दुर्गभांडार - त्र्यंबकगड - हरेरगड 

डॉ. अमर अडके  
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

किल्ले भ्रमंती
 

काही दिवसांपूर्वी व्हॉट्‌सॲपवर हरेरगडाच्या पायऱ्यांवरचा गर्दीचा व्हिडिओ पाहिला. त्या गर्दीविषयीच्या क्रिया आणि प्रतिक्रियाही ऐकल्या. मन अस्वस्थ झालं. खूप वर्षांपूर्वीचा शांत हरेरगड आठवू लागला. पहिल्या दरवाजाच्या कातळ पायऱ्या खोबण्यांत बोटं रुतवून चढतानाचा आकाशभरला एकांत आठवू लागला. पहिल्या दरवाजातून आत गेल्यानंतर दुसऱ्या दरवाजाच्या अलीकडचा कातळ फोडून केलेला मार्ग आठवू लागला. तिथं बसून पाहिलेली तुटलेल्या कातळांमधून स्कॉटिश कड्याच्या बाजूची दरी आठवू लागली. दुसऱ्या दरवाजाच्या अलीकडचा चढाचा वळणदार चिंचोळा मार्ग आठवू लागला. कसाबसा एखादा माणूस वर किंवा खाली जाऊ-येऊ शकेल, असा हा मार्ग, त्यात कड्याकडं तुटलेला! स्कॉटिश कड्याच्या बाजूला एका जुन्या तुटलेल्या वाटेच्या माथ्यावरून न्याहाळलेली खालच्या आसमंताची खोली आणि तो निवांतपणा आठवला. त्या दरीच्या आणि कड्याच्या उजव्या अंगाला पंख स्थिर ठेवून उडणारा सोनेरी गरुड आठवला. हरेरगडाच्या पायऱ्यांवरचा आणि माथ्यावरचा हा निवांतपणा आज इतक्‍या वर्षांनी का आठवतोय कुणास ठाऊक? पण आठवतोय एवढं खरं. अस्वस्थ मनात विचार येऊ लागले. किल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या वाढली म्हणून आनंद मानायचा, की या दिशाहीन गर्दीत किल्ल्यांचा श्‍वास गुदमरतोय म्हणून अस्वस्थ व्हायचं? खरंच अस्वस्थ झालो. गेल्या कित्येक वर्षांत हरेरगड आणि दुर्गभांडार यावरचं वारंवारचं जाणं आठवू लागलं. हळूहळू बदलत गेलेली तिथली वर्दळही आठवू लागली. 

दुर्गभांडार-त्र्यंबकगड-ब्रह्मगिरी-हरिहरगड-वाघेरा-फण्या डोंगर-भास्करगड या साऱ्या देखण्या गिरीशिखरांचं माझं जुनं नातं आहे. किमान छत्तीस वर्षं होऊन गेली या साऱ्या शिखरांच्या सौंदर्यशाली अनुभूतीला! या साऱ्यांच्या पहिल्या दर्शनाला निमित्त होतं त्र्यंबक परिक्रमेचं. श्रावणातल्या सोमवारी त्र्यंबकेश्‍वर-ब्रह्मगिरी परिक्रमेची एक जुनी परंपरा नाशिकच्या परिसरात आहे. पावसाने ओथंबलेला ब्रह्मगिरी पर्वत. त्याच्या माथ्यावरून खळाळत झेपावणारे जलप्रपात, धुकं आणि उन्हाच्या पाठशिवणीत उजळणारे श्रावणातले ते डोंगरकडे... 

या पार्श्‍वभूमीवरची ती परिक्रमा हा साराच आनंद सोहळा असतो. त्यातही दीर्घ परिक्रमेत दिसणारी डोंगर शिखरं अवर्णनीय असतात. खरंतर आता त्र्यंबकेश्‍वराच्या आजूबाजूला खूप चांगले रस्ते झालेत. त्यावेळी असं नव्हतं. मोठ्या परिक्रमेसाठी निरगुड पाड्यातली काही आदिवासी कुटुंबं हाच आमचा आधार. त्यातही निरगुड पाड्यातल्या समाधानचा अशिक्षित बाप हा आमचा सर्वकाही. 

