टिकटॉक ॲप आणि मुलं 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 27 मे 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

सलमान, सोहेल आणि आमिर हे टीनएजर्स मित्र. रात्री दिल्लीतल्या ‘इंडिया गेट’पर्यंत क्रेटा या गाडीतून ते तिघं फिरायला गेले. परत येताना सलमान गाडी चालवत होता. सोहेल त्याच्या शेजारी बसला होता. सोहेलनं तेवढ्यात एक पिस्तूल काढलं. सलमानवर रोखलं. त्यातून गोळी सुटली आणि सलमानला लागली. सोहेल आणि मागे बसलेला आमिर दोघंही जाम घाबरले. दोघं सोहेलच्या जवळच राहणाऱ्या एका नातेवाइकांच्या घरी गेले. तिथे त्यांनी रक्ताळलेले कपडे बदलले. सलमानला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेलं. पण डॉक्‍टरांनी सलमानला मृत घोषित केलं. तेव्हाच त्यांनी पोलिसांनाही कळवलं. यानंतर खुनाच्या गुन्ह्याखाली सोहेल, आमिर आणि त्यांच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली. १४ एप्रिल २०१९ रोजी भारतात घडलेली ही घटना. अशा घटना आपल्यासाठी नवीन नाहीत. पण या घटनेला एक वेगळं परिमाण आहे. ते म्हणजे, सोहेलला खरं तर सलमानवर गोळी झाडायची नव्हतीच. त्याला फक्त काहीतरी थरार, सनसनाटीपणा म्हणून सलमानवर गोळी झाडायचा आविर्भाव करून ‘टिकटॉक’वर टाकण्यासाठी व्हिडिओ काढायचा होता..! 

काय आहे हे ‘टिकटॉक’ प्रकरण? सोशल मीडियावर सेल्फी काढून शेअर करणं सोपं होतं. पण स्वत:चे व्हिडिओज काढणारं सुटसुटीत ॲप नव्हतं. ‘बाईटडान्स’ या चीनी कंपनीनं २०१६ मध्ये त्यासाठी ‘टिकटॉक’ हे ॲप चीनमध्ये सुरू केलं. वर्षभरानंतर ते ॲप जगभर पसरलं. २०१८ मध्ये १५० देशांमधले ७५ भाषांमधून पाच कोटी लोक ते ॲप वापरत होते. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये अमेरिकेत ते सर्वांत जास्त डाऊनलोड झालेलं ॲप ठरलं होतं. आज बाईटडान्स या कंपनीची व्हॅल्यू ७,८०० कोटी डॉलर्स आहे आणि जगभरात टिकटॉकचे १८.८ कोटी वापरकर्ते आहेत. त्यातले ८.८ कोटी म्हणजे सुमारे ४८ टक्के वापरकर्ते भारतातले आहेत. महत्त्वाचं म्हणजे जानेवारी २०१८ मध्ये भारतात एकूण वापरकर्त्यांपैकी याचे फक्त ९.५ टक्के वापरकर्ते होते. एका वर्षात याचं भारतीयांना, विशेषत: युवा वर्गाला किती झपाट्यानं व्यसन लागलं, त्याची हे आकडे खात्रीच पटवतात. 

‘टिकटॉक’ या ॲपमध्ये १५ सेकंदांचे स्वत:चे व्हिडिओज काढता येतात. सेल्फी फोटोमध्ये जसं स्वत:ची प्रतिमा हवी तशी बदलता येते तसंच ‘टिकटॉक’मध्ये आपला व्हिडिओ मनासारखा होईपर्यंत बदलता येतो. मग तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करता येतो. याचं व्यसन कसं लागतं याचं हे एक उदाहरण. भारतात ११ वीच्या वर्गातल्या एका मुलीनं बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल झाल्यावर मित्राच्या मोबाईल फोनवरचं ‘टिकटॉक’ वापरून व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ तिनं वर्गातल्या मुलामुलींबरोबर शेअर केला. तिचं त्यातल्या खूप मित्रमैत्रिणींनी कौतुक केलं. मग ती दिवसभर व्हिडिओज काढून अपलोड करायला लागली. आपल्या मनाप्रमाणे व्हिडिओ चांगला तयार होईपर्यंत त्यात बदल करणं, हे काम तिचा पुष्कळ वेळ खात होतं. याचा परिणाम म्हणून मग आईशी आणि बहिणीशी फोनवर बोलणं बंद झालं. आपली मोठी बहीण आपलं ‘टिकटॉक’ अकाऊंट डिलीट करेल या भीतीनं तिनं वेगवेगळ्या नावांनी अकाऊंट्‌स सुरू केली. ती व्हॉलिबॉल चांगला खेळायची. पण ते खेळणंही तिनं थांबवलं. अभ्यासातले तिचे गुणही कमालीचे कमी व्हायला लागले. त्यानंतर ‘टिकटॉक’ ॲप वापरायचं प्रमाण कमी करण्यासाठी तिला चक्क मानसोपचार घ्यावे लागले. त्यात झोपण्यापूर्वी किमान एक तास ते ॲप वापरायला तिला बंदी केली. हळूहळू या ॲपचं तिला लागलेलं व्यसन कमी झालं. पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. काही महिन्यांपूर्वी २३ वर्षांच्या एका मुलानं रेल्वेतून उडी मारून चक्क जीव दिला. कारण? ‘टिकटॉक’च्या एका व्हिडिओत त्यानं बायकांचे कपडे घातले होते. त्यावरून होणारं मित्रांचं ट्रोलिंग त्याला सहन झालं नव्हतं. 

