सायबरबुलिंग

नीलांबरी जोशी 
सोमवार, 29 एप्रिल 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

एका सातवीच्या मुलीनं आठवीच्या मुलाला आपलं नग्न छायाचित्र शेअर केलं. त्यानंतर तो धमक्‍या देत असल्यामुळं ती तणावाखाली होती. एका संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मुलाच्या शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबत सांगितलं आणि मुलाकडून सर्व छायाचित्रं घेतली. आपले अनुभव इतरांना सांगून जनजागृती करण्याची शिक्षा या मुलाला देण्यात आली. दुसरा अनुभव म्हणजे, मुंबईमध्ये स्थलांतरित झालेला एक मुलगा नव्यानं शाळेत दाखल झाला. हा मुलगा बुटका, चष्मा असलेला होता. शाळेतील आठ ते दहा मुलांच्या गटानं या मुलाला लक्ष्य करायला सुरुवात केली. त्याच्या नावानं फेक अकाऊंट सोशल मीडियावर सुरू केलं. त्यांच्यासह इतर मुलांनी त्याच्यावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया पोस्ट केल्या. त्यातून हा मुलगा तणावात गेला... नुकत्याच एका वृत्तपत्रात ही बातमी झळकली होती. या प्रकाराचं नाव आहे ‘सायबरबुलिंग.!' सर्व वयोगटातल्या लोकांना ‘सायबरबुलिंग'ला तोंड द्यावं लागू शकतं. पण मुलं आणि टीनएजर्स यांच्यामध्ये हा प्रकार सर्वाधिक चालतो. 

इंटरनेटवरच्या किंवा स्मार्टफोनवरच्या कोणत्याही डिजिटल संवादात कोणत्याही प्रकारचा केलेला छळ म्हणजे सायबरबुलिंग. इमेल, इन्स्टंट मेसेजेस, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरच्या कॉमेंट्‌स, वेबसाइट किंवा ब्लॉगवरच्या पोस्ट्‌स, युट्यूबवरचे व्हिडिओज या सर्व ठिकाणांहून सायबरबुलिंग होऊ शकतं. 

निरनिराळ्या देशांनुसार शाळा/कॉलेजमधली किती मुलं इंटरनेट किंवा स्मार्टफोन्स वापरतात याची आकडेवारी बदलत राहाते. पण जगभरात सर्वसाधारणपणे शहरी भागातली १२ ते १७ वयोगटातली ९५ टक्के मुलं इंटरनेट वापरतात. ६८ टक्के मुलं शाळेतही इंटरनेट वापरतात. भारतात ६३ टक्के मुलं दिवसात ४ ते ७ तास स्मार्टफोन वापरतात. कॉलेजच्या वयातली मुलं दिवसातून १५० वेळा स्मार्टफोनवर काय आलं आहे ते चेक करतात. सोशल नेटवर्किंग साईट्‌स वापरणाऱ्यांपैकी ७३ टक्के जण फेसबुक वापरतात. त्यामुळे सायबरबुलिंगसाठी फेसबुक, मायस्पेस, लिंक्‍डइन, युट्यूबसारख्या व्हिडिओ साइट्‌स, गेमिंग साइट्‌स, ब्लॉग्ज असा सोशल मीडिया सर्वांत जास्त प्रमाणात वापरला जातो. 

बुलिंग हा प्रकार अजिबात नवीन नाही. एखाद्यावर तो लठ्ठ, कुरूप, भित्रा, मूर्ख, गबाळा, विचित्र, अयशस्वी असल्याचे आरोप करून त्याला एकटं पाडणं, त्याला त्रास देणं, त्याचं मानसिक खच्चीकरण करणं म्हणजे बुलिंग..! हे कठोर प्रकार विद्यार्थ्यांच्या किंवा तरुणांच्या बाबतीत पूर्वापार चालत आले आहेत. सायबरबुलिंग हा प्रकार मात्र गेल्या काही दशकातलाच आहे. त्याबद्दल माहिती, कारणं, परिणाम, उपाय हे सगळं खुद्द समाजशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासाठीही बऱ्यापैकी अंधारातच आहेत. या प्रकाराचं वाढतं प्रमाण पाहता त्याबद्दल जनजागृती खूप आवश्‍यक आहे. 

