सोशल मीडिया आणि ब्रॅंडिंग 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

कॉन्स्टंटाईन ऊर्फ कोस्टा कापोथॅनॅसिस या ग्रीक-अमेरिकन बेसबॉलपटूला खरं तर मेरीलॅंडच्या एका कॉलेजमध्ये बेसबॉल शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. पण खांद्याला दुखापत झाल्यामुळं त्याला व्यावसायिक खेळातून निवृत्त व्हावं लागलं. त्या खेळावरच्या प्रेमामुळं त्यानं मग बेसबॉलच्या ‘मेड टू ऑर्डर’ अशा विशेष बॅट्स तयार करण्याचा उद्योग सुरू केला. दुसरीकडं त्यानं फायनान्स या विषयात एमबीए केलं. नंतर काही मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. पण एक तर कोस्टा दरवेळी नोकरी सोडायचा किंवा कंपनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवायची. जिथं तिथं एकच समस्या; ती म्हणजे, कंपन्यांमध्ये सोशल मीडिया वापरण्यावर असलेले निर्बंध. कोस्टाकडून बेसबॉल घेण्यासाठी अनेकजण त्याला सोशल मीडियावरून विचारणा करायचे. तो दिवसभर त्या लोकांशी संपर्क साधू शकायचा नाही. मग गिऱ्हाईक जायचं. यापेक्षाही बेसबॉल आयुष्यातून संपल्याचं दुःख त्याला प्रचंड होतं. 

अशातच एक दिवस कोस्टा गाडीतलं ऑईल बदलायला गेला. तिथं जरा जास्तच वेळ लागला. तेव्हा गाडीतलं ऑईल झटपट बदलून देणारा व्यवसाय आपण सुरू करावा असा त्याच्या मनात विचार आला. मग लगोलग कोस्टानं ‘क्विक चेंज ऑईल’ ही कंपनी सुरू केली. या कंपनीच्या मार्केटिंगसाठी लोकांना ईमेल्स पाठवणं वगैरे तंत्र वापरून त्यानं लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला. पण ते काही जमेना. तेवढ्यात त्यानं एक पुस्तक वाचलं. सोशल मीडियावरून मार्केटिंग कसं करावं याच्या त्या पुस्तकातल्या टिप्स त्याला भलत्याच आवडल्या. मग त्यानं युट्यूब आणि फेसबुक जाहिराती कशा वापराव्यात ते शिकून घेतलं. मार्केटिंगचं महिनाभराचं सगळं बजेट फेसबुक जाहिरातींवर खर्च केलं. सोशल मीडियावर नीट कंटेंट तयार केला. ट्विटरवर मोटारगाड्यांबद्दलच्या चर्चा ऐकून त्याप्रमाणं लोकांना गाठलं. आपल्या ग्राहकांच्या महागड्या गाड्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले.  ग्राहकांनाही आपल्या गाड्यांचे उत्तम फोटो तिथं पाहून मस्तच वाटायचं. गाड्यांबद्दल शैक्षणिक व्हिडिओज तयार केले. त्या व्हिडिओजमध्ये गाडीचा एअर फिल्टर आणि ऑईलचे प्रकार अशा गोष्टींची सोप्या भाषेत माहिती दिली होती. यानंतर कोस्टाला अमेरिकेत एका वर्षात सहा ठिकाणी ऑफिसेस काढावी लागली. अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये त्याचा व्यवसाय विस्तारल्यावर एका विद्यापीठाच्या आंत्रप्रेन्युअरशिपविषयक कार्यक्रमात त्याचं भाषणही झालं. २०१७ मध्ये त्यानं आपल्या कंपनीला ‘कोस्टा ऑईल’ हे नाव दिलं. 

अशा रीतीनं सोशल मीडिया केवळ मनोरंजनासाठी न वापरता व्यावसायिक किंवा वैयक्तिक पातळीवर ब्रॅंड तयार करून पैसे मिळवण्यासाठी वापरता येतो. ही संकल्पना भारतात नवीन असली, तरी नवीन पिढीच्या उद्योजकांमध्ये याबद्दल जागरूकता वाढत चालली आहे. कनान गिल आणि बिस्व कल्याण या दोघांनी तर आपले आवडते चित्रपट पाहून त्यातलं काय आवडलं ते सांगणारे मजेशीर व्हिडिओज युट्यूबवर टाकले. ते आज ३० लाख लोकांनी पाहिले आहेत आणि त्यांच्या युट्यूब चॅनेलचे ३५ लाख सबस्क्रायबर्स आहेत. 

