लाइक्सच्या चकव्यामागचं मानसशास्त्र 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 9 डिसेंबर 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

‘पण हृषिकेश आणि समृद्धीला दरवर्षीच कसं डान्समध्ये घेतात? परत गाणं गायलाही ते असतातच. सगळे टीचर्स वर्गात मदतीला त्यांनाच बोलावतात. मागच्याच आठवड्यातली गोष्ट. तनिषचा घसा बसला होता. मग तनिषला ‘हात लावेल त्याचाही घसा बसेल रे..’ असा धमाल खेळ सुरू झाला.. आमच्या सगळ्यांचीच पकडापकडी, आरडाओरडा चालू होता. हृषिकेश आणि समृद्धी तेवढ्यात म्हणाले, ‘आम्ही यावर औषध शोधलं आहे बरं का..’ मग त्यांनी त्यांच्या बॉटलमधलं पाणी सगळ्यांना औषधासारखं द्यायला सुरुवात केली. खरं तर हृषिकेश/समृद्धीच्या आधी निखिल सांगत होता, ‘मी औषध शोधलंय..’ पण त्याच्याकडं कोणी लक्षच देत नव्हतं. सगळे रांग लावून हृषिकेश/समृद्धीचं औषध पीत होते..!’ सकाळीच शाळेत जाऊन आलेला सहा वर्षांचा निनाद आईला हे सगळं सांगत होता. 

असे हृषिकेश आणि समृद्धी सगळ्याच शाळांमध्ये असतात. ‘कुछ कुछ होता है’मधली अंजली सुरुवातीला टीनाला सांगते ‘माझं आणि राहुलचं इथं सगळं ऐकतात..’ तोच हा प्रकार.. अर्थात काही निखिलही असतात. ते तुलनेनं कमी लोकप्रिय असतात. बाकीचे सगळे मधे कुठंतरी असतात. नंतरच्या आयुष्यातही ते लोकांमध्ये प्रिय असतात. कोणत्याही वर्गात, कंपनीत किंवा समाजसमूहात असे एक-दोघं असतातच. 

लोकप्रियतेचं महत्त्व आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच आपल्यावर ठसतं.  मग एकतर ‘आपण कोणीतरी विशेष आहोत, आपलं कौतुक होतंय’ हे आपल्याला कळतं आणि ती लोकप्रियता कशी टिकवायची याची आपण चिंता करायला लागतो किंवा ‘इतर कोणीतरी खूप लोकप्रिय आहे’ हे आपल्याला कळतं आणि आपल्याकडं इतरांचं जास्त लक्ष जावं यासाठी आपण तळमळायला लागतो. शाळेत, नंतर कॉलेजमध्येही या झळकणाऱ्या मुलांसारखं आपण असावं या स्वप्नापुढं सगळं तुच्छ भासतं. 

लोकप्रिय असणं हे आयुष्यभर आपल्यावर या ना त्या प्रकारे परिणाम करत असतं. आपण कुठंही असलो तरी आपला आत्मविश्वास, आपल्याला भेडसावणाऱ्या गोष्टी, आपला आनंद, आपली नाती अशा अनेक गोष्टी आपण शाळेत असताना लोकप्रिय होतो की नाही याच्याशी निगडित असतात. एखादा माणूस मान्य करो वा न करो, लोकप्रिय असावं या आकर्षणामागं तो कायम धावतच असतो. समाजात जे लोकप्रिय असतात त्यांच्याबरोबर संवादाची संधी शोधतो. ते कसं करता येईल याचे मार्ग शोधतो. आपण जोडत असलेली नाती, मुलांना वाढवताना अवलंबत असलेले मार्ग सगळ्यामागं आपलं लोकप्रियतेचं सुप्त आकर्षण दडलेलं असतंच. 

