ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन? 

नीलांबरी जोशी 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

‘खरं तर अर्ध्याच तासापूर्वी मी ठरवलं होतं.. पण १५ मिनिटं झाल्यावर मला राहावलंच नाही. मी परत गुगलवरून अॅमेझॉन गाठलं. तिथं तो सुरेख निळसर ड्रेस दिसत होताच. त्याच्या शेजारी वजन कमी करण्याच्या उपायांची जाहिरातही होती. तेवढे उपाय केले तर तो ड्रेस मला शोभून दिसलाच असता. मग काय मी क्लिक केलं. मग त्या ड्रेसचे साईजेस तपासले. तेवढ्यात मला अजून काही रंगांचे पर्याय दिसले. एकावर मी क्लिक केलं.. तर अजूनच मस्त ड्रेसेस दिसले.. झालं, माझ्या ऑनलाइन शॉपिंगवर दिवसातला अजून एक तास गेला. तेवढ्यात समोर वेळेकडं नजर गेली.. अभिजितला भेटणार होते ती वेळ उलटून अर्धा तास झाला होता. गेल्या आठवड्यात हा तिसऱ्यांदा उशीर होता.. परत एकदा तो माझ्यावर रागावणार हे नक्की..!’ 

हे तुमच्या बाबतीत घडत असेल तर मला खरेदी करायला जरा जास्तच आवडतं.. इतकंच हसून म्हणण्यापलीकडं याकडं जरा गांभीर्यानं पाहायला हवं आहे हे नक्की..! 

आपण विकत घेतलेलं कोणाला कळणार नाही ही मानसिकता ऑनलाइन खरेदीत महत्त्वाची भूमिका बजावते. एका क्लिकसरशी सहज मिळणारी वस्तू, आकर्षक सवलतीच्या दरातल्या किमती, अनेक ब्रॅंड्स, रंग आणि इतर बाबतींत वैविध्य या गोष्टी ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना खेचून घेतात. 

शॉपिंगचं व्यसन हे इंटरनेटचं अजून एक पिल्लू आहे..! सहसा वाटतं तसं हे व्यसन स्त्रियांपुरतं मर्यादित नाही. स्टॅनफर्डच्या एका अहवालानुसार पुरुषांना अतिखरेदीची समस्या जास्त भेडसावते. तसंच मोबाईल जनरेशनला अतिखरेदी करण्याची सवय सहज लागू शकते. अल्कोहोलिक्सच्या धर्तीवर शॉपोहोलिक्स हा प्रकार गेल्या ५० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहेच. पण पूर्वीच्या अतिखरेदी करणाऱ्या लोकांमध्ये आणि आजच्या ऑनलाइन ग्राहकांमध्ये महत्त्वाचा फरक आहे. 

पूर्वी शेजारी, भोवतालचा समाज किंवा सणसमारंभात नातेवाइकांमध्ये आपण उठून दिसावं इतपतच लोकांबरोबर आपली स्पर्धा असायची. त्यांच्यापेक्षा भारी कपडे, वस्तू, राहणीमान ही तुलना आपापल्या गावापुरती/शहरापुरती मर्यादित होती. पण आधी दूरचित्रवाणी आणि आता इंटरनेटवरचा सोशल मीडिया या दृश्यमाध्यमांमुळं आपल्यासमोर जग खुलं होतं. जगभरातल्या फॅशन्स आणि सेलिब्रिटिज सतत समोर दिसतात. त्यांच्यासारखंच आपलंही राहणीमान असावं असं जवळपास प्रत्येकाला वाटतं. जग हेच एक खेडं झाल्यामुळं आपली स्पर्धा आता शेजारपाजारच्या लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या स्पर्धेतून वस्तूंचा साठा करावा ही मानसिकता तयार होते. त्यातून चंगळवाद जन्माला येतो आणि वाढतच जातो. 

मुळात तंत्रज्ञानामधल्या बदलांमुळं जगातल्या अनेक देशांमध्ये चैनीच्या वस्तूंचं खूप जास्त उत्पादन होतं. जगभरात, जिथं लोकांच्या मूळ गरजा पूर्णपणे भागल्या आहेत त्यांना आणि ज्यांना रोजची विवंचना आहे त्यांनाही या वस्तू विकणं हे आव्हान कंपन्यांसमोर असतं. अनेक देशांची आर्थिक भरभराट ही त्या वस्तूंच्या विक्रीवर अवलंबून असते. त्यामुळंच सायबरशॉपिंगचं व्यसन अमेरिकेपासून कॅनडा, मेक्सिको, ब्राझिल, युरोप, इस्राईल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि चीन या सर्व देशांमध्ये पसरलेलं आहे. 

