हरिश्‍चंद्रगड - नळीची वाट 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

किल्ले भ्रमंती
 

महाराष्ट्राच्या उत्तरेपासून दक्षिणेला पसरलेला सह्याद्री, त्याच्या पश्‍चिमेचे अजस्र कडे, त्याचे उत्तुंग सुळके, त्याच्या माथ्यावरची विलोभनीय पठारे हे सह्याद्रीचे रौद्र भीषण, पण लोभसवाणे रूप अनुभवणे हा एक रोमांच असतो. फार पूर्वीपासूनच सह्याद्रीच्या या धडकी भरविणाऱ्या वैभवाचे माणसाला आकर्षण होते आणि आजही ते तसेच आहे. 

सह्याद्रीच्या या उत्तुंग कड्या-पठारांमध्ये त्याचे आणखी एक सौंदर्य दडले आहे, त्याला नळी म्हणतात. तुटलेल्या दोन कड्यांमधून किंवा विलग पठारांच्या बेचक्‍यातून प्रचंड दगडांच्या राशीतून खाली थेट कोकणात उतरणारी तीव्र उतारांची चिंचोळी वाट म्हणजे नळी. या वाटा सहा महिने उघड्या बोडक्‍या प्रचंड शिलाखंडाच्या काळ्या कुळकुळीत, तर सहा महिने सह्याद्रीच्या माथ्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला कोकणात वाहून नेणाऱ्या पांढऱ्या शुभ्र प्रचंड जलप्रपातांच्या रूपात! 

या काळ्या-पांढऱ्या आव्हानात्मक नळीच्या वाटा चढणे किंवा उतरणे याचा अनुभव काय वर्णावा? यातल्या काही पूर्वीपासून ज्ञात आहेत, काही राबत्या आहेत. काही नव्याने समजू लागल्या आहेत. पण या वाटांची ओढ महाराष्ट्राला लागली आहे. 

खालून आकाशात घुसलेल्या कड्याच्या पोटात शिरायचे, दगडा-दगडांवर पाय रोवत, आभाळाच्या ठिपक्‍याकडे लक्ष ठेवत वर चढायचे, मग भन्नाट वाऱ्याच्या चाहुलीने खाली दरीत डोकवायचे. विश्‍वासच बसत नाही, या खोल दरीतून हा कडा चढून वर आलो यावर! 
डोंगर-दऱ्या आणि गडकोटांच्या ओढीने अशा कित्येक नाळा, नळीच्या वाटा चढलो, उतरलो. तोच सह्याद्री तसेच दगड, तेच पाणी; पण प्रत्येक नळीचा आत्मा वेगळा. 

अशीच एक आव्हान देणारी ‘नळीची वाट’ सह्याद्रीच्या सर्वोच्च कड्याच्या पोटात उभी आहे. हरिश्‍चंद्रगडाचा कोकणकडा हा महाराष्ट्रातला सर्वांत उंच आणि अजस्र कडा. दोन डोळ्यात तो मावत नाही. याच्या माथ्यावर घेऊन जाणारी ही नळीची वाट. 

हरिश्‍चंद्रगडावर अनेक वेळेला गेलो. कोकणकड्यावर उभे राहिले, की खालच्या अफाट दरीतून वर येणारी ही वाट खुणवायची. या वाटेने कोकणकडा चढून यायचा मनात निश्‍चय व्हायचा. तो थरार एकदा अनुभवला. मग ही वाट मनात रुतून बसली. पहिल्यांदा ही वाट चढून आलो आणि टोलारखिंड - खिरेश्‍वर खुबी फाटा मार्गे माळशेज घाटात उतरलो, पण ही वाट काही स्वस्थ बसू देईना... आणि ठरवले, यावेळी बेलपाड्यातूनच नळीच्या वाटेने चढायचे, पण उतरायचे मात्र बैलघाट, साधले घाट या थरारक वाटेने. 

अमोल आणि भास्कर बादड या आमच्या स्थानिक मित्र, वाटाड्यांना सांगावा गेला. त्यांच्या संगतीत हरिश्‍चंद्र किती बाजूंनी, किती वेळेला फिरलो गणतीच नाही. आम्ही येणार म्हटल्यानंतर गडी उत्साहाने नियोजनाला लागले. दिवस ठरले. तारखा ठरल्या. आमची कोल्हापुरातली सेना घेऊन शुक्रवारी रात्री दहा वाजता आम्ही कोल्हापुरातून प्रस्थान ठेवले. वाटेत सांगली, पुण्याची, संगमनेरची मंडळी मिळाली. बारा वर्षांच्या कस्तुरीपासून ते ६३ वर्षांच्या मराठेमामांपर्यंत असे आमचे लष्कर होते. 

