सोशल मीडिया आणि झोप (भाग १)

नीलांबरी जोशी 
सोमवार, 1 जुलै 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

तुम्हाला दीर्घ आरोग्य लाभावं यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन उपचारपद्धत शोधून काढली आहे. त्यामुळं तुमची स्मरणशक्ती वाढते, तुम्ही जास्त सृजनशील होता. तजेलदार दिसायला लागता. सडपातळ राहाता आणि तुमची जंकफूड खाण्याची तीव्र इच्छा कमी होते. तुम्हाला कॅन्सर किंवा स्मृतीभ्रंशाचा विकार होण्यापासून ही पद्धत वाचवू शकते. तुम्हाला सर्दी किंवा ताप होणार नाही याचीही काळजी ही पद्धत घेते. तसंच तुम्हाला हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. मधुमेहाचा धोका मंदावतो हे वेगळं सांगायला नकोच. तुम्हाला या उपचारांमुळं आनंदी वाटेल. चिंता आणि निराशेचं प्रमाण कमी होईल. तुम्हाला या उपचारांमध्ये रस आहे का?

ही जाहिरात कोणत्याही चमत्काराची किंवा सर्व काही बरं करणाऱ्या एखाद्या जादुई औषधाची नाही, तर रात्रभर शांत झोप घेतल्यानं काय फायदे होतात त्याचं हे वर्णन आहे. या विधानामागचे पुरावे आजवर १७ हजार वैज्ञानिक अहवालांमध्ये गोळा झालेले आहेत. या औषधाचं प्रिस्क्रिप्शन शून्य किमतीला असलं, तरी आपण त्याचा पूर्ण डोस घेणं अनेकदा टाळतो आणि त्याचे भयंकर परिणाम सहन करतो, असं ‘व्हाय वुई स्लीप’ या पुस्तकाचा लेखक मॅथ्यू वॉकर म्हणतो.

इतके फायदे असलेली गुणकारी झोप आजच्या जमान्यात मात्र अनेकांसाठी दुर्लभ झाली आहे. वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये माणसाला किती तास रोजची झोप आवश्‍यक असते आणि प्रत्यक्षात आजच्या जगात माणसांना किती तास झोप मिळू शकते याचं प्रमाण विचार करण्याजोगं आहे. ४ ते ११ महिन्यांच्या अर्भकाला १२ ते १५ तास, १ ते २ वर्षांच्या मुलांना ११ ते १४ तास, ३ ते ५ वर्षांच्या मुलांना १० ते १३ तास, शाळेत जाणाऱ्या ६ ते १३ वर्षांच्या मुलांना ९ ते ११ तास, टीनएजर्स म्हणजे १४ ते १९ वर्षांच्या मुलांना ८ ते १० तास, २० ते ६४ या वयोगटात ७ ते ९ तास, तर ६५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांना ७ ते ८ तास झोप आवश्‍यक आहे. याची सरासरी ८ तास आहे. पण आठ तास झोप सर्वांना मिळते, असा एकही देश आज पृथ्वीतलावर नाही. उदाहरणार्थ, झोपेचं सरासरी प्रमाण जपानमध्ये ६ तास, सौदी अरेबियामध्ये ६ तास ८ मिनिटं, स्वीडनमध्ये ६ तास १० मिनिटं, भारतात ६ तास २० मिनिटं, फिलिपाईन्समध्ये ६ तास २२ मिनिटं, न्यूझीलंड ७ तास ३० मिनिटं, नेदरलॅंड्‌स ७ तास २८ मिनिटं, फिनलंड ७ तास २६ मिनिटं, ग्रेट ब्रिटन ७ तास २४ मिनिटं आहे. अपुऱ्या झोपेचं प्रमाण इंग्लंडमध्ये ६३ टक्के, सिंगापूरमध्ये ६२ टक्के, अमेरिकेत ५८ टक्के, चीनमध्ये ५३ टक्के आहे.

हेच प्रमाण भारताबाबत पाहायचं झालं, तर फारच भयानक परिस्थिती आहे. भारतातल्या ९३ टक्के लोकांना पुरेशी झोप घेता येत नाही. मुंबईतले ९५ टक्के लोक रात्री १० वाजल्यानंतरच झोपायचा विचार करू शकतात. दिल्लीत हेच प्रमाण ७४ टक्के आहे. भारतात १८ वर्षांपेक्षा लहान मुलं रात्री १० च्या आधी न झोपण्याचं प्रमाण ९० टक्के आहे. एका संस्थेनं दीड लाख लोकांवर सर्वेक्षण करून काढलेल्या निष्कर्षानुसार यापैकी ६४ टक्के लोकांनी ‘स्क्रीन टाइम’मुळं आपण पुरेसं झोपत नाहीत हे मान्य केलं आहे. ‘स्क्रीन टाइम’ याचा अर्थ आपण टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट अशा कोणत्याही उपकरणावर घालवत असलेला वेळ.

