साल्हेरच्या माथ्यावरून

डॉ. अमर अडके  
सोमवार, 17 जून 2019

किल्ले भ्रमंती
 

पूर्वार्ध
दिवस सरत्या थंडीचे, जानेवारी महिना संपत आला होता. पण बागलाणातल्या प्रचंड डोंगरांवर ऊन तापू लागले होते. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेचा बागलाण तालुका तसा अरण्याविहीन होत, नाही म्हणायला डोंगरउतारावर खुरट्या झाडांचे बसके जंगल. बागलाण तालुक्‍याचे मुख्य ठिकाण सटाणा. विस्तीर्ण माळरान आणि उत्तुंग डोंगररांगेचा हा तालुका गुजरातला लागून आहे. बागलाणातल्या अजस्र डोंगररांगांना सेलबारी-डोलबारी डोंगररांगा म्हणतात. या डोंगररांगांत उत्तुंग आणि अवाढव्य किल्ले वसले आहेत. साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-हरगड हे त्यातलेच, आकाशाच्या उंचीशी स्पर्धा करणारे. बागलाणातला सह्याद्री उरात धडकी भरवतो.

का कुणास ठाऊक? या अजस्र किल्ल्यांचे आकर्षण मला फार पूर्वीपासून आहे. पहिल्यांदा त्यांच्या अंतरंगात शिरलो त्यालाही जवळजवळ पस्तीस वर्षे झाली. त्यावेळची त्यांची अनुभूती आजही मनात घर करून आहे. घनदाट अरण्यांनी वेढलेल्या दक्षिण सह्याद्रीच्या तुलनेत हा उत्तरेचा सह्याद्री तसा उघड्या बोडक्‍या भूमीवर ठाण मांडून बसल्यासारखा आहे. तो अधिकच उत्तुंग भासतो आणि आहेही. एक कुतूहल होते; महाराजांच्या सुरतेच्या स्वारीचे आणि त्याहीपेक्षा हस्तगत केलेला खजिना घेऊन येतानाच्या परतीच्या प्रवासाचे आणि लढाईचे! या साऱ्या ऐतिहासिक प्रसंगाचा भूगोल म्हणजे बागलाणातल्या सेलंबारी-डोलंबारी डोंगररांगा ते दिंडोरी-चांदवडपर्यंतच्या सातमाळा डोंगररांगा. या रोमांचकारी इतिहासाच्या भूगोलाच्या शोधात या साऱ्या डोंगररांगा झपाटल्यासारखा फिरलो आणि अजून फिरतोच आहे. सुरतेच्या खजिन्याचा स्वराज्याकडचा प्रवास, साल्हेर-मुल्हेरची लढाई, प्रतापराव, मोरोपंतांचा पराक्रम, खानाचा पाडाव, सूर्याजी काकड्यांचे धारातीर्थी पतन, कांचनबारीची लढाई हे सारे ज्या दुर्गांच्या साक्षीने घडले, ते साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोरा-हरगड, कांचना-रवळ्या-जवळ्या धोडप यांची आणि या दुर्गांमधल्या अनगड सह्याद्रीची भटकंती ही एक रोमांचित करणारी अनुभूती असते. हे किल्ले बोलावतात, मग आपसूक त्यांच्या कुशीत जाणे होते. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा साल्हेर-मुल्हेर मनात उसळी मारू लागले. सटाण्याच्या देवमामलेदारांपासून ते मुल्हेरच्या डॉ. रघुराज पंडित महाराजांपर्यंतचे सारे संदर्भ आठवू लागले. मन स्वस्थ बसू देईना. गडपायथ्यापासून नाशिकपर्यंत सर्वांशी संपर्क सुरू झाला आणि अनामिक ओढीने निघालो साल्हेर-सालोटा-मुल्हेर-मोऱ्याला भेटण्यासाठी होय, भेटण्यासाठीच. मी किल्ल्यांना भेटायलाच जातो, पाहायला नाही...!

