अविस्मरणीय वासोटा
ट्रेककथा
मी आणि माझी जीवश्चकंठश्च मैत्रीण स्मिता घोलप. आम्हाला नववी-दहावीतच गडबाधा झाली आणि मग काय सुटलोच आम्ही! पुढं कॉलेजला गेल्यावर तर घरात पाय ठरेनासाच झाला. सगळे रविवार, सगळ्या सुट्या गड, गड आणि गडच! कोणत्याही गडावर जायच्या आधी त्याची सर्व माहिती मिळवून, अभ्यास करून जायचो. गोनिदा तसंच प्र. के. घाणेकर यांची पुस्तकं आमची गाईड्स असायची. राजमाची, रायगड, तोरणा, तुंग, तिकोना... अशा वाऱ्या सुरू झाल्या. रायगड २५ वेळा झाल्यावर आम्ही मोजणं थांबवलं. पण दरवेळेला व्हायचं काय, मी आणि स्मिता प्रत्येकवेळी फिक्स असायचो, पण घरी किमान ४-५ डोकी तरी दाखवायला लागायची. तिचा भाऊ संजू आणि माझा भाऊ अभिजित हक्काचे होते. पण परीक्षा असेल, तर त्यांचा नाइलाज असायचा. मग मित्रमंडळींपैकी एक-दोघांना घोड्यावर बसवून घरी आवश्यक तेवढी डोकी कशीबशी दाखवायचो. पण काही झालं, तरी जायचो म्हणजे जायचोच... आणि हो, मग आई-बाबांचाही नेहमी सक्रिय पाठिंबा असायचा.
एकदा काय झालं, माझा एमएस्सीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. सकाळी मी पेपरला जायच्या गडबडीत होते. तोच स्मिता धावतपळत आली आणि म्हणाली, ''अंजू, उद्या आपल्याला वासोट्याला जायचंय आणि खुशखबर म्हणजे यावेळी आपल्याला डोकी जमवायची नाहीयेत. संजू आणि त्याच्या मित्रांनीच हा ट्रेक ठरवला आहे.'' मी आनंद सावरत म्हटलं, ''आत्ता परीक्षा देऊन येते, संध्याकाळी सगळं ठरवू.'' आनंदी मनःस्थितीतच पेपर देऊन आले.
संध्याकाळी स्वारगेटला जाऊन सातारा गाडीची तिकिटं काढून आणली. मी, स्मिता, संजू आणि त्याचे तीन मित्र लक्ष्मीकांत राठी, महेंद्र बोरा व सर्वेश बर्वे. वासोटा ऊर्फ व्याघ्रगड हे सह्याद्रीतील अजोड असं दुर्गरत्न आहे. दुर्गांचे स्थलदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि भर समुद्रातील जंजिरे असे प्रकार आहेत.
घनदाट जंगलानं वेढलेला व कोयनेच्या शिवसागर जलाशयामुळं दुर्गम झालेला वासोटा पाहण्याची अविला उत्सुकता होती. नेहमीप्रमाणं याही वेळेस वासोट्याची सर्व माहिती नीट वाचूनच निघालो.
साताऱ्याला जाऊन पोचलो आणि बामणोली गाडीची चौकशी केली, तर काय! गाडी जवळपास तीन-चार तासांनी होती. आम्ही जरासे गडबडलोच... पण नेहमीप्रमाणं आमच्या सुपीक डोक्यातून त्या वेळात अजिंक्य ताऱ्याला जाऊन येण्याची नामी कल्पना आली. तेव्हा जरी सर्वांनी ती कल्पना उचलून धरली असली, तरी नंतर अजिंक्यताऱ्याचा डांबरी गाडीरस्ता ''मे''च्या रणरणत्या उन्हात पायी चढताना सर्वांनी वैतागून शिव्या घातल्या. बरोबर नेलेला डबा अजिंक्यताऱ्यावर खाल्ला आणि बामणोली गाडीच्या वेळी सातारा स्टॅण्डवर येऊन हजर झालो. गाडीला तोबा गर्दी. कसंबसं आत घुसलो. दीड तासांचा प्रवास करून बामणोलीत पोचलो. उतरून पाहिलं, तर कोयनेचा विस्तीर्ण जलाशय समोर पसरला होता!