झोपेबाबत जगभरात इतकी भीषण परिस्थिती असताना ‘नेटफ्लिक्‍स’ या ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या दुनियेवर राज्य करणाऱ्या कंपनीचा संस्थापक रीड हेस्टिंग्ज काय म्हणतो ते ऐकणं तर जास्तच भयावह आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रीड हेस्टिंग्ज यानं ‘नेटफ्लिक्‍सचा स्पर्धक कोण?’ या मुलाखतकर्त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ‘ॲमेझॉन’ किंवा ‘यूट्युब’ अशा स्पर्धक कंपनीचं नाव घेतलं नाही. त्यानं आमचा स्पर्धक म्हणजे ‘माणसाची झोप’ हे उत्तर दिलं होतं. ‘काल रात्री तुम्ही नेटफ्लिक्‍स पाहिलं नसतं, तर काय केलं असतं? फिरायला गेला असता, शांतपणे विचार करत बसला असतात किंवा मित्रमैत्रिणींना भेटला असता. या सगळ्यांपेक्षा तुम्हाला नेटफ्लिक्‍स पाहणं महत्त्वाचं वाटावं असा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला तुमचा लाडका चित्रपट काहीही करून पाहायचा असतो. तो तुमचा हट्ट आम्ही पुरवतो. तुम्ही अखेरीस रात्री जागून तो चित्रपट पाहायचं ठरवता. पण तुम्हाला झोप येते आणि तुम्ही तो चित्रपट पूर्ण पाहात नाही. त्यामुळं कोणत्याही कंपन्यांपेक्षा आमची खरी स्पर्धा तुमच्या झोपेशी आहे आणि या स्पर्धेत आम्ही जिंकत चाललो आहोत,‘ असंही हेस्टिंग्ज याच मुलाखतीत पुढे म्हणाला होता. त्याचं म्हणणं खरंच आहे. ‘नेटफ्लिक्‍स’ आता प्रेक्षकांच्या संख्येच्या बाबतीत हॉलिवूडचे चित्रपट किंवा ‘ॲमेझॉन प्राइम’ला टक्कर देतंय. १९० देशांमध्ये पोचलेल्या ‘नेटफ्लिक्‍स’ची २०१८ मधील उलाढाल १,५७९ कोटी अमेरिकन डॉलर्स होती. २०२५ पर्यंत ६ हजार कोटी डॉलर्सपर्यंत ही उलाढाल जाईल असा अंदाज आहे. आज ‘नेटफ्लिक्‍स’चे जगभरात १४ कोटी सदस्य आहेत.

आपल्या वेळेनुसार, हवी ती मालिका किंवा चित्रपट पाहण्याची मुभा देणं हे नेटफ्लिक्‍सचं वैशिष्ट्य आहे. पण ७० टक्के अमेरिकन्स विशेषत: आयजनरेशनमधली मुलं एकदा नेटफ्लिक्‍स पाहायला लागली, तर एखाद्या मालिकेचे पाच भाग तरी सलग पाहिल्याशिवाय जागचे उठत नाहीत. नवीन मालिका आल्यावर त्याच दिवशी सगळेच्या सगळे भाग बघणं हा अनेकांचा छंद असतो. ‘नेटफ्लिक्‍स’च्या एकूण सदस्यांपैकी ५० टक्के जण मालिकांच्याबाबतीत हाच प्रकार अवलंबतात. उदाहरणार्थ, ‘स्ट्रेंजर थिंग्ज-२’ या मालिकेचे नऊच्या नऊ भाग आल्या दिवशी पाहणारे ३ लाख ६१ हजार लोक होते. हिंसा, सेक्‍स, साय-फाय, गुन्हेगारी किंवा राजकारणाचा खेळ अशा विषयांवर आधारलेल्या या मालिका पाहताना तरतरीत वाटायला लागतं असं अनेकजण सांगतात. मेंदूतलं डोपामाईन या रसायनाचं वाढतं प्रमाण हे त्या तरतरीतपणामागचं कारण असतं. रोजच्या आयुष्यातले ताणतणाव विसरण्यासाठी दारू किंवा ड्रग्जप्रमाणं आता बेभान होऊन ‘नेटफ्लिक्‍स’ किंवा इतर कंपन्यांच्या वेबसीरिज पाहणं हा मार्ग अनेकजण पत्करतात.

अशाच प्रकारची एक केस भारतात ऑक्‍टोबर २०१८ मध्ये सापडली होती. आपली बेरोजगारी, घरच्या माणसांची अवहेलना आणि आपल्या तुलनेत इतरांचं चांगलं चाललेलं पाहून होणारा त्रास कमी करण्यासाठी भारतातला एक तरुण रोज नेटफ्लिक्‍स पाहायचा. कित्येक तास त्या मालिका पाहून त्याच्या डोळ्यांवर ताण आला. तो सतत थकलेला असायचा. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये फरक पडला होता. आपल्याला ‘नेटफ्लिक्‍स’चं व्यसन लागलं आहे हे लक्षात आल्यावर तो बंगळूरच्या एका मानसोपचार केंद्रात दाखल झाला.

