एक थरारक, पण अपूर्ण ट्रेक!

 हरीश कोळी, सातारा 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

ट्रेककथा
 

नुकताच कोकण दौरा झाल्याने प्रचितगड ट्रेकला जाऊ की नको या विचारात मी होतो. थोडा आजारी असल्याने बहुतेक मला ट्रेक रद्द करावा लागणार असे वाटत होते. पण औषध घेऊन रात्री घरी गेल्यावर ''मी उद्या ट्रेकिंगला निघालोय,'' असे सांगितले. माझी तब्येत पण आता जरा बरी वाटत होती. तेवढ्यात तात्या बागलचा फोन आला. म्हणाला, ''येतोस की नाही ते एकदाच सांग.'' मी गंमत म्हणून म्हणालो, ''आई येऊ देत नाहीये. तूच समजावून सांगून बघ एकदा तिला.'' मी आईकडे फोन दिला, त्याने आईला दुसरेच कारण सांगून तयार केले.

सकाळी आवरून झाल्यावर अप्पाने आमच्या 'यशवंत ट्रेकर्स एमएच ५०' ग्रुप वरती जाताना कोणकोणते साहित्य घ्यायचे याची लिस्ट टाकली होती आणि आपापल्या पार्टनरशी संपर्क करून सकाळी लवकर यायला सांगितले होते. प्रत्येकाचा पार्टनर ठरलेला होता. आमच्या एकूण चौदा जोड्या होत्या. आशुतोष गोळे-सोहन खोत, प्रवीण खबाले-अजय सोनवणे, योगेश गावडे-दीपक सोनार, तात्यासो बागल-हरीश कोळी, सुनील जाधव-मयूर पवार, रणजीत बागडे-गणेश सावंत, सूर्यकांत यादव-ऋषिकेश लाटे, दत्तप्रसाद कदम-वैभव काळे, विलास तोळसणकर-योगेश दळवी, अक्षय जहागीरदार-शारंग भंडारे, अनिल बागल-अनिकेत शेडगे, सागर लोहार-सुधीर पाटील (बापू), सागर हुलवान-प्रीतम मोहिते, रोहित यादव-संतोष मोरे (सरपंच). 

प्रचितगडाचा ट्रेक ७ आणि ८ डिसेंबर २०१९ ला करायचा ठरला. एकूण अंतर ४०० किलोमीटर होते. जाण्याचा मार्ग कराड-तळमावले-आरळे-वारणा धरण-उदगीर-परळी निनाई धरण-आंबा घाट-महिमतगड-मार्लेश्वर-कसबा संगमेश्वर-शृंगारपूर(मुक्काम)-प्रचितगड-संगमेश्वर-भवानीगड-गोवळगड/गोविंदगड चिपळूण (वेळ मिळाल्यास)-कुंभार्ली घाट-कराड. सकाळी ७ वाजता आमचा प्रवास सुरू झाला. अप्पाचे सहा मित्र, ज्यात सगळे अनुभवी ट्रेकर्स होते. ते वाटेत आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भेटून आमच्यात सामील होणार होते. 

जाताना आम्ही सारेजण ढेबेवाडी तळमावले मार्गे कुठरे-पवारवाडीमध्ये दत्तप्रसाद कदम यांच्या घरी चहा घेऊन पुढे निघालो. तो भाग कोकणसारखाच सुंदर असल्याने कोकणाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली. अप्पाचे मित्र दत्तप्रसाद, विलास तोळसनकर(दादा), अक्षय जहागीरदार , हे आम्हाला जागोजागी योग्य त्या सूचना आणि जंगल सफर कशी अनुभवावी याची माहिती देत होते.

तेव्हाच प्रवीण खबाले याच्या पायाजवळून सापतुळी जाताना दिसला. हा साप बिनविषारी असल्याने दत्त प्रसादने उचलून सर्वांना दाखवला. तिच्या अंगावरून आमच्या कोणाच्या तरी गाडीचे चाक गेल्याने तो जखमी झाला होता. त्याला परत जंगलात सोडून दिले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. त्यानंतर आम्ही आरळ्यात रणजीत बागडे या आमच्या मित्राला सोबत घेतले. आमची २८ जणांची यादी पूर्ण झाली. गणेश सावंत, प्रितम मोहिते, सुधीर पाटील हेसुद्धा आरळ्यात पोचले होते. आरळ्यात आम्ही आमच्या सर्वांच्या गाड्या परत एकदा व्यवस्थित तपासून पुढे मार्गस्थ झालो.

आरळ्यातून पुढे काही अंतरावर उदगीर पठारावरचा अनुभव खूप भारी होता. एकदम ओसाड माळरानावर नुसती कुसळे दिसत होती.