बुलिंग आणि सायबरबुलिंग यात काही गोष्टी समान आहेत. उदाहरणार्थ, दोन्ही प्रकारात आक्रमकतेची भूमिका मोठी असते. दोन्ही प्रकारांत व्यक्तीचा छळ करणं वारंवार घडत राहतं. लिंग, जात, आर्थिक पातळी, वर्ण, वंश, धर्म, समाज, संस्कृती, शारीरिक क्षमता अशा कोणत्याही पातळीवर असमतोल असलेल्या दोन व्यक्तींमध्येच असा छळ केला जातो. सायबरबुलिंग या प्रकारामध्ये हा असमतोल इतर गोष्टींबरोबरच ‘तंत्रज्ञानविषयक ज्ञान' याबाबतीतही असू शकतो. 

या दोन्ही प्रकारातले फरक पाहायला गेलं तर पहिला फरक म्हणजे सायबरबुलिंग अनामिकपणे होऊ शकतं. या प्रकारात आपल्या खऱ्या नावांऐवजी टोपणनावं घेऊन इमेल लिहिणं, सोशल नेटवर्किग साइट्‌सवर खोट्या नावानं छळवणूक करणारे मेसेजेस लिहिणं हे चालत असतं. याचा परिणाम म्हणून जाड, कुरूप आणि मूर्ख आहे असे मला मेसेजेस येतात. मी खरं तर कोणाला कधी त्रास दिलेला नाही अशी तक्रार मुलं करतात. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात समोरासमोर येऊन जे बोलायचं धाडस कधीच होणार नसेल ते ती सायबरबुलिंगमध्ये सर्रास करते. सायबरबुलिंग सहन करणाऱ्या ५० टक्के जणांना आपल्याला कोण घाबरवतं आहे हेच ठाऊक नसतं. तसंच आपल्या बोलण्याचा समोरच्या माणसावर होणारा परिणाम प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळं त्याच्याबद्दल सहानुभूती किंवा आपल्या वागण्याबाबत पश्‍चात्ताप वाटणं सायबरबुलिंगमध्ये शक्‍य होत नाही. 

दुसरा फरक म्हणजे, पारंपरिक बुलिंग साधारणपणे शाळेच्या वेळांमध्ये होतं. सायबरबुलिंग मात्र शाळेला सुटी असताना रविवारी किंवा उन्हाळ्याच्या सुटीत असं कधीही म्हणजे २४x७x३६५ असं कधीही होऊ शकतं. तिसरा फरक म्हणजे पारंपरिक बुलिंगपेक्षा सायबरबुलिंगमध्ये केलेल्या कॉमेंट्‌स किंवा पोस्ट्‌स प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचू शकतात. एक भडका उडवणारी इमेल हजारो लोकांपर्यंत पोचवणं किंवा वेबसाइटवरचा मानहानिकारक मजकूर हजारो लोकांनी वाचणं हे प्रकार सहज घडतात. 

चौथा फरक म्हणजे एखाद्यानं तोंडी काहीतरी अपमानास्पद बोललं असेल तर काही काळानंतर ते विसरलं जाऊ शकतं. पण लिखित स्वरूपातली पोस्ट/कॉमेंट सर्वदूर पोचल्यामुळं ती कधी कोणत्या स्वरूपात परत समोर येईल ते कळणं अवघड असतं. पाचवा फरक म्हणजे, पारंपरिक बुलिंगमध्ये आपल्याला शारीरिक इजा केली जाईल या भीतीनं बळी जाणारा गप्प बसतो. सायबरबुलिंगमध्ये आपण पालकांना सांगितलं, तर आपलं इंटरनेट/स्मार्टफोन वापरणं/ऑनलाइन गेमिंग बंद होईल अशी भीती मुलांना वाटते. आपल्या मुलांनी सायबरबुलिंगला तोंड दिल्याचं रिपोर्टिंग भारतात ३७ टक्के पालक करतात. प्रत्यक्ष प्रमाण याहून कितीतरी जास्त असू शकतं. 

