ऐनारी गुहा आणि गगनगड 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 13 मे 2019

किल्ले भ्रमंती
 

तीन तपं झाली. सह्याद्री भटकतो आहे. खूप भटकलो. मोहीम करून परत आलो की दमल्या अंगानं विश्रांती घेताना मिटले डोळे पुन्हा चालू लागतात, त्याच मोहिमेच्या वाटेवर! सारं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मोहीम संपते पण सह्याद्री उरतोच. प्रत्येक मोहिमेनंतर हा उरलेला सह्याद्री नव्यानं साद घालत असतो, तो संपतच नाही... 
दुर्गांच्या या भटकंतीत असं जाणवू लागलं, की हे किल्ले कधी एकटे नसतात. किल्ल्यांभोवतीचं अरण्य आजूबाजूच्या डोंगररांगा, त्यातल्या रानवाटा या साऱ्या परिवारासह ते आपल्याला सामोरे येतात. महाराष्ट्रातल्या या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि त्यातले दुर्ग अशा असंख्य घाटवाटांनी जोडलेले आहेत. त्या घाटवाटांचं स्वतःचं एक सौंदर्य असतं... मग सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील, दऱ्या-शिखरांमधील दुर्गवाटा आणि घाटवाटांच्या भटकंतीचा, अवघ्या महाराष्ट्रमनाला जोडणाऱ्या या आडवाटांच्या मागोव्याचा, सह्याद्रीतले हे सांस्कृतिक आणि भौगोलिक सेतू धुंडाळण्याचा संकल्प केला. मग या घाटवाटांची भटकंती सुरू झाली. 

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, त्यातल्या घनदाट अरण्यांत, निसर्गसुंदर घाटवाटा काळाशी झगडत आपलं शतकानुशतकांचं अस्तित्व आजही टिकवून आहेत. कधीकाळी या घाटवाटा इथल्या भूमिपुत्रांच्या जीवनवाहिन्या होत्या. पण रस्ते आणि वाहतुकीची साधनं आली आणि या वाटांचं अस्तित्वच पणाला लागलं. देश आणि कोकणाला जोडणाऱ्या या वाटा अंत्यत रमणीय आहेत. ‘ऐनारीची घाटवाट’ आणि ‘पायरीची घाटवाट’ या त्यापैकीच होत. या घाटवाटांनी सह्याद्री चढून आल्याशिवाय खरा गगनगड समजणार नाही. किंबहुना कोकणातून वर येणाऱ्या व्यापारी घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठीच गगनगड निर्मिला असावा. या दोन्हीही वाटांवरचे गुहा विहार या वाटांच्या आणि गगनगडाच्या प्राचीनत्वाचे साक्षीदार आहेत. खरंतर गगनगडावर पोचणं आजकाल खूप सोपं झालं आहे. घाटमथ्यावरून थेट दुर्गपायथ्यापर्यंत वाहन जातं. मग काही पायऱ्या चढून गेल्यावर किल्ला. खूप वेळेला कोकणातून करूळ घाट किंवा भुईबावडा घाट चढून वर येताना दुर्गम आणि बेलाग गगनगड दिसायचा. या घाटातून येताना त्याची दुर्गमता इतकी मनाला भिडायची की कुतूहल जागृत व्हायचे. मग मनात यायचे, की गगनगडावर कोकणातून येणाऱ्या घाटवाटा याच उत्तुंगतेत कुठंतरी दडल्या असतील. 

कोणताही गिरीदुर्ग प्रस्थापित सोप्या वाटेने पाहता येतोच, पण त्यांच्या जुन्या दुर्गम वाटांनी गेल्यानंतर तो अधिकच देखणा दिसतो. ऐनारी किंवा पायरी घाट चढून आल्यानंतर गगनगडही असाच काहीसा वेगळा भासतो. गगनगडाच्या आसमंतात बोरबेट मोरजाईपासून सांगशी पडसाळीपर्यंत आणि ऐनारी उंबर्ड्यापासून भट्टीवाडीपर्यंत भटकण्यासाठी खूप काही आहे. या परिसरातून वेगवेगळ्या घाटवाटा गगनगडाच्या दिशेने येतात. 

