‘डेड पूल’

ओंकार ओक 
सोमवार, 20 मे 2019

ट्रेक कथा
 

‘काका भगवंतगडाला जायचा रस्ता कुठून आहे हो?’ दुपारी दोन वाजताची टळटळीत उन्हं डोक्‍यावर पेटलेली असताना टेराईवाडीतल्या त्या काकांना भर रस्त्यात उभं करून हा प्रश्न विचारणं म्हणजे आधीच पंक्‍चर झालेल्या टायरची कास धरून एखादी मोठी रोडट्रीप प्लॅन करण्यासारखं होतं, हे त्यांचे हावभाव बघून चटकन माझ्या लक्षात आलं! गाडी सिंधुदुर्ग बाहेरची दिसते, हे त्यांच्या अनुभवी नजरेनं हेरणं यात काहीही अवघड नव्हतं. त्यांनी अत्यंत त्रासलेल्या चेहेऱ्यानं केलेल्या अंगुली निर्देशाकडं आम्ही वळते झालो आणि भगवंतगड पायथ्याच्या भगवंतगड गावात आमचा रणगाडा येऊन थांबला. आजच्या दिवसात विजयदुर्ग आणि देवगड बघून आम्ही इथं पोचलो होतो. ‘गड’ नदीवरच्या काठावर वसलेले भरतगड आणि भगवंतगड हे दोन नितांत सुंदर किल्ले! उंची फार नसली, तरी यांचा रानवा मात्र सुखावून जातो. बाकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किल्ल्यांची बात काही औरच आहे. मुख्य हायवेपासून म्हणा किंवा एका किल्ल्याकडून दुसऱ्या किल्ल्याकडे नेणारे रस्ते म्हणा... हा प्रवास निरंतर चालत राहावा असंच वाटून जातं. इथला निसर्ग आणि इथली माणसं ही त्या रेशमी किनाऱ्यांसारखीच मुलायम आणि अविस्मरणीय! पण क्वचितच कधी वर सांगितलेल्या काकांसारखे लोक भेटतात आणि वरून काटेरी असलेल्या फणसाच्या आत इतके गोड गरे कसे काय बुवा? या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज मिळून जातं! पुढचे ३ दिवस आम्हाला हीच अनुभूती मुक्तहस्ते देणारे होते.

तुम्ही या जाऊन किल्ल्यावर...मला काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय या झाडात! गळ्यात आपली पॉवरफुल्ल दुर्बीण अडकवत आमच्यातल्या एकमेव निसर्ग अभ्यासक आणि या विषयाचं दांडगं वाचन, व्यासंग, व्यवधान आणि अनुभव असलेल्या मकरंद केतकरनं गाडीतून उतरल्या उतरल्या घोषणा केली. याला एखादा पक्षी दिसला असणार, जो त्याच्यासाठी येत्या ३ दिवसांच्या ट्रेकदरम्यानच्या अभ्यासासाठीचं खाद्य ठरू शकतो, हे अनुभवांती ओळखून आम्ही भगवंतगडावर निघालो. किल्ला तसा अगदी लहान पण झाडांनी वर अक्षरश: साम्राज्य माजवलेलं आहे. तटबंदीचे अवशेष, निवडक जोती, एक दरवाजा आणि खास कोकणी शैलीतलं भगवंतेश्वराचं राऊळ सोडलं, तर किल्ल्यावर तसं खास काही पाहण्यासारखं नाही. मकरंदला त्याच्या स्वच्छंदपणासाठी वेळ मिळावा म्हणून आम्हीही गडावर उगाचच रेंगाळलो. अर्ध्या पाऊण तासानं भानावर आलो, तेव्हा आता समोरचा भरतगड खुणावू लागला होता.

