आठवणीतला रांगणा...

अमित कागवाडे  
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

ट्रेककथा
 

छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जन्म घेतलेल्या आणि त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेणाऱ्या प्रत्येकाला गडकिल्ल्यांना भेट देण्याचा मोह न झाल्यास नवलच. त्याप्रमाणंच माझ्याही मनात गडकिल्ल्यांना भेट देण्याची तळमळ सतत सुरू असते. खरं तर, माझा पहिला ट्रेक झाला तो सिहंगडाचा आणि तोही पायथ्यापासून. दहावीनंतरच्या सुटीमध्ये आत्याकडे पुण्याला गेलो आणि सर्व भावंडाबरोबर सिंहगड भेटीचा प्लॅन ठरला. काय सांगू त्या दिवशीचा तो आनंद अवर्णनीयच होता... आणि आजही तसाच मनात कायम आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये वाचलेला 'गड आला पण सिंह गेला' हा धडा... आणि अचानक त्याचा नायक तानाजी मालुसरे यांचा बालमनावर उमटलेला ठसा. ती गोष्ट ऐकताना धमन्यांमधून रक्त सळसळत होतं... त्यातूनच संचारलं वीरत्व आणि सर केला सिंहगड! गड चढल्यावर गडावरून दिसणारी विहंगम दृश्‍यं, तानाजींची समाधी, टिळकांचा बंगला, दूरदर्शनचा टॉवर, पाण्याचं देवटाकं, तानाजीचा कडा, प्रशस्त खेळण्यासाठी सपाट जागा, दाट झाडी आणि झुणका-भाकर. दही मातीच्या गाडग्यातलं थंड, गोडदही... म्हणजे खवय्यांची पर्वणीच. श्रमपरिहार झाल्यावर पुन्हा ताजतवानं होऊन गड उतरण्याची तयारी. एक साहसी जिद्दीनं पेटलेलं मन धावत धावत... धडपडत... सावरत... सांभाळत उतरतं आणि वळून पुन्हा गडाकडं पाहतं आणि अर्थातच ओठी शब्द येतात, अबब! एवढ्या वरती चढलो होतो? तसं गड चढायला सुरुवात करताना गडाच्या शिखरावर कटाक्ष टाकल्यावरचा अबब! किंवा अरे बापरे! आणि उतरून मागे वळून पाहिल्यावरचा अबब! अरे बापरे!... किती फरक... शब्द तेच, पण भाव व भावना वेगळ्या... 

असाच अनुभव पुन्हा अनुभवण्यासाठी मनाशी निश्‍चय पक्का केला, की गड किल्ले सर करायचेच आणि ती संधी मिळाली कॉलेजच्या  एनसीसी कॅंपमुळे. एनसीसीध्ये असताना रांगणा किल्ल्यावर जायचं ठरलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी गावामधून एसटीनं पाटगाव धरणावर आमची २० कॅडेट्‌सची स्वारी पोचली... आणि तिथून सुरू झाला पायी प्रवास. सर्व २० जणांवर नियंत्रण न ठेवू शकणाऱ्या आमच्या एकट्या फारणे सरांनी दोन दोन कॅडेट्‌सची 'बडीज' म्हणजे जोडी केली. म्हणजे दोघांनीही सतत एकत्र राहायचं. वेगळं जायचं असल्यास एकमेकांना सांगून जायचं, जेणेकरून एकमेकांकडून एकमेकांची काळजी घेतली जाईल. खरंच खूप मस्त नियोजन होतं ते. कारण त्यामुळं प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव तर राहिलीच, पण संपूर्ण मोहीम पूर्ण होईपर्यंत आपल्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे असा आत्मविश्‍वासही निर्माण झाला. कारण पुढचा संपूर्ण पायी प्रवास हा जवळजवळ ३० किलोमीटरचा आणि घनदाट जंगलातूनच होता. आमच्यापैकी दोघंजण अगोदर या वाटेवरून जाऊन आल्यामुळं तशी फारशी काळजी नव्हती. जसजसं पुढं पुढं जात होतो, शिवाची गाणी गात होतो! शिवरायांचा जयजयकार करत होतो. रस्ता चुकण्याचा संभव नव्हता. कारण जागोजागी झाडांवर, दगडांवर चुन्याचे ठिपके मारून अगोदरच्या वाटसरूंनी दिशादर्शक खुणा करून ठेवल्या होत्या. तसंच काही ठिकाणी लाल रंगाचं कापडही बांधून वाट दाखवण्याची योजना केली होती. चालत असताना वाटेत रानगव्यांनी दर्शन देऊन त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीच. 