उदगीर पठारावरून जरा पुढे गेल्यावर रोहितच्या गाडीजवळ लहान मुले उभी दिसली. त्यांची सायकल पडलेल्या अवस्थेत होती. वाटले अॅक्सिडेंट झाला की काय. मी गाडी पटकन थांबवली, पण पाठीमागे अनिकेत शेडगेची गाडी आम्हाला लागूनच असल्याने त्यानेही पटकन ब्रेक लावला. खर्रर्रर्र असा आवाज आला. माझ्या पाठीमागे बसलेल्या तात्याला वाटले, मागची गाडी आपल्याला धडकणार, म्हणून त्याने उजव्या बाजूला भार दिला, म्हणून माझापण बॅलेन्स गेला. माझा पाय गाडीच्या फुटरेस्टच्या खाली सापडला आणि गुडघ्याला खरचटले. पण न लागल्याचे सांगून मी लगेच उठून उभा राहिलो. तात्या तर दोन कोलांट्या उड्या घेऊन गवतात जाऊन पडला. असा प्रवास करत आम्ही पुढे जात होतो. नजर जाईल तिकडे निसर्गाची मुक्त उधळण दिसत होती. फक्त पठारे दिसत होती. तिथून पुढे आम्ही छोट्या घाटाच्या कच्च्या रोडवरून छोट्या घाटातून परळी निनाई या धरणावर पोचलो. तिथे धरणावरच जेवण केले, थोडे थांबलो, मस्त फोटो, व्हिडिओ शूट करून त्या ठिकाणाचा निरोप घेतला. पुढे कुठेही न जाता सरळ आंबा घाटकडे निघालो.

  आंबा घाटात आम्ही हॉटेल गोकुळपाशी थांबलो. तिथे तोळसनकरदादांचे मित्र प्रमोद माळी भेटणार होते. आंबा घाट आणि परिसरातील जंगल संवर्धक आणि सर्पमित्र अशी प्रमोद माळी यांची ओळख आहे. त्यांच्याकडून जंगल संवर्धन का गरजेचे आहे याची माहिती तर मिळालीच, शिवाय त्यांचे अनुभवही ऐकता आले. काही वेळाने त्यांचा निरोप घेऊन आम्ही सर्वजण पुढे साखरपा फाट्यावरून संगमेश्वरकडे वळलो. तास दीडतासाच्या प्रवासानंतर आम्ही संगमेश्वर येथे पोचलो. वाटेतच भवानिगडावर जाऊन मंदिर पाहून आम्ही परत निघालो. पुढे रस्त्यातच असलेल्या राजवडी येथील पांडवकालीन सोमेश्वर मंदिर आणि तिथलेच गरम पाण्याचे झरे याचा अनुभव घेतला. प्रवास करून दमल्याने प्रत्येकाने गरम पाण्याच्या झऱ्यावर अंघोळ करून घेतली. अंघोळ झाल्यानंतर शेजारच्या पांडवकालीन सोमेश्वर मंदिराला भेट दिली. त्या भेटीत मंदिराची रचना, दगडावरील नक्षीकाम पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. जवळजवळ हजार वर्षांपूर्वी कोरीव कामाद्वारे त्या मंदिराची अप्रतिम उभारणी केली होती.

 रात्रीच्या साडेआठ वाजल्याने तिथल्या आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही तिथून १५ किलोमीटरवर असलेल्या संगमेश्वर येथे जाण्यासाठी निघालो. कोकणातले ते छोटेछोटे रस्ते, कुठेतरी दिसणारे प्रकाशाचे दिवे, अधूनमधून येणारे प्राण्यांचे आवाज आणि त्या वेड्यावाकड्या रस्त्यावर आमच्या १४ गाड्यांचा आवाज. एकामागोमाग गाड्या वेगाने धावत होत्या. संगमेश्वरला पोचल्यावर तिथून पुढे १०-१२ किलोमीटरवर असलेल्या शृंगारपूरमध्ये आम्ही रात्री १० च्या आसपास पोचलो. तिथे अप्पाचा मित्र यशवंत याच्याशी रेंज नसल्याने कॉन्टॅक्ट होत नव्हता. अप्पाने त्याचे घर शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडले नाही. शेवटी आम्ही तिथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत राहायचे ठरवले. आमच्या ग्रुपला दंगामस्तीची सवय होती, पण गावात शाळा असल्याने आणि कोणी आम्हाला तिथून हाकलून लावू नये,. यासाठी सारंगदादाने सर्वांना शांत राहण्याची सूचना केली. जेवण करून आम्ही साधारण १ वाजता झोपलो. पहाटे ४ वाजता जाग आली. अजून कोणी उठले नाही, हे बघून मी पुन्हा झोपणार तेवढ्यात कुजबुज सुरू झाली. लगेच दत्तप्रसादने 'उठा रे सगळेजण,' अशी हाक दिली. १०-१५ मिनिटांनी सर्वजण उठले आणि आवरून साडेपाचच्या आसपास आम्ही गावातील आजीच्या घरी पोचलो. तिथे आम्ही आणलेले मॅगीचे पुडे दिले. काही वेळातच आमचा मॅगीचा नाश्ता झाला. नंतर आम्ही सर्वांच्या बॅगा आजीच्या घरात ठेवून आवश्यक साहित्य घेऊन ६ वाजता गडाकडे जायला निघालो. माझ्याजवळ अप्पाने ५ लिटरची बाटली दिली होती. गाड्या घेऊन आम्ही घरापासून एक ते दीड किलोमीटर वरच्या ओढ्याजवळ जाऊन पोचलो. तिथे गाड्या लावून सगळ्यांनी गडाकडे कूच केली.

