शेअरिंग इकॉनॉमी 

नीलांबरी जोशी 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

कॅनेडियन उद्योजक गॅरेट कॅंप यानं २००८ मध्ये आपली ‘स्टंबलअपॉन’ ही कंपनी ‘इबे’ या कंपनीला ७.५ कोटी डॉलर्सना नुकतीच विकली होती. त्यामुळं तेव्हा तो सानफ्रान्सिस्कोमध्ये ऐष करत होता. एका निवांत संध्याकाळी त्यानं जेम्स बॉंडच्या ‘कॅसिनो रोयाल’ या चित्रपटाची डीव्हीडी प्लेयरमध्ये सरकवली. त्या चित्रपटातल्या एका दृश्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. चित्रपटात तिसाव्या मिनिटाला जेम्स बॉंड आपल्या सोनी एरिकसनच्या स्मार्टफोनमध्ये पाहतो, तेव्हा त्याला तो चालवत असलेली गाडी बहामामधल्या एका ट्रेलवर चाललीय असं नकाशात दिसतं. आपण जिथं चाललोय त्या वाटेचा नकाशावर ‘ग्राफिकल आयकॉन’ दिसणं हा प्रकार कॅंपला भलताच आवडला होता…! 

कॅंप बालपणापासून कॉम्प्युटर ग्राफिक्सशी खेळतच मोठा झाला होता. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यानं आपल्याला हव्या त्या आवडीच्या वस्तू गुगलवर न जाता शोधता याव्यात यासाठी ‘स्टंबलअपॉन’ ही वेबसाइट तयार केली होती. १२ महिन्यांत या साइटचे वापरकर्ते ५ लाखांवरून २० लाखांवर पोचले होते. मग त्यानं ती कंपनी ‘इबे’ला विकली. 

सानफ्रान्सिस्कोमध्ये राहात असताना कॅंपकडे मर्सिडिज बेंझ ही गाडी असली तरी त्याला गाडी चालवायची विशेष आवड नव्हती. गाडी चालवण्याचा ताण घेण्यापेक्षा तो टॅक्सीनं जाणंच पसंत करायचा. याचवेळी सानफ्रान्सिस्कोच्या टॅक्सी सेवेशी त्याचा संबंध आला. सानफ्रान्सिस्कोमध्ये टॅक्सीचे परवाने फक्त १५०० जणांनाच मिळणार असा नियम होता. आपल्याकडचा टॅक्सी चालवण्याचा परवाना दुसऱ्याला विकताही येत नव्हता. त्यामुळं कोणाला नवीन परवाना हवा असेल तर पहिल्या परवानाधारकाच्या मृत्यूचीच वाट पाहणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळं ‘मागणीपेक्षा पुरवठा कमी’ या तत्त्वानं टॅक्सी मिळणं हा प्रकार सानफ्रान्सिस्कोमध्ये दुरापास्त होता. कॅंप मग सरळ अनेक टॅक्सीधारकांना फोन करून जो टॅक्सीवाला लवकरात लवकर येईल त्याबरोबर निघायचा. पण मग बोलावलेले इतर टॅक्सीवाले वैतागायचे. कॅंपच्या सहकाऱ्यांचीही हीच अवस्था होती. 

यावरून कॅंपला ‘कॅसिनो रोयाल’ चित्रपटामधलं ते आपली गाडी ट्रेलवर जाताना दिसण्याचं दृश्य आठवलं. ‘ऑन डिमांड कार’ मागवून प्रवासी आपल्या स्मार्टफोनमधल्या नकाशावर आपली गाडी कुठं पोचलीय ते पाहू शकतील अशी एक सेवा पुरवायचं त्याच्या डोक्यात आलं होतंच. कॅंपनं अशी सेवा देणारी एक कंपनी काढायची पक्कं केलं आणि त्या कंपनीचं नाव आपल्या वहीत नोंदवलं.. ‘उबर.’ 

