सोशल मीडिया आणि तुलना 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 17 जून 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

कितीतरी दिवस झाले. कोणाला भेटणंच झालं नाही.. असा विचार करून लीनानं जवळच्या नातेवाइकांना जेवायला बोलवायचा घाट घातला. संध्याकाळी मोहन घरी आल्यावर तिनं त्याला तो प्लॅन सांगितला. जेवायला कोणाकोणाला बोलवायचं, दोघांच्या नोकऱ्या असल्यानं वीकएंडलाच बरं पडेल, मेन्यू काय करूया, बाहेरून काय आणावं लागेल... अशा त्यांच्या गप्पाही जेवणाच्या टेबलवर रंगल्या. 

ठरल्या दिवशी संध्याकाळी नातेवाईक यायला सुरुवात झाली. मोरपिशी रंगाची साडी, लांबसडक वेणीवर मोगऱ्याचा गजरा अशा वेशात लीना सुरेख दिसत होती. येणाऱ्याजाणाऱ्यांचं आगतस्वागत चालू होतं. लीना खुष होती. तेवढ्यात तिनं तिच्या मामेबहिणीला - मधुराला दारातून आता येताना पाहिलं आणि कुठंतरी आत धस्स झालं. साध्याच वेशात आलेली मधुरा सगळ्यांशी बोलत होती. मधुरा नुकतीच ऑफिसच्या कामानिमित्त लंडनला जाऊन आली होती. त्याबद्दल चर्चा चालू होती. पण लीनाचा मात्र मूड पार गेला होता. 

लहानपणापासून तिच्या मनात मधुराबरोबर कायम तुलना चालायची. आत्ताही तिला मधुराची परदेशवारी सलत होती. पण मधुरानं त्याआधी गेली तीन वर्षं कंपनीत अक्षरशः दिवसरात्र केलेली मेहनत मात्र लीनाच्या लक्षात येत नव्हती. मधुराच्या आईला झालेला अल्झायमर, नवरा दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेल्यावर एकटीनं मुलगी आणि आई यांची तिनं सांभाळलेली जबाबदारी, लंडनला जाऊन आल्यानंतर ऑफिसमध्ये तिच्याकडून वाढलेल्या अपेक्षा हे सगळं लीनाला अजिबात दिसत नव्हतं. तिच्या मनात फक्त आपण पाच वर्षं नोकरी करूनही आपल्याला परदेशात जायची संधी मिळाली नाही इतकीच तुलना वारंवार उमटत होती. 

मित्र, नातेवाईक, ऑफिसमधला एखादा सहकारी अशा कोणाच्यातरी बाबत आपल्या प्रत्येकाच्या मनात अशी तुलना उमटते. तो किंवा ती आपल्याला दुरून दुरूनसुद्धा नकोसे वाटतात. सहसा याचं कारण आपल्या मनात त्याच्या/तिच्याबरोबर नेणिवेत चाललेली तुलना हेच असतं. 

सोशल मीडिया या तुलनेला खतपाणी घालत असतो. सकाळी ऑफिसला जाताना कंपनीच्या गाडीत, सिनेमाची तिकिटं काढताना किंवा बॅंकेसमोरच्या अशा कोणत्याही रांगेत उभं असताना, जेवताना, समोरच्या माणसाशी बोलत असताना, मीटींगच्यामधे आणि रात्री दोन वाजता जाग आल्यावर आपण सोशल मीडिया नजरेखालून घालतो. मग फेसबुकवर लॉग इन केल्यावर आपल्याला कोणाचं तरी प्रमोशन, कोणाची तरी ॲनिव्हर्सरी, नव्यानं घेतलेलं ऑफिस, युरोपला साजरी केलेली सुटी, विकत घेतलेली होंडा सिटी, मिळालेलं पारितोषिक अशा चमकदार गोष्टी दिसतात. आपण यातलं काहीच मिळवलं नाही असं वाटून आपण मनातून खट्टू होतो.

