संवादाचं व्यसन 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

“घनचक्कर” या चित्रपटातल्या विद्या बालनला फॅशनेबल कपडे घालण्याचा शौक असतो. तिच्या नवऱ्यानं बॅंक लुटून जमवलेलं धन कुठं लपवलंय याचा शोध लावण्यासाठी त्याचे इतर दोन सहकारी तिचं अपहरण करतात. तिचं तोंड बांधून ठेवलेलं असतं. इतक्या घनघोर प्रसंगातही समोरच्या फॅशनविषयक मासिकाची पानं चाळून नवनवीन फॅशन्स शोधण्यासाठी तिचा आटापिटा चाललेला असतो…! हे दृश्य पाहून हसायला येतंच; पण असं एखाद्या गोष्टीशिवाय राहणंच शक्य होत नाही तेव्हा ते व्यसन झालेलं असतं. अनेकांना चक्क बोलण्याचं व्यसन असतं. मुळात माणूस हा समाजात राहणारा प्राणी असल्यामुळं त्याला संवादाची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यामुळंच एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करताना बोलघेवडा, मितभाषी, बोलका, चुपचाप असे ताशेरे आपण मारत असतो. 

औद्योगिक क्रांतीनंतर रेडिओ, टेलिव्हिजन, चित्रपट अशा दृकश्राव्य माध्यमांचा उदय झाला. वर्तमानपत्रं आणि ही माध्यमं यांच्यातला महत्त्वाचा फरक म्हणजे, ही माध्यमं दिसण्याला आणि चटपटीत बोलण्याला महत्त्व द्यायला लागली. त्यामुळंच बोलून समोरच्यावर छाप पाडणं याला पराकोटीचं महत्त्व आलं. “हाऊ टु विन फ्रेंड्स अॅंड इन्फ्लुएन्स पीपल”सारखी पुस्तकंही लोकांवर संभाषणातून प्रभाव कसा पाडावा हे उघडपणं सांगतात. मग सार्वजनिक ठिकाणी, वैयक्तिक सभासमारंभात, आॉफिसमध्ये संभाषणकौशल्य हा महत्त्वाचा गुण मानला जायला लागला. बोलकी, बहिर्मुख स्वभावाची माणसं इतरांवर जास्त छाप पाडतात या गृहीतकामुळं त्या विषयावर शेकडो पुस्तकं, प्रशिक्षणं यांचा भडिमार सुरू झाला. 

पण बोलण्याला इतकं महत्त्व असलं तरीही जास्त प्रमाणात बोलणाऱ्या माणसाला बडबड्या, वायफळ बोलणारा, स्वतःचं ऐकवणारा, उथळ अशीच नकारात्मक विशेषणं लावली जातात. कित्येक जणांना बोलण्याची आपली ऊर्मी दाबता येत नाही आणि किती बोलावं यावर त्यांचं नियंत्रण राहात नाही. ते एक प्रकारचं व्यसन होऊन बसतं. अशा म्हणजे आपल्या बोलण्याच्या इच्छेवर नियंत्रण न ठेवू शकणाऱ्या व्यक्तींसाठी चक्क “टॉकोहोलिक्स” असा शब्दच वापरला जातो. अल्कोहोलिक म्हणजे दारूचं व्यसन असणारा आणि वर्कोहोलिक्स म्हणजे कामाचं व्यसन असणारा तसे हे टॉकोहोलिक्स..! “टॉकोहोलिक्स” व्यक्तींच्या बाबतीत गमतीचा भाग म्हणजे आपल्याला बोलण्याचं व्यसन आहे हे त्यांना कळत नसतं. याउलट, आपल्यात बोलून छाप पाडण्याचं कौशल्य आहे असं त्यांना वाटत असतं. टॉकोहोलिक्स किती बोलतात या प्रमाणाला मर्यादा नाही. जागे असताना सर्ववेळ ते बोलत असतातच; पण अनेकदा गप्पांमध्ये रंगून त्यांच्या झोपेची वेळ पुढं पुढं जाते. बोलता येत नसेल तेव्हा ते अस्वस्थ होतात. टॉकोहोलिक्स असण्याचा दुष्परिणाम म्हणजे लक्ष देऊन दुसऱ्याचं बोलणं ते ऐकू शकत नाहीत. जिव्हाळ्याची नाती निर्माण होऊ शकत नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बोलण्यातून वैचारिकदृष्ट्या काही महत्त्वाचं निष्पन्न होत नाही. 