वेळ भर दुपारची. टळटळीत ऊन, समोर चोहोबाजूंनी तासलेल्या उताराचा उत्तुंग साल्हेर उभा, मातकट-पिवळ्या रंगाने उजळलेला. पायथ्याची काळी-भुरी शेते उघडी-बोडकी आणि तापलेली. सह्याद्री मंडळाच्या मातीच्या रंगाची एक अपूर्वाई असते. लालभडक मातीपासून ते काळ्या-भुऱ्या मातीच्या असंख्य छटा प्रदेशपरत्वे पाहायला मिळतात. अगदी तीनही ऋतूंत ही माती वेगवेगळ्या वर्णाची दिसते. कधी ती पावलापावलाला रंग बदलते. कधी पायथ्याशी लाल तर माथ्यावर भुरी, कधी याच्या उलट. लांबच-लांब पाऊलवाटांवरून जाताना कधी अचानक काळवटते, तर कधी मधेच फुफाट्याची भुरी बनते. तळकोकणात मात्र ती रंगाशी प्रामाणिक असते. तिथे ती तांबडीच असते. पण त्यातही एक गंमत आहे. कोकणातल्या पठारांवर आणि सड्यांवर ती मातकट-भुरी बनते. अरण्यवाटांवर ती लालभडक होते. भर कोकणातले डोंगरमाथ्यांवरचे सडे भुऱ्या मातीचे का असतात हे मला अजूनही समजलेले नाही. पण ही सारी माती माझ्या अंगाला लागलीय, माझी पावले या मातीने वेळोवेळी मळलीत, माझा घाम या मातीत मुरलाय. हे मला रोमांचित करतात.

तसा हा बागलाणातल्या डोंगरांचा सोनेरी भुरेपणा मला फारच मोहवतो. सारे डोंगर पावसाळ्यापेक्षा भर उन्हात सोन्यासारखे चकाकतात. पांढऱ्या प्रकाशातले आकाशाच्या निळ्या पार्श्‍वभूमीवरचे त्यांचे सौंदर्य अक्षरशः वेडावून टाकते. त्यातलाच हा साल्हेर. भर दुपारी तापलेली राने तुडवत साल्हेरच्या पायथ्याला भिडण्यासाठी चालतोय. भर उन्हात किल्ल्यांवर जाताना भाजणारे ऊन हळूहळू जाणवेनासे का होते कुणास ठाऊक!