खरं तर सगळेजण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवू शकतात, पण तशी प्रवृत्ती जोपासायला हवी. फेसबुकसारख्या अनेक गोष्टी त्यासाठी कशा वापराव्यात याच्या योजनाही आखायला हव्यात. उदाहरणार्थ, वेबसाइटवर कंटेंट तयार करणं महत्त्वाचं असतं. पण वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांवर वेगवेगळ्या वयोगटातले लोक येतात. ट्विटरपेक्षा इन्स्टाग्रामचे प्रेक्षक वेगळे असतात. तसंच फेसबुक पोस्ट, युट्यूब व्हिडिओ आणि ब्लॉग या सगळ्या ठिकाणांवरचं लेखन वेगवेगळं असावं लागतं. या सर्व ठिकाणी काय वाचायचं/काय पाहायचं याच्या वाचकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ, ट्विटरवर वाचक/प्रेक्षक खमंग ताज्या बातम्या पाहतात. फेसबुकवर आपले नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी काय लिहितात ते बघतात. युट्यूबवर संध्याकाळच्या शांत वेळी एखादा उत्तम व्हिडिओ बघावा अशी त्यांची अपेक्षा असते. या प्लॅटफॉर्मनुसार कोणते फोटो, कोणती वाक्यं, कोणते व्हिडिओज कोणत्या माध्यमासाठी वापरणार ते ठरवता येणं म्हणजे कंटेंटवर हुकमत मिळवणं होय. 

यामुळंच इंटरनेटवर तुमच्या कामाचा ब्रॅंड तयार करताना तुमचा उद्देश, तुम्ही लिहिलेल्या मजकुराची सत्यता, तुमची तळमळ, तुमचा वेग, तुमच्या कामातली नैतिकता, ग्राहकांना काय आवडतं ते तपासत राहणं, सोशल मीडिया वापरता येणं आणि त्याहून जास्त कंटेंट महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी दीर्घ मजकूर तयार करून त्याचे योग्य ते तुकडे, योग्य त्या प्लॅटफॉर्मवर वापरावेत. तुम्हाला कोणता कंटेंट तयार करायचा आहे याची धोरणं आखायला हवीत आणि नवनवीन कल्पनांवर आधारित कंटेंट तयार करत राहायला हवं. 

सोशल मीडियावर स्वतःच्या व्यवसायाचा ब्रॅंड तयार करणं हा एक प्रकार. पण नोकरी सांभाळून जर ऑनलाइन लर्निंगसाठी शिकवणं, असं तुम्ही करत असाल तर स्वतःचं ब्रॅंडिंग करावं लागतं. असा कंटेंट तयार करण्यात अनेक अडथळे येतात. साधारणपणे ‘मी पूर्णवेळ नोकरी करतो, माझ्याकडं पैसे नाहीत, मला लहान मुलं आहेत, माझ्याकडं वेळच नाही, माझ्या कामाच्या ठिकाणचे नियम कडक आहेत, अॅप आहे हे माहिती आहे-पण ते कसं चालवायचं ते माहिती नाही, माझ्या पालकांना त्यातलं काही कळत नाही, कुटुंबाला वेळ द्यावा लागतो, इंटरनेटवर माझे मित्र माझ्या पुढं निघून जातील अशी मला भीती वाटते, मी पोस्ट केलं पण कोणी पाहातच नाही, मी लिहिलेलं खूप कमी माणसं वाचतात, कोणती संकल्पना मांडू तेच कळत नाही, माझ्याकडं तशी उपकरणं नाहीत, कुठून सुरुवात करावी ते कळत नाही, माझं आता वय झालं, मी कलाकार आहे-व्यावसायिक नाही, पैसा मिळवणं हे माझं ध्येय नाही, मला नकारात्मक आणि द्वेषपूर्ण प्रतिक्रिया येतील याची भीती वाटते, हे लिखाण म्हणजे खायचं काम आहे का?’ अशी कारणं सोशल मीडियावर आपला ब्रॅंड तयार का करता येत नाही यासाठी दिली जातात. 

पण सोशल मीडिया वापरून अनेकजणांनी किती पैसे मिळवले आहेत ते पाहिलं, तर या तक्रारी जरा कमी होऊ शकतात. स्मार्ट टीव्हीवरून युट्यूब पाहणारे लोक जगभरात वाढत चालले आहेत. टीव्ही पाहणारे आणि मासिकं/पुस्तकं वाचणारे अनेकजण या माध्यमांकडं वळले आहेत. याचा फायदा घेऊन युट्यूब वापरून २०१६ मध्ये सर्व वापरकर्त्यांनी मिळून ७ कोटी डॉलर्स मिळवले होते. त्यापैकी एकजण एलजीबीटी चळवळीसाठी काम करायचा, तर लिंडसे स्टर्लिंग ही व्हायोलिनवादक होती. मिशेल फान हा मेकअप आर्टिस्ट होता. इन्स्टाग्रामनंही अनेक लोकांना लोकप्रियता आणि आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. आजकाल कॉलेजमधले पदवीधर इन्स्टाग्रामचा वापर करून आपल्याला चमकता येतं का हे एखाद-दुसरं वर्षं घालवून प्रयत्न करून पाहतात. आज इन्स्टाग्रामवर सर्वांत जास्त लोकप्रिय असणारा माणूस वर्षाला  