इंटरनेटवर सतत उपलब्ध राहण्याचंही काही जणांना व्यसन असतं. त्यांच्यासाठी ‘ऑनलाइनोहोलिक्स’ असाही शब्द वापरला जातो. या प्रकारातली माणसं सतत संवाद साधण्याची ऊर्मी काबूत ठेवू शकत नाहीत. सोशल मीडिया, ब्लॉग्ज, मेसेजिंग किंवा इमेल्स अशा सर्व माध्यमांमधून ते सतत कोणापाशीतरी व्यक्त होत असतात. इंटरनेटवर असं सतत कम्युनिकेशन केल्याशिवाय ज्यांना राहवत नाही, त्यांना ‘‘कम्युनिकेशन अॅडिक्शन डिसआॅर्डर’’ असू शकते. 

जगाची लोकसंख्या ७०० कोटी आहे. त्यापैकी इंटरनेटला जोडले गेलेले ३१० कोटी लोक, दिवसाला सरासरी चार तास इंटरनेटवर कम्युनिकेशनसाठी घालवतात. फिलिपाईन्स या देशामध्ये हे प्रमाण दिवसाला तीन तास ५७ मिनिटं, तर ब्राझिलमध्ये तीन तास ३९ मिनिटं आहे. जपानमधले लोक तुलनेनं खूप कमी म्हणजे दिवसाला ४८ मिनिटं सोशल मीडियावरच्या कम्युनिकेशनला देतात. त्यापैकी फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या माध्यमांना सर्वांत जास्त प्राधान्य दिलं जातं. आकडेवारी पाहायची झाली, तर फेसबुकवर नित्यनेमानं लिहिणारे २२३ कोटी जण आहेत. फोटो किंवा व्हिडिओ पाहणं हा प्रकारही सर्वांत जास्त प्रमाणात फेसबुकवरूनच घडतो. मोबाईलवरून फेसबुक अॅप वापरणारे दिवसाला ५८ मिनिटं त्यावर घालवतात. फेसबुक वापरणाऱ्यांपैकी ९५ टक्के जण मोबाईल अॅप वापरतात. इंटरनेट वापरणाऱ्या ३१० कोटींपैकी ८५ टक्के जण फेसबुकचे वापरकर्ते आहेत, ७९ टक्के जण युट्यूबचे, ६६ टक्के जण व्हॉट्सअॅपचे आणि इन्स्टाग्रामचे ६३ टक्के वापरकर्ते आहेत. साधारणपणे व्हॉट्सअॅपवरून दिवसाला दोन बिलियन मिनिटांचे कॉल्स एकमेकांना केले जातात. व्हॉट्सअॅप हे १२८ देशांमध्ये पहिल्या क्रमांकाचं मेसेजिंग अॅप आहे. समाजमाध्यमांवर घालवला जाणारा हा वेळ मोजताना साधारणपणे कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन या सगळ्यांवरचा वेळ एकत्रित करून काढला जातो. 

ही सर्व माध्यमं आपल्याला सतत काहीतरी बोला, व्यक्त व्हा, असं आवाहन करत असतात. मग अनेकजणांना दरक्षणी सोशल मीडिया तपासणं, त्यावर उत्तर लिहिणं, त्यावर फोटो अपलोड करणं, इतरांच्या पोस्टवर कॉमेंट करणं आणि परत एकदा नवीन नोटिफिकेशन आलंय का ते तपासणं याचा चाळा लागतो. इंटरनेट कम्युनिकेशन डिसऑर्डरचं (आयसीडी) ते लक्षण आहे. 

मुळात आयसीडी कशी जडते त्याची एक प्रक्रिया मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे. अनेकजणांना आयुष्यात नैराश्य असतं किंवा सोशल अॅंक्झायटी असते. समाजात मिसळायची भीती वाटणं इथपासून भाषण करायची भीती वाटणं असे सोशल अॅंक्झायटीचे अनेक प्रकार असतात. अशा लोकांचा आत्मविश्वास खालावलेला असतो; त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्त्व प्रभावी नाही असं प्रकर्षानं वाटत असतं. दैनंदिन जीवनात त्यांना सततचे ताणतणाव जाणवत असतात. भावनांवर नियंत्रण करता न येणं आणि वास्तव जगात वावरता न येणं.. याच कारणांमुळं सामाजिक पातळीवर एकटेपणा जाणवत असतो. आपल्या समस्या ते कोणाला सांगत नाहीत. त्यामुळं त्यांना कोणाकडून हे दूर होण्यासाठी मदत मिळत नाही. 