आळेफाटामार्गे माळशेज घाट उतरून सावर्णे - फांगुलगव्हाणमार्गे - मोरोशी या घाटपायथ्याच्या गावात पोचलो. तेथे आमुचा हरहुन्नरी वाटाड्या भास्कर येऊन थांबला होता. त्याच्यासह बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात उतरलो. समोर सह्याद्रीचा सर्वोच्च असा कोकणकडा दिमाखात उभा होता. आडवा पसरलेला तो उत्तुंग कडा पाहून छाती दडपून गेली. इथे अमोल बादड येऊन थांबला होता. कंकू आणि कमळू पोकळा हे आमचे इथले पालक. आवश्‍यक तेवढे सामान बरोबर घेतले. कंकूच्या बायकोने फर्मास कांदेपोहे केले. पाठीवर पिशव्या बांधून सगळे तयार. आता इथून पुढे तर खरी मोहीम. दोर इत्यादी जाम्यानिम्यासह आम्ही भास्कर-अमोल बरोबर निघालो. 

कड्याच्या पायथ्याकडे आम्ही चालू लागलो. जितके पुढे जाऊ तितका कडाही पुढे गेल्याचा भास व्हायचा. आता तो अधिक मोठाही होऊ लागला. गावचा माळ संपला, शेतीवाडीही संपली. चढ सुरू झाला. वेगाने उतरणाऱ्या पाण्यामुळे तुळतुळीत आणि काळेभोर दगड दिसू लागले. आजूबाजूची झाडीही वाढू लागली. ही झाडी काही अंतरच बरोबर राहाणार होती. मग दोन्ही बाजूला फक्त उत्तुंग कडे आणि पायातली प्रचंड शिळा. दमछाक करणारी चढाई, जणू एकाच्या डोक्‍यावर दुसरा माणूस. चढाई तरी किती, जवळ-जवळ चार हजार फूट करावी लागणार होती. कारण तळकोकणातून महाराष्ट्रातल्या सर्वोच्च कड्यावर पोचायचे होते. दगडांमधून, कपाऱ्यांमधून आपणच वाट शोधायची. स्वतःला वर उचलायचे. चढाईच्या या रोमांचाची अनुभूतीच घ्यायला हवी. दोन्ही बाजूला अक्राळविक्राळ कडे सोबतीला होतेच, ते आता थोडे अधिक जवळ येऊ लागले. अशी रोमांचकारी चढाई जवळ-जवळ दोन अडीच तास चालली. झाडी केव्हाच संपली होती. उरले होते फक्त काळे कभिन्न कडे आणि प्रचंड शिळांच्या राशी आणि थेट डोक्‍यावर आकाश. सह्याद्रीच्या कुशीतले हे क्षण विसरता येणार नाहीत. सह्याद्रीच्या पोटातली ही चढाई पुन्हा सुरू. मागे पाहिले तर वर चढणारे सहकारी ठिपक्‍यासारखे दिसत होते आणि अचानक दरीतून हाकारे ऐकू येऊ लागले. भास्करने त्यांना प्रतिसाद दिला. आवाजाच्या अनुरोधाने झाडीतून हालचाल जाणवू लागली. पाहतो तर वाट चुकून थेट कड्याच्या पोटाला मंडळी बिलगली होती, त्यांनाही बरोबर घेतले आणि पुढची वाटचाल सुरू झाली. प्रत्येक दगड डोंगरासारखा वाटत होता. मधेच दगड संपून ठिसूळ घसारा लागत होता. त्यावर तोल सांभाळणे महाकठीण. एक-दोन सहकारी पडून पुन्हा तयार झाले. सह्याद्रीच्या अंतरंगातली ही चढाई म्हणजे जणू जीवन संघर्षाचा परिपाठच. सह्याद्रीच्या कातळांची ही भव्यता त्याच्या पोटात शिरल्याशिवाय कळत नाही. 

आकाशाच्या अनुरोधाने चाललेली ही चढाई अजून काही काळ मूकपणे सुरूच राहिली. एकमेकांना आश्‍वस्त करत चढत होतो. सह्याद्रीच्या या कडेकपाऱ्यात आही सारे जणू एकजीव असतो. एकाला ठेच तर दुसऱ्याच्या बोटातून रक्त असेच काहीसे! 

मग ही चढाई एका खड्या कातळ टप्प्यापाशी पोचली. डोंगरांच्या अजस्र भिंतींमधली ही अरुंद खडी चढण दोराच्या साहाय्यानेच चढावी लागणार होती. भास्कर आणि प्रेम खिलारी हा नव्याने सामील झालेला धाडसी भिडू पुढे सरसावले. पाठोपाठ आम्ही सर्व जण ही चढाई पार करून वर पोचलो. एकदा खाली डोकावून पाहिले, काय दिव्य केले होते ते! 