फेसबुक सोडून इतर ठिकाणी जावं तर ट्‌विटरवर कोणीतरी नवीन जॉबबद्दल ट्‌विट केलेलं असतं (तुमच्या नोकरीबाबत मनात साशंकता असते), तर इन्स्टाग्रामवरच्या फोटोत कोणीतरी कमनीय बांध्याची तरुणी सॅलड खाताना दिसते (तुमचं २ किलो वाढलेलं वजन सकाळीच वजनकाट्यानं दाखवलेलं असतं), कोणीतरी आपल्या मैत्रिणीबरोबर गोव्याला गेलेलं दिसतं (नेमकं तेव्हाच तुमचं मात्र गर्लफ्रेंडशी भांडण झालेलं असतं). हे तर झालंच, पण ट्‌विटरवर कोणाला किती फॉलोअर्स आहेत, कोणाची लिंक्‍डइन कनेक्‍शन्स किती आहेत, फेसबुक पोस्टला कोणाला किती लाईक्‍स मिळाले, इन्स्टाग्रामवरच्या फोटोला किती हार्टस मिळाले यावरूनही आपण तुलना करतो. 

या तुलनेतली गंमत म्हणजे एकतर आपण तुलना करताना ती दरवेळेला हेतुपूर्वक आणि योजनाबद्धपणे करतो असंही नाही. प्रतिक्षिप्तपणे नेणिवेत तुलना होतच असते. दुसरं म्हणजे, आपल्याला ज्या गोष्टींचं महत्त्व वाटतं - उदाहरणार्थ, आपलं दिसणं, नातेसंबंध, आर्थिक स्थिती, व्यावसायिक यश - त्याच गोष्टींबाबत मनात तुलना उमटते. या न्यायानं शिक्षणक्षेत्रातल्या माणसाला सहकाऱ्याला पीएच.डी. मिळाल्याचा त्रास होतो. इतरांसाठी ते फार महत्त्वाचं नसतं. तसंच तुम्हाला जर स्वतः लठ्ठ असण्याचा न्यूनगंड असेल, तर रस्त्यानं चालताना एखादा वीस वर्षांचा मुलगा जॉगिंग करताना दिसल्यावर त्रास होतो. आपण कसे बेढब आहोत, असाच पहिला विचार मनात येतो. तरीही या तुलनेचा त्रास तुलनेनं जरा कमी होतो. तुमचा सहकारी जर सगळं सांभाळून व्यायाम करत असेल, तर मात्र मनाला जास्त त्रास होतो. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, जे आपल्यासारख्या कोणत्याही पातळीवर आहेत असं वाटत असतं त्यांच्याशीच तुलना करायचा मोह होतो. त्यामुळं आपण सहसा शाहरुख खान किंवा रतन टाटा यांच्याशी तुलना करायला जात नाही किंवा रस्त्यावरच्या भिकाऱ्याशी तुलना करत नाही. कुटुंबातले सदस्य, मित्र, सहकारी, शेजारी यांच्याशीच तुलना होते. 

मात्र सोशल मीडिया तर एक पाऊल पुढं जाऊन कधीही न पाहिलेल्या, अनोळखी लोकांशी तुलना करायला आपल्याला भाग पाडतो. एखाद्याचं प्रोफाइल पेज आपण पाहतो. ती व्यक्ती अजिबात ओळखीची नसते. पण आपण ते प्रोफाइल पाहून आपण कसे दिसतो, आपण आयुष्यात कुठं पोचलो आहोत, आपल्या व्यक्तिमत्त्वात काय ट्रेट्‌स आहेत याची चाचपणी करायला लागतो. इतरवेळी आपण अगदी तर्कनिष्ठ असलो आणि सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून वागत असलो, तरी अशावेळी सगळी तर्कशक्ती बाजूला पडते. या सगळ्यांसाठी १० मिनिटं फेसबुकवर घालवून पुढचे १० तास फक्त तुलना आणि नंतर अपरिहार्यपणे येणारं नैराश्‍य सुरू होतं. 