गगनगडाच्या कोकणाच्या बाजूला करूळ घाट उतरला, की करूळनंतर पहिलं मोठं गाव वैभववाडी हे लागतं. सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे तालुक्‍याचं ठिकाण. देशाच्या उतारावर आणि कोकणात विखुरलेला हा तालुका. मुंबई-गोवा महामार्ग तळेऱ्यापाशी सोडून गगनबावड्याकडं जायला करूळ घाट चढून जावं लागतं. करूळ ओलांडलं आणि गगनबावड्याच्या दिशेनं जाऊ लागलो, की वळणावळणाच्या रस्त्यानं जाताना सातत्यानं गगनगड सामोरा येतो. वाटेतलं भट्टीवाडी गाव ओलांडलं, की उजव्या हाताला कोकणातील खोल दऱ्या, डावीकडं सह्याद्रीचा कडा आणि त्यावरचा उत्तुंग गगनगड खुणावतो. खरंतर इथपासूनच पायरीघाटाला सुरुवात होते. गगनगडावर जाणारी ही प्राचीन घाटवाट थेट गडाच्या पायथ्याशी जाते. 

कितीतरी वेळेला या पायरी घाटानं गगनगडाच्या पायथ्याशी गेलो. करूळ घाटानं कोकणात उतरू लागल्यानंतर काही किलोमीटर अंतर घाट उतरून गेल्यानंतर एका वळणावर दोन्ही बाजूला दरी येते. या वळणावर उजवीकडं उत्तुंग गगनगडाचं वेगळं दर्शन होतं. कधी अनगड खोदी व पायऱ्या, कधी दगडांची फरसबंदी असा हा घाट कोकणातल्या प्राचीन मालोंड नावाच्या बंदरातील समुद्रामार्गे होता. परदेशी उंची काचसामान, शस्त्रं आदी याच मार्गानं मुख्य भूमीवर जात असत आणि देशावरून बंदरात गूळ इत्यादी देशी पदार्थ जात असत. गगनगड परिसराची प्राचीन स्थापत्य रचना पाहता या घाटाचं महत्त्व अधोरेखित होतं. नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्राचीन घाटवाटेचं अस्तित्व फारच थोडं शिल्लक आहे. 

गगनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये काही होतकरू तरुण गगनगडाच्या चहूबाजूंनी भटकंती करत असतात. वैभववाडी परिसरातील अशा डोंगरवेड्या तरुणांचा एक दिवस अचानक निरोप आला, ‘सर या पायरी घाटात गुहा सापडलीय!’ पायरी घाटाचा सगळा परिसरच डोळ्यासमोर उभा राहिला. कुतूहलापोटी जे दगड, घाटातून जाताना आपले वेगळे अस्तित्व दर्शवायचे ते डोळ्यापुढून सरकू लागले. काही दगड उगीचच कुणीतरी घडवल्यासारखे वाटायचे. त्यावर नजर स्थिर होऊ लागली. त्यात काहीतरी दडलंय असं नेहमी वाटायचं. ही मुलं त्या संदर्भातच काही बोलत नसतील ना असंही वाटून गेलं. मन स्थिर बसू देईना. सरळ उठलो आणि पायरी घाटात पोचलो. आश्‍चर्यानं वेडं होण्याचंच फक्त बाकी होतं. ज्या घडीव दगडाविषयी नेहमी वेगळं काहीतरी वाटायचं तोच दगड आता गुहेचं छत बनून समोर उभा होता. भर उन्हात कित्येक दिवसांच्या परिश्रमानं दगडाखालची माती मुलांनी खणून काढली होती. पाहता पाहता एक विशाल गुहाविहार, कित्येक शतकांचा अज्ञातवास झुगारून सूर्यकिरण आणि त्यातला प्रकाश पीत होता. कुदळीच्या प्रत्येक घावासरशी माती निघतच होती आणि दालनं रिकामी होत होती. कितीतरी वेळेला या पायरी घाटानं गगनगडावर गेलो होतो. बरोबर या दगडासमोरून वळताना नकळत आधाराला हात त्यावरच टेकवला जायचा. आज तोच दगड, प्राचीन स्थापत्य बनून समोर उभा होता. घामेजलेल्या अंगानं गुहाविहारातली माती काढून तो मोकळा करणाऱ्या मुलांचं कौतुक वाटू लागलं. 