मग अर्थातच नावेची चौकशी करणं प्राप्त होतं. तेव्हा वासोट्यावर राहायला वगैरे बंदी नव्हती. ती नंतर झाली. त्यामुळं आम्ही तसं निवांत आणि निश्चिंत होतो. नावेची चौकशी केल्यावर सरकारी लॉंच कधीच निघून गेल्याची शुभवार्ता कानी पडली. सरकारी लॉंचचं भाडं नाममात्र होतं, पण ती आता दुसऱ्या दिवशीच होती. खासगी बोटी होत्या, पण त्यांचं भाडं काहीच्या काही सांगत होते. संजूच्या चतूर, बोलक्या स्वभावामुळं शेवटी एकाला त्यानं पटवलं आणि त्यानं आम्हाला पलीकडं वासोट्याच्या पायथ्याचं गाव कुसापूरला सोडायचं मान्य केलं.
बामणोलीपासून कुसापूर १६ किलोमीटर आहे. साधारण दीड-पावणेदोन तासांचा जलप्रवास होता तो. मे महिन्यात उन्हाची वेळ असूनही, निळाशार जलाशय व आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार वनराईमुळं हा प्रवास अतिशय विलोभनीय झाला. या आनंददायी जलप्रवासानंतर किनाऱ्यावर उतरलो, तेव्हा उन्हं कमी व्हायला लागली होती. आम्ही दोन-तीन दिवस राहणार असल्यानं नावाड्याला थांबायला सांगायचं नव्हतंच. उलट त्यानंच स्वतःहून सांगितलं, ''रोज सकाळी नऊला इथं सरकारी लॉंच येते, जेव्हा येणार असाल, तेव्हा बरोबर नऊला इथं या.''
आम्हाला सोडून लॉंच परत फिरली. आता किनाऱ्यावर आम्हीच सहाजण होतो. भोवताली नजर फिरवली, तर शांत, स्वच्छ किनारा, गर्द निळं स्फटिकासारखं पाणी, बाजूला गर्द हिरवाई, आकाशात केशरी उधळण... आणि प्रगाढ शांतता! चिटपाखरू नाही ना कुठं मानवी स्पर्श नाही. इतकं आल्हाददायक वातावरण, त्याचीच मोहिनी पडली. सगळेच त्या सुंदराच्या दर्शनानं मौन झाले. त्या समाधीतून बाहेर आल्यावर म्हटलं, ''चालायला तर लागू, दिसेलच पुढं काहीतरी.'' थोडं पुढं गेल्यावर लांबवर काहीतरी घरासारखं दिसलं. त्या दिशेनं चालू लागलो. २०-२५ मिनिटांतच तिथं पोचलो. एक बऱ्यापैकी मोठी मंदिरवजा, पण गवतानं साकारलेली झोपडी होती. ते पाहून आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. मुक्कामाची खाशी सोय झाली. मातीच्याच भिंती आणि सारवल्यासारखी जमीन. पण खूप मातीमय कोपऱ्यात एक केरसुणीपण मिळाली. सगळं स्वच्छ झाडून काढलं. झोपडीच्या समोर चारी बाजूंनी बांबू रोवून मांडवासारखं बांधलं होतं, पण बिनछताचं, बिनकुंपणाचं. ते आम्हाला खूप आवडलं आणि लगेचच मी आणि स्मितानं बाहेरच झोपणार, असं घोषितही केलं. एव्हाना दिवस ढळायला लागला होता. तिथूनही लांबवर वरच्या बाजूला झोपडीसारखं काहीतरी दिसत होतं, पण माणसांची चाहूल नव्हती. संधिप्रकाशात ऐहिक जगाच्या पार असं काहीतरी खूप सुंदर फिलींग येत होतं.