‘उबर’ या जर्मन शब्दाचा अर्थ आहे अबॉव्ह! सर्वांच्या वर म्हणजे टॉपमोस्ट या अर्थानं तो शब्द कॅंपनं वापरला होता. २००९ मध्ये कॅंपला ट्रॅव्हिस कालानिक भेटला. त्या दोघांनी ‘उबर’ची सुरुवात सानफ्रान्सिस्कोमध्ये केली. काही काळातच न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, लंडन, पॅरिस, बीजिंग अशा जगातल्या ६३३ मोठ्या शहरांमध्ये उबर पोचलं. २०१६ मध्ये उबरची बाजारपेठेतली व्हॅल्यू ६८०० कोटी डॉलर्स होती. आज जगभरात उबर वापरणारे ११ कोटी लोक आहेत. कालानिक आणि कॅंप यांची प्रत्येकी नेट वर्थ आज ६०० कोटी डॉलर्स आहे. 

आपली स्वतःची गाडी फावल्या वेळेत चालवून पैसे कमावण्यासाठी कोणीही ‘उबर’बरोबर करार करू शकतं. तसंच ‘उबर’कडून गाडी भाड्यानं घेऊनही प्रवाशांना सेवा देता येते. ‘उबर’वरून टॅक्सी मागवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर एक अॅप डाऊनलोड करावं लागतं. त्यावर तुम्ही जिथं असाल ते ठिकाण आणि जिथं जायचं आहे ते ठिकाण निवडल्यावर उबर जवळपास कोणत्या मोटारगाड्या उपलब्ध आहेत ते शोधतं. त्यात तुम्हाला कोणत्या प्रकारची कार हवी आहे ते ठरवता येतं. कारच्या प्रकारावर दर बदलतात. मुख्य म्हणजे कार कुठून कशी चालली आहे ते स्मार्टफोनवर प्रवाशाला दिसत राहातं. सुरक्षिततेचा महत्त्वाचा प्रश्न यामुळं सुटतो. या संकल्पनेवर आता खाद्यपदार्थ पुरवणारी ‘उबर इट्‌स’ ही सेवाही सुरू झाली आहे. 

गंमत म्हणजे, ‘उबर’ ही जगातली पहिल्या क्रमांकाची कार सर्व्हिस असली, तरी काही स्वयंचलित गाड्या प्रायोगिक तत्त्वांवर सोडल्या तर त्यांची स्वतःची एकही मोटारगाडी नाही. केवळ दहा वर्षांपूर्वी एका अनोळखी माणसाच्या गाडीत बसणं आपल्याला जितकं विचित्र वाटलं असतं तितकंच अनोळखी माणसाच्या घरात जाऊन राहणं अशक्य वाटलं असतं. पण उबरनं पहिला प्रकार सोपा करून दाखवला, तर दुसरा प्रकार मान्यता पावला तो एअरबीएनबीमुळं! उबर आणि एअरबीएनबी या दोन कंपन्यांनी प्रवास कसा करायचा आणि आपल्याला परवडेल अशा ठिकाणी कसं राहायचं याचे नवीन पायंडे पाडले आहेत. ‘एअरबीएनबी’ ही आज जगातली सर्वांत मोठी हॉटेल कंपनी आहे, पण त्यांची स्वतःची एकही हॉटेल रुम नाही. या कंपनीचा प्रवासही उबरइतकाच सुरस आहे. 