पण लोकप्रिय असावं असं वाटणं ही माणसाची सहजप्रवृत्ती असली, तरी लोकप्रिय असणं दरवेळी चांगलंच असतं असं नाही. महत्त्वाचं म्हणजे लोकप्रियता दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेटसला महत्त्व दिलं जातं. शाळेत शारीरिक सौंदर्य, बळ, आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक स्तर अशा कोणत्यातरी स्टेटसच्या जोरावर सगळ्यांच्या पुढं असणारा तो किंवा ती यांचा द्वेष करणारेही अनेकजण असतात. अशा स्टेटसला महत्त्व देणारे लोक आपल्या मर्जीप्रमाणं इतरांना हवं तसं वाकवतात. 

दुसऱ्या प्रकारातल्या लोकप्रिय लोकांशी आपल्याला अंतर्मनातल्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. अशा व्यक्तींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची, लाईकेबिलिटी. अशा लोकांबरोबर बोलायला, त्यांच्या खांद्यावर विश्वासानं मान टेकवायला आपल्याला आवडतं. त्यांच्याबरोबर वेळ पटापट संपतो. स्टेटस आणि लाईकेबिलिटी या दोन्हीमुळे मिळणाऱ्या लोकप्रियतेतला फरक अनेकजणांना ओळखता येत नाही. ते चुकीच्या लोकप्रियतेमागं धावतात. 

पण टीनएजमध्ये असताना मात्र स्टेटसमुळं लोकप्रिय असणाऱ्या मित्रमैत्रिणींचं जास्त आकर्षण वाटतं. त्यांच्यासारखं कूल असावं असं वाटतं. त्यासाठी या वयात होणारे हार्मोनल बदल महत्त्वाचे ठरतात. टीनएजच्या सुरुवातीला मेंदूची वाढ जितक्या नाट्यमय रीतीनं होते तितक्या नाट्यमयतेनं नंतरच्या आयुष्यात कधीच होत नाही. या वयात मुलांचा मेंदू जास्त कार्यक्षमतेनं काम करायला लागतो. बालिश विचारांमधून तर्कशुद्ध, विश्लेषणात्मक, चिंतनशील पद्धतीच्या विचारांकडं त्यांची वाटचाल सुरू होते. याबरोबर ‘स्व’ची जाणीव प्रखर व्हायला लागते. तेव्हा कार्यक्षमता वाढल्यामुळं भोवतालच्या जगातल्या अनेक गोष्टी टिपण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी मेंदू तत्पर असतो. या माहितीतून आपण कोण आहोत याची जाणीव महत्त्वाची वाटायला लागते. मग इतरजण आपल्याला काय म्हणतात, ते आपलं कौतुक करतात का? त्यातून आपण समाजात कोणत्या पातळीवर उभे राहतो? याचा विचार सुरू होतो. या वयात चांगलं काय आणि वाईट काय हे मेंदू पक्कं करतो. मग स्टेटस असणाऱ्या व्यक्ती चांगल्या, महत्त्वाच्या असतात हा विचार रुजू शकतो. हा विचार पक्का होत जातो. स्टेटस असणाऱ्या व्यक्तींची लोकप्रियता तेव्हा मनात ठसते. आयुष्यभर त्यांचं साहचर्य मनात राहतं. 

त्यामुळं पालक मुलांना ‘अभ्यासाकडे लक्ष दे’ किंवा ‘पालेभाज्या खात जा’ असे सल्ले या वयात देत असतात तेव्हा मुलांना मात्र भरपूर मार्क, चांगलं आरोग्य वगैरे गोष्टी क्षुल्लक वाटत असतात. आपल्या शाळा/कॉलेजमध्ये झळकणाऱ्या लोकप्रिय मुलांसारखं आपल्याला का वागवलं जात नाही हे त्यांना सर्वांत महत्त्वाचं वाटत असतं. मग स्वप्नाळूपणे त्या मुलांसारखं जगायचा प्रयत्न केला जातो. मोठेपणी मात्र आपलं शिक्षण, करिअर, आर्थिक स्थिती ही आपल्या शाळेतल्या मार्कांवर ठरते हे त्यांच्या लक्षात येतं. लहानपणापासून पालकांनी जपलेल्या खाण्याच्या योग्य सवयी आपल्या आरोग्याला उपकारक ठरतात हेही कळतं. 