पायरी घाटाच्या या वेगळ्या दर्शनानं गगनगडाच्या प्राचीन वाटांचं कुतूहल अधिकच वाढलं. सांप्रतच्या करूळ घाटातून दक्षिण सिंधुदुर्गाच्या मुखात म्हणजे वैभववाडी, तळेरे परिसरात उतरता येतं. तसंच गगनबावड्याहून उतरणाऱ्या भुईबावडा घाटातून खारेपाटण परिसरात उत्तर कोकणाच्या द्वारात शिरता येतं. या भुईबावडा घाटाच्या पोटात दडलेल्या, ऐनारी घाटवाट-ऐनारी गुहा-अर्जुनी कडा-अंधार खोरे या मोत्याच्या माळेसारख्या शब्दसंभारानं मन मोहरून गेलं. मनात या शब्दांच्या भूगोलाची माळ फेर धरू लागली. तसा ऐनारीच्या गुहेपर्यंत घाटमाथ्यावरून अनेक वेळेला गेलो होतो. पण भुईबावडा घाटाच्या मध्यावरच्या निसर्ग सुंदर ऐनारी गावातून घनदाट जंगलातून चढउतारांची जुनी घाटवाट ओढ लावत होती. 

तसे ऐनारीच्या गुहेपर्यंत गगनबावड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या असळजच्या पठारावरून किंवा गगनगडाच्या अलीकडच्या सांगशी गावच्या माथ्यावरून किंवा अगदी गगनगडाच्या बसस्थानकाच्या मागील बाजूच्या जंगलवाटेने सहजपणे ऐनारी गुहेच्या माथ्यापर्यंत पोचता येते. थोडा घसाऱ्याचा उतार, की मग गुहाच! 

नेमकं आठवत नाही किती वर्षांपूर्वी; पण गगनबावडा ते भुईबावडा घाटातून रात्री जाणं एक साहसच होतं, तेव्हाची गोष्ट. तेव्हा आमचा दुर्गांचा अवघा प्रवास दुचाकीवरूनच असायचा. एकदा ठरलं, संध्याकाळी मुक्कामाला ऐनारी आणि भल्या सकाळी डोंगरदरीच्या वाटेनं ऐनारी गुहा. साधारण मे, जूनचा संधिकाळ होता. आकाश ढगाळलेलं होतं. पण देशावर फारसा वळीव बरसला नव्हता. उतरत्या छपरांच्या पुढ्यातल्या स्वच्छ सारवलेल्या अंगणात आम्ही पथारी पसरली होती. भल्या पहाटे उठून आवरलं आणि ऐनारी गुहेच्या घाटवाटेच्या मोहिमेला तयार झालो. त्या संधिप्रकाशात पूर्वेकडच्या डोंगररांगा एक एक करून उजळू लागल्या होत्या. पूर्व क्षितिज आपला अनंत काळेपणा सोडून तांबडं होऊ लागलं होतं. त्या पूर्व क्षितिजाच्या आणि डोंगररांगांच्या गर्भात वसलेल्या गुहेकडं आमची पावलं पडू लागली. मे महिन्याचा उत्तरार्ध असल्यामुळं दिवस तसा लवकर उजाडला होता. उष्माही आत्ताच जाणवू लागला होता. त्याकाळी रस्ता ऐनारीपाशीच संपायचा. हल्ली पुढच्या पेडवेवाडीपर्यंत वाहन जाईल, असा रस्ता आहे. त्याच्याही पुढं थोड्या कच्च्या रस्त्यानं जाता येतं. पण पेडवेवाडीच्या राईपर्यंतच वाहनं न्यावीत. मग पुढे सुरू होतो, अरण्यातल्या झाडांच्या पाण्याच्या वाटांचा आणि चढउतारांचा सहावा-सातवा विलक्षण डोंगरप्रवास. 