अशा परिणामांना घाबरून ३ एप्रिल २०१९ रोजी टिकटॉकवर बंदी आणावी आणावी, असा अर्ज मद्रासच्या हायकोर्टात दाखल झाला. ३ एप्रिलला मद्रास हायकोर्टानं केंद्र सरकारतर्फे हे ॲप डाऊनलोड करायला बंदी आणावी, असा आदेश दिला. त्याच दिवशी हायकोर्टानं ॲपच्या गुगल आणि ॲपलनं आपापल्या मोबाईल स्टोअर्सवरून या ॲपच्या डाऊनलोडला बंदी आणावी, तसंच हे वापरून तयार केलेले व्हिडिओज इतर माध्यमांनी वापरायला बंदी आणावी असा आदेश दिला. १७ एप्रिलला गुगल आणि ॲपलनं आपापल्या स्टोअर्सवरून ते ॲप डाऊनलोड करायला बंदी घातली. यानंतर ‘टिकटॉक’ बनवणाऱ्या ‘बाईटडान्स’ या चिनी कंपनीनं सुप्रिम कोर्टाकडे धाव घेतली. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी भारतीय जो कंटेंट तयार करत आहेत त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या बंदीनं गदा येते, असं ‘बाईटडान्स’ या कंपनीचं म्हणणं होतं. हा मुद्दा ग्राह्य धरून २५ एप्रिल २०१९ ला सुप्रिम कोर्टानं ‘टिकटॉक’वरची बंदी काढली आहे. 

इंटरनेटवरच्या अशा ॲपच्या सुरक्षा धोरणांबाबत भारतात ठोस कायदे नाहीत. त्यामुळे भविष्यात भारताची याबाबतीतली धोरणं काय असतील, यावरही या बंदी प्रकरणानंतर प्रश्‍नचिन्ह उमटली आहेत. अमेरिकेत जसा ‘चिल्ड्रेन्स ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्‍शन ॲक्‍ट’ आहे, तसा भारतात आणावा का यावरही विचारविनिमय व्हावा, असा कोर्टानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडला आहे. ‘टिकटॉक’वर बंदी घालण्यावरून गदारोळ झालेला भारत हा पहिला देश नाही. बांगलादेशात ‘टिकटॉक’वर बंदी आहे. तरुणाईवर नकारात्मक परिणाम होतो आहे, या कारणानं इंडोनेशियामध्येही काही काळ या ॲपवर बंदी आली होती. ‘बाईटडान्स’नं आपल्या ॲपमध्ये काही बदल केल्यानंतर ती बंदी इंडोनेशियन सरकारनं उठवली.

पण मुळात टिकटॉकवर बंदी आणावी, असं आवाहन निरनिराळे देश का करतात? या किंवा अशा प्रकारच्या ॲपचे मुलांवर काय परिणाम होतात ते जाणून घ्यायला हवं. या ॲपनं तयार झालेले व्हिडिओ पाहिले, तर वर्गातून व्हिडिओ पोस्ट करणारी शाळेच्या गणवेशातली मुलं यात जास्त दिसतात. त्यामुळं मुलांचा पोर्नोग्राफिक व्हिडीओज तयार करणं आणि बघणं याकडे ओढा वाढतो. त्यांचं अभ्यासात दुर्लक्ष सुरू होतं. गुण खालावत जातात. प्रत्यक्षातल्या मित्रमैत्रिणींपेक्षा आभासी विश्वात रमणं वाढतं. ॲपच्या वापरातून मारहाणीच्या किंवा एकमेकांचा जीव घेण्याच्या धमक्‍या देण्याचे प्रकार वाढतात. इतकंच नव्हे तर बलात्काराच्या धमक्‍याही वाढतात. उदाहरणार्थ डिसेंबर २०१८ या एकाच महिन्यात तामिळनाडूतल्या १०४ हेल्पलाईन्स असलेल्या एका समुपदेशन केंद्राकडे ३६ कॉल्स टिकटॉक बुलिंग होतंय यासाठी आले होते. 

या ॲपचा आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ शकणारा परिणाम ‘बाईटडान्स’ कंपनीनं गोळा केलेल्या डेटामध्ये लपला आहे. शेती प्रधान संस्कृतीत जमिनींची मालकी हा मुद्दा सत्ता गाजवण्याच्या केंद्रस्थानी होता. तोच मुद्दा औद्योगिक युगात पोलाद हा ठरला. आज जगावर राज्य करू शकतो तो डेटा. ‘बाईटडान्स’कडे आज मुलांचं वजन, उंची, ते चष्मा वापरतात का नाही इथपासून ते कोणत्या शाळेत जातात, कोणत्या वर्गात आहेत, अशी सर्व माहिती आहे. तितकी माहिती खुद्द भारत सरकारकडेपण नाही. याच कारणानं मुलांकडून बेकायदा पद्धतीने माहिती जमा केल्याबद्दल अमेरिकेनं ‘बाईटडान्स’ला मोठा दंड ठोठावला आहे. 