आपल्यातल्या या उणिवांच्या भासामुळं ती व्यक्ती इतरांना टाळायला लागते. पण या सगळ्यातून सुटका व्हावी अशीही त्यांची सुप्त इच्छा असते. वास्तव आयुष्यातल्या समस्या सहन होत नाहीत, अशा निष्कर्षाला ती व्यक्ती पोचते. इंटरनेट हा त्या व्यक्तींना सुटकेचा मार्ग वाटतो. तिथं एकमेकांशी बोलून सकारात्मक वाटेल आणि तिथं आपल्याकडून कोणी कसल्याच अपेक्षा करणार नाही याची त्यांना खात्री वाटते. त्यातून इंटरनेट कम्युनिकेशनची सवय लागते. एकदा ते सुरू झाल्यानंतर वेळेचं भान उरत नाही. रोजच्या आयुष्यातल्या कटकटींपासून सुटका होईल असं वाटणं; एकटेपणातून सुटका मिळवणं; त्या क्षणिक आनंदाच्या मागं लागणं; सकारात्मकतेचा भास होणं या सगळ्याचं आकर्षण वाटून सतत इंटरनेटवर असण्याची इच्छा सुरू होते. यानंतर समाजाशी थोडाफार उरलेला संबंध पूर्णपणे तुटतो. ही आयसीडीची लक्षणं आहेत. आयसीडी असलेल्या व्यक्तीच्या मूडमध्ये सारखे बदल होतात. सहनशक्ती कमी होते. आपल्याला काहीतरी करायचं आहे, अशी अपूर्णतेची भावना मनाला छळत राहते. 

आयसीडी असलेल्या व्यक्तींचा स्क्रीन टाइम (कॉम्प्युटर, टॅबलेट, स्मार्टफोन असे विविध स्क्रीन वापरण्याचा वेळ) वाढत जातो. मग कामामधलं, अभ्यासामधलं लक्ष कमी होत जातं. कामाच्या ठिकाणी परफॉर्मन्स खालावतो. शाळा/कॉलेजमधले मार्क्स कमी होत जातात. वास्तव आयुष्यातल्या मित्रमैत्रिणींशी/जोडीदाराशी/नातेवाईकांशी संबंध दुरावत जातात. इतकंच नव्हे, तर नात्यात वितुष्ट येतं. याचं भयानक उदाहरण दक्षिण कोरियामधल्या एका शहरातलं आहे. या शहरात तीन महिन्यांची लहान मुलगी भुकेनं तडफडून मरण पावली. मात्र, तिच्या मृत्यूचं कारण गरिबी किंवा कुपोषण किंवा दुर्धर आजार हे नव्हतं. तिचे आईवडील इंटरनेटवर एक गेम खेळत होते आणि त्यात मग्न झाल्यामुळं त्यांचं त्या मुलीकडं लक्ष नव्हतं. यातला दुःखद विरोधाभास म्हणजे ते पालक तेव्हा आभासी जगात एक मूल वाढवायचाच गेम खेळत होते. 

आयसीडीमुळं इतर काही धोके संभवतात. त्यापैकी एक म्हणजे इंटरनेटवरून फसवलं जाण्याचा धोका वाढतो. इंटरनेटवर माणसं सर्रास खोटं किंवा स्वतःशी अप्रामाणिक बोलतात असं २/३ लोकांनी कबूल केलं होतं. त्यामुळं आभासी विश्वात जेव्हा अनोळखी माणसाची ओळख होते, तेव्हा तो आपला वापर करून घेतो आहे हे लक्षात येऊ शकत नाही. हा प्रकार पुण्याजवळच्या एका ४० वर्षांच्या महिलेच्या बाबतीत नुकताच घडला. तिची एका ३१ वर्षांच्या चहाची टपरी चालवणाऱ्या माणसाबरोबर ओळख झाली. त्याला भरपूर कर्ज होतं. त्या माणसानं तिला जाळ्यात ओढलं. आपण तुझे चांगले फोटो काढू असं आमिष दाखवलं. त्यासाठी ती महिला भरपूर दागिने घालून त्याच्याबरोबर ताम्हिणी घाटात गेली. तिथं त्या पुरुषानं तिचा खून केला. इंटरनेटवरून पैशांची फसवणूक, लैंगिक बाबतीत छळ करणं असे अनेक प्रकार आयसीडी असलेल्या लोकांच्याबाबतीत घडू शकतात. 