वयाचा विचार केला, तर माध्यमिक शाळेतल्या मुलांना याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ, ९ ते ११ वयाच्या मुलांना ६ ते ८ वयाच्या मुलांपेक्षा सायबरबुलिंगचा त्रास जास्त दिला जातो. दहावी-अकरावीतल्या मुलांना सर्वांत जास्त प्रमाणात हा त्रास सतावतो. मुलं थेटपणे आक्रमक होऊन सायबरबुलिंग करतात. मुली मात्र त्या तुलनेत पडद्यामागं राहणं पसंत करतात. मुलींचं सायबरबुलिंग मुलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात होतं. 

सायबरबुलिंगचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, कॉम्प्युटर/स्मार्टफोनवरून इमेल्स किंवा फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम अशा प्रकारच्या कोणत्याही सोशल नेटवर्किंग साईटवरून ‘फ्लेमिंग' म्हणजे ऑनलाइन शाब्दिक मारामाऱ्या करणं, ‘हरॅसमेंट' म्हणजे एखाद्याला सतत धमकीवजा त्रासदायक मेसेज पाठवणं, ‘आऊटिंग अँड ट्रिकरी' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याची/तिची वैयक्तिक, खासगी माहिती मिळवून शेअर करणं, ‘एक्‍सक्‍लुजन' म्हणजे एकटं पाडण्याच्या हेतूनं मित्रयादीतून/ग्रुपमधून एखाद्या व्यक्तीला वगळणं/ब्लॉक करणं, ‘इमपर्सोनेशन' म्हणजे एखादी व्यक्ती आपणच असल्याचा भास निर्माण करून त्या व्यक्तीच्या नावे मेसेजेस/चुकीची/अयोग्य माहिती शेअर करत राहणं, ‘सायबरस्टॉकिंग' म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांद्वारे सतत धमकीवजा संदेश देणं आणि ‘सेक्‍सटिंग' असे सायबरबुलिंगचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ‘सेक्‍स्टिंग' हा शब्द ‘सेक्‍सी टेक्‍स्ट्‌स' यावरून रूढ झाला. सुरुवातीच्या मोबाईल्सच्या जमान्यात सूचक लैंगिक मेसेजेस इतकंच त्याचं स्वरूप होतं. स्मार्टफोनच्या जमान्यात नग्न, अर्धनग्न, लैंगिकता दर्शवणारे कामुक फोटोग्राफ्स, व्हिडिओज पाठवणं सुरू झालं. सेक्‍स्टिंगचे सूचक लैंगिकता असणारे, थेट नग्न किंवा अर्धनग्न, पूर्ण नग्न, कामुक आणि लैंगिकता थेट उघड करणारे संदेश, फोटोग्राफ्स, व्हिडिओज असे पाच प्रकार आहेत.  भारतातली ११ पेक्षा पुढच्या वयाची २१ टक्के शहरी मुलं मोबाईल फोन्स दिवसाला ७ तासांपेक्षा जास्त प्रमाणात वापरतात. त्यातल्या ‘सातजणांपैकी एक' असं सेक्‍स्टिंगचं प्रमाण आहे. यातले सेक्‍स्ट मेसेजेस पाठवणाऱ्याच्या परवानगीशिवाय पुढं पाठवण्याचं प्रमाण ८ ते १० टक्के आहे. त्यातून नंतर धमकावण्या आणि ब्लॅकमेलिंग सुरू होतं. ‘दृश्‍यम' या गाजलेल्या चित्रपटात एका मुलीच्या नकळतपणे एक टीनएजर सेक्‍स व्हिडिओ काढतो. ती जर आपल्याला लैंगिक सुखासाठी वश झाली नाही, तर तो व्हिडिओ पुढं पाठवण्याची धमकी तिला देतो. 