सकाळी ११.३०-१२ वाजण्याच्या दरम्यान हा पायी प्रवास सुरू होण्यापूर्वी पोटपूजा उरकून घेतल्यानं आणि गडावर पोचल्यावरच जेवण करायचा निर्णय घेतल्यानं आम्ही अविरत चालत होतो. एव्हाना दोन डोंगर चढून वर आलो होतो. तसंच दोन दऱ्यासुद्धा ओलांडल्या होत्या. परंतु, चालता चालता पुन्हा एका दरीकडं जातोय हे लक्षात येताच मनात शंकेची पाल चुकचुकली, की आपण रस्ता तर चुकलो नाही ना? आणि ती शंका खरी होती. कारण पुढं कुठंही चुन्याची अथवा कापडाची खूण मिळत नव्हती. पायही चालून चालून थकले होते म्हणून परत फिरले ते आतापर्यंत मिळालेल्या शेवटच्या खुणेपर्यंत. तेव्हा लक्षात आलं, की एक सपाट जागा होती. पण आजूबाजूनं घनदाट झाडीही होती. आमच्यापैकी अगोदर येऊन गेलेल्या त्या दोघांनाही काही समजेना की कोणत्या दिशेला जायचं आहे. कारण ते जेव्हा येऊन गेले होते, तेव्हा मे महिना होता. तेव्हा एवढं जंगल, झाडी नव्हती... आणि आम्ही आलो होतो सप्टेंबर महिन्यात. आता एकानं दुसऱ्याच्या खांद्यावर उभं राहून पाहायचं म्हटलं तरी किल्ला कोणत्या दिशेला आहे ते दिसणं अशक्‍य होतं. मग ठरवलं की चार दिशांना चार बडीज पाठवायचे आणि अचूक रस्ता शोधायचा. त्याप्रमाणं मी व माझा बडी 'अविष्कार' हा त्याच्या नावाप्रमाणंच अविष्कार करण्यासच की काय एका दिशेला निघालो. थोडंफार पुढं गेल्यावर त्या रस्त्याला अजून एक रस्ता फुटला होता. आम्ही दोघांनी प्रत्येकी एक रस्ता निवडला आणि एकमेकांना आवाज देत पुढं पुढं जायचं ठरवलं. जोपर्यंत एकमेकांचा आवाज एकमेकांना ऐकू येईल, तोपर्यंत चालायचं आणि आवाज ऐकू यायचा कमी झाला, तर परत फिरायचं ठरलं. त्याप्रमाणं आम्ही एकमेकांच्या नावाचा घोष करत करत पुढं चालू लागलो आणि पुन्हा एकत्र भेटलो. कारण तो रस्ता पुन्हा एकाच ठिकाणी जुळला. तसंच त्या रस्त्यावर चुन्याच्या खुणादेखील सापडल्या. साधारणपणे वनखात्याची जीप जाईल एवढा मोठा रस्ता होता तो. खात्री पटल्यावर आम्ही आत्मविश्वासानं परत फिरलो आणि सर्वांना आमच्यामागं यायला सांगितलं. पुन्हा सुरू झाला पायी प्रवास त्या निर्मनुष्य घनदाट जंगलातून. सूर्यास्त होऊन अंधार होणाऱ्या क्षणालाच आम्ही पोचलो त्या जंगलातल्या एका गावात. गावाचं नाव होतं 'चिकाची वाडी'. ही वाडी होती चाळीस एक घरांची. गावकऱ्यांनी चहाची व्यवस्था केली आणि चहा घेता घेताच सूर्यनारायणही अस्ताला गेला. आम्हाला पुढच्या प्रवासासाठी कोणीतरी रस्ता माहीत असणारी व्यक्तीबरोबर हवी होती. एका गावकऱ्यानं कंदील घेऊन आमच्याबरोबर येण्यास संमती दर्शवली आणि सुरू झाला आमचा पुढचा प्रवास! अंधारात समोरचं काहीच दिसत नव्हतं. गावकऱ्यानं दिलेल्या सूचनेनुसार आम्ही फक्त एकमेकांचे हात धरून चालत होतो. थोड्या अंतरावर गेल्यावर चढण चढत आहोत असं जाणवू लागलं. इतक्‍यात गावकऱ्यानं एक सूचना केली. ''डाव्या बाजूनंच चाला, उजव्या बाजूला दरी आहे.'' हे ऐकताच आम्ही डाव्या बाजूच्या डोंगराला बिलगूनच चालत राहिलो. साधारण अर्धा तास असंच अंधारात चालल्यानंतर आम्ही गडावर पोचल्याचं गावकऱ्यानंच आम्हाला सांगितलं व समोरच्या एका पडक्‍या देवळामध्ये नेलं. तिथंच चूल मांडून स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. गावकऱ्यानं सकाळी येतो सांगून आमचा निरोप घेतला. बरोबर आणलेल्या स्वयंपाकाच्या साहित्यानं आमच्या सवंगड्यांनी स्वादिष्ट स्वयंपाक केला आणि शिवरायांच्या पराक्रमाच्या आठवणी जागवत, गप्पा मारत मारत आम्ही त्याचा आस्वाद घेतला. थोड्या वेळात झोपी गेलो. सकाळी उजाडल्यावर सर्वांत पहिल्यांदा उठून मी व माझे काही सवंगडी औत्सुक्‍यापोटी पळालो ते अशा ठिकाणी ज्या ठिकाणाहून आम्ही रात्री आलो होतो, ती दरीकाठची वाट पाहण्यासाठी! पाहतो तर काय... ती वाट बघून काळजात धस्स झालं. कारण काळजाचा ठोका चुकेल अशीच ती पायवाट होती. डाव्या बाजूला उत्तुंग डोंगर व उजव्या बाजूला खोल दरी. कदाचित एखादा जरी चुकून उजव्या बाजूला झुकला असता तर...! 