मग त्याच्या साथीनं एकेका डोंगराची ओळख होऊ लागली. जाणं होऊ लागलं. खरंतर हरिहर असो, भास्करगड असो, दुर्गभांडार असो, आम्ही आणि हे किल्ले एवढेच आहोत असं वाटायचं. ते फक्त आपलेच आहेत असं वाटायचं. एकटं मागं राहिलं, की भीती वाटायची. असं भावनिक नातं या डोंगर शिखरांशी गेली तीन तपं जमून गेलंय. काही नाही! परवाची हरेरगडावरची गर्दी पाहून हे माझे सगेसोयरे सारखे आठवू लागले. बस्स! इतकंच... 

आज त्र्यंबकेश्‍वराचं रूपच बदलून गेलंय. तेव्हा कुशावर्त ओलांडून गंगाद्वाराच्या पायऱ्या सुरू होईपर्यंतही मोकळं मोकळं असायचं. निवृत्तीनाथांचा डोंगरही सगळ्या बाजूंनी हिरवागार असायचा. दुपार टळून गेली, की गंगाद्वाराच्या डावीकडच्या आडव्या रस्त्यानं ब्रह्मगिरीकडं जायचं नाही हा अलिखित नियम. या सगळ्या जुन्या आठवणींसह ब्रह्मगिरी ते हरिहरगड ही डोंगररांग सारखी मनाच्या गाभाऱ्यातून वर येऊ लागली. 

जाऊन बरेच दिवस झाले होते. या डोंगररांगेची ओढ स्वस्थ बसू देईना. मनाने उचल खाल्ली आणि पुन्हा एकदा या जुन्या नातलगांना भेटून आलो. यावेळेला सुरुवात दुर्गभांडार पासून केली आणि सांगता हरिहरगडावर झाली. 

कोल्हापुरातून तसं वेळेतच निघालो. पण पुणे-नाशिक रस्त्यानं जेवढा घ्यायचा तेवढा वेळ घेतलाच. उजाडायच्या आत नाशिकरोडला पोचलो. आमचे दुर्गमित्र मार्गदर्शक संजय अमृतकर यांना बरोबर घेतलं आणि त्र्यंबकेश्‍वरी पोचलो. तोपर्यंत दिवस चांगलाच वर आला होता. नाही म्हटलं, तरी रात्रभराच्या प्रवासाचा शीण होताच. सरत्या थंडीचे दिवस असूनसुद्धा उष्मा जाणवत होता. आवरून ताजेतवाने झालो. आमचे आणखी एक मित्र विलास वडजे आधीच गंगाद्वारापाशी आमची वाट पाहात होते. खरंतर गंगाद्वार करून आडव्या वाटेनं ब्रह्मगिरी करायचा असा बेत. पण असं ठरवलं आधी थेट ब्रह्मगिरी गाठू आणि दुर्गभांडार करूनच परतीला गंगाद्वार करू. तसं या सर्व पर्वतसंकुलालाच त्र्यंबकगड म्हणतात. ब्रह्मगिरीवर जाण्याचा कातळ पायऱ्यांचा मार्गसुद्धा एखाद्या गिरीदुर्गाच्या वाटेसारखाच आहे. कातळ फोडून केलेल्या प्राचीन अनगड पायऱ्या अलीकडं घडविलेल्या काही पायऱ्या आणि कातळातच बांधलेली द्वारे असा भक्कम दुर्गमार्ग प्रचंड कातळ कड्यांमधून ब्रह्मगिरीवर घेऊन जातो. त्र्यंबकेश्‍वरापासून या पायरी मार्गानं ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोचणं हाच एक आनंद सोहळा असतो. या पायरी मार्गावर काही वेगळी कातळशिल्प आणि प्राचीन मंदिरे आहेत. 

ब्रह्मगिरीच्या विशाल माथ्यावर पोचल्यानंतर हरिहरगडापासूनचा ते दुर्गभांडारपर्यंतचा सुंदर गिरीशिखरांचा आसमंत अतिशय सुंदर दिसतो. या पठाराच्या डाव्या बाजूला एक शिवमंदिर, तर उजव्या हाताला गोदावरीचं मूळ उगमस्थान आहे. श्री शंकरानं आकाशातून पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेली गंगा कदाचित तिच्या प्रवाहाचा भार पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून आपल्या जटेवर पेलली. त्या जटा भूमीवर आपटल्या आणि मग त्या जटांमधून बाहेर पडून ती पृथ्वीवर प्रवाहित झाली, अशी मौखिक माहिती परंपेरनं सांगितली जाते. ब्रह्मगिरीवर जेथून गोदा प्रवाहित होते, तिथं नैसर्गिकरीत्या कातळाला प्राप्त झालेला वळ्यायुक्त आकार शंकरानं जटा आपटल्याचा आहे, असंही सांगितलं जातं. ते काहीही असो इथून गोदावरी प्रवाहित होते. हेच गोदावरीचं मूळ उगमस्थान आहे. 