अंधार पडल्यावर झोपडीत जाऊन मेणबत्ती लावली आणि आतच गप्पा मारत बसलो. जरा वेळानं बाहेर जराशी चाहूल वाटली आणि पाठोपाठ माणसाचा आवाजही आला, ''कोण हाये म्हणायचं?'' असं म्हणत तो आत आला. कुठून आलो, कशाला आलो, सारी चौकशी झाली. संजूनं मामा-मामा म्हणून त्याला गप्पांत चांगलंच सामील करून घेतलं. अनोळखी माणसाला आपलंसं करण्याची कला त्याच्यात आहे. गप्पांच्या ओघात मामा म्हणाला, ''तुमच्या जेवणाचं काय? नागलीची भाकरी, भाजी नाहीतर बेसन देतो आणून.'' आम्ही खूशच खूश! वरच्या बाजूला जी झोपडी होती, तिथंच तो राहात होता. जाऊन नंतर परत तो साडेआठ-पाऊणेनऊला आला. बरोबर एक लहान मुलगापण होता. नाचणीची भाकरी, पिठलं, कांदा एवढंच नाही, तर पाण्याची एक छोटी कळशीपण आणली होती. शिवाय आमच्यासाठी एक कंदीलही! अजून वर ताकाची एक बरणीपण!
स्वर्गसुख म्हणजे आणखी काय असतं? आणि तो भला माणूस पैसेही सांगायला तयार नव्हता. मग बळंबळंच पैसे दिले त्याला आणि म्हटलं, ''उद्या येणार का आम्हाला वासोटा दाखवायला?'' तो म्हणाला, ''माला शेतीची कामं हायती, पोरगं यील.'' हबकून म्हटलं, ''एवढंसं पोर येणार?‘‘ तर हसला अन् म्हणाला, ''हा न्हाय याचा भाऊ हाय. तो यील. आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी बरोबर सहाला पाठवायला सांगितलं.
जेवणं झाल्यावर जरा वेळानं झोपायची तयारी झाली. पहाटे लवकर उठायचं होतं. महेंद्र म्हणाला, ''मी आतच झोपतो. मला जरा कणकण वाटतेय. क्रोसिन घेऊन झोपतो.'' बरं म्हटलं आणि आमच्या पथाऱ्या झोपडीसमोर पसरल्या. मोकळ्या वातावरणात, थंड झुळका घेत, मातीच्या शय्येवर, नक्षत्रखचित आभाळाखाली झोपण्यातलं सुख अनुभवणाऱ्यालाच कळेल. त्या गडद अंधारातही एक चैतन्य होतं. गाढ झोप लागली. मधे एक-दोनदा लांबून आलेल्या कोल्हेकुईसारख्या आवाजनं किंचितशी जाग आली. अशा ठिकाणी किंवा कुठल्याही गडावर उघड्यावर झोपून उठल्या उठल्या जे काय भारी वाटतं ना, त्याची तुलना कशाशीच नाही.
सहाला आवरून तयार होतो. वाटाड्या मुलगाही वेळेवर आला. बिबट्यानं एक शेळी ओढून नेली म्हणत होता. रात्रीची कोल्हेकुई आठवली. काही न बोलताच निघालो. जंगलातील मळलेली पाऊलवाट होती. अर्ध्या-पाऊण तासानं खळाळता ओढा समोर आला. त्याला नैसर्गिक झरे होते. त्याच्या दर्शनानं चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. त्याच्या काठीच दगडी चबुतऱ्यावर हनुमानाचं उघडं मंदिर होतं. तिथं थोडं च्याऊम्याऊ झाल्यावर पुढं निघालो.
ओढा ओलांडून खऱ्या जंगलात प्रवेश केला. उन्हाळा असूनही घनदाट जंगलामुळं एवढा जाणवत नव्हता. अस्पष्ट पायवाटेच्या दोहो बाजूस आंबा, जांभूळ, ऐन, धावडा, हिरडा, बेहडा, अंजनी, कुंभी, नाणा आणि अन्य कितीतरी प्रकारची दाट वृक्षराजी होती. दाट वनामुळं इथं अस्वलं, गवे, रानडुकरं व अन्य वन्यप्राण्यांचा वावर असतो. आमचं नशीब तेवढं जोरावर नसल्यानं आम्हाला काही दिसलं नाही.