‘टिकटॉक’ डाऊनलोड करताना ज्या कराराला आपण होकार देतो त्यात ‘आम्ही तुमचा डेटा थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्सना देतो’ असं लिहिलेलं आहे. या सर्व्हिस प्रोव्हायडर्समध्ये क्‍लाऊडवर डेटा साठवणं आणि इतर आयटी सर्व्हर्सही येतात. तसंच ‘आम्ही तुमची माहिती आमचे व्यावसायिक भागीदार, जाहिरातदार, विश्‍लेषक आणि सर्च इंजिन या सर्वांना देतो’ असंही या करारात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. थोडक्‍यात तुम्ही या ॲपला पुरवलेला डेटा किती ठिकाणी जातो ते तुम्हाला कधीच कळू शकणार नाही.

या डेटामुळे जाहिरातदारांचं चांगलंच फावतं आणि तोच डेटा वापरून ते आपली उत्पादनं ऑनलाइन पद्धतीत जोमानं विकतात, हा एक परिणाम आहेच. पण मुलांचे अश्‍लील व्हिडिओज हे पेडोफिलिक माणसं (लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे) आणि पोर्नोग्राफी विकणाऱ्या साईट्‌स या दोघांचं लक्ष्य ठरतं, हा परिणाम सहजी आपल्याला दिसत नाही.

वयात न आलेल्या ११ वर्षांपेक्षा लहान मुलामुलींबरोबर लैंगिक क्रियेतून आनंद मिळवणं, याला पेडोफिलिया म्हटलं जातं. पेडोफिलिया हा प्रकार सहसा पुरुषांमध्येच जास्त आढळतो. यात लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्ती सहसा लहान मुलांचे नातेवाईक किंवा कुटुंबाचे मित्र असतात. पेडोफिलियाबद्दलची आकडेवारी अंगावर काटा आणते. अमेरिकेत पाच मुलींपैकी एक आणि २० मुलांपैकी एक जण लैंगिक शोषणाचा बळी असतो. भारतात ५३% मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे हे आकडे धक्कादायक असले, तरी हे फक्त उजेडात आलेले आकडे आहेत. शरमेच्या भावनेनं अनेकजण आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांची वाच्यताही करत नाहीत! ती संख्याही प्रचंड मोठी आहे. 

पोर्नोग्राफीचेही आकडे असे धक्कादायक आहेत. आज पोर्न उद्योगाची उलाढाल ९,७०० कोटी डॉलर्सची आहे. नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन, ट्‌विटर या तीन साईट्‌सवर मिळून एका महिन्यात जितका ट्रॅफिक असतो, त्यापेक्षा जास्त ट्रॅफिक पोर्नसाईट्‌सवर असतो. इंटरनेटच्या एकूण डाऊनलोड्‌सपैकी ३५ टक्के डाऊनलोड पोर्नचं होतं. एका सर्वेक्षणानुसार ९७ टक्के किशोरवयीन मुलं पोर्नोग्राफी पाहातात. इंटरनेट पोर्नोग्राफी बघण्याचं मुलांचं सरासरी वय १४.३ आणि मुलींचं १४.८ आहे. आपलं मूल पोर्नोग्राफीच्या साईट्‌स बघतं, हे फक्त १२ टक्के पालकांना माहिती असतं. ९३.२ टक्के मुलं आणि ६२.१ टक्के मुलींनी १८ व्या वर्षाच्या आधी पोर्नोग्राफी पाहिलेली असते. 

टिकटॉकच्या ‘बाईटडान्स’सारखी पोर्नमध्ये ‘माईंडगीक’ ही लक्‍झेंबर्ग शहरातली कंपनी वैश्‍विक पातळीवर इंटरनेट पोर्नोग्राफीमध्ये अग्रेसर आहे. अनेक पोर्न वेबसाईट्‌स ‘माईंडगीक’ चालवते. तसंच प्रौढांसाठी फिल्म तयार करणाऱ्या अनेक कंपन्या ‘माईंडगीक’च्या मालकीच्या आहेत. जगात इंटरनेटचा सर्वांत जास्त वापर या कंपनीमार्फत होतो. 

सरकारनं तरुण आणि लहान मुलांसाठी इंटरनेट वापरण्याचे योग्य ते कायदे करणं, इंटरनेट सुरक्षितपणे वापरणं या विषयावर शाळा-कॉलेजेसपासून प्रशिक्षण देणं आणि इंटरनेट कंपन्यांनी स्वत:चा फायदा बघण्यापलीकडे जाऊन मुलांच्या भवितव्याचा विचार करणं हे महत्त्वाचे उपाय या समस्येवर आहेत. अखेरीस आपण आपल्या मुलांना कसं वागवतो, यावर समाजाचा पाया आणि आत्मा ठरतो हे विसरून चालणार नाही.

संबंधित बातम्या