या मंदिराच्या पाठीमागील बाजूनं दुर्गभांडारकडं जाणारी रोमांचकारी वाट आहे. उजव्या हाताला पठाराचा खुज्या उंचीचा कडा आणि डावीकडं घसाऱ्याचा उतार अशी ही वाट एका चिंचोळ्या कातळभिंतीपर्यंत पोचते आणि इथून सुरू होतो दुर्गभांडारचा रोमांच! 

ब्रह्मगिरी-ब्रह्मगड-त्र्यंबकगड खरंतर माझ्या लेखी तिन्ही एकच. ब्रह्मगिरीचं पठार संपलं, की अरुंद कातळवाटेवरून जाताना दोन्ही बाजूला खोल दरी. उजवीकडची बाजू म्हणजे त्र्यंबकेश्‍वर. ब्रह्मगिरीचं पठार आणि दुर्गभांडारचा हा कडा याच्या थेट खाली गंगाद्वार आहे. उगमाचं पाणी या कड्याच्या पोटातूनच गंगाद्वारापर्यंत पोचतं, प्रकटतं हे गोदावरीचं दुसरं दर्शन. तिथून ब्रह्मगिरीच्या या डोंगराच्या पोटातून थेट कुशावर्त आणि तिथून प्रवाहित झालेली गोदावरी पूर्ववाहिनी होऊन हजारो मैलाचा प्रवास करून अखेरीस बंगालच्या उपसागराला मिळते. 

दुर्गभांडारच्या सुरुवातीच्या या कड्यावर उभं राहिलं, की अंदाजच करता येत नाही की पुढं स्थापत्याच्या एका अद्‌भूत विश्‍वात आपण प्रवेशणार आहोत. कडा संपता संपता अचानक कड्याच्या पोटातल्या उतरणाऱ्या प्राचीन पायऱ्या लागतात. त्या उतरून कड्याच्या पोटातल्या दारानंच आपण कड्याच्या बाहेरच्या अंगाला पोचतो आणि पुन्हा कड्याच्या पोटातल्या अशाच चढणीनं कड्याच्या टोकाला थेट माथ्यावर पोचतो. कड्याच्या पोटातलं हे विलक्षण स्थापत्य म्हणजे दुर्गभांडारचं वैभव. सांगूनही पटणार नाही अशा या दुर्गवाटा सह्याद्रीच्या कड्यांवर फार थोड्या ठिकाणी आढळतात. त्यातली दुर्गभांडारची ही वाट एक दुर्मीळ स्थापत्य आहे. पहिल्यांदा जाणाऱ्याला अचंबित व्हायलाच होतं. या अनुभूतीतून सावरत ब्रह्मगिरीचं पठार पार करून पुन्हा पायऱ्यांपर्यंत कधी पोचलो कळलंच नाही. पहिलं द्वार आल्यावरच सारे भानावर आलो. ब्रह्मगिरी उतरून थेट खाली न जाता आडव्या वाटेनं आता गंगाद्वाराशी पोचायचं होतं. नाशिकमध्ये गोदावरीचा उल्लेख गंगा असाच होतो. गंगाद्वारापासूनच खाली उतरतानासुद्धा अजूनही मनातून ब्रह्मगिरीची दुर्गवाट आणि दुर्गभांडारची कड्यातली वाट रुंजी घालतच होती. 

आता ओढ होती त्र्यंबकेश्‍वराच्या दर्शनाची. रात्रभराचा प्रवास, दिवसभराची चढाई इतकं असूनसुद्धा कधी दमल्यासारखं का वाटत नाही हे न उलगडलेलं कोडं आहे. त्र्यंबकेश्‍वराच्या विशाल गाभाऱ्यातून घेतलेलं शिवलिंगाचं दर्शन, नंतर क्षणभर मिटलेले डोळे यात काय समाधान दडलेलं असतं कुणास ठाऊक? 