तास-दीड तास त्या वाटेनं चढत गेल्यावर त्या पायवाटेच्या पुढं दोन वाटा झालेल्या आढळल्या. वाटाड्यानं सांगितलं, ''आता इथून सरळ जायचं, म्हणजे किल्ल्यावर जाता येतं. उजवीकडची वाट नागेश्वरला जाते, मी आता परत जातो.'' त्याला शेतीचं काम होतं. त्यालाही बळंबळंच पैसे घ्यायला लावले आणि पुढं कूच केली. पुढं बऱ्यापैकी खडी चढण होती. छातीवरचा चढ. धापा टाकत चढलो. काही वेळानं कड्यात, कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या. त्या वाटेनं गेलो, तर भग्न प्रवेशद्वार दृष्टीस पडलं आणि किल्ल्यावर प्रविष्ट झालो.
अख्ख्या किल्ल्यावर आम्हा सहा शिलेदारांखेरीज एकाही मनुष्यप्राण्याची चाहूल नव्हती. सगळीकडं गवत आणि दाट झाडी होती. उन्हाळ्यामुळं पाऊलवाटा दिसत होत्या. गडाच्या तटबंदीच्या कडेनं डावीकडं गेलो. मधे भिंत असलेली पाण्याची दोन बांधीव टाकी दिसली. एकाही मनुष्यप्राण्याची चाहूल नव्हती. सगळीकडं गवत आणि दाट झाडी होती. उन्हाळ्यामुळं पाऊलवाटा दिसत होत्या. गडाच्या तटबंदीच्या कडेनं डावीकडं गेलो. मधे भिंत असलेली पाण्याची दोन बांधीव टाकी दिसली. त्यात थंड, मधुर पाणी होतं. तिथूनच पुढं टोकापर्यंत गेलो, तर समोरच रौद्रभीषण बाबू कड्याचं दर्शन झालं. तसंच मागं आलो. पुढं चुना मळण्याची दगडी घाणी व मारुतीचं बिनछपराचं देऊळ दिसलं. परत येऊन उजवीकडं गेल्यावर दगडावरची एकमेव शाबूत वास्तू, म्हणजे गडाची अधिष्ठात्री देवता. चंडिका ऊर्फ भवानीदेवीचं मंदिर नजरेस पडलं. तिथं बसून थोडीशी पोटपूजा केली. माहिती वाचून आल्यानं काय काय पाहायचं ते डोक्यात होतं. तिथून पुढं गेल्यावर लांबच्या लांब माची दृष्टीस पडली. तिला काळकाईचं ठाणं म्हणतात. मंदिराकडून माचीकडं जाणारी वाट फार चिंचोळी व अरुंद आहे. तुफानी वारं आणि दोन्ही बाजूला असलेल्या खोल दऱ्यांमुळं धैर्य गोळा करूनच त्या वाटेवर पाऊल टाकावं लागतं. तिथून आसपासचा परिसर फार सुंदर दिसतो.
इथून परत येऊन थेट नागेश्वर फाट्यावर पोचलो व तिथून पायवाटेनं चालू लागलो. सर्वांची आत्मविश्वासाची पातळी खूपच उंचावलेली होती. या वाटेवर एवढी दाट झाडी होती, की उन्हाची तिरीपही येत नव्हती. तासाभरानं जरा सपाटी आली. तिथून पुढं पायवाट डावीकडून दरीच्या कडेनं जात होती. ही थरारक वाटचाल जीव मुठीत धरून पार केली. नागेश्वरच्या सुळक्याच्या पायथ्याशी ही वाट जात होती. शेवटचा टप्पा अगदी खडा आहे. एक दिव्य पार केलं, की त्याहून अधिक दिव्य समोर ठाकत होतं.
शेवटी थोड्या बांधीव पायऱ्यांची वाट गुहेत घेऊन जाते. ती गुहा मुक्काम करण्यायोग्य असून मध्यभागी शिवलिंग आहे. त्यावर वरून सतत पाणी स्रवत असतं.