मग पुन्हा चढाई. दगडांचा आधार, घसाऱ्यात पाय रुतवणे असे करत करत दुसऱ्या कातळ चढाईपाशी पोचलो. ही चढाई थोडी वेगळी होती. उजव्या कातळ भिंतीवरच चढायचे होते. मग त्या कातळ भिंतीला बिलगूनच वळसा घालूनच नळीच्या दुसऱ्या अंगात शिरायचे होते आणि त्याच खड्या चढावाच्या बेचक्‍यातून वर चढायचे होते. दोर लावला. सॅक्‍स वर घेतल्या. माणसे एक एक करून वर आली. कड्याच्या बगलेतून वळून वर चढू लागली. जणू सह्याद्रीच्या पोटात एकेक माणूस गडप होत होता! ठिसूळ दगडांवरची ही छातीवरची चढाई अधिकच अवघड होती. पाय कधी घसरेल याचा नेमच नव्हता. घसरलात तर खाली कडेलोटच होता. 

मग अरुंद, चिंचोळ्या चढाच्या वाटेने अखेरीस कड्याच्या पठाराच्या मानेपर्यंत पोचलो. अजूनही पठार डोक्‍यावरच होते. मग अखंड कातळाचा तिरका टप्पा ओलांडला आणि घनदाट जंगलात शिरलो. उभा चढ, पायाखाली धुपलेली माती, अशा गच्च रानातून अखेरीस कोकणकड्याच्या खालच्या पठारावर पोचलो. श्‍वासात विलक्षण समाधान दाटत होते आणि अखेरीस पाण्याच्या वाटेने कोकणकड्यावर पोचलो. त्या प्रचंड कड्याच्या काठावर उभे होतो. भन्नाट वाऱ्यात डोळे फाडफाडून खाली दरीत पहात होतो. त्या अंतहीन दरीतून हा अफाट कडा चढून सह्याद्रीतल्या या सर्वोच्च कड्याच्या माथ्यावर उभे होतो. त्या दरीला आणि वर आकाशाला डोळे मिटून हात जोडले. अचानक दरीतून धुक्‍याचे लोटच्या लोट येऊ लागले. जणू सारे पाताळ त्यात लुप्त झाले आणि सरसरून पाऊस आला. फेब्रुवारीच्या मध्यात ऐन कोकणकड्यावर त्या पावसात चिंब भिजून गेलो. अमृताच्या धाराच त्या! पाऊस आणि गार वाऱ्याने थंडीत गारठून गेलो. कोकणकड्यावरच्या भास्करच्या झोपडीत दाटीवाटीने थांबून राहिलो. पाऊस उणावला. लख्ख ऊन पडले. हरिश्‍चंद्रेश्‍वराच्या मंदिराकडे निघालो. त्याच्या समोर माथा टेकला. डोळे भरून आले. या हरिश्‍चंद्राच्या कृपेने किती वेळेला किती वाटांनी हा गड चढलो. 

तारामती शिखराच्या पोटातील एका गुहेत साऱ्यांनी आसरा घेतला. पथाऱ्या पसरल्या. अमोलने गरम चहाचे पातेले आणले. चहापेक्षा त्याच्यातली उष्णता हवी होती. थोडी तरतरी आली. मग हरिश्‍चंद्रगड भटकून आलो. एव्हाना अंधार पडू लागला. एकमेकांच्या उबेने गुहेत दाटीवाटीने बसलो. मग गडकोटांच्या गप्पांनी असा सूर धरला, की रात्रीचे साडेनऊ केव्हा वाजले कळलेच नाही. अमोलची ताजी भाकरी आणि रस्सा समोर आला; तेव्हाच भानावर आलो. तांदळाच्या भाकरीचे ते गरम जेवण आणि दिवसभराचे श्रम यामुळे डोळे मिटू लागले. पुन्हा पहाटे चार वाजता उठून उद्या नवे साहस मांडायचे होते. हरिश्‍चंद्राच्या अंगावरची ती गाढ झोप पहाटे साडेचार वाजताच भंगली. एकेक सहकारी उठू लागला. एकेकाला उठवू लागलो. साडेपाच वाजले. अमोलच्या झापात पोचलो. पहाटेच्या दाट थंडीत गरम चहाचे घोट घेतले आणि भास्करसह निघालो. नेहमीच्या रुळलेल्या म्हणजे पाचनई किंवा टोलारखिंडीच्या वाटेने उतरायचे नव्हते, तर साठ पायऱ्यांचा घाट, बैलघाट आणि कोकण-देशाची नाळ असणारा साधले घाट असा वेगळा साहसी मार्ग आखला होता. 

