देखणा मधुमकरंदगड 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

किल्ले भ्रमंती
 

प्रतापगडाच्या माथ्यावर केदारेश्‍वराच्या तटबंदीशी उभे राहिले, की मावळतीच्या बाजूला किंचित दक्षिणेकडे एका रुंद पण उथळ खिंडीने विलग झालेली दोन उत्तुंग पठारे लक्ष वेधून घेतात. जावळीच्या त्या घनदाट अरण्याच्या माथ्यावरची ही देखणी शिखरे म्हणजे ‘मधुमकरंदगड’ होय. म्हणायला हे जोडकिल्ले; पण एका पठारावरचा मकरंदगडच काय तो किल्ला. बाकी मधुगड... हे एक दुर्गम डोंगर शिखरच. पण जावळी खोऱ्याच्या पश्‍चिमेकडचे हे मधुमकरंदगड म्हणजे नितांत सुंदर गिरिशिखरांचे रमणीय स्वप्नच होय. 

सगळ्या बाजूंनी अरण्याने वेढलेल्या या दुर्गांवर कोणत्याही वाटेने जाणे म्हणजे डोंगरयात्रेची विलक्षण अरण्यानुभूतीच होय. ही डोंगरयात्रा कोकणातून करावी किंवा देशावरून... ‘किती देखण्या वाटा!’... प्रत्येक वाटेचे सौंदर्य वेगळे. या साऱ्या वाटांनी हे किल्ले चढलो. पण प्रत्येक चढाईचा आनंद वेगळा! 

कधी महाबळेश्‍वरकडून पार हातलोटच्या मार्गाने गेलो, कधी खेडच्या बाजूने आंबिवली रस्त्याने बिरमलीकडून उभा हातलोट घाट चढून गेलो, कधी याच बाजूने कोंडनाळेच्या अवघड चढणीनेसुद्धा चढलो, कधी कुंबरोशीकडून चतुब्रेटमार्गे घोणसपुरापर्यंत जाऊन तेवढीच चढाई केली. कधी मुक्काम देशावर हातलोटला तर कधी कोकणात बिरमणीला. या मुधमकरंदाच्या माथ्यावरून दिसणारे सह्याद्रीच्या डोंगररांगांचे रूप केवळ अनुपमेय. 

अनेक वाटांनी अनेक वेळेला या किल्ल्यांवर गेलो, पण मलाच काय कोणालाही भुरळ घालेल असा देखणा मार्ग म्हणजे महाबळेश्‍वरहून प्रतापगडाच्या दिशेने पार घाटाने निघून हातलोटच्या बाजूने चढाई करायची. सर्वाधिक वेळेला या वाटेने गेलो. या वाटेची मजाच काही और! 

महाबळेश्‍वराहून निघाल्यानंतर साधारण पंधरा एक किलोमीटर घाट उतरला, की डावीकडे पारला जाण्याचा रस्ता लागतो. हे रामवरदायिनीचे पार. पारचा फाटा प्रतापगड फाट्याच्या अलीकडे आहे. पारसाठी मुख्य घाट रस्त्यावरून डावीकडे वळल्यानंतर सहा किलोमीटर अंतरावर कुमठे फाटा येतो. इथून हातलोट गावापर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गसौंदर्याची अद्‌भूत अरण्यवाट! या कुमठे फाट्यावरून उजवीकडे वळले, की पार गावी जाण्याचा रस्ता लागतो. तर डावीकडे हातलोट गावी जाण्याचा रस्ता आहे. कुमठे फाट्यावर डावीकडे वळून तीन ते चार किलोमीटर अंतर गेले, की शिरवली हे गाव लागते. हे गाव ओलांडून परत डावीकडे वळून जंगलातल्या मातीच्या रस्त्याने पाच-सहा किलोमीटर गेले, की हातलोट गाव लागते. हातलोट म्हणजेच मधुमकरंदाचा पायथा. सह्याद्रीच्या उत्तुंग कड्याच्या पायथ्याशी असणारी एक टुमदार वाडी. चोहोबाजूंनी जंगलाने वेढलेली. गावात मोरे आडनावाची बहुतांश घरे. हे जावळीतलेच मोरे. इथून भर जंगलातली मधुमकरंदाची चढाई म्हणजे अरण्य डोंगरयात्रेचा सर्वांगसुंदर अनुभव. 