पण मोठेपणीही शाळा/कॉलेजमध्ये असलेल्या लोकप्रिय मुलांचं महत्त्व मनातून सगळ्यांना वाटत असतंच. याबद्दल अमेरिेकेत सैनिकांवर झालेलं एक संशोधन वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

१९५० ते १९७० दरम्यान अमेरिकेत दुसरं महायुद्ध आणि व्हिएतनामबरोबरचं युद्ध यामुळं निवृत्त सैनिकांची संख्या भरमसाठ झाली होती. युद्धभूमीवरून परतलेल्या बऱ्याच सैनिकांना मानसोपचारांची गरज भासत होती. याच काळात अमेरिकेनं मानसिक आरोग्य या क्षेत्रासाठी भक्कम आर्थिक सहाय्य पुरवलं होतं. या दरम्यान अमेरिकेत ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ’ स्थापन झाली. अनेक विद्यापीठांमध्ये मानसशास्त्राचे स्वतंत्र विभाग सुरू झाले. सैनिकांच्या मानसिकतेवर संशोधन करणारे अनेक मानसोपचारतज्ज्ञ तेव्हा उपलब्ध होत होते. 

युद्धात काही सैनिकांनी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. काहीजण मात्र कामगिरी अर्धवट सोडून परत आले होते. असं का झालं असावं? यावर यांच्यापैकी काही मानसशास्त्रज्ञ संशोधन करत होते. तेव्हा सैनिकांचे आयक्यू, त्यांचा शाळांमधला परफॉर्मन्स, त्यांचा सामाजिक-आर्थिक स्तर, पालकांबरोबरचे त्यांचे संबंध, त्यांच्यात दिसणारी भावनिक लक्षणं आणि आक्रमक प्रवृत्ती या गोष्टी विचारात घेतल्या होत्या. या संशोधनावरून शालेय जीवनात या सैनिकांची लोकप्रियता आणि सैन्यातला त्यांचा परफॉर्मन्स यांचा थेट संबंध लागला होता. 

यानंतरच्या काळात सैनिक सोडून इतर नागरिकांवर अशाच प्रकारे नंतर दोन दशकं संशोधनं झाली. त्यातही एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, कौटुंबिक पार्श्वभूमी, तिला जाणवणारे मानसिक ताणतणाव आणि तिचे पालकांबरोबरचे नातेसंबंध यापेक्षा शालेय जीवनातल्या लोकप्रियतेवर ही माणसं आयुष्यात किती आनंदी होती ते अवलंबून असल्याचं लक्षात आलं होतं. काम करणं एंजॉय करता का, पालकत्व हे ओझं वाटतं की आनंदाचा भाग वाटतं, समाजात आपण महत्त्वाचे घटक आहोत असं वाटतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्यक्तींच्या लहानपणीच्या लोकप्रियतेत सापडत होती. 

लहानपणी लोकप्रिय असलेले लोक आपण जोडीदाराबरोबर आनंदात असल्याचं, कामाच्या ठिकाणी चांगले नातेसंबंध असल्याचं आणि समाजात महत्त्वाचे घटक असल्याचं त्यांना वाटत असल्याचं सांगत होते. आपण शाळेत लोकप्रिय नव्हतो अशा आठवणी असणारी माणसं याच्या उलट सांगत होती. शाळेत लोकप्रिय नसलेल्या लोकांना कायम आपली उपेक्षा झाल्याची भावना सतावत होती. 

समाजमाध्यमांवर भरपूर लाइक्स मिळणं हे बहुसंख्य लोकांना का महत्त्वाचं वाटतं? याचा या उपेक्षित भावनेशी थेट संबंध आहे. आपल्या पोस्टला किती लाइक्स मिळाले यावर अनेकांचा मूड आणि रक्तदाब अवलंबून असतो. याचं कारण म्हणजे, २००४ मध्ये फेसबुक सुरू झाल्यानंतर आपली लोकप्रियता वाढवण्याचा एक मार्ग समाजातल्या बहुसंख्य लोकांना उपलब्ध झाला. 