आता ओढ लागली होती निरगुड पाड्याची. बोलावत होता हरिहरगड. रस्ते झालेले असले, तरी प्रवास दुर्गम भागातला होता. निरगुड पाड्याच्या समाधानबरोबर होईल तसा संपर्क सुरू होता. ब्रह्मगिरीच्या माथ्यावरून दिसणारा हरिहरगडाचा डोंगर सकाळपासूनच साद घालत होता. तसं यावेळी ब्रह्मगिरी शेजारचं ब्रह्मा शिखरही राहूनच गेलं होतं. एखादं डोंगर-शिखर एखाद्यावेळी जाऊ शकलो नाही, की एखाद्या जवळच्या आप्ताकडं त्याच्या गावात जाऊन न गेल्याचं दुःख होतं. 

अंधारात निरगुड पाड्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्र्यंबकेश्‍वर-घोटी हा नव्यानं रुंद झालेला रस्ता मग खोडाळा फाटामार्गे पेगळवाडीपाशी उजवीकडं वळून अगदी रस्त्यावरच असणाऱ्या निरगुड पाड्यात पोचता येतं, तसं त्र्यंबकेश्‍वराहून हे अंतर बावीस तेवीस किलोमीटरच; पण डोंगराळ मुलखातला प्रवास. 

आज रात्रीचा मुक्काम निरगुड पाड्यात समाधानच्या घरी. तसा त्याच्या घरी पोचायला उशीरच झाला होता. त्याचं जुनं घर अजूनही डोळ्यासमोर तसंच होतं. उंचवट्यावरच्या घरासमोरचं स्वच्छ सारवलेलं अंगण, त्यात इतस्ततः फिरणाऱ्या कोंबड्या आणि घराची रंगीबेरंगी भिंत. घराचं स्वरूप फारसं बदललेलं नसलं, तरी थोडी आधुनिकतेची झालर आली होती. इथं तिथं घातलेल्या फरश्या, लाइटचे बल्ब, पाण्याच्या टाक्‍या, पाण्याचे नळ हे त्या संस्कृतीला ठिगळं लावल्यासारखे दिसत होते. आतल्या बाजूची चूल मात्र तशीच होती. समाधानचा बाप वर्षभरापूर्वीच गेल्याचं कळलं. त्याच्या आईला भेटताना कसंसंच वाटलं. इतक्‍या वर्षांनीसुद्धा तिनं मात्र पटकन ओळखलं. त्या आदिवासी पाड्यातल्या जेवणाबरोबर अंगणातला गप्पांचा फड असा काही रंगला, की रात्र किती सरली कळलंच नाही. अशा दूर डोंगरांमधल्या वाड्या-वस्त्यांमधल्या सह्याद्रीच्या कुशीतल्या रात्री केवढ्या समाधानाच्या असतात हे शब्दांत सांगणं अवघड आहे. झोप न लागतासुद्धा खरी विश्रांती इथंच मिळते. 

निरगुड पाडा हा हरिहरगडाचा बेस कॅम्प. हरिहरगडाला खरंतर अनेक मार्गांनी जाता येतं. पण त्यातला सर्वाधिक प्रचलित मार्ग म्हणजे निरगुड पाडा ते हरिहर पायथा. तसंच हल्ली पायथ्याच्या हर्षेवाडीपर्यंतसुद्धा वाहनानं जाता येतं. डोंगर चढून पायऱ्यांच्या रोमांचकारी वाटेनं दुर्गचढाई. तसं हौशी भटक्‍यांसाठी जांभुळपाड्यापासून किंवा ब्रह्मगिरीच्या उत्तरेच्या दरीच्या लांबच्या आणि अवघड वाटेनंही हरिहरगड करता येतो. पण या डोंगरयात्रांसाठी जाणकार वाटाड्या हवा. 

