समाजमाध्यमं आणि ट्रोलिंग

नीलांबरी जोशी 
सोमवार, 29 जुलै 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

घरातला दिवाणखाना. गेली १८ वर्षं त्या घरात एकटा राहणारा तो. रात्रीची अस्वस्थ वेळ. तो काँप्युटरसमोर बसला आहे. एका वेबसाइटवरून ‘करूनच दाखव आता.. नाहीतरी तुझ्या असल्या आयुष्याला काय किंमत आहे..’ वगैरे भडिमार सुरू आहे. मग तो व्हिडिओ कॅमेरा सुरू करतो. वेबसाइटवरचे सगळे बघत असतात. तो स्वतःला गळफास लावून घेतो. तरीही सगळे बघतच असतात. त्याचा जीव जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस येतात. तेव्हा तो मरण पावलेला असतो, व्हिडिओ कॅमेरा सुरूच असतो...! 

ही काल्पनिक घटना नाही. २५ जुलै २०१८ रोजी इंग्लंडमधल्या एका शहरात लिऑन जेनकिन्स या ४३ वर्षांच्या बिल्डरनं खरोखर अशा प्रकारे इंटरनेटसमोर आत्महत्या केली होती. ‘पलटॉक’ या व्हिडिओ चॅट साइटवरून एकमेकांशी गलिच्छ, अर्वाच्य भाषेत बोलून एकमेकांना ट्रोल करणाऱ्यांनी त्याला उचकवलं होतं. विश्‍वकरंडक सामन्यामध्ये उपांत्य फेरीत भारताच्या न्यूझीलंडबरोबरच्या अपयशानंतर ताबडतोब ‘अनुष्का शर्माचं काय काय चुकलं म्हणून विराट कोहलीची टीम हरली’ असं तिला ट्रोलिंग सुरू कसं झालं नव्हतं हेच आश्‍चर्याचं होतं. अर्जुन कपूर-मलायका अरोरा यांचं खासगी आयुष्य असो किंवा सोनाक्षी सिन्हाचा लठ्ठपणा, आराध्याचा हात ऐश्‍वर्यानं धरावा का नाही आणि रणबीर सिंगनं कोणता ड्रेस घातला होता यावरून ते सगळे सेलिब्रिटी सतत ट्रोल होत असतात..! त्यावर असंख्य मीम्सचा भडिमार होत असतो.

या मीम्सचे जनक बहुतेक ‘फोरचॅन’ या साइटवर सापडतात. २००३ मध्ये सुरू झालेल्या या साइटवर वाट्टेल ते पोस्ट करायला काही ठिकाणी परवानगी आहे. आज त्यावर दिवसाला १० लाख पोस्ट्‌स पडत असतात. २९ नोव्हेंबर २०१० रोजी अली साद या १९ वर्षांच्या मुलाला एफबीआयनं पकडलं. त्यानं लहान मुलांच्या पोर्नोग्राफिक इमेजेस ‘‘4chan’ वर टाकल्या होत्या. अनेकजणांना जिवे मारण्याच्या धमक्‍याही दिल्या होत्या. अलीनं ‘‘4chan’ वापरायला फक्त आठ दिवसांपूर्वी सुरुवात केली होती. ५ नोव्हेंबर २०१४ रोजी याच साइटवर वॉशिंग्टनमधल्या एकानं आपण खून केलेल्या माणसाचा फोटो टाकून ‘गळफास लावून मारणं चित्रपटात दिसतं त्यापेक्षा अवघड असतं’ असा शहाजोगपणाचा मेसेजही टाकला होता. या ट्रोल्समधले अनेकजण नार्सिसिस्टिक, नैराश्‍यात गेलेले, सॅडिस्ट असतात असा अनेक संशोधनांमधून निष्कर्ष निघालेला आहे. एकमेकांची थट्टा करणं यातून आनंद मिळवणं हा प्रकार कोणालाच नवीन नाही. पण याच थट्टेचं रूपांतर दुसऱ्याचा शारीरिक, भावनिक, आर्थिक, बौद्धिक किंवा मानसिक छळ करण्यासाठी जेव्हा केला जातो, तेव्हा ते ट्रोलिंग होतं. ऑनलाइन कम्युनिटीवर विषयाला सोडून किंवा टवाळखोर विषारी विधानं करून लोकांना अस्वस्थ करणं किंवा भांडण पेटवून देणं म्हणजे ट्रोलिंग. वंश, वर्ण, धर्म आणि जात अशा विवादास्पद गोष्टींवरून सोशल मीडियावर सतत मजकूर आणि फोटो टाकणं असे प्रकारही ट्रोल्स करतच असतात. एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवणं किंवा उद्योगव्यवसाय बंद पाडणं इथपासून समाजमाध्यमांमधल्या ग्रुप्सवर अस्वस्थता आणि असंतोष पसरवणं हे सगळे प्रकार ट्रोलिंगमध्ये चालतात. सोशल मीडियातल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांच्यासारख्या साइट्‌स, इंटरनेट चॅट रुम्स, इमेल ग्रुप्स, ब्लॉग्ज सर्वत्र ट्रोल्स असतातच.