 जाताना आजीने आम्हाला 'जमले तर कोणालातरी घेऊन जा,' असे सांगितले. पण आमच्यातील काहीजण आधी जाऊन आले असल्याने आम्ही तिचे न ऐकता आपले आपणच जाऊन येऊ आशा तोऱ्यात पुढे निघालो. पण त्यामुळे आमचा ट्रेक दुसऱ्याच डोंगरावर होणार आणि आम्ही रस्ता चुकणार याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती.

गडाच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याच्या कडेला गाड्या पार्क करून आम्ही गडाकडे जायला सुरुवात केली. दहा पंधरा मिनिटे चालल्यावर आम्ही उजव्या बाजूने ओढ्यात उतरलो आणि हीच आमची घोडचूक ठरली. कारण ती पायवाट गावातल्या लोकांनी गुरेढोरे चरायला घेऊन जाण्यासाठी केली होती. आम्हाला ज्या वाटेने जायचे होते, ती वाट सरळ गेली होती. पण नुकताच पावसाळा संपल्याने त्या वाटेवर गवत उगवले होते. ती वाट व्यवस्थित दिसलीच नव्हती. मग काय आमची फरफट जवळजवळ सकाळी साडेसहापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू होती. दत्तप्रसाद आणि त्याचे मित्र या आधी गडावर जाऊन आल्याने आम्ही ते म्हणतील तसे त्यांच्या पाठीमागे जात होतो. पण काहीवेळाने आमच्या हे लक्षात आले, की हेसुद्धा भटकलेले आहेत. तेव्हा आमच्या ग्रुपमधल्या तात्या, दीपक सर आणि ठराविक जणांनी मोहीम आपल्या हाती घेतली. नुसती घेतलीच नाही, तर ते दाखवतील तो मार्ग कसा योग्य आहे हेही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी दत्तप्रसाद आणि त्याचा मित्र यांनी पाठीमागे जाऊन रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना बरोबर वाट सापडली होती, पण आमच्या काही महाभागांना लाल रिबीन दोन ठिकाणी बांधलेली दिसल्याने हाच योग्य रस्ता असावा असे वाटले. त्यांनी दत्तप्रसाद व मित्रांना मागे बोलावून घेतले. त्याचवेळी आम्ही जर दत्तप्रसाद यांनी सांगितलेल्या वाटेकडे गेलो असतो, तर योग्य रस्त्याने गडावर पोचलो असतो. पण त्यादिवशी गड आमच्या नशिबात नव्हता...

आता सकाळचे १० वाजत आले होते. आम्हाला रस्ता काही केल्या सापडत नव्हता. शेवटी मी, सुनील आणि सागरने ठरवले, की ओढ्यामध्ये उतरून जायचे. ओढ्यातून गेल्यावर आपल्याला रस्ता नक्की सापडेल. म्हणून आम्ही ओढ्यात उतरून चालू लागलो. आमच्या पाठोपाठ सगळेजण खाली उतरले. ओढ्यातील स्वच्छ आणि चविष्ट पाणी कृष्णेच्या पाण्याची कमी भरून काढत होते.

 चालून चालून सर्वांची ट्रेकिंगची तल्लफ भागली होती. खूपच भयंकर अनुभव आला होता. रस्ता न सापडल्याने आम्ही परत ओढ्यातून ५०- ६० फुटांचा उभा कडा सर केला. तोसुद्धा एकेकट्याने. ज्यावेळी आम्ही त्या कड्यावरून पाठीमागे येत होतो, तेव्हा तिथे एका झाडाला दोरी बांधून ती १० फूट खाली सोडली आणि फक्त त्या दोरीच्या आधारे खाली उतरलो. कारण पकडण्यासाठी झाड, खडक असे काहीच नव्हते. तिथून खाली झाडांच्या मुळ्यांचा आधार घेत आलो. केवढा अवघड तो कडा होता. ओढ्यातून जाताना एखादा दगड निसटून खाली येताना होणारा आवाज जिवाचा थरकाप उडवत होता.