आज हर्षेवाडीहून हरिहर करायचा, अशी ऊर्मी आली आणि वर मनसोक्त भटकायचं ठरलं! दिवस उजाडायलाच हर्षेवाडीत पोचलो. विरळ जंगलाच्या डोंगररांगेत अफाट कड्याचा हरिहरगड उठून दिसत होता. हर्षेवाडीहून पायथ्याला पोचायला पाऊणतास तरी लागतोच. डोंगर चढाईला लवकर सुरुवात; कारण कदाचित नंतर होणारी गर्दी. निरगुडपाड्याच्या बाजूनं प्रकाशमान होणाऱ्या आकाशाच्या साक्षीनं गडपायथ्याशी पोचलो. घसाऱ्याचा शेवटचा चढ चढून पायथ्याच्या सपाटीला आलो. समोर पायऱ्यांचा उभा मार्ग पोटात घेऊन बसलेला साक्षात हरिहरगड आणि त्याच्या छातीतले द्वार. किती वेळेला हरिहराचं हे रूप पाहिलं, पण डोळ्यात मावतच नाही. द्वारापासून पायऱ्यांपर्यंत एकही माणूस नसणारा हरिहर किती प्रसन्न आणि टवटवीत दिसतो, हे पाहिल्यावरच कळतं. तसा हा चौकोनी किल्ला. दोन अफाट कडे, एक बाजू भूमीशी संपर्क ठेवणारी-त्या बाजूलाच पायऱ्यांची अवघड चढण आणि मागची बाजू तिचा कडा थेट दरीत घुसलेला. प्रसन्न सकाळी सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेला हा हरिहरगड किती सुंदर दिसतो. त्याचं हे निर्मनुष्य रूप डोळ्यात साठवत पायऱ्यांअलीकडची वळणदार छोटीशी, पण अवघड चढाई करून थेट पायऱ्यांपाशी पोचलो. ज्यांचा हरिहरगडाचा हा पहिला अनुभव होता, त्यांच्या आश्‍चर्याला सीमाच नव्हत्या. दोन्ही बाजूला खोल दरी आणि पायऱ्यांचा चढायचा हा मार्ग, हातानं पकडायला दगडी खोबणी. एकशे सतरा पायऱ्यांची ही अनुपम चढाई प्रत्येक दुर्गभटक्‍यानं अनुभवावी अशीच आहे. मग त्या पहाडातला पहिला दरवाजा. डाव्या बाजूला कडा अन्‌ आडवी चाल. मग वळणदार चिंचोळ्या वाटेवरची चढाई, या चढाईवेळी डावीकडचा तुटलेला कडा खासच आणि मग आडव्या प्रवेशातून दुर्ग माथ्यावर. मग कातळांचे टप्पे पार करत प्रशस्त दुर्ग पठारावर. या दुर्गपठारावरून दिसणारं त्र्यंबकेश्‍वराच्या डोंगररांगेचं चित्र अवर्णनीय. उत्तरेचा वाघेरा किल्ला. दक्षिणेला कावनाळ, त्रिंगलवाडी, अप्पर वैतरणा तलाव, ब्रह्मा डोंगर, कापडा डोंगर आणि ब्रह्मगिरी, त्र्यंबकगड थेट पूर्वेला. पश्‍चिमेला फण्या डोंगर, बसगड आणि उटवडचा डोंगर. या गिरीशिखरांवर नजर ठरत नाही. पठारावर तसे माफक दुर्ग अवशेष. श्री शंभू महादेवाचं एक छोटेखानी मंदिर, श्री हनुमंत आणि बांधकामाची पडझड झालेलं एक तळं, एक-दोन ठिकाणी तटबंदीचे क्षीण अवशेष आणि प्रासाद म्हणू हवं तर, त्याचे उद्‌ध्वस्त अवशेष. पठार तसं आकारानं विस्तृत. अक्षरशः सर्व बाजूंनी तासलेला कडा. पठारावरच असणाऱ्या बालेकिल्ल्याचे अगदी मोजके अवशेष. पण या साऱ्यांच्या पलीकडं चोहोबाजूंनी पठार फिरताना त्र्यंबकेश्‍वराच्या डोंगररांगेचं दिसणारं विलोभनीय दृश्‍य अगदी खासच. निरगुड पाड्याच्या बाजूच्या प्रचंड कड्याला ‘स्कॉटिश कडा’ म्हणतात. अर्थात ही अलीकडची ओळख. 