घनदाट जंगलवाटेने तास-दीड तासाची खडी चढाई करून या दुर्गम वन-गिरीदुर्गाच्या माथ्यावर पोचता येते. हातलोटापासून जंगलवाटेची अर्धी-पाऊण चढाई करून मधुमकरंदाच्या कातळकड्याच्या खालच्या पठारावरील घोणसपूर या वाडीत पोचायचे आणि मग तेथून उघड्या चढाईने मधुमकरंदाचा माथा गाठायचा. घोणसपुरात मल्लिकार्जुनाचे एक अप्रतिम मंदिर आहे. अनेक वेळेला हे मंदिरच आमचे आश्रयस्थान झालेले आहे. या मल्लिकार्जुनाच्या प्राकारात असणारे अंजनाचे भलेमोठे झाड हे आमचे खास आकर्षण. फेब्रुवारी-मार्च नंतरच्या मोहिमेवेळी फिकट जांभळ्या पांढऱ्या फुलोऱ्याने लगडलेली फांदी अन्‌ फांदी किती सुंदर दिसते हे पाहिल्याशिवाय कळायचे नाही. या किल्ल्यांवर येण्यासाठी चतुर्बेटमार्गे घोणसपुरापर्यंत येण्याची कच्ची वाहनवाटपण आहे. या बाजूने येऊन घोणसपुरापासूनही या किल्ल्यांवर जाता येते. 

खरेतर ही आमची नेहमीची वाट. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मकरंदाच्या माथ्यावरच्या छोट्याशा शिवमंदिरासमोर उभा होतो. दूरवर कोकणातून वर येणाऱ्या हातलोटाच्या घाटवाटेची डोंगरखिंड खुणावत होती. त्या वाटेने वर यायचे मनसुबे मनात आकारत होते. खूप दिवस हा विचार मनात घोळत होता... आणि ठरले पुढची मोहीम त्या वाटेची! 

खेडचे आमचे डोंगरमित्र नितीन दिवटे यांना निरोप गेला. फेब्रुवारी-मार्चमध्ये मनात आलेली ही ऊर्मी वास्तवात यायला अर्धाअधिक मे महिना उलटून गेला. खरेतर कोकणाच्या बाजूने चढायचे होते. देशावरही उष्मा मी म्हणत होता, तर कोकणात काय! पण दुर्गमोहिमा करताना कोकणातला हा उष्मा कसा सुसह्य होतो कोण जाणे? थोडेफार वळीव आणि वावटळी सुरू झाल्या होत्या. बऱ्याच वेळेला या सह्याद्री कोकणात मे-जूनच्या संधिकाळात पावसाची बारीक भुरभुर सुरू झालेली असते. त्या शिडकाव्याने डोंगर हिरवे होऊ लागलेले असतात. पण प्रत्येक वर्षी हे असेच असते असे नाही. काहीही असो कोकणातून हातलोट घाटाने मधुमकरंद असा बेत ठरला. 

मुक्कामी मोहीम, त्यामुळे सगळा संसार बरोबर बाकी स्थानिक संयोजन... दिवटे सर. सकाळी कोल्हापुराहून निघता निघताच थोडा उशीर झाला. कऱ्हाड, कुंभार्ली घाट चिपळूणमार्गे खेडच्या रस्त्याला लागलो. कोकणातला उष्मा जाणवू लागला. ढगाळ वातावरणामुळे दमटपणा जास्तच होता. खेडला भरणे नाक्‍यावर दिवटे सरांची गाठ पडली. तोपर्यंत दुपार टळून गेली होती. आता आंबिवली फाट्याने डोंगररांगांच्या कुशीत शिरायचे होते. भरणे नाक्‍यापासून आंबिवली फाट्याने निघाले, की पाच किलोमीटर अंतरावर डावीकडे रसाळगड फाटा लागतो. तिकडे न जाता सरळ आंबिवलीकडे जायचे. आता सह्याद्रीच्या डोंगररांगा अधिकाधिक जवळ येऊ लागतात. आंबिवलीच्या थोडे अलीकडे डावीकडच्या रस्त्याने सरळ बिरमणीला निघायचे. सह्याद्रीच्या कड्याखालचे हे शेवटचे गाव. गावात पोचेपर्यंत ठार अंधार होऊन गेला होता. समोरचे डोंगरही काळोखात विरघळून गेले होते. आजचा मुक्काम बिरमणीत, सारवलेल्या अंगणाच्या एका घरात. अर्धेअधिक अंगण झावळ्यांच्या मांडवाने बंदिस्त. आमच्या पथाऱ्या त्या अंगणात आणि आतल्या पडवीत पसरल्या. जेवणे उरकली आणि गप्पांचा फड रंगला. डोंगरकुशीतल्या अशा किती वाड्या-वस्त्यांवर मी स्वप्नमयी रात्री घालवल्या आहेत याला गणतीच नाही. इथल्या गप्पांना सह्याद्रीचे पाठबळ असते. जणू घोंघावणाऱ्या वाऱ्याने तोच आपल्याशी बोलत असतो. त्या पडवीत बसल्या-बसल्या ढगांआडून पळणारा चंद्र दिसत होता. आता सरावलेल्या नजरेला उत्तुंग डोंगरमाथ्याच्या रेषा दिसत होत्या. या अंगणाच्या मोकळ्या बारीक पानांचे एक झाड होते. आता आठवत नाही नेमके कशाचे; पण त्या झाडाचे, त्या रात्रीचे प्रकाशमयी सौंदर्य आज इतक्‍या वर्षांनंतरही डोळ्यापुढून हलत नाही. एक बुंधा सोडला, तर अवघे झाड काजव्यांनी लगडलेले होते. निसर्ग प्रकाशाचा तो खेळ पाहत केव्हा डोळा लागला हे कळलेच नाही. 

