम पावणाऱ्या क्षेत्र महाबळेश्‍वराकडं ढवळ्या घाटानं जाताना फक्त बहिरीच्या घुमटीजवळच पाणी मिळतं... ही एक डोंगरयात्रेची खासियत! 

खिंडीतून हिरवाईच्या चढानं बहिरीच्या घुमटीकडं येताना आमच्या दोन ज्येष्ठ भिडूंच्या पायांनी असहकार पुकारला होता. त्यांना हाकारे घालत, त्यांचं मनोबल वाढवत आमच्या इतर भिडूंनी बहिरीच्या घुमटीपर्यंत आणलं आणि इथं एकदम कुस्तीतले डाव टाकल्या सारख्या त्यांच्या पायांच्या आणि अंगाच्या हालचाली सुरू झाल्या... मसल क्रॅम्प्स! डिहायड्रेशन! जितके पाय सैल सोडावेत तितके आवळले जायचे... असे अनुभव डोंगरयात्रांमध्ये सर्वसामान्य आहेत. अशावेळी पाणी-साखर आणि विश्रांती आवश्‍यक... त्यांच्या जिद्दीला सलाम. सारं जिरवून... ताजेतवाने होऊन उठले आणि आमचा काफिला निघाला आर्थरसीटच्या दिशेनं. 

आता आर्थरसीटवरची माणसं दिसत होती... त्यांचा आवाजही ऐकू येऊ लागला होता... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काही वेगळ्याच समाधानाची प्रसन्नता होती. आर्थरसीटच्या कड्याला भिडण्यापूर्वी गवताळ माथ्याचा एक अरूंद डोंगर पार करावा लागतो. त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड खोल दरी आहे. तो पार करून आर्थरसीटचा सज्जा डाव्या हाताला ठेवून एक कातळ टप्पा चढायचा मग आणखी डावीकडं सरकून विंडो जवळून आर्थरसीटच्या पायऱ्यापर्यंत पोचायचं... मग सज्जातून खालच्या अफाट दरीत डोकवायचं... उजव्या बाजूच्या अजस्त्र डोंगररांगेच्या उत्तरेकडच्या डोंगरटोकापर्यंत नजर न्यायची. आकाशाच्या निळाईत मिसळलेला चंद्रगड शोधायचा, समोरची डोळ्यात न मावणारी खिंड पहायची, दीर्घ श्‍वास घेऊन डोळे मिटायचे, मिटल्या डोळ्यांनीच या डोंगरदऱ्यांची वैश्‍विक रूपं मनात साठवायची, जपून ठेवायची. डोळे उघडून या साऱ्या विश्‍वरूपाला माथा टेकून नमस्कार करायचा... भूमीवर टेकलेल्या माथ्यानंच डोंगर-दऱ्यांचं पुन्हा येण्याचं आमंत्रण स्वीकारायचं. डोंगरयात्रेची सांगता ही अशीच भावविवश असते. परत येण्याच्या ओढीची असते... भूमीवर टेकलेला माथा वर केला. हात जोडले मागून कातर आवाज कानावर पडला... बहिरीच्या घुमटीच्या चढावर पायांनी असहकार पुकारलेल्या आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्याचा... घरच्यांशी बोलणं सुरू होतं... मी मागं वळून पाहिलं. त्याचे डोळे पाण्यानं डबडबलेले होते... त्या कातर बोलण्यातून एवढंच कळत होतं, की आज जे अनुभवलं ते आयुष्यात कधी अनुभवायला मिळेल असं वाटलं नव्हतं. माझ्या अनेक सहकाऱ्यांच्या अशा अनेक परिपूर्त प्रतिक्रिया मला प्रत्येक डोंगरयात्रेच्या सांगतेवेळी पुन्हा नव्या डोंगरयात्रेचं बळ देतात हे नक्की... 

म्हणूनच माझ्या तीन तपांहूनही जास्त भटकंतीतल्या माझ्या साऱ्या डोंगरभाऊंना सलाम....! 

संबंधित बातम्या