ऐनारी ओलांडून जंगलात शिरण्यापूर्वी समोर डाव्या बाजूला दिसणाऱ्या उत्तुंग कड्याला ‘अर्जुनाचा कडा’ म्हणतात. स्थानिक लोक त्याला ‘अर्ज्याचा कडा’ म्हणतात. त्याच्या दक्षिणेकडच्या कड्याच्या बेचक्‍यात एक विलक्षण अरण्यसौंदर्य दडलेलं आहे. तिन्ही बाजूला उत्तुंग कडे, त्यांच्या उतारावरचे घनदाट जंगल आणि प्रचंड कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहानं तयार झालेला दगडगोट्यांचा जलमार्ग कड्याच्या पोटात दडलेल्या या सौंदर्यस्थळाला ‘अंधार खोरे’ म्हणतात. 

ऐनारीपासून सुरू झालेल्या हा स्वप्नवत अरण्यप्रवास तीव्र चढाउतारांचा आहे. या परिसरातच ऐनारीची मूळ घाटवाट दडून बसलेली आहे. कस पाहणाऱ्या दोन-अडीच तासांच्या चढाईनंतर गुहेच्या पायथ्याशी थोड्या मोकळ्या दांडावर आपण येतो आणि मग डोंगरदांडाच्या बेचक्‍यातून अवघड पायवाटेनं गुहेच्या मुखाशी पोचतो. हा सारा रोमांचकारी अरण्यप्रवास डोंगरयात्रेची विलक्षण अनुभूती आहे. 

ऐनारीची गुहा खरंतर प्राचीन घाटवाटेवरचा एक प्रशस्त विहार आहे. ही खडतर घाटवाट मोहीम गिर्यारोहणाची साहसी अनुभूती देते. गुहेपर्यंत पोचल्यानंतर आपण गगनगडाच्या आसमंतात म्हणजे भुईबावडा घाट जिथून सुरू होतो तिथपर्यंत पोचू शकतो किंवा साहसाची अधिकच उत्कंठा असेल, तर आल्या मार्गानं उतरून पुन्हा ऐनारीत जाऊ शकतो. पण ऐनारीपासून गुहेपर्यंत येण्यापेक्षा पुन्हा ऐनारीत उतरणं अधिक साहसी आहे. अनेक वेळेला ऐनारीच्या बाजूनं चढाई करून गुहेपर्यंत आलो आणि पुन्हा ऐनारीत उतरलो. पण प्रत्येक वेळेचा रोमांच वेगळाच. 

सहजपणे जाता येणारा गगनगड अशा घाटवाटांनी अत्यंत दुर्गम आहे. मग अशा वाटांनी चढून आल्यावर तो खरा गिरीदुर्ग भासतो. 

खरंतर गगनगडावर अनेक गुहांचा समुदाय आहे. या गुहा त्याच्या प्राचीनत्वाच्या साक्षीदार आहेत. त्यातल्याच एका गुहेत प.पू. गगनगिरी महाराजांची तपसाधना चालायची. आज गगनगड गगनगिरी महाराजांची तपोभूमी आणि मूळ स्थान म्हणून सर्वदूर परिचित आहे. बऱ्याच भाविकांना या अंगानंच गगनगड माहिती आहे. पण या पलीकडं एक वेगळाच ऐतिहासिक आणि प्राचीन गगनगड अस्तित्वाची झुंज देत उभा आहे. 