वॉशिंग्टनमध्ये १९ जानेवारी २००९ च्या आठवड्यात सुमारे वीस लाख लोक अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या शपथविधी समारंभासाठी जमले होते. यात चार विशीतले तरुणही होते. त्यांच्याकडे ना समारंभाची तिकिटं होती, ना पुरेसे उबदार कपडे..! इतकंच काय आठवड्याभराच्या कार्यक्रमांचं वेळापत्रकही त्यांना ठाऊक नव्हतं. वॉशिंग्टन डीसीमध्ये राहण्यासाठी त्यांना एक अपार्टमेंट कसंबसं भाड्यावर मिळालं. तिथं त्यांना अक्षरशः जमिनीवर झोपावं लागलं. शपथविधीच्या दिवशी ते चौघेजण पहाटे तीन वाजता उठून दोन मैल चालत कसेबसे समारंभाच्या ठिकाणी म्हणजे नॅशनल मॉलला पोचले. त्यांना तिथं जेमतेम बसायला जागा मिळाली. थंडीत कुडकुडत बसलेले ते चौघेजण होते, ब्रायन चेस्की, जो गेब्बिया, नाथन ब्लेकारझॅक आणि मायकेल सिबेल. आज आठ वर्षांनंतर ब्रायन, जो आणि नाथन यांच्या ‘एअरबीएनबी’ कंपनीची बाजारपेठेतली किंमत (व्हॅल्यू) ३००० कोटी डॉलर्स आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये जमिनीवर झोपलेले हे तिघं आज प्रत्येकी ३०० कोटी डॉलर्सचे धनी आहेत. 

सानफ्रान्सिस्कोमध्ये एका मैलाच्या अंतरावर ऑफिसेस असणाऱ्या उबर आणि एअरबीएनबी या दोन कंपन्या विक्रीच्या, बाजारपेठेतल्या व्हॅल्यूच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या बाबतीत इतिहासात ‘फास्टेस्ट ग्रोईंग’ ठरल्या आहेत. 

आज जगातल्या १९१ देशांमधल्या ६५ हजार शहरांमध्ये ‘एअरबीएनबी’ची ३० लाख लॉजिंग्ज आहेत. ‘एअरबीएनबी’द्वारे सुटीत राहण्यासाठी, हॉस्टेल किंवा हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवासी आणि जागेचे मालक या दोघांकडूनही ‘एअरबीएनबी’ला पैसे मिळतात. ‘एअरबीएनबी’च्या मॉडेलनुसार आपल्याकडची जास्तीची बेडरुम, जास्तीचं अपार्टमेंट एखाद्या प्रवाशाला काही काळासाठी भाड्यावर देता येतं. ‘एअरबीएनबी’च्या साइटवर आपल्याला जिथं राहायचं असेल तिथं हव्या त्या दरात, हव्या तितक्या खोल्या असलेली जागा निवडता येते. उदाहरणार्थ, गोव्याला जायचं असेल तर समुद्रकिनाऱ्याजवळची हवी आहे का? किती खोल्या हव्या आहेत? घरात फ्रिज, वॉशिंग मशीन आहे की नाही? अशा अनेक प्रकारे  जागा शोधता येते. जागेचे फोटो वेबसाइटवर दिलेले असतात. ‘एअरबीएनबी’ प्रवाशांकडून ऑनलाइन बुकिंगच्या वेळी पैसे घेते. आपला वाटा वजा करून ज्यानं मालकाला प्रवासी 
राहून गेल्यानंतर पैसे देते. आपल्याकडच्या खोलीला भाडं किती आकारायचं ते मालक ठरवतो. 

ब्रायन चेस्की हा ‘एअरबीनबी’चा सीईओ २०१५ च्या टाईम मासिकाच्या १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत होता. तर ४० वर्षांखालच्या अमेरिकेतल्या तरुण उद्योजकांच्या फोर्ब्जच्या यादीतही तो दोनवेळा झळकला होता. मे २०१५ मध्ये ओबामा या अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांनी चेस्कीला ‘अॅंबॅसिडर ऑफ ग्लोबर आंत्रप्रेन्युअरशिप’ हा किताब दिला. 