हे सगळं झालं ‘नेटफ्लिक्‍स’चं. पण सोशल मीडियाच्या ‘फेसबुक’ किंवा ‘ट्विटर’सारख्या साईट्‌सवर एकदा लॉग इन झाल्यावर तुम्ही क्‍लिक करतच राहता. समोर फोटोग्राफ्स, लेख, व्हिडिओज आणि तुमच्या पोस्टवरच्या कॉमेंट्‌स दिसतात. तुमच्या मैत्रिणीला झालेल्या बाळाचे फोटो, मेकअप न केलेले सेलेब्रिटिजचे फोटो, साल न काढता केळ्याचे काप कसे करावेत याचे व्हिडिओज असा माहितीचा/मनोरंजनाचा भडिमार चालू असतो. तुम्ही जे वाचलेलं किंवा पाहिलेलं असतं त्याबद्दल मनात विविध भावना दाटून येतात. पाहता पाहता त्या पाहण्यात जास्त रस वाटतो आणि कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन हातातून सोडवत नाही. हे दुष्टचक्र थांबतच नाही.

इंटरनेट किंवा सोशल मीडिया यांची माहिती मिळवणं आणि माहितीचे स्रोत सहज उपलब्ध असणं हे फायदेच आहेत. पण प्रत्यक्षात मात्र तुमच्यावर त्यावरून नको इतका माहितीचा भडिमार होत राहातो. अनेक वेळा ती माहिती निरुपयोगी असते. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जेव्हा झोपेची नितांत गरज असते, तेव्हा तुमच्या डोक्‍यात ही अतिरिक्त माहिती घोळत असते. याचा परिणाम म्हणजे तुम्हाला खूप उशिरापर्यंत झोप येत नाही. पहाटेचे तीन वाजलेले असतात. तुम्ही जागेच असता. स्मार्टफोनवर जर नोटिफिकेशन्स सुरू ठेवलेली असतील, तर मेसेजेसचा आवाज किंवा व्हायब्रेटर मोडच्या थरथरण्यामुळं तो बघायचा मोह होतो. रात्रभराची शांत झोप हे स्वप्नच राहतं. काही वेळात आवरून ऑफिसला जायचं असतं. उशापाशी फोन असतोच आणि फोनवर अलार्म लावलेला असतो. पुरेशी झोप न झाल्यानं त्या अलार्मला तुम्ही अनेकवेळा स्नूझ करता. मग चरफडत उठता. उठल्या उठल्या परत स्मार्टफोनवर इमेल/व्हॉट्सॲप चेक करताच! दिवस, महिने, वर्षं अशी निघून जातात. आठवड्याच्या शेवटी झोप भरून काढू असा निश्‍चय करूनही अनेकदा ते जमत नाही.

मजेचा भाग म्हणजे, आधी कोंबडी का आधी अंडं यासारखं तुम्ही ‘स्क्रीन टाइम’ जास्त वापरता म्हणून तुम्हाला झोप येत नाही, का झोप येत नाही म्हणून तुम्ही ‘स्क्रीन टाइम’ जास्त वापरता हे लक्षातच येत नाही. तुम्ही जितके जास्त जागे राहाता तितकी काहीतरी ब्राऊज करायची इच्छा वाढत जाते. झोप अपुरी असेल, तर आपल्याला सोशल मीडियावर रात्री ॲक्‍टिव्ह राहण्याचा मोह जास्त होतो. हे कॅलिफोर्निया विद्यापीठानं ७१ विद्यार्थ्यांवर केलेल्या एका सर्वेक्षणातूनही सिद्ध झालं आहे. या विद्यार्थ्यांवर काही संशोधकांनी एक आठवडाभर लक्ष ठेवलं होतं. या सर्व विद्यार्थ्यांची ८ तासाच्या तुलनेत जितके तास झोप अपुरी होत होती, तितका जास्त वेळ ते सोशल मीडियावर घालवत होते. पण केवळ रात्री झोपायच्या आधी सोशल मीडिया वापरल्यानंच झोपेचं चक्र बिघडतं असंही नाही. यासाठी पिट्‌सबर्ग विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. १९ ते ३२ वयोगटातल्या १,७८८ जणांचं त्यांनी दोन आठवडे निरीक्षण केलं. त्यापैकी निम्म्या लोकांना फक्त दिवसा सोशल मीडिया वापरायला परवानगी होती. त्यांच्या झोपेचं चक्र सोशल मीडिया अजिबात न वापरणाऱ्यांच्या तुलनेत तिप्पट जास्त प्रमाणात बिघडत गेल्याचं लक्षात आलं. म्हणजे दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळेस सोशल मीडियाचा अतिवापर झोपेच्या विकारांना आमंत्रण देतो.

जीवनाचं सौंदर्य आणि गुणवत्ता टिकवायची असेल, तर शांत झोप आवश्‍यक आहे असं ‘ॲपल’चे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्जदेखील म्हणायचे. हीच झोप कशा प्रकारे सोशल मीडिया आपल्यापासून हिरावून घेतो आहे? त्याचे परिणाम कोणकोणत्या गोष्टींवर होतात? मुळात शांत झोप म्हणजे काय? आणि यावर काही उपाय आहेत का? हे पुढच्या लेखात जाणून घेऊ.

संबंधित बातम्या