काही पायऱ्या चढून गेल्यावर गगनगडाच्या पठारावर पोचतो. इथं अलीकडं बांधलेलं एक सभागृह आहे. त्याच्यासमोर बालेकिल्ल्याकडं जाणाऱ्या पायऱ्या आणि वर टोकाला पांढराशुभ्र दर्गा दिसतो. पायऱ्या सुरू होतात, त्या डाव्या बाजूला उंचवट्यावर महादेवाचं एक छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरासमोरून आणि बालेकिल्ल्याकडं जाणाऱ्या पायऱ्या उजव्या हाताला ठेवून आपण सरळ जाऊ लागलो, की सह्याद्रीचं आणि गगनगडाचं खरं सौंदर्य सामोरं येतं. डावीकडं जवळजवळ नामशेष झालेली लांबलचक तटबंदी आणि आपल्या अस्तित्वाशी झगडणारे प्रचंड बुरूज दिसतात. उत्तरेच्या बाजूला गेलो, की गगनगडाच्या प्राचीनत्वाचे साक्षीदार असणारे दुर्गस्थापत्य आपल्याला मोहवून टाकते. 

दुर्गाच्या कातळ भिंतीत खोदून काढलेली वेगवेगळ्या स्थापत्य वैशिष्ट्यांची पाण्याची टाकी हे गगनगडाचं खरं स्थापत्यसौंदर्य आहे. गगनगडाच्या उत्तरेच्या उतारावरचं जलसंकुल मात्र शिल्पस्थापत्याचा अजोड नमुना आहे. काळात खोदलेल्या अनेक खांबांमुळं निर्माण झालेली ओवरीसदृश रचना त्याच्या बाहेरचा आयताकृती जलाशय, कातळावर कोरलेली अनेक प्रकारची शिल्पं; त्यातही गजशिल्पं आणि हनुमंत शिल्प विशेष उल्लेखनीय आहेत. दुर्दैवानं ही सारी शिल्परचना नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 

उपसा, स्वच्छता, देखभालीअभावी अनेक टाक्‍यांचा हा समूह हळूहळू रिता होऊ लागला आहे. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, आजही यातल्या काही टाक्‍यांमधून गगनगडावर पाणी पाइपद्वारे नेलं जातं. टाक्‍यांच्या अगदी माथ्यावर बालेकिल्ला आहे. टाक्‍यांपासून पुन्हा माघारी वळून पायऱ्या चढून मग बालेकिल्ल्यावर जाता येतं. पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असणारा एक विठ्ठल - रुक्‍मिणीचा चौथरा, ध्वजस्तंभाची अडक, वाघजाईचं पाणी, निशाणबुरूज असे विखुरलेले अवशेष बालेकिल्ल्यावर आहेत. 

दर्ग्याच्या मागं सर्वोच्च ठिकाणी उभे राहिलो, की कोकणात उतरणारे घाट, पश्‍चिम-उत्तर-पूर्वेच्या डोंगररांगा यांचं अत्यंत देखणं रूप आपल्याला दिसतं. आकाश निरभ्र असेल, स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर दूर पश्‍चिम क्षितिजावर मिळतं. त्या मुचकुंदी खाडीचे पूर्णगडाजवळच्या सागराचंही दर्शन होतं. गगनगडावरून दिसणारा सूर्यास्त आणि सूर्योदयसुद्धा निसर्गाचा सौंदर्यसोहळा असतो. 

भुईबावडा घाटातल्या ऐनारी गावात मुक्‍काम करून अंधारखोरे - अर्जुनकड्याच्या मधल्या मूळ घाटवाटेनं ऐनारी अंगाची भटकंती ही थोडी चाकोरीबाहेरची साहसी दुर्गभटकंती एकदातरी अनुभवावी अशीच आहे. अर्थात उत्तम काळ दिवाळीनंतर जानेवारी महिन्यापर्यंत.

संबंधित बातम्या