भारत त्याबाबतीत मागं नाही. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन कंपन्यांच्या दसरा - दिवाळीनिमित्त असलेल्या फेस्टिव्ह सीझनच्या भारतातल्या ऑनलाइन विक्रीनं यावर्षी उच्चांक गाठला. गाड्यांपासून बिस्किटांपर्यंत सगळ्या वस्तू तुफानी प्रमाणात विकल्या गेल्या. अॅमेझॉनवर पहिल्या ३६ तासांमध्ये ७५० कोटी रुपयांचे स्मार्टफोन्स विकले गेले. फ्लिपकार्टवर सौंदर्यप्रसाधनं, लहान मुलांच्या वस्तू, फर्निचर मागच्यावर्षीच्या तुलनेत दुपटीनं वाढलं. भारतात ऑनलाइन खरेदीचे व्यवहार मागच्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. भारताचं ऑनलाइन मार्केट २०२० मध्ये ३२९.१ मिलियन डॉलर्सला पोचेल असा अंदाज आहे. 

त्यामागं कंपन्यांनी हिंदी भाषेत खरेदी करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणं, क्रेडिट कंपन्यांनी हप्त्यांवर वस्तू उपलब्ध करून देणं, हजारो आकर्षक वस्तू उपलब्ध असणं आणि त्या वस्तू वेळच्यावेळी घरपोच मिळणं ही कारणं आहेत. भारतात सुरुवातीला ग्राहक सहसा स्मार्टफोन्स ऑनलाइन खरेदी करायचे. पण आता मात्र सौंदर्यप्रसाधनांपासून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपर्यंत सगळं ऑनलाइन घेतलं जातं. तेच लक्षात घेऊन वनप्लस आणि झिओमी या दोन कंपन्यांनी त्यांच्या टीव्हीची मॉडेल्स यावर्षी फक्त अॅमेझॉनवर लॉंच केली होती. 

ऑनलाइन खरेदी करताना त्या वस्तूंवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती हा ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पण आपल्याला ज्या वस्तू खरोखर हव्या आहेत तेवढ्याच वस्तू खरेदी करून आपण थांबत नाही. गरज नसणाऱ्या कितीतरी वस्तू आपण हावरटासारख्या विकत घेतो. आपल्या घरातल्या वस्तूंच्या मोबदल्यात एक्स्चेंज ऑफर किंवा काही हव्या असणाऱ्या वस्तू घेऊन झाल्या तरी ‘चांगलं दिसतंय, किती वर्षं झाली माझी हौसमौज झालीच नाही, हे ट्राय करून पाहू’ असे विचार करत आपण शॉपिंग कार्ट वाढवत राहतो. 

कंपन्या याचाच फायदा घेऊन काही दिवसांचे, तासांचे सेल लावतात. त्याचं घड्याळ आणि सवलतीचे आकडे सतत समोर दिसत राहातं. थोड्या काळासाठी असा सेल लावणं हा ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ या मानसिकतेचा फायदा घेण्याचा एक प्रकार आहे. ‘उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे?’ पासून अनेक जाहिरातींमध्ये हा प्रकार वापरला जातो. दुसऱ्याकडं चांगली वस्तू आहे ही तुलना मानवी मन करतंच, मग ती वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध असताना आपण घेतली नाही तर काहीतरी गमावू असं मन सांगायला लागतं. हाच ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट-फोमो’चा प्रकार. त्यात एखाद्या वस्तूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल, ती वस्तू दुर्मिळ असेल तर आपण भराभर वस्तू विकत घेतो. ‘स्टॉकमध्ये कमी उरलं आहे किंवा हे उपलब्ध असेल तोपर्यंतच..’ अशा सूचनांच्या मागं ही ‘फोमो’ची मानसिकता वापरलेली असते. एखादी गोष्ट उपलब्ध नसेल तर ती जास्त मौल्यवान वाटते. परत ती वस्तू मिळेल का नाही याचा विचार करून घाईत कार्टमध्ये अॅड करतो. 

यासाठी एक संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असते. अॅमेझॉन किंवा तत्सम कंपन्यांबरोबर हातमिळवणी करून फेसबुक ग्राहकांच्या आवडीनिवडी जोखून त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू समोर दाखवत राहतं. आपल्याला नको असलेल्या वस्तूंचं आकर्षण लोकांच्या मनात निर्माण करणं या उद्देशानं अनेक जाहिराती दाखवल्या जातात. या जाहिराती तयार करणाऱ्या कंपन्या ग्राहकांचं लक्ष जास्तीत जास्त वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यात विलक्षण चढाओढ चालू होते. कर्ज देणाऱ्या संस्था त्या वस्तू परवडणाऱ्या आहेत असा भास ग्राहकांसमोर निर्माण करतात. आपल्याला ग्राहक म्हणून प्रोग्रॅम करण्यासाठी हे सगळे सज्ज असतात. 