शेवटी कसेबसे आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो. प्रचितगडाला 'सह्याद्रीचा मुकुटमणी' का म्हणतात याची जणू काही प्रचितीच आम्हाला आली. कारण आम्ही जिथे पोचलो होतो, तिथून मुख्य गड आसमंतात गेलेला दिसत होता. खूप उंचीवर गड असल्याने आम्ही वेळेअभावी पाठीमागे येण्याचा निर्णय घेतला. निराश चेहरे, सुजलेले डोळे, खचत चाललेली मने आणि ओरखडे पडून रक्ताळलेले हात पाय घेऊन डोंगरमाथ्यावर पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मधेच सर्वांचे मनोबल वाढविण्यासाठी अप्पा 'हाउज द जोश'ची हाक देत होता. पण थकलेली पोर संमिश्र प्रतिसाद देत होती. प्रत्येकाची निराशा हळूहळू शब्दावाटे बाहेर येत होती.

दुपारचे एक-दोन वाजले होते. वर येताना आम्ही जवळ असणारी बिस्किटे संपवल्याने खाण्यासाठी आता काहीही उरले नव्हते. पाणी पण निम्मा डोंगर उतरून खाली गेल्यावर मिळणार होते. मग आम्ही खाली जाऊन काय करायचे याच नियोजन करायला सुरुवात केली. तेव्हा काहीजण घरी जाणार म्हणाले. मग अप्पाने घरी जाणारे किती आणि आज मुक्काम करून उद्या ट्रेकिंगला येणार किती असे विचारले, तेव्हा आमच्या २८ जणांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जणांनी गडावर जाऊ असे ठरवले आणि राहिलेली पोर घरी जाणार असे ठरल्यानुसार आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. येताना आम्हाला जाताना झाला तेवढा त्रास झाला नाही. कारण झाडांचा आधार घेत आम्ही सारेजण पटापट खाली उतरलो. ओढ्यात आल्यावर कोण पुढे गेला, कोण पाठीमागे राहिला, तर कोण अंघोळ करण्यासाठी थांबल्याने जे घरी जाणार होते त्यांनी थोडा वेळ वाट बघून गणपतीपुळेला जाऊन सरळ घरी जाऊ असे नियोजन केले. पण मी खाली येईपर्यंत उद्या सकाळी गडावर जायच्याच विचारात होतो. पण आमच्यापैकी चार गाड्या आम्ही पोचायच्या आधीच निघून गेल्या. आता आमचीपण द्विधा मनःस्थिती झाली होती. शेवटी आम्ही आज मुक्काम करून उद्या गणपतीपुळेला जाऊन सनसेट बघायचा आणि घर गाठायचे ठरवले. 

पुढचा प्रवास करताना रस्त्यावर भले मोठे खड्डे होते. समोरून येणारी मोठी वाहने बघून त्यांची खूप भीती वाटत होती. आता कोकण संपून कोल्हापूर खिंडीत प्रवेश करताना कोकणातील दमट हवा जाऊन अचानकच हवेत गारवा जाणवायला लागला. पोटभर जेवण केल्याने डोळ्यावर झोप आली होती आणि तात्याच्या लेन्स रात्री काम देत नव्हत्या. मग आम्ही सावकाश प्रवास करत शेडगेवाडीत पोचलो. रणजितला शेडगेवाडीत सोडून पुढल्या प्रवासाला निघालो. नंतर तात्याला टाळगावात आणि गणेश सावंतला उंडाळ्यात निरोप देत मी, अजय, सूर्यकांत, दीपक सर आम्ही पाचवड फाट्यावरून पुढे प्रवास करत कोयना वसाहतीजवळ मी सर्वांचा निरोप घेऊन मलकापूरमार्गे रात्री १२.३० ला घरी पोचलो.

सकाळी उठल्यावर का कुणास ठाऊक पण आपण थांबायला पाहिजे होते, असे मनाला वाटत होते. आपण न थांबल्याची खंत मनाला जाणवत होती. हा ट्रेक खूप काही शिकवून गेला. १० तारखेला भेटलेले, प्रचितगड ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या माझ्या सर्व मित्राचे एवढेच म्हणणे होते, 'भावा थांबायला पाहिजे होतेस, एकदम कडक अनुभव होता.' सोहन, आशुतोष, अनिकेत सांगत होते, की प्रचितगडाच्या ट्रेकमध्ये अप्पाने जवळपास १०-१२ वेळा तुझे नाव काढले. हे ऐकल्यावर खरच यावेळी माघारी येऊन आपण चूक केल्याचे जाणवले. पण येत्या काही दिवसांत प्रचितगड ट्रेकची मोहीम फत्ते करणार हे नक्की.  

संबंधित बातम्या