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर काही घडामोडी सुरू असतील - उदाहरणार्थ, क्रिकेटची मॅच, निवडणुका इ. - तर फेसबुकवर ट्रोलर्सना उत येतो. अनेक फेसबुक पेजेसवर तेव्हा शब्दांचं मुष्टियुद्ध रंगलेलं दिसतं. एखाद्या पोस्टवर कॉमेंट करताना होणाऱ्या विधानांना अंत नसतो. तिथं आपापली मतं मांडून वेगळेपणा जपायचा सगळे प्रयत्न करत असतात. यात मूळ मुद्दा अनेकदा बाजूला पडतो. पण अर्थात कोणतंही विधान करणं हे ट्रोलिंग नव्हे. एखाद्यानं अस्थानी, विषारी किंवा खुनशी विधान केलं तर ट्रोलिंग सुरू होतं. उदाहरणार्थ, त्या पोस्टकर्त्याच्या आईबद्दल किंवा धर्माबद्दल विधान करणं. जिवे मारण्याच्या धमक्‍या देणं, द्वेषकारक, अपमानकारक पोस्ट्‌स किंवा कॉमेंट्‌स करणं, दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं आणि लोकांच्या बुद्धिमत्तेला आवाहन करण्यापेक्षा भावनांना हात घालणं हे ट्रोलिंगचे काही प्रकार आहेत. मच्छीमार आपल्या बोटीच्या मागे मासे पकडण्यासाठी पाण्यावर गळ (ट्रोल्स) लावतो त्यावरून ट्रोलिंग हा शब्द आला आहे. इंटरनेटच्या जगात आपल्या विधानरूपी गळाला माणसंरूपी मासे लागावेत अशी ट्रोलर्सची इच्छा असते. आजमितीला जगाची लोकसंख्या ७३० कोटी आहे आणि त्यापैकी ३१७ कोटी लोक इंटरनेट वापरतात. त्यांच्यापैकी ९० टक्के म्हणजे २८६ कोटी लोक निरनिराळी समाजमाध्यमं वापरतात. थोडक्‍यात आपण, आपले मित्र, जाहिरातदार, अनेक व्यावसायिक, सेलिब्रिटीज, उत्पादक सगळेजण समाजमाध्यमं वापरत असतातच. त्यामुळं सगळ्यांनाच आणि विशेषतः मोबाईल जनरेशनला निश्‍चितपणे ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं.

माहितीची देवाणघेवाण सोपी होणं हे इंटरनेटचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. मात्र, त्यात ट्रोलिंग हा प्रकार कसा सुरू झाला? तर १४ डिसेंबर १९९२ रोजी इंग्लंडमधल्या ‘युजनेट’च्या ‘अल्ट डॉट फोकलोअर डॉट अर्बन’ या ग्रुपवर ट्रोलिंगचा पहिला उल्लेख ऑक्‍सफर्ड इंग्लिश डिक्‍शनरीतल्या संदर्भानुसार सापडतो. ‘युजनेट’ मधल्या या ग्रुपवर एकानं - ‘मी हे टाकल्यावर आपण अजून ट्रोलिंग करून काय होतंय ते पाहू’ असं आपल्या विधानात लिहिलं होतं. याच ग्रुपनं नंतर ‘ट्रोल म्हणजे काय’ याचा एक मार्गदर्शक तयार केला. 