बॅंकेत काम करणाऱ्या आणि स्वभावानं समजूतदार असणाऱ्या राधिकाचं उदाहरण याबाबत खूप बोलकं आहे. राधिकाची बहीण आणि चुलतभाऊ यांनी ‘तुला फेसबुक आवडेल’ अशी तिला ग्वाही दिली. मग राधिकानं २००९ मध्ये फेसबुक अकाऊंट उघडलं. सुरुवातीला तिला फेसबुकवर बरंही वाटलं. जुने मित्रमैत्रिणी परत एकदा ऑनलाइन भेटले. पण वयाच्या तिशीत असलेल्या तिच्या मित्रमैत्रिणींच्या पेजवर साधारण एकच विषय असायचा; तो म्हणजे त्यांची मुलं! राधिकालाही लहान मुलं खूप आवडायची. पण तिला मूल होऊ शकणार नाही, असं डॉक्‍टरांनी सांगितलं होतं. या गोष्टीचा तिला त्रास व्हायला लागला. सोशल मीडियावर तिला सतत लहान मुलांना सुटीला, शाळेत, पाळणाघरात घेऊन जाणारे मित्रमैत्रिणी आणि इतरजण दिसायचे. तिच्या मनात त्यांच्याशी तुलना करून आपल्याला मूल नाही याची निराशा वाढायला लागली. त्यावर तिनं उपाय म्हणून प्रत्यक्षातल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि फेसबुकवरच्या निवडक मित्रमैत्रिणींना आपलं दुःख सांगितलं. त्यांनी तिला भेटून किंवा फोन करून खूप आधार दिला. त्यांची मुलं राधिकाला आपलीशी वाटायला लागली. तिचं दुःख कमी व्हायला यामुळं मदत झाली. 

सोशल मीडियाच्या तुलनेच्या जंजाळात टीनएजर्स जास्त अडकतात. यालाही विशिष्ट कारणं आहेत. आपल्याला महत्त्व दिलं जातंय किंवा आपल्याला सकारात्मक वाटेल असं संभाषण सुरू आहे यामुळं टीनएजर्सच्या मेंदूतले काही भाग प्रौढांच्या तुलनेत जास्त प्रमाणात उत्तेजित होतात. डोपामाईन या मेंदूतल्या रसायन स्रवण्याचं प्रमाण उत्तेजित झाल्यानं वाढत जातं. त्यानंतर एकदा छान वाटल्यानंतर पुन्हापुन्हा छान वाटावं याची मेंदूला सवय लागते. त्यासाठी वारंवार सोशल मीडियावरचे अपडेट्‌स तपासले जातात.

हे सगळं का होतं हे तपासलं, तर ‘हायलाईट रील’ हे महत्त्वाचं कारण आहे. माणसं सोशल मीडियावर त्यांच्यातले फक्त चांगले, उत्तमोत्तम पैलूच दाखवत असतात. उदाहरणार्थ, मी पॅरिसला पोचलो अशा पोस्ट्‌स आपल्याला दिसतात. पण जाताना विमानाला १५ तास झालेला उशीर किंवा त्या ट्रीपसाठी एखाद्यानं वर्षभर केलेले कष्ट आपल्याला दिसत नाहीत. स्टीअर्स या ह्यूस्टनमधल्या मानसशास्त्रज्ञ महिलेनं या प्रकाराला ‘हायलाईट रील’ असं नाव दिलं आहे. सोशल मीडियावर आपल्यासमोर अनेकजणांच्या आयुष्यातला एक तुकडा म्हणजे ‘हायलाईट रील’ समोर येतो. इतरांच्या अशा ‘हायलाईट रील’शी आपण सतत तुलना करत असतो. त्यातून आपल्याला समाधान वाटणं बंद होतं. आपला आपल्याच मनाशी, विचारांशी कायम झगडा चालू होतो. 

असं असलं तरी सोशल मीडियाच्या जगातच आपल्याला वावरायचं आहे. त्यामुळं यावर काही उपाय आहे का नाही असा प्रश्‍न सगळ्यांनाच पडतो. निरनिराळे मानसशास्त्रज्ञ यावर उपाय सुचवत असतात. 