७ आकडी रक्कम सोशल मीडिया वापरून मिळवतो. काही हजार फॉलोअर्स असलेला माणूस इन्स्टाग्रामवरून आठवड्याला दोन पोस्टस करून वर्षाला ५००० डॉलर्स मिळवू शकतो, तर दहा हजार फॉलोअर्स असलेला माणूस केवळ आठवड्याला २ पोस्टस करून वर्षाला २० हजार डॉलर्स कमवू शकतो. यासाठी इन्स्टाग्रामवर हॅशटॅग्ज, कोलॅबोरेशन्स, टॅगिंग आणि जाहिराती यांचा मुक्तहस्तानं वापर करायला हवा. ट्विटरवर एका क्षणात तुम्ही खाद्यपदार्थांच्या कृतीपासून ते अंतराळवीरांपर्यंत आणि राजकारणापासून फुटबॉलपर्यंत कशावरही चर्चा सुरू करू शकता. तुम्ही विशिष्ट विषयावर सातत्यानं ट्विट करत राहिलात, तर तुम्हाला असंख्य लोक फॉलो करायला लागतात. 

स्नॅपचॅट हे मेसेजिंग अॅप आहे. २०१८ मध्ये या अॅपचे १८.७ कोटी वापरकर्ते झाले आहेत. प्रत्येकजण दिवसभरात साधारण स्नॅपचॅटवर १८ वेळा जातो. म्युझिकल.ली (musical.ly) या कंपनीचं शांघायमध्ये मुख्यालय आहे. या अॅपमधून वापरकर्त्याला १५ सेकंदांपासून ते १ मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ तयार करता येतो. त्या व्हि़डिओला संगीत जोडायचीही सोय आहे. प्रत्येक फ्रेमचा वेगही यात कमीजास्त करता येतो. २०१७ मध्ये याचे २० कोटी वापरकर्ते होते. ‘व्हॉइस फर्स्ट’ला आज खूप महत्त्व आहे. ‘अॅमेझॉन’ कंपनीनं इको डॉट, अॅमेझॉन इको आणि इको प्लस ही ‘अॅलेक्सा व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम’वर चालणारी तीन उत्पादनं नुकतीच भारतात सादर केली आहेत. स्पीकरसारखं दिसणारं हे उपकरण वापरकर्त्यानं सांगितलेल्या - ‘अॅलेक्सा, प्ले बॉलिवूड म्युझिक फॉर मी’ अशा  सूचनांचं पालन करून विविध कामं करतं. घरातील दिवे, म्युझिक सिस्टीम, टीव्ही आणि इतर उपकरणं बंद चालू करण्याचं काम ‘इको’ करतं. भविष्यात अॅलेक्साला किराणा सामानाची यादी करायला सांगितल्यास ती तयार करून लक्षात ठेवेल. तुमच्यासाठी अलार्म सेट करेल. अर्थात त्यासाठी ही उपकरणं वाय-फायनं जोडावी लागतील. तसंच ‘गुगल होम’ हे आवाजाच्या सूचनांद्वारे विविध कामं करणारं ‘गुगल होम’ हे ‘गुगल’ कंपनीचं उपकरणही सध्या उपलब्ध आहे. शिवाय ‘अॅपल’ कंपनीचं ‘होम पॉड’देखील भारतात लवकर दाखल होणार आहे. 

त्यामुळं येणारा काळ हा व्हॉइस रेकग्निशन सिस्टीमवर चालणाऱ्या उपकरणांचा असेल. आपल्याकडचं हवामान, ताज्या बातम्या, तुमच्या अपॉईंटमेंट्स, तुमचा आवडता चित्रपट कोणत्या थिएटरला किती वाजता आहे हे सगळं ही उपकरणं तुम्हाला सांगतील. यामुळंच २००६ मध्ये ट्विटर, २०१० मध्ये इन्स्टाग्राम आणि २०१२ मध्ये स्नॅपचॅटनं जे केलं ते २०१९ मध्ये ‘व्हॉइस फर्स्ट’ करतं आहे आणि आवाजावर चालणारी अॅप्स तयार करणं या उद्योगाला खूप तेजी आली आहे. 

आज युट्यूबवर दररोज १२५ कोटी तास घालवले जातात. दर मिनिटाला इन्स्टाग्रामवर ६५९०० व्हिडिओज/फोटोज पोस्ट होतात. आज दर मिनिटाला १.८ कोटी टेक्स्ट मेसेजेस पाठवले जातात; युट्यूबवर ४३ लाख व्हिडिओ पाहिले जातात; १ लाख ७४ हजार इन्स्टाग्राम स्क्रोल केले जातात; ४ लाख ८१ हजार ट्विटस केले जातात; ९ लाख ३६ हजार ट्विट्स पाहिले जातात; २ कोटी ४० लाख स्नॅप्स स्नॅपचॅटवर तयार होतात; ३ लाख ७५ हजार अॅप्स डाऊनलोड केले जातात. हे लक्षात घेऊन अनेक ब्रॅंड्सनी सोशल मीडियाच्या जाहिरातींवर होणारा आपला खर्च तिप्पट केला आहे. आपणही या सर्व समाजमाध्यमांवर फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा, की पॅशनचा आणि व्यवसायाचा एकत्रित पाठपुरावा करायचा हे ठरवणं आपल्याच हातात आहे.   

संबंधित बातम्या