सुरुवातीला ऑनलाइन चर्चांना भलतीकडंच वळवण्यासाठी विचित्र विधानं करणं इतपतच अर्थ ट्रोलिंगमध्ये मर्यादित होता. यानंतरच्या काळात इंटरनेटचे टप्पे बदलत गेले. इमेल्स, फोरम्सपुरत्या मर्यादित असलेल्या इंटरनेटच्या विश्‍वात ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया यांनी प्रवेश केला. ई-कॉमर्समुळं एखाद्याची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणं सहजसाध्य झालं. सोशल मीडियामुळं लोकांची वैयक्तिक माहिती नको इतक्‍या प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध झाली. त्यातून लोकांचा छळ करणाऱ्यांचं चांगलंच फावलं. गेल्या २० वर्षांत ट्रोल हा शब्द आणि प्रकार इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात फोफावला.त्या काळात ‘फोरचॅन’ वगैरे वेबसाइट्‌सवरून ट्रोलिंग लाखो लोकांपर्यंत पोचलं. ‘एलओएल’ म्हणजे ‘लाफ आउट लाऊडली’ असा प्रतिसाद इंटरनेटच्या विश्‍वात प्रसिद्ध आहे. ट्रोलर्सचा हेतू सुरुवातीच्या काळात ‘एलओएल’ हा प्रतिसाद मिळवणं हाच होता. पण आपल्या मनोरंजनासाठी दुसऱ्याच्या भावनांचा/वागणुकीचा/विधानांचा गैरवापर करणं अशा भावनेतून मिळालेल्या ‘एलओएल कॉमेंट’ला शब्द वापरला जातो lulz. या प्रकारातलं ट्रोलिंग दिवसेंदिवस वाढत गेलं. हे कसं बदलत गेलं ते जाणून घेण्यासाठी ट्रोलिंगचे वेगवेगळे प्रकार माहिती असायला हवेत.

काही ट्रोल्स फक्त दुसऱ्याचा अपमान करायला टपलेले असतात. अपमानास्पद लिहिताना कोणाचा द्वेष करायला यांना कारणही लागत नाही. कोणत्याही थराला जाऊन अपमानास्पद शब्द वापरून ते समोरच्याला राग येईल किंवा दुःख होईल याची काळजी घेतात. काहीजणांना फक्त वाद घालण्यात रस असतो. हे लोक संशोधनानं सिद्ध झालेल्या, पुरावे असलेल्या अशा सत्य गोष्टींवर आधारित एखादी पोस्ट टाकतात. त्या पोस्टच्या मजुकराबाबत फक्त आपण कसे बरोबर आहोत आणि इतरांचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे ते दाखवण्यात यांना पराकोटीचा अभिमान वाटतो. स्वतःची पोस्ट टाकली नसेल, तर दुसऱ्याच्या पोस्टरवरच्या आपल्या कॉमेंट्‌समध्ये लांबलचक लिखाण करणं किंवा संदर्भ देत राहाणं हा त्यांचा आवडता छंद असतो. दुसरा माणूस कॉमेंट करणं थांबवेपर्यंत ते वाद घालू शकतात. काहीजणांना वादात भाग घेताना विषय बाजूला ठेवून भलत्याच गोष्टीत सविस्तर माहिती सांगायची खुमखुमी येते. मग ते आपला एखादा अनुभव घेऊन भलामोठा लेख कॉमेंटमध्ये लिहितात. त्यात कधी खोटी माहितीपण दडपलेली असते. आपल्याबद्दलची माहिती इतरांना ऐकायची असो वा नसो, ते लिहीत राहातात.