प्रातःविधी व स्नान आटोपेपर्यंत तो गावकरी दूध घेऊन गडावर हजर झाला होता. त्यामुळं रोजच्याप्रमाणं चहाच्या मेजवानीत काही खंड पडला नाही. गावकऱ्यांबरोबर गप्पा मारताना माहिती मिळाली, की शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी या गडाची निवड केली होती. आजही दररोज संध्याकाळी साधारण पाच ते साडेपाचच्या दरम्यान आकाश स्वच्छ व निरभ्र असल्यास या गडावरून समुद्र दिसतो. खरंच हे ऐकून, शिवरायांच्या दूरदृष्टीच्या कौशल्यानं अचंबित झालो. तसं किल्ल्यावर एकदोन पडकी देवळं सोडल्यास काही काही शिल्लक राहिलं नव्हतं. मात्र, मनामध्ये शिवरायांचा इतिहास अगदी ओतप्रोत भरलेला होता. तो घेऊनच किल्ला उतरण्याची तयारी सुरू झाली. आमच्याकडचे शिल्लक कांदे, तांदूळ आम्ही गावकऱ्यांकडं सुपूर्द केलं. खरंच या गावकऱ्यांचे आभार मानावेत तेवढं कमीच आणि कौतुक करावं तेही नसे थोडके. कारण त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी त्यांची गुजराण या वाडीतच होत असे. बाह्यजगताशी संपर्काचं काही कारणच नसे. अन्न इथंच पिकवायचं आणि खायचं. डॉक्टर, दवा इथलेच वनस्पती. ना वीज ना रस्ते-वाहतूक. मग टी.व्ही., मोबाईल तर दूरच. आजही वीज, रस्ते नाहीतच. कारण संपूर्ण डोंगराळ व जंगलमय प्रदेश आहे हा. परिस्थिती बदलली, ती म्हणजे डॉक्‍टर, मार्केट व शाळांशी संबंधित खालच्या गावांशी संपर्क वाढलाय. मुलं शिकलीत व नोकरीसाठी पुण्या-मुंबईत आहेत, एवढंच.

हे सारं ऐकून अनेक प्रश्‍न मनात घेऊन गड उतरण्यास सुरुवात केली. पुन्हा एकमेकांना सावरत, सांभाळत, झपाझप पावलं टाकीत गड उतरताना हिरव्यागार वृक्षवेलींच्या सहवासातून चालू लागलो. आता मात्र जाण्याची वाट वेगळी होती. कारण आम्ही गडाच्या दुसऱ्या दिशेनं गड उतरण्यास सुरुवात केली होती. नियोजनाप्रमाणं पाटघर धरणाच्या बाजूनं गड चढून नेरुळ सावंतवाडीच्या दिशेनं उतरून सावंतवाडीहून एसटीनं परतण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणंच परतीचा प्रवास सुरू केला. थोड्या वेळानं समोरून दोन तीन माणसं गड झपाझप चढताना दिसली. त्यातला एक मनुष्य वयस्कर दिसत होता. पण चाल मात्र विशीतल्या तरुणाला लाजवेल अशी होती. चौकशीअंती त्याचं वय ७० असल्याचं समजलं. पण ते खूपच काटक होते. काही अंतरावर जाताच आमच्यापैकी एकाला हिरवागार सर्प दिसला आणि पुन्हा एकदा जंगलाची थरारक जाणीव होऊन आम्ही साहसमय व धाडसी मनानं गडाच्या पायथ्याला नारूर गावी पोचलो. नारूर-सावंतवाडी एसटीनं परतीच्या प्रवासाला लागलो ते या निश्‍चयानंच, की असे साहसी ट्रेक पुन्हा पुन्हा करायचे. जय शिवराय जय महाराष्ट्र!   

संबंधित बातम्या