पुन्हा भल्या सकाळी कोकणकड्यावर पोचलो. सकाळचा कोकणकडा विलक्षण असतो. तिथून पायच उचलेना. पण पुढे जाणे भाग होते. कोकणकड्याचे पठार ओलांडून नाफ्ता शिखराच्या दिशेने चालू लागलो. दोन अवघड कातळ टप्पे उतरलो. जंगलवाटेने खालच्या पठारावर आलो. पुन्हा पाण्याच्या वाटेने कड्याच्या खांद्यावर उतरलो आणि नळीच्या वाटेला पाठी ठेवून साठ पायऱ्यांची की कातळांची घाटवाट संपवून जंगलवाटेच्या बैलघाटात शिरलो. गच्च जंगलाच्या दोन्ही बाजूला दरी असणाऱ्या या अनोख्या तीव्र उताराच्या वाटेने कलाडगडासमोर पंचनाईच्या पठारावर उतरलो. 

मग पठार ओलांडून शिरलो एका तीव्र उताराच्या नाळेत म्हणजे साधले घाटात. उतार इतका तीव्र, की पुढे झोक जाता कामा नये. आजही ही घाटवाट इथले भूमिपुत्र वापरतात. दगडांमधून, कपाऱ्यांमधून, कातळाच्या आधाराने जणू अज्ञातात जाणारी ती नाळ उतरू लागलो. कालच्या चढाई इतकेच हे उतरणेही रोमांचकारी होते. अजस्र कातळांच्या मधल्या फटीतून कोकणात उतरायचे. हे अनुभव म्हणजे आयुष्याचा मोलाचा ठेवा. पावसाळ्यात या वाटा म्हणजे रोमांचकारी जलप्रपात असतात. 

अखेरीस सह्याद्रीच्या भिंतींच्या कमरेपर्यंत पोचलो. मगाशी ज्या शिखरांच्या माथ्यावर उभे होतो, आता ती आकाशात घुसल्यासारखी दिसू लागली. खाली तळकोकणाचे पठार आणि इवली इवली गावे दिसू लागली. दूरवर ठिपक्‍यासारखे बेलपाडा दिसू लागले. अजूनही उतरंड सुरूच होती. आता कातळकडे संपले आणि खोल जंगलात शिरलो. सगळेच दृष्टिआड झाले. उताराची नागमोडी जंगलवाट संपता संपेना. उतरतोच आहे. डाव्या बाजूला दरी, उजवीकडे ठिसूळ कडा... जणू उतरायची तंद्रीच लागली. जंगल वाटांवर चालण्यातही एक नाद असतो. आपण त्यात हरवून जातो. कालपासूनच्या आजपर्यंतच्या मोहिमांच्या विलक्षण आठवणीत हरवून गेलो होतो. वाटेचे भानच नव्हते आणि अचानक घसाऱ्यावरून तोल गेला. सावरता सावरता नाकीनऊ आले. विलक्षण कळ पायातून मस्तकापर्यंत गेली. पाय टेकवेना पण थांबणे नामंजूर. त्या रोमहर्षक वाटांवर पायातल्या वेदनांना थारा नाही. अजूनही बेलपाडा यायला किमान तास-दीड तास होता. चालतच राहिलो. जंगल विरळ होऊ लागले. शेतांचे बांध दिसू लागले की समजावे, गावाच्या आसपास पोचलो. बांधावरून मोकळ्या पठारावर आलो. समोर बेलपाडा दिसू लागले. दुखरा पायही झपाट्याने पडू लागला. गावच्या पुढ्यात उभे राहिलो. मागे वळून पाहिले. भर दुपारच्या उन्हात चकमकणारा अफाट कोकणकडा समोर उभा होता. कुणीतरी वाकडी रेष ओढावी, तशा ठिपक्‍यासारख्या नाळा दिसत होत्या. काल तर हाच कडा या नाळेने चढून आज उतरलो होतो. आमचा आमच्यावरच विश्‍वास बसेना. मन भरून आले. भर उन्हात, तापल्या मातीत कोकणकड्याला आणि हरिश्‍चंद्रगडाला साष्टांग दंडवत घातला. डोळे मिटून घेतले. तरी नजरेत न मावणारा कडा मनातही मावेना. जड पावलांनी कमा पोकळाच्या बेलपाड्यातल्या घरात पोचलो. त्याच्या घरात सारवलेल्या जमिनीवर नक्षीदार खांबाला टेकून समोरचा कोकणकडा कितीतरी वेळ न्याहाळत होतो. त्याच्या भाग्याचा हेवा करत होतो, की त्याला घरबसल्या रोज कोकणकड्याचे दर्शन होते. बाराही महिने रोज...    

संबंधित बातम्या