या दोन्ही कंपन्यांच्या यशाला काही इतर तत्कालीन कारणंही आहेत. या कंपन्या सुरू होण्याआधी काही महिने अॅपलच्या स्टीव्ह जॉब्जनं ‘आयफोन-७’ची घोषणा केली होती. त्यात इतर कंपन्यांची मोबाईल अॅप्स चालणार होती, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. इंटरनेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं ब्रॉडबॅंडला तेजीचे दिवस आले होते. अनेकजण आपलं आयुष्य हातात मावणाऱ्या आणि खिशात सहजी सरकवता येणाऱ्या स्मार्टफोन्सद्वारे ऑनलाइन जगायला लागले होते. या सगळ्याचा फायदा ‘एअरबीएनबी’ आणि ‘उबर’ या दोन्ही कंपन्यांना झाला नसता तरच नवल! 

इंडस्ट्रीजमध्ये झपाट्यानं घडलेल्या बदलांनाच आता ‘उबरिफिकेशन’ किंवा ‘उबरायझेशन’ असं म्हटलं जातं. ‘एअरबीएनबी’ आणि ‘उबर’ ही आज ‘शेअरिंग इकॉनॉमी’तली महत्त्वाची नावं आहेत. मालमत्ता किंवा सेवा या गोष्टी विकत किंवा मोफत शेअर करणाऱ्या आर्थिक व्यवस्थेला ‘शेअरिंग इकॉनॉमी’ म्हणतात. भटकं जीवन जगणारा आदिम काळातला माणूस कळपानं राहात होता. त्याच्या मालकीच्या वस्तू फार कमी होत्या. तेव्हा शेअरिंग इकॉनॉमी होतीच. पण सुमारे १० हजार वर्षांपूर्वी आपण शेतीप्रधान व्यवस्थेत मालकीच्या वस्तू जमवायला सुरुवात केली. त्याचा आज अतिरेक झाला आहे. सर्वसाधारण अमेरिकन घरांमध्ये आज ३ लाख वस्तू असतात. ब्रिटनमध्ये १० वर्षांच्या मुलाकडं २३८ खेळणी असतात आणि तो त्यापैकी १२ खेळण्यांशी जेमतेम खेळतो. त्यामुळं आपल्याला गरजेच्या नसणाऱ्या वस्तू, आपल्या अतिरिक्त क्षमता आणि उपलब्ध असणारा अतिरिक्त वेळ जर शेअर केला तर त्याचा योग्य वापर होईल हे ‘शेअरिंग इकॉनॉमी’चं मूलतत्त्व आहे. 

बॅंकेकडं न जाता एकमेकांना पैसे देणं, घरकाम, घरातल्या किरकोळ दुरुस्त्या आणि नर्सचं काम करणं अशा सेवा पुरवण्यासाठी एकत्र येऊन एखादी कंपनी काढणं किंवा हमरस्त्यावर एखाद्याला आपल्या गाडीतून लिफ्ट देणं हीदेखील ‘शेअरिंग इकॉनॉमी’चीच उदाहरणं आहेत. या पद्धतीत तुम्हाला सेवा जलद मिळू शकतात. एकत्रितपणे गोष्टी केल्यानं मानसिक ताण कमी होतो. पैसे मिळवण्याचे जास्तीत जास्त मार्ग उपलब्ध होऊ शकतात. ‘शेअरिंग इकॉनॉमी’ ही इंटरनेटमुळं सोपी झालेली प्रक्रिया आहे. 

बदलत्या जगात स्मार्टफोन्सचा वापर समाजमाध्यमं वापरून वेळ वाया घालवण्यासाठी करता येतो, तितकाच उद्योजकतेच्या नवीन संधी शोधून त्या संधींचं सोनं करण्यासाठीही करता येतो. अनेक स्टार्ट अप्स आपले उद्योगधंदे सुरू केल्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांद्वारे वाढवतात. तुम्ही एअरबीएनबी किंवा उबरप्रमाणं या बदलत्या तंत्रज्ञानाचा एक भाग होणार, स्वतः धोका पत्करून नवीन संकल्पनेवर आधारित व्यवसाय/नोकरी करणार; की तटस्थपणे या बदलाचे फक्त साक्षीदार होणार हे पूर्णपणे तुमच्याच हातात आहे.    

संबंधित बातम्या