आजकाल जे लोकप्रिय असतात ते फेसबुकवर आपली लोकप्रियता वाढवण्याचे अनेक प्रयत्न करतात. ज्या क्षेत्रात ते लोकप्रिय असतात त्याबद्दलचं लिखाण, फेसबुक लाइव्हचा वापर करून लोकांसमोर अनेकदा येणं असे अनेक प्रकार ते वारंवार करतात. पण हे माध्यम सगळ्यांनाच खुलं असल्यामुळं वास्तव जीवनात फारसे लोकप्रिय नसलेले सर्वजणही तिथे पोस्ट्स, फोटो, कॉमेंट्स टाकत असतात. फेसबुकवर आपल्या पोस्टला लाइक्स मिळाल्यामुळं समाजानं आपल्याला मान्य केलं आहे अशी भावना मेंदूपर्यंत पोचते. ती हवीहवीशी सुखद भावना प्राप्त करून घ्यायला आपण फेसबुक जास्तीत जास्त वापरायला लागतो. 

त्यातच फेसबुक सुरू झाल्यावर पाच वर्षांनंतर म्हणजे २००९ मध्ये फेसबुकनं लाइक बटण सुरू केलं. फेसबुकवर लाइक बटण असावं का? यावर मार्क झुकेरबर्ग दोन वर्षं विचार करत होता. या बटणासाठी त्याचा होकार मिळायला दोन वर्षं गेली होती. मात्र लाइक बटण आल्यानंतर फेसबुक जास्त लोकप्रिय झालं. 

टीनएजर्स मुलांना तर अचानक खूप पैसे मिळाल्यानंतर किंवा आवडतं चॉकोलेट खायला मिळाल्यानंतर त्यांच्या मेंदूत जसा बदल होतो तसा सोशल मीडियावर लाइक मिळाल्यानंतर होतो असं संशोधनात दिसून आलं आहे. आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्या ज्या पोस्टला जास्त लाइक केलं असेल तशाच पोस्ट्स टाकण्याकडं टीनएजर्सचा कल असतो. 

अर्थात हे टीनएजर्सपुरतं मर्यादित नाही. आता तुम्ही फेसबुक कसं वापरता ते आठवून पाहा. फेसबुक पेजवर तुम्ही एखादा फोटो, पोस्ट टाकता किंवा मित्रांच्या पोस्टला लाइक करता. त्यानंतर काही सेकंदांत फेसबुकवर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात आपल्या अकाऊंटवर काहीतरी हालचाल झालीय का हे धडधडत्या अंतःकरणानं पाहता. ती हालचाल दिसली तर आपल्या फोटोला/पोस्टला किती लोकांनी लाइक केलेलं आहे, कॉमेंट टाकलेली आहे ते दिसतं. इतक्या लोकांनी आपण पोस्ट केलेलं पाहिलं आणि त्यांना ते आवडलं हे आपल्याला कळतं. आपलं कोणालातरी कौतुक वाटतंय यानं आपल्याला एक स्टेटस प्राप्त झाल्यासारखं वाटतं. अशा सतत मिळणाऱ्या लाइक्सवरून आपण लोकप्रिय आहोत असं वाटतं. एकदम छान वाटायला लागतं. एकदा हे लाइक मिळायला लागल्यानंतर ते छान वाटणं परतपरत अनुभवावं असं वाटण्याची प्रक्रिया मेंदूत घडायला लागते. मग एखादा महत्त्वाचा प्रकल्प संपवताना किंवा नवीन कौशल्य शिकताना जसं त्यात गढून जातो तसं आपण फेसबुकवर पोस्ट्स टाकण्यात गढून जातो. शाळा/कॉलेजमध्ये प्राप्त न झालेली लोकप्रियता आपण अशा प्रकारे मिळवायचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात, समाजमाध्यमांनी निर्माण केलेल्या लाइक्सच्या चकव्यात आपण अलगद शिरलेले असतो...!

संबंधित बातम्या