आयसीडी असलेली व्यक्ती कशी ओळखावी याचे सोपे नियम म्हणजे, आपलं इंटरनेट वापरावर नियंत्रण राहात नाही. इंटरनेटवर असायला हवं असं सतत वाटतं आणि कोणाला काही सांगायची गरज नसताना सतत तसं वाटायला लागतं. पण आयसीडीचं निदान आणि प्रमाण याचं मोजमाप करणं तितकंसं सोपं नाही. मुळात वास्तव आयुष्यात प्रत्यक्ष जोडलेले नातेसंबंध जास्त निरोगी असतात, असं निःसंदिग्धपणे म्हणता येत नाही. त्यामुळं इंटरनेटवरची सर्वच नाती चुकीची असतात, असं सरसकट म्हणता येत नाही. तसंच इंटरनेट हे वेळ घालवण्याचं वाईट ठिकाण नाही. तिथंही आपल्यासारखीच माणसं खऱ्या भावभावना शेअर करतात. फेसबुकवरची मैत्री अनेकदा दीर्घकालीन ठरते. प्रत्यक्षात भेटलेल्या लोकांपेक्षा ऑनलाइन भेटलेले लोक जास्त जवळचे वाटू शकतात. काही लोकांना तरी इंटरनेटवरून जोडलेली मैत्री आणि अनेक गोष्टी आनंद देऊ शकतात. आत्मविश्वासाचा अभाव असलेले, शारीरिक व्यंग किंवा लैंगिक समस्या असलेल्या व्यक्तींना समोर येऊन नातं टिकवणं शक्य होतंच असं नाही. तेव्हा ते इंटरनेट वापरतात. एकाकी लोकांना अनेकदा यातून आनंद मिळतो. तसंच रोजच्या दैनंदिन आयुष्यात गुरफटलेल्या लोकांशी जर संवाद साधता येत नसेल, तर इंटरनेट ती संधी उपलब्ध करून देऊ शकतं. तुमच्या छंदाला अनुसरून माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी मदत होते. 

“से समथिंग” हे जस्टिन टिंबरलेक या पॉपगायकाचं गाणं तरुणांमध्ये खूप गाजलं होतं. समाजमाध्यमं सतत आपल्याला काहीतरी  बोलायचा, लिहायचा आग्रह धरत असतात. याच गाण्यात पुढं काहीतरी सांगायचं असेल, तर काहीच न सांगणं हा सर्वोत्तम मार्ग आहे अशा अर्थाची एक ओळ येते. याचा अर्थ तपासायला गेलो तर पार ग्रीक तत्त्ववेत्ते काय सांगायचे ते आठवतं... स्वतःला जाणून घ्या” असं सॉक्रेटिस सांगायचा. स्वतःला जाणण्याचा मार्ग म्हणजे अंतर्मनाचा सतत तपास घेणं – आत्मपरीक्षण करणं. मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी आत्मपरीक्षण करणं, ही मानसशास्त्रातली मूलभूत संकल्पना आहे. आत्मपरीक्षण करण्यासाठी विचारांना तर्कसंगत रूप देण्याची गरज आहे, असं सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटोही म्हणायचा. आपले विचार आणि भावना यांची सतत चिकित्सा करणं प्लेटोला गरजेचं वाटत होतं. पण हे करण्यासाठी स्वतःला वेळ देण्याची, म्हणजे शांतपणे एकांतात बसण्याची गरज असते. आयसीडीमधून बाहेर यायचं असेल, तर इंटरनेटला दोष देण्यापेक्षा इंटरनेटवर जाऊन जे काय केलं जातं त्या गोष्टींमध्ये बदल करायची गरज लक्षात घ्यायला हवी.

संबंधित बातम्या