एक तर पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सौंदर्य या सगळ्या गोष्टी कोणाकडं तरी कमीजास्त असतात. त्यामुळं हेवा वाटणं साहजिक आहे. ‘स्मायलिंग डिप्रेशन’ हा प्रकार टाळणं हा यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे. ‘स्मायलिंग डिप्रेशन’ म्हणजे आपण वरवर आनंदी, हसरे सकारात्मक भासतो. पण तुलनेमुळं मनात एक निराशा कायम असते. हा हसरा चेहरा ठेवायचा आणि आदर्श प्रतिमेकडं वाटचाल करायचा प्रचंड ताण आपल्याला मारक ठरतो. ते टाळा. तुलना वाटते हे मान्य करा. तुलनेतून जर अतिताण, चिंता, अस्वस्थता, नैराश्‍य इकडं मनाचा कल झुकत असेल, तर आपल्याला त्यातून बाहेर पडायची गरज आहे हे लक्षात घ्या. 

अजून एक उपाय म्हणजे तुमच्या सोशल मीडियाच्या वापरावर मर्यादा आणा. स्क्रीनवर अनोळखी माणसांच्या आयुष्यात काय चाललं आहे ते निरर्थकपणे पाहात बसू नका. त्याऐवजी तिथं किंवा प्रत्यक्षात भावनिक पातळीवर तुम्हाला मदत करतील असे मित्रमैत्रिणी जोडायचा प्रयत्न करा. इतरांशी तुलना करून आपल्यातल्या उणिवा शोधणं याला ‘डाऊनवर्ड कंपॅरिझन’ म्हणतात. उदाहरणार्थ, फेसबुकवरचं चकचकीत घर पाहून आपल्या घरातल्या खोल्या इतक्‍या आवरलेल्या कधीच का नसतात असा विचार करणं. त्याऐवजी ‘अपवर्ड कंपॅरिझन’ करा. आपल्याहून चांगले मार्क मिळवणाऱ्यांशी तुलना करून काही मुलांच्या मनात चढाओढ सुरू होते. त्यांना पुढच्या परीक्षेत चांगले मार्क्‍स मिळतात. ही झाली ‘अपवर्ड कंपॅरिझन.’ ‘अपवर्ड’ तुलनेत आपण प्रेरित होऊन जास्त प्रयत्न करायला लागतो. स्वतःच्या क्षमता वाढवतो. अपवर्ड आणि डाऊनवर्ड कंपॅरिझन्स आपण मिळालेल्या माहितीवर कशी मानसिक प्रक्रिया करतो यावर अवलंबून असते. ‘मी आणि ती एकाच कॉलेजमध्ये होतो आणि ती कुठं पोचली!’ असा विचार केला तर स्वतःची प्रगती साधता येऊ शकते. पण ‘ती जितकी सुंदर आहे तितकी मी कधीच होऊ शकणार नाही’ हे डाऊनवर्ड कंपॅरिझन आहे. फेसबुकवरसुद्धा इतरांबद्दल तुलना आणि शत्रुत्व वाटून घेण्यापेक्षा दुसऱ्याचं कौतुक करा. त्यांच्या यशानं आनंदी व्हायला शिका. ते स्वतःच्या उन्नतीसाठी उपयोगी पडतं. 

तसंच स्वतःची तुलना स्वतःशीच करा. मॅरेथॉनमध्ये पहिला आलेला खेळाडू मागच्यावेळेच्या आपल्या खेळण्याशी तुलना करून पुढच्यावेळेला जास्त चांगलं यश मिळवू शकतो. दुसऱ्याकडं पाहात पाहात तो स्पर्धा पुरी करू शकणार नाही; जिंकणं तर दूरची गोष्ट आहे. सर्वांच्याच मनात तुलना येतेच. खरी आनंदी माणसं त्यासाठी स्वतःमध्ये आतून बदल घडवतात. त्या सेल्फ एस्टीमवर तुलनेचा नकारात्मक परिणाम होऊ देत नाही. या जगात तुम्ही एकमेव आहात हे विसरू नका. इतरांचं उत्तम व्हर्जन होण्यापेक्षा स्वतःचं उत्तम व्हर्जन व्हा.    

संबंधित बातम्या