साल्हेर गावाच्या बाजूने वर चढताना थोडी अनगड डोंगरवाट लागते. ती चढत चढत कड्याला भिडलेल्या कातळ पायऱ्यांपर्यंत घेऊन जाते. मग दुर्ग चढाईचा अनुभव. या दमछाक करणाऱ्या चढाईने आपण माथ्यावर पोचलो, की दुर्गात प्रवेश करण्याचे एकाकी, पण देखणे द्वार लागते. त्याच्या आतून बाहेरून, माथ्यावरून सगळ्या बाजूंनी निळे आकाश ओसंडून वाहत असते. या दारातून प्रवेश केल्यावर साल्हेर किल्ल्याच्या पठारावर आपण पोचतो. केवढा प्रचंड किल्ला आणि तेवढाच विस्तृत माथा. मागे-पुढे असलेल्या सर्व सहकाऱ्यांसह दुर्ग माथ्यावर पोचेपर्यंत सूर्य कलतीकडे झुकला होता. निळे आकाश पांढरे होऊन लालसर बनू लागले होते. हळूहळू ते जांभळे आणि चांदण्यांच्या नक्षीसह काळे होणार होते. या संधिकाळात पश्‍चिम क्षितिजाकडे तोंड करून साल्हेरच्या उत्तुंग कड्यावर मी उभा होतो. घामाने चिंब भिजलेले अंग पठारावरच्या वाऱ्याने हळूहळू सुकू लागले होते. पश्‍चिमेकडचा लाल प्रकाशाने न्हाऊन निघालेला तो प्रचंड आसमंत मी निःस्तब्ध न्याहाळत होतो. विरघळणाऱ्या त्या आसमंतात मीही विरघळत चाललो होतो. आजूबाजूला कोणी नसले, तरी मी एकटा नव्हतो. पण आता एकटे असल्यासारखे वाटत होते. मावळणाऱ्या संध्याकाळी किल्ल्यांवर असे एकटे वाटते आणि एकटेच असावेसे वाटते. अशा असंख्य कातर संध्याकाळ मी किल्ल्यांवर अनुभवल्या आहेत. आजही मी साल्हेरच्या पश्‍चिम कड्यावर असाच एकटा उभा आहे. पायतळीच्या गवताची सळसळ, कड्यांवरून वाहणारा वारा बस्स! इतकाच आवाज. हळूहळू सारे काळवंडू लागले. का कुणास ठाऊक, शांतपणे मिटलेल्या डोळ्यांमध्ये मला ओल जाणवू लागली. पापण्यांना न जुमानता दोन थेंब बाहेर आलेच. त्या विलक्षण आत्ममग्नतेत कानावर शब्द आले, बाबा! मी वळून मागे पाहिले. माझ्या मागे चार पावलांवर माझा मुलगा अद्वैत उभा होता. त्याची ही हाक. किती वेळ उभा होता कुणास ठाऊक. फक्त हाक मारून तो थांबला. पुढे काही बोललाच नाही. अंधारलेल्या त्या पठारावर पश्‍चिमेच्या कड्यावर आम्ही दोघेच. चार पावले मी ओढल्यासारखा त्याच्याकडे गेलो. त्याला कडकडून मिठी मारली. दोघेही निःशब्द. सह्याद्रीच्या उत्तुंग किल्ल्यावर बापाने आपल्या मुलासमवेत असण्याचा आनंद अनुभवत होतो. तो शब्दांपलीकडला होता. खरेतर त्या उत्तुंग कड्यावर मी बाप नव्हतो आणि तो मुलगा नव्हता. दोन्ही नाती विरून गेली होती. आम्ही होतो झपाटल्यासारखे दुर्गांवर फिरणारे साऱ्या नात्यांपलीकडचे मित्र. वाऱ्याच्या लहरींबरोबर अंधारात मिसळलेल्या पायवाटेवरून दूर मुक्कामाच्या गुहेकडे आम्ही चाललो होतो. एकही शब्द न बोलता या दुर्गांवर असे शब्दांपलीकडचे काही तरी सतत मिळते.

दुर्गांवर फिरणारा वारा आता थंड होऊ लागला होता. दुर्ग पायथ्याचा आसमंत जसा वाड्या-वस्त्यांमधल्या दिव्यांनी जागोजागी लुकलुकत होता, तसा माथ्यावरला आसमंतही आभाळभर लुकलुकत होता. जणू वरही वाड्या-वस्त्या असाव्यात. त्या एकाकी पण मंतरलेल्या चालीने मुक्कामाच्या गुहेपाशी पोचलो. गुहेतून लाल प्रकाशाबरोबर धूरही बाहेर डोकावत होता. गुहेत जेवणाची तयारी सुरू होती. किल्ल्यांवरल्या जेवणापेक्षा त्याची तयारी हा आनंदसोहळा असतो. गुहेबाहेर मिळेल त्या सपाटीला पथाऱ्या पसरल्या जात होत्या. गुहेच्या खालच्या अंगाला असणाऱ्या थोड्या लांबवरच्या पाण्याच्या टाक्‍यावर विजेऱ्या चमकत होत्या. टाक्‍यातून वर प्यायला आणि स्वयंपाकाला पाणी आणणे चालले होते. दुर्गांवरच्या आमच्या अशा निर्धन संसारात कुणी कुणाला कामे सांगण्याची वेळ येत नाही. आमच्या कुटुंबातला प्रत्येक जण समजून कामाला लागतो. स्वयंपाकात कधी मीठ जास्त पडत नाही आणि तिखटही कमी पडत नाही. त्या चवीपुढे हे सारे गौण असते. इथे कुणाचे उष्टे नसते, काही शिळे नसते, सारेच अन्न पवित्र असते. आपल्यानंतर उद्या आणखी कुणी संसार मांडणार आहे याचेही भान असते. सारे कसे स्वच्छ स्वच्छ होते. मग सुरू होतात चांदण्या ओंजळीत घेऊन गप्पा... इतिहासाच्या, सह्याद्रीच्या, दुर्गांच्या. गडावरची मध्यरात्र आणि उत्तररात्र अवघे आयुष्य शिकविते.