तसं पाहायला गेलं, तर युवावस्थेत असताना आपल्या मनातल्या भावना एकमेकांपाशी व्यक्त करण्यासाठी माध्यमांचा वापर करणं नवीन नाही. रोमॅंटिक इच्छा आणि जवळीक व्यक्त करण्यासाठी प्रेमपत्रं किंवा साध्या कॅमेऱ्यावर काढलेले फोटो एकमेकांना पाठवण्यासारखे मार्ग काही दशकांपूर्वीपर्यंत प्रचलित होते. स्मार्ट फोन्स आणि सोशल मीडियासाठीचे ऍप्स वापरून प्रत्येकजण आता रोमॅंटिक मेसेजेस, फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओज तयार करून प्रिय व्यक्तीला पाठवू शकतो. लाजऱ्याबुजऱ्या मुलांना तर यातून एक समाधान, आनंद मिळू शकतो. कित्येकजणांचा आत्मविश्‍वास वाढीला लागतो. लैंगिकतेबाबतच्या चुकीच्या कल्पना दूर होऊ शकतात. पण यासाठी सेक्‍स्टिंग मान्य केलं तरी गंमत म्हणूनही खासगी फोटोग्राफ्स सगळीकडं पाठवले जातील अशी भीती उरते. सेक्‍स्टिंग अनेकदा जवळच्या नात्यात घडतं. तिथंच त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यताही वाढत जाते. मग सेक्‍स्टिंगमुळं प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांबद्दल आनंद आणि आदर वाटणं असे मुद्दे बाजूला पडतात. याउलट, सेक्‍स्टिंग जर चुकीचं आहे असं मानलं तर मुलांच्या लैंगिकतेबाबतच्या मानसिकतेवर कायमस्वरूपी नकारात्मक परिणाम होऊ शकेल अशी भीती असते. 

सेक्‍स्टिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारात सायबरबुलिंग करणाऱ्या लोकांनी समाजाचे नीतिनियम जरी धाब्यावर बसवले असले, तरी कोणत्या शब्दांनी समोरच्या माणसावर काय परिणाम होतो त्याची या लोकांना उत्तम जाण असते. त्यांना तंत्रज्ञानाचा वापर उत्कृष्टरीत्या करता येतो. याला ‘डिजिटल कॉंपिटन्सी' म्हटलं जातं. उदाहरणार्थ, ‘अ वेनसडे' या चित्रपटात बॉंब कुठं ठेवला आहे याची माहिती देणाऱ्या माणसाचा ठावठिकाणा शोधायला एक टीनएजर याच कॉंपिटन्सीमुळं मदत करतो. पण समोरच्या माणसाचा फोटो आपल्याला हवा तसा बदलायचा किंवा खोटं प्रोफाइल तयार करायचा आणि त्यातून इतरांना छळायचं हे तीच कॉंपिटन्सी चुकीच्या पद्धतीनं वापरण्याचं उदाहरण आहे. 

सायबरबुलिंगचा अजून एक प्रकार म्हणजे सोशल नेटवर्किंग साइटवर एक पेज तयार करून एखाद्याची तिथं बदनामी करणं. त्या व्यक्तीबद्दल इतरांचं मत कलुषित करण्यासाठी तिच्या कीर्तीवर शिंतोडे उडवण्यासाठी लज्जास्पद मजकूर टाकणं. तसंच गटातल्या इतरांनाही या पेजचा निर्माता फोटोग्राफ्स, नकारात्मक कॉमेंट्‌स, अफवा, गॉसिप टाकायचं आवाहन करणं. उदाहरणार्थ, दहावीतल्या विपुल या मुलावर काही वर्गमित्रांनी मिळून ‘आय हेट विपुल' नावानं एक वेबपेज तयार केलं. तिथं विपुलबद्दल घाणेरडे जोक्‍स, कार्टून्स, गॉसिप, अफवा पोस्ट केल्या. या साइटबद्दल इशान या मित्रानं सांगेपर्यंत विपुलला काही माहितीही नव्हतं. त्यानं जेव्हा आपल्यावरचं हे पेज पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला. तो आणि त्याचं कुटुंब यांच्याबद्दल बऱ्याच वाईट कॉमेंट्‌स त्या वेबपेजवर होत्या. काही वेळा एखाद्या धार्मिक/सामाजिक ग्रुपबद्दल किंवा सेलिब्रिटीजबद्दल अशी पेजेस तयार करून त्यांचाही छळ केला जातोच. ‘अ लाइव्ह स्टोरी' या युट्यूबवरच्या ४ मिनिटांच्या शॉर्टफिल्ममध्ये एका अभिनेत्रीला सायबरबुलिंग करणाऱ्याची, ती कशी फजिती करते हे पाहायला मिळतं..!   
(सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू, परिणाम, लक्षणं आणि उपचार याबद्दल पुढच्या लेखात जाणून घेऊ.)  

संबंधित बातम्या