काही ट्रोल्स दुसऱ्यांच्या व्याकरणातल्या चुका दाखवण्यात कुशल असतात. मजकूर इंग्रजीत असेल, तर ते तत्काळ स्पेलिंग दुरुस्त करतात. तसंच पोस्टचा मुद्दा काय आहे हे पाहण्यापेक्षा केलेली शब्दयोजना कशी चुकीची आहे यावरून ते लिहिणाऱ्याचा अपमान करतात. धर्म, राजकारण अशा वादग्रस्त विषयांवर वाद होतातच. तेव्हा त्यावर ट्रोल्सचा सुळसुळाट असतोच. पण काहीजण तर कोणीतरी पोस्ट केलेला अगदी अगदी साधा विनोद, एखादं गाणं घेऊन त्यावरून वाद निर्माण करण्यातही पटाईत असतात. काहीजणांना फक्त शिवीगाळ करायला आवडते. ते कीबोर्डावरचं कॅप्स लॉक सुरू करून (थोडक्‍यात वरच्या पट्टीतल्या आवाजात) ठराविक कॉमेंट लिहीत बसतात. कशावरच त्यांनी फार विचार केलेला नसतो. तसंच सर्वत्र एकच शब्द उदाहरणार्थ, छान, वाहवा, ग्रेट वापरून अभिप्राय देणारे काहीजण असतात. एरवी यांच्या कॉमेंट्‌स फारशा गंभीरपणे कोणी घेत नाही. पण गंभीर किंवा महत्त्वाच्या मुद्द्यावर यांची ‘ग्रेट’ इतकीच कॉमेंट आली की सगळे वैतागतात. यांच्याप्रमाणेच कोणत्याही पोस्टवर स्वतःचं गाणं, स्वतःची कविता, स्वतःचा व्यवसाय असाच ठरलेला प्रतिसाद टाकणारे काही असतात. 

अर्थात हे करणारे सगळे घातक ट्रोल्स नसतात. यापैकी काहीजणांकडं तरी गंमत म्हणून पाहता येतं. मग ट्रोल्स ओळखावेत कसे? एक तर आपल्या पोस्टवर कोणीही केलेल्या कॉमेंटमधलं काही खरं आहे का ते तपासावं. फक्त द्वेषमूलक, कशावर तरी राग काढण्यासाठी, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून किंवा वैयक्तिक वैमनस्यातून कॉमेंट आली असेल तर ते ट्रोलिंग असतं. तुम्ही तुमच्या पोस्टमधल्या चुकीबद्दल क्षमा मागितली, तर त्यावरून उठलेलं वादळ सरळपणे वागणाऱ्या माणसांसाठी थांबू शकतं. पण ट्रोल मात्र सहजासहजी थांबत नाही. ट्रोलर्सना समस्या सोडवण्यात रस नसतोच. त्यांना भांडणं, वाद उकरायचे असतात. शाब्दिक लढाई सुरू राहील यावर त्यांचा भर असतो. त्यांच्याकडून सकारात्मक तडजोड शक्‍य नसते. ट्रोल्सच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे बुद्धी किंवा तर्कनिष्ठता न वापरता ते तुमच्या भावनांना हात घालतात. शक्‍यतो तुम्हाला राग येईल अशी भाषा वापरतात. ट्रोल्सचा इगो प्रचंड वाढलेला असतो. जग फक्त आपल्याभोवतीच फिरतं असं समजून ते बोलत असतात. एकूणच आविर्भाव मी कसा शहाणा असाच असतो. ट्रोल्सना गोष्टी असतात त्याच्या दसपट वाढवून सांगण्यात रस असतो.

तुमची पोस्ट किंवा कॉमेंट यांचा रोख कशावरही नसला, तरी ट्रोल्स प्रत्येक गोष्ट वैयक्तिक पातळीवर ओढवून घेतात. त्यांच्या लिखाणात विचारपूर्वक वापरलेली पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम अशी चिन्हं सहसा नसतात. याउलट जास्त करून ते उद्‌गारवाचक चिन्हं वापरतात. रोमन लिपीत लिहिलं असेल, तर सगळी अक्षरं कॅपिटलमध्ये किंवा मजकूर बोल्ड करतात. एखाद्याला मुखवटा घालायला दिला तर तो तुम्हाला गुप्त रहस्यं सांगेलच, पण त्याचबरोबर तो छळ करणारा, बेफिकीर आणि बेजबाबदार होईल असं म्हटलं जातं. ट्रोलर्सच्या बाबतीत असंच घडतं. पण यामागं त्यांची मानसिकता काय असते, ते पुढच्या लेखात जाणून घेऊ. 

संबंधित बातम्या