का कुणास ठाऊक? किल्ल्यांवर मला फारशी झोप येत नाही. सारे शांत झाल्यानंतर आकाशाकडे पाहताना ताऱ्यांमधली अंतरे स्पष्ट जाणवू लागतात. मग त्यांच्याकडे पाहात कधीतरी हलकासा डोळा लागतो. भल्या पहाटे कुणीतरी पक्षी हलकेच कानात बोलतो, मग आलेली जाग नव्या उमेदीची असते. अंधाराच्या गर्भातून उजळणारा सारा आसमंत टवटवीत भासतो. पहाटेच्या संधिप्रकाशात साल्हेरच्या पठारावरच्या गुहेसमोर उठून बसलो. उत्तरेच्या बाजूच्या टाक्‍यातील पाण्यावर आकाशाचे प्रतिबिंब उजळत होते आणि डाव्या हाताला उंच टेकडीवर परशुरामाचे पांढरेशुभ्र मंदिर चकाकू लागले होते. साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वांत उंच किल्ला आणि त्यावरचे परशुराम शिखर महाराष्ट्रातले दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर. काही सहकारी उठले होते, उरलेल्यांना उठवले आणि आवरून परशुरामाकडे निघालो. पूर्व क्षितिजावरून सूर्य हळूहळू वर डोकावू लागला होता. गुहेकडून परशुरामाला जाणे तसे काही अगदी सोपे नाही. आडव्या वाटेने जसजसे चढत जातो, तसतसा समोरचा सालोटा किल्ला त्याच्या रौद्र सौंदर्यासह सामोरा येतो. परशुराम शिखरावरून सालोटा पाहाणे हा सह्याद्रीचा सर्वांगसुंदर आविष्कार असतो आणि परशुरामासमोरचा सूर्योदय आणखी सौंदर्यशाली असतो. परशुरामाचे मंदिर तसे छोटेखानी. आत परशुरामाच्या मूर्तीसह फारशा सुबक नसलेल्या मूर्ती विराजमान आहेत. पुन्हा गुहेकडे येऊन गरम पोह्यांची पोटपूजा केली आणि संसार पाठीवर घेऊन सालोट्याकडे मार्गस्थ झालो. साल्हेरचे सौंदर्य साल्हेर ते सालोटा या मार्गावरच खऱ्या अर्थाने आहे. अवघा डोंगरकडा कोरून तयार केलेली अनगड पण सुंदर कातळवाट, त्या पाषाणपायऱ्या, पाण्याची टाकी, मधली कातळद्वारे हे अचंबित करणारे दुर्गस्थापत्य आपल्याला थेट साल्हेर सालोट्यामधल्या मोरज खिंडीपर्यंत घेऊन जाते. केव्हा कुणास ठाऊक? किती सहस्रकांपूर्वी कुणास ठाऊक? कुणी कुणास ठाऊक? या उत्तुंग डोंगराच्या कातळ कड्यामध्ये ही देखणी वाट कोरून काढली. मोरज खिंडीपासून थोडी खडी चढाई आहे. मग पुन्हा लागतात कातळ पायऱ्या, कातळ कड्याच्या भोवतीने फिरत जाणारी, अनेक टाक्‍या असणारी, कातळकड्याच्या बाजूला मुद्दाम कोरून काढलेल्या कातळ भिंतीचे संरक्षण असणारी, जागजागच्या कातळद्वारांची आश्‍चर्यमुग्ध करणारी कातळवाट. या अपरिचित आणि दुर्लक्षित दुर्गावरची ही कातळवाट हे महाराष्ट्राचे अमोल स्थापत्य लेणे आहे. गूढ सुंदर अशी ही कातळवाट संपली, की आपण पोचतो दुर्गाच्या पठारावर. या पठाराच्या सर्वोच्च माथ्यावरून परशुरामासह साल्हेर पाहणे किती नेत्रदीपक असते, हे शब्दांत सांगणे अवघड आहे. सालोट्याच्या माथ्यावर मोजकेच दुर्ग अवशेष आहेत. काही मंदिरांचे, काही टाक्‍यांचे, उद्‌ध्वस्त महादेव मंदिराच्या शेजारचे एक पाण्याचे टाके थोडेबहुत शाबूत, थोडे पाणीही त्यात. तेथून काही अंतरावर उघड्या चौथऱ्यावरचा हनुमंत मला नेहमीच भावतो. त्याच्यासमोर कितीतरी वेळेला मोठ्याने मी भीमरूपी महारुद्रा म्हटले आहे. आज अधिक मोठ्याने म्हटले. या हनुमंताला पाठीशी टाकून वाळलेल्या गवतामधून पश्‍चिमेच्या साल्हेरकडे जात राहावे. उत्तुंग कड्याच्या टोकावर पोचलो, की परशुराम शिखरासह समोर येणारा सालोटा अवर्णनीय दिसतो. सालोट्याच्या सर्वोच्च पठारावरून साल्हेर पाहिला, की विश्‍वास बसत नाही आपण तिथे होतो आणि तिथून इथे आलो. नेमके हेच साल्हेरवरून सालोटा पाहताना होते. दोन्ही किल्ल्यांच्या कड्यांच्या पोटात कोरून काढलेल्या देखण्या वाटा आणि पाण्याची टाकी हे दुर्मिळ स्थापत्य शिल्प आहे. साल्हेरीच्या गुहेपासून किल्ल्यावरचे खांब टाके डाव्या हाताला ठेवून उत्तुंग कातळात खोदून काढलेल्या मार्गाने सालोट्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोचणे हा आकाशाच्या पोकळीतल्या उत्तुंग कातळकड्यांच्या गूढ गर्भातला कातळ प्रवास, दुर्ग भटक्‍यांनी अनुभवलाच पाहिजे. तो अनुभवल्याशिवाय त्याची श्रीमंती कळणार नाही.