याचा परिणाम म्हणून अनेकांना इंटरनेटवर आल्यावर खरेदी केल्याशिवाय राहवत नाही. आता कंपलसिव्ह बाईंग, बाईंग अॅडिक्शन, ओनियोमॅनिया अशा अनेक नावांनी खरेदीचं व्यसन ओळखलं जातं. ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांमध्ये भावनिक नैराश्य आल्यावर खरेदी करणारे, योग्य आणि अचूक वस्तू आपण विकत घेतो याचा वृथा अभिमान बाळगणारे, आपण खूप पैसे उधळू शकतो आणि चकचकीत वस्तू आपल्याकडं आहेत असं दाखवायचा प्रयत्न करणारे, सवलतीच्या दरातली प्रत्येक वस्तू घेणारे, विकत घेऊन वस्तू परत करायच्या चक्रात अडकणारे आणि एखाद्या सेटमधला प्रत्येक रंग हवा अशा मनोवृत्तीचे – असे ग्राहकांचे प्रकारही तयार होतात. 

ऑनलाइन खरेदीची सवय व्यसनाकडं जायला लागली आहे हे कसं ओळखावं? तर ऑनलाइन खरेदी टाळावीशी वाटते पण जमतच नाही; ऑनलाइन शॉपिंगच्या इच्छेनं तुमच्या कामावर, नातेसंबंधांवर परिणाम होतो; ऑनलाइन शॉपिंगबद्दल तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी सतत तक्रार करतात आणि तुमचं त्यांच्याशी भांडण होतं; तुम्ही सतत ऑनलाइन शॉपिंगचा विचार करता; ऑनलाइन खरेदी करायला जमलं नाही तर चिडचिड होते; खरेदीवर नियंत्रण ठेवता येत नाही; ऑनलाइन खरेदी करून हलकं वाटतं; तुम्ही विकत घेतलेल्या वस्तू हा पैशांचा अपव्यय आहे असं समजून तुम्हाला लोक नावं ठेवतील म्हणून तुम्ही त्या वस्तू दाखवतच नाही;  क्रेडिट कार्डची बिलं लपवता; ऑनलाइन खरेदी केल्यावर अपराधी वाटतं; तुमचे इतर छंद जोपासायला तुम्हाला पुरेसा वेळ देता येत नाही; गरज नसलेल्या वस्तू परवडत नसतानाही तुम्ही अनेकदा खरेदी करता, त्यातून बॅंकेतले पैसे भराभर संपत जातात... असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन लागलं आहे असं खुशाल समजा. ऑनलाइन डीलसाठी तुमचं बजेट कोलमडत असेल, त्या वेबसाईट बघताना इतर महत्त्वाची कामं, समारंभ मागं पडत असतील, घरात वस्तू कुठं ठेवाव्या असा प्रश्‍न पडत असेल आणि खरेदी केलेल्या वस्तूंना एक आठवडा बाजूला ठेवून त्यांच्यावाचून तुमचं अडत नसेल तर ती वायफळ खरेदी आहे असं लक्षात घ्यावं. 

या व्यसनावर काही उपायही आहेत. मुख्य म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचे पैसे ऑनलाइन वस्तू बघण्यात आणि खरेदी करण्यात किती वाया जातात ते तपासा. त्यावर तुम्हाला वस्तूंची भुरळ घालणाऱ्या साईट्स ब्लॉक करणं हा महत्त्वाचा उपाय आहे. क्रेडिट कार्डची माहिती ऑनलाइन देऊ नये आणि तशी दिलेली माहिती काढून घ्यावी. ऑनलाइन खरेदी करून भावनिक पातळीवर चांगलं वाटतं. तसंच  जवळच्या माणसांसाठी खरेदी करणं, चांगली डील्स शोधण्यात आपण तज्ज्ञ आहोत याचा आनंद वाटतो. पण जवळच्या माणसांना तुम्ही वस्तूंपेक्षा वेळ देणं जास्त गरजेचं आहे. वर्षभर मुलाला वेळ देता आला नाही तर दिवाळीला त्याला लॅपटॉप घेऊन देणं हा उपाय नव्हे. तसंच तुमची जवळची व्यक्ती जर ‘अतिखरेदी करता’ असे इशारे देत असेल तर तिकडं दुर्लक्ष करू नका. 

मुळात अशा प्रकारे जास्त खरेदी करणाऱ्या बहुतांश लोकांचा सेल्फ एस्टीम कमी असतो. त्यांना असुरक्षितता भेडसावत असते आणि नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवता येत नसतं. आपण खरेदी केलेल्या वस्तूंमुळं आपल्याला छान वाटेल असा त्यांना भ्रम निर्माण होतो. त्या वस्तूंमुळं लोकांना आपण आवडायला लागू असंही वाटतं. तसंच अतिखरेदी करणाऱ्या अनेक लोकांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी फक्त पैसा असतो. आपलं समाजातलं स्थान सिद्ध करण्यासाठी, आपण यशस्वी आणि आनंदी आहोत हे दाखवण्यासाठी ते खूप वस्तू विकत घेतात. आपली स्वतःची आणि इतरांचीही किंमत ते वस्तूंवर करतात. Networth is not self-worth हे त्यांच्या लक्षातच येत नाही!    

संबंधित बातम्या