खरंतर या दुर्गाची बांधणी त्र्यंबकेश्‍वराच्या डोंगररांगेमधून जाणाऱ्या आणि सध्याच्या गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली. तसा अनेक शतकांचा या दुर्गाचा इतिहास मौन बाळगूनच आहे. त्र्यंबकेश्‍वराच्या डोंगररांगेतील दुर्गांची बांधणी पाहिली, तर या दुर्गाचा इतिहास यादवपूर्व कालाच्याही आधीपासून सुरू होतो. खरंतर कोरलेल्या कातळ पायऱ्या, कातळांच्या पोटातले खोदीव मार्ग, गुहास्थापत्य, कातळाद्वारे अशी स्थापत्यशैली सातवाहन ते चालुक्‍य या काळात प्रामुख्याने बहरली होती. अर्थात यातल्या काही किल्ल्यांचे यादव काळातले ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. ब्रह्मगिरी किंवा त्र्यंबकगडाचे संदर्भ त्यामानानं जास्त सापडतात. ब्रह्मगिरी किंवा त्र्यंबकगड शहाजीराजांनी १६२९ मध्ये ताब्यात घेतला. परंतु निजामशाहीच्या पतनानंतर १६३६ मध्ये तो मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे शिवाजी महाराजांनी मोरोपंतांकरवी स्वराज्यात आणला. खरं तर ब्रह्मगिरी किल्ल्याचा एक भाग म्हणजेच ‘दुर्गभांडार’. पण ऐतिहासिक कागदपत्रांत त्याचा वेगळा दुर्ग अशा नोंदी आढळतात. सन १७५२ मध्ये त्र्यंबकजी प्रभूंनी पेशवाईमध्ये मराठी सत्तेच्या अमलाखाली आणल्याचे उल्लेख आढळतात. सन १८१८ मध्ये मराठी साम्राज्याच्या पतनानंतर इंग्रजांच्या सत्तेखाली गेला. त्याची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि दुर्गमता यामुळं येथे शस्त्रं आणि दारूगोळ्याचा साठा केला जायचा. 

त्र्यंबकेश्‍वर डोंगररांगेतील हे दुर्ग किमान तीन दशकांहूनही अधिक काळ पाहतोय. एक बह्मगिरी सोडला, तर फारशी वर्दळ नसायची. गोदावरीच्या उगमापुढं दुर्गभांडारला जाताना भीती वाटायची. कातळाच्या पोटातल्या पायरी वाटेनं त्र्यंबकेश्‍वराच्या बाजूच्या कड्याकडं सरपटतसुद्धा बाहेर पडणं मुश्‍कील व्हायचं, इतकी माती साचलेली असायची. हरिहरगडावरून सूर्यास्त पाहायचा मोह तर आवरायचा नाही. पण संधिप्रकाशात उतराईची कातळवाट उतरून अंधाराच्या साथीनं डोंगरवाटेनं निरगुड पाड्यापर्यंत पोचणं हे एक दिव्य असायचं. हरिहरगड, मग निरगुड पाड्यापासून असो, पायथ्याच्या हर्षेवाडीकडून असो किंवा ब्रह्मगिरीच्या मजल-दरमजलीच्या डोंगरवाटेने असो; तो एक साहसी आव्हान वाटायचा. अजूनही हरिहरच्या पायऱ्या चढताना आणि उतरताना त्याच्या दुर्गमतेचा तोच पूज्यभाव मनात असतो. कोरून काढलेल्या दगडी खोबणींचा आणि दांड्यांचा आधार आजही घ्यावासाच वाटतो. एक हात आधारासाठी कातळकड्यावर विसावलेलाच असावा असं वाटतं. त्याच्या अंगाखांद्यावर बागडताना त्याला घट्ट धरून ठेवावंसं वाटतं. त्याच्या अफाटपणात आपली मर्यादा पदोपदी जाणवत रहाते. त्याच्या उत्तुंगतेत आणि दुर्गमतेतच दुर्गचढाईचा आकाशभराचा आनंद आणि रोमांच दडलेला आहे. वडिलांच्या खांद्यावर बसून त्यांच्या हाताला, डोक्‍याला घट्ट धरून हे जग पाहताना जो आनंद असतो तोच आनंद दुर्गांच्या अंगाखांद्यावरून-माथ्यावरून हा महाराष्ट्र पाहताना असतो. 

हे दुर्गच आपल्याला इतक्‍या उंचीवर नेतात आणि महाराष्ट्रभूचं हे अफाट रूप दाखवतात. दुर्गांमुळंच आपण उंच होतो हे भान प्रत्येकानं ठेवायला हवं इतकंच.

संबंधित बातम्या