रणरणत्या उन्हात गुडघाभर गवतात सालोट्याच्या माथ्यावर उभा होतो. समोर बागलाणातल्या अफाट डोंगररांगा. डोंगरांच्या उंचीमुळे त्यांच्याच कड्यांची सावली त्यांच्याच अंगावर. मधल्या दऱ्यांमध्ये माथ्यावरचे आकाश मिसळून गेलेले आणि दूरदूरच्या डोंगररांगा आकाशात मिसळलेल्या. भर उन्हातसुद्धा सह्याद्री इतका देखणा असतो. त्याच्या माथ्यावर ऊन जाणवतच नाही आणि भर उन्हातसुद्धा वाऱ्याची झुळूक शीतलच असते. हे मी कितीतरी वर्षे अनुभवत आलोय.

खरे तर आज मोहिमेचा शेवटचा दिवस. मोहीम संपताना मी अस्वस्थ होतो. एखादा सण संपल्यानंतर किंवा मंगलकार्य आटोपल्यानंतर जी हुरहूर असते, तसेच मोहीम संपताना मला उदास व्हायला होते. किल्ल्यांवरून माझा पायच निघत नाही. पुन्हा नव्या मोहिमेची निश्‍चिती झाली, की मग शांत वाटते. मग पुनरागमनायचे असे ठरवून जड पावलांनी किल्ला उतरतो. तसेच मुल्हेरपासूनचा या मोहिमेतला प्रवास डोळ्यांसमोर तरळू लागला...  

संबंधित बातम्या