आजही आम्ही कालच्याच झोपडीत मुक्काम करणार असल्यानं जास्त वेळ न रेंगाळता, परतीची वाट धरणं क्रमप्राप्त होतं. दुपार संपत आली होती. अंधारापूर्वी आम्हाला पोचायचं होतं. त्यामुळं थोडी घाई करायला हवी होती. परतीचे कठीण टप्पे पार करायला दम राखणं भाग होतं. त्यामुळं पटकन सुकामेवा तोंडात टाकला आणि निघालो. अगदी सावकाश उतरून पायवाट पकडली आणि पुढचाही टप्पा काळजीपूर्वक पार केला.
पायवाट अजिबात न सोडता, गेल्या वाटेनं परत निघालो. सगळे दमले होते, तरी भरभर चालणं गरजेचं होतं. पण आता ताण पूर्ण गेला होता. त्यामुळं जंगल वाटेवरचा प्रवास अतिशय सुखद वाटला. सगळ्यांना कडकडून भूक लागली होती, तरी खाण्यात वेळ न घालवता चालत राहिलो.
मला अशक्य झोप येत होती. मला वाटलं आता चालता-चालता झोप लागते की काय? हनुमान मंदिराजवळचा खळाळता स्वच्छ निर्झर समोर दिसला आणि सर्वांना हर्षवायूच झाला. सारेच झऱ्याच्या दिशेनं धावले. मी म्हटलं, ''तुम्ही जा, मी झोपते.'' मी तिथल्या तिथं आडवी झाले आणि क्षणार्धात गाढ झोपले. अर्ध्या-पाऊण तासानं जाग आली, तर स्मिता मला उठवत होती. अशा झोपेचा अनुभव पहिल्यांदाच आला होता. सूर्य मावळायला आला होता. संध्या रंगात आभाळ रंगलं होतं. तिथंच बसून जवळचा थोडा कोरडा खाऊ खाल्ला. लगेच निघालो. आता सांजवायला लागलं असलं, तरी वाट आता शेवटच्या टप्प्यातली होती. आमच्या घरापाशी पोचलो, तर अंधार झाला होता.
रात्री जेवण करून बाहेर अंथरुणं टाकली. दिवसभराच्या अनुभवानं प्रत्येकाला एवढं भारून टाकलं होतं, की एवढी दमणूक होऊनही झोप येत नव्हती. संजू म्हणाला, ''अंजू, आतापर्यंतच्या ट्रेकमधला हा ट्रेक सगळ्यात भारी, सगळ्यात बेस्ट झाला.'' बाहेर सर्वत्र मिट्ट काळोख होता. आम्ही अंथरुणावर पडून अंधारात गप्पा मारत होतो... आणि अहो आश्चर्यम्! समोरच काजव्यांनी चमचमणारं झुडूप होतं. डोळे विस्फारून त्याच्याकडं पाहात राहिलो. त्या विजनात साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाचे केवळ दैवदुर्लभ योगानं आम्ही साक्षी होतो. काजव्यांचा तो अद््भुत सोहळा आम्ही डोळ्यातच नव्हे, तर मनात साठवला... बोलता बोलताच झोप लागली. पहाटे सारेजण ताजेतवाने होते. दगडांची चूल मांडून चहा केला.
लॉंच नऊ वाजता येणार होती. आम्ही साडेआठलाच किनाऱ्यावर हजर होतो. मन मात्र वासोट्याच्या कुशीत शांत पहुडलं होतं. वासोट्याच्या थरारक तरीही मोहक, सुंदर स्मृती बरोबर घेऊन आम्ही घरी परतलो. आजही या ट्रेकचं गारुड मनावर तसंच आहे... आणि वासोटा ऊर्फ व्याघ्रगडही आपलं दुर्गमत्व टिकवून नाव सार्थ करीत दिमाखात तसाच उभा आहे.
(हौशी ट्रेकर्सचे अनुभवकथन...)