अजूनही अंधार होता पण पहाटेचा. अशा वेळेला कोंबड्यांची बांग इतकी प्रसन्न असते, की त्या आवाजाने येणारी जागही तेवढीच तजेलदार असते. हळूहळू आजूबाजूला सहकाऱ्यांचीही चुळबुळ सुरू झाली होती. मोहिमेवर वैयक्तिक गरजा किमान असतात. त्यामुळे पटकन आवरले जाते. एक गंमत म्हणून सांगतो, इतकी वर्षे झाली, शेकडो मोहिमा झाल्या. पण मला सर्वाधिक टेंशन असते ते स्लिपिंग बॅगेची लहानात लहान वळकटी करण्याचे. कारण सॅकमध्ये सर्वाधिक जागा स्लिपिंग बॅगच खाते. मागून घट्ट गुंडाळत आलो, की पुढचा भाग पसरतो आणि मग मनासारखी वळकटी होत नाही आणि ती होईपर्यंत चैन पडत नाही. असो! 

आज सगळेच सामान बरोबर घ्यायचे होते. कारण कोकणातून देशावर चढल्यावर तिकडूनच परतीला लागायचे होते. सगळे उठून, आवरून तयार होऊन मोहिमेला तयार झाले, की कुणीतरी येऊन सांगते, ‘सर थोडे थांबा अजून... यायचाय!’ तोपर्यंत तयार झालेल्या लोकांची चलबिचल... कुणी उभ्या उभ्याच पाय वर घेऊन गुडघ्यात दुमडतेय, कुणी सॅक सारखी घट्ट करते, कुणी बुटाचे बंद घट्ट असल्याची खात्री करते, कुणी मधूनच चार पावले पुढे जाऊन ‘सर एक स्नॅप घेतो’ म्हणतेय. गंमत गंमत असते सगळी. सुरुवातीच्या सपाटीला सगळेच तरातरा असतात. मग एखादा भातखाचराचा बांध येतो. असे दोन-चार बांध ओलांडले, की एखादा शुष्क ओढा येतो. मग चढ सुरू झाला, की एकमेकांतील अंतरे वाढायला लागतात. भर थंडीतही स्वेटरच काय डोक्‍यावरची टोपीही काढावीशी वाटते. हे चढ इतके निःशब्द असतात, की एखाद्या टप्प्याला थांबून मागे वळून बघितले, की हमखास एखादा सहकारी पायथ्याच्या वाडीच्या दिशेने बोट करून विचारतो, ‘सर, इथून आलो?’ या शब्दांमधला गोडवा अजूनही तेवढाच ताजा आहे. डोंगर अरण्यातले दुर्गवाटांवरचे हे निःशब्द चढ किती अर्थपूर्ण असतात याची विलक्षण, जिवंत अनुभूती किमान साडेतीन दशके घेतो आहे. पण तरीही या चढांची ओढ अजूनही तशीच आहे. 

आजची हातलोट घाटाची चढाई पण अशीच आहे. जंगलातली पण बऱ्यापैकी खडी चढाई. हातलोट घाट चढाई करताना खरेतर तासलेला कातळ, अनगड पायऱ्या असे काही लागत नाही. पण नेमक्‍या वाटेवर आहोत की नाही याची खात्री मधेच लागणारे प्रचंड कातळातले कोरीव, तसे लहान पाण्याचे कुंड लागले की होते. मग वेध लागतात हातलोटच्या पठाराचे. पठारावरून घोणसपूर मग त्याच उघड्या चढाईने मकरंदगडाचा माथा. 

मकरंदगडाच्या माथ्यावर अगदी छोटेसे अलीकडे डागडुजी केलेले एक शिवमंदिर आहे. त्याच्या आसपास काही जुने स्थापत्य अवशेष आहेत. मकरंदगडाच्या चढाईचा शेवटचा टप्पा काही उद्‍ध्वस्त पायऱ्यांचा आहे आणि तोच खरा कसरतीचा आहे. तो चढला, की मग हे मंदिर. गडाचा माथा फार मोठा नाही. या मंदिराच्या मागच्या बाजूने डोंगरधारेवरल्या एका पायवाटेने मधुगडाकडे जाता येते. पण ही वाट इतक्‍या अरुंद धारेवरून जाते, की दोन्ही बाजूंच्या कड्यांवर नजर ठेवून काही अंतरच जावे. मकरंदगडावरून उतरताना या पायवाटेच्या उजवीकडे असणाऱ्या काही पायऱ्यांवरूनही खाली येता येते. दोन्ही बाजूला घसारा आणि या मधल्या पायऱ्या उतरल्या, की एका विशाल टाक्‍यापाशी आपण येतो. पाण्याचे हे मोठे खांबटाक मकरंदगडाचे जसे वैशिष्ट्य आहे, तसे त्याच्या प्राचीनत्वाचेही साक्षीदार आहे. हे हनुमान टाके. एकदा इथपर्यंत उतरून आले, की गड उतरण्यासाठी पुन्हा मंदिराकडे जाण्याची गरज नाही. कड्याला लागून असलेल्या आडव्या पायवाटेने थेट तुटक्‍या पायऱ्यांच्या पुढे पोचता येते. तिथून मग सरळ घोणसपूरपर्यंत उतरायचे. 

दुर्गावर तसे स्थापत्य अवशेष फारच कमी. माथाही अरुंद; पण या माथ्यावरून सह्याद्रीच्या किती डोंगररांगा दिसतात! मोठे विलक्षण दृश्‍य असते ते. वाळलेल्या गवताच्या सोनपिवळ्या छटेपासून ते आकाशात मिसळणाऱ्या निळाईपर्यंत अनेक छटांनी या डोंगररांगा नटलेल्या असतात. रसाळ, महितपत, सुमारगडापासून ते महाबळेश्‍वराच्या उत्तुंग गिरिशिखरापर्यंत आणि मंगळगडापासून ते प्रतापगडापर्यंत सारी सह्यशिखरे पाहताना भान हरपून जाते. या अपूर्व दृश्‍यासाठी कितीतरी वेळेला मकरंदगडावर गेलो. कोणत्याही बाजूची चढाई आणि माथ्यावरून दिसणारा सह्याद्री या सौंदर्यशाली डोंगरयात्रेसाठी मधुमकरंद कितीही वेळेला चढला, तरी पुन्हा पुन्हा खुणावत असतो. 

जावळी खोऱ्याचा मुकुटमणी असलेला हा किल्ला तसा इतिहासाविषयी थोडा अबोलच आहे. जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी परिसरातील सात शिवपुऱ्यांची (महादेवाची स्थाने) जी व्यवस्था लावली, त्यात गडपायथ्याच्या घोणसपुराचाही समावेश आहे. एका नोंदीनुसार श्री शिवाजी महाराजांनी पराभव केल्यानंतर मरकंदगडाजवळील कोंडनाळेने उतरून रायगडाकडे चंद्रराव मोरे गेल्याचा उल्लेख आहे. 

एका अवघड वाटेने हनुमान टाक्‍याच्या बाजूने किंवा माथ्यावरच्या मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळून डोंगरधारेने मधुगडावर जिकिरीने जाता येते. चार-दोन पायऱ्यांचे अवशेष त्याच्या वर दरवाजाच्या खुणा आणि पश्‍चिमेला कोरड्या पाण्याच्या टाक्‍या असे दुर्ग अवशेष आहेत. पण हल्ली मधुगडावर फारसे कुणी जात नाही. 

एका कलत्या दुपारी मकरंदगडाच्या माथ्यावर उभा होतो. कधी कधी दुर्गमाथ्यावर मन इतके हळवे का होते हेच कळत नाही. मावळतीचे रसाळ, सुमार लख्ख प्रकाशात उजळून निघाले होते. थोड्या वेळाने पिवळ्या मग लाल प्रकाशात ते न्हाऊन निघणार होते. मग आकाशाच्या जांभळ्या-काळ्या गूढ गर्भात मिसळून जाणार होते. हळूहळू काळवंडत जाणाऱ्या या डोंगररांगा मनात काहूर माजवतात. त्या कलत्या दुपारी मनात विचार आला हे दुर्गभ्रमण, हे गिरिभ्रमण, या अरण्ययात्रा खरेतर अनादी आणि अनंत असा आनंद सोहळा असतो. कितीही फिरा हे डोंगर, या दऱ्या, ही गिरिशिखरे, ही अरण्ये नेहमी असतात. ती कधीच थकलेली मी बघितलेली नाहीत आणि त्यांच्याकडे बघून आपल्यालाही थकवा येत नाही. यासाठीच तर आपण त्यांच्याकडे सतत जात नसतो ना? 

मधुमकरंदासारख्या अनेक किल्ल्यांवर असे काहीसे मनात दाटून येते... आणि परतीच्या चालीतच नव्या मोहिमेची निश्‍चिती होते.

संबंधित बातम्या