भगवंतगड ते भरतगड यांच्या दरम्यान गड नावाची नदी आहे. बहुधा आजही या नदीतून इकडच्या तीरावरून तिकडं जाण्यासाठी तराफा किंवा छोट्या बोटी वापरल्या जातात. भगवंतगडावरून भरतगडाला जाण्यासाठी पुन्हा टेराईवाडी मार्गे आचऱ्याला येऊन तिथून भरतगडच्या पायथ्याचं मसुरे गाव गाठणं कधीही श्रेयस्कर. पण या दोन्ही किल्ल्यांच्यामध्ये असलेल्या नदीवर एक पूल असून तिथून चारचाकी गाड्या सहज जातात. या आमच्याकडच्या माहितीला भगवंतगड गावातल्या लोकांनी जरी दुजोरा दिलेला असला, तरी आमच्या ‘बोलेरो’ या महाकाय गाडीचा आकार बघून एक-दोन अनुभवी लोकांच्या नजरेतला संशय काही केल्या लपत नव्हता. ‘स्थानिक लोक सांगतील ते फायनल असेल’ या आमच्या नेहमीच्या तत्त्वावर आमच्या पुढच्या प्रवासाचा पर्याय निवडला जाणार होता. आचऱ्या मार्गे की त्या पुलावरून यापैकी एक! हे बघ, ‘गावकरी म्हणत आहेत ना गाडी जाते, मग जाईल आरामात’, गाडीचा कुशल सारथी असलेल्या मकरंदच्या या वाक्‍याने बाकीच्या शक्‍यता जरी निवळल्या असल्या, तरी कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकत असल्याची स्पष्ट जाणीव मला होत होती. अखेरीस भगवंतगडाला उजवी घालून आम्ही निघालो. डावीकडं गडाचे नदीकाठचे संरक्षक बुरूज आणि तटबंदीचा काही भाग आजही व्यवस्थित अगदी जवळून पाहता येतो.

चाकांखालच्या मातकट रस्त्याने आधीच झळा पोचवत असलेल्या त्या दमट उन्हात खिडक्‍या लावायला भाग पाडलं. पण चार-पाच वळणं गेली, तरी पुलाचा काही पत्ता लागेना. बरं रस्ता चुकलाय का बरोबर आहे, याची खात्री करून घ्यायलाही आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं. अखेरीस शेवटचं वळण क्रॉस झालं आणि ज्याची वाट बघत होतो तो पूल समोर आला आणि आमचा ठोकाच चुकला! फक्त सहा साडेसहा फूट रुंदी! दोन्ही बाजूंनी गड नदीचं शांत पण तितकंच खोल पात्र. साधारणपणे ५०-१०० मीटर लांबी. दोन्ही बाजूला कठड्यांचा पत्ता नाही आणि पलीकडच्या तीरावर आम्ही आता काय निर्णय घेतोय याची वाट बघत उभे असलेले तीन-चार बाईकधारी तरुण हे दृश्‍य म्हणजे कठीण पेपरच्या आधी हुशार मुलं मुद्दामूनच अजिबात तयारी नसलेल्या ‘ढ’ मुलांकडे बघून जसे कुत्सितपणे गालातल्या गालात हसत असतात ना, तसला फील देणारं होतं! घेतलेला निर्णय बदलून आता मागं फिरायचा चान्सच नव्हता, कारण आम्ही अशा वळणावर होतो जिथून गाडी रिव्हर्स गेलीच नसती. अखेरीस श्वास रोखून मकरंदनं गाडी त्या पुलावर चढवली. त्यानं पहिला गियर टाकला, तेव्हा आपण रामरक्षेची ऑडिओ क्‍लिप मोबाईलमध्ये टाकायला का विसरलो, या विचाराने डोक्‍याला एक वेगळाच शॉट दिला. त्या पुलावरून गाडी घेऊन जाणं अशक्‍य अजिबात नव्हतं. पण एक इंच जरी आमचा अंदाज चुकला असता, तरी सहाही जणांच्या घरचे फोन एकाच वेळी खणाणले असते, हे मात्र निश्‍चित होतं. त्यात पुलाच्या अतीव अरुंदतेमुळं चाकांच्या शेजारी असलेलं पुलाचं ‘मार्जिन’ अजिबात म्हणजे अजिबातच दिसेना. शेवटी देवा घाणेकर आणि अमित देसाईनं खाली उतरून आणि गाडीच्या पुढं जाऊन चालक मकरंदला गाइड करण्याचा निर्णय झाला. आत बसलेल्या सगळ्यांचे श्वास आता रोखले गेले होते. देवा किंवा अमितचं रस्ता सांगतानाचं किंवा ते हुबेहूब फॉलो करण्याचं मकरंदचं जजमेंट जरा जरी चुकलं असतं, तरी गाडी १०० टक्के नदीपात्रात जलसमाधी घेणार हे आता जवळपास निश्‍चित झालं होतं. त्या पुलाच्या अतिअरुंदतेमुळं हे तर निश्‍चितच होतं, की आता एका वेळी फक्त आमचीच गाडी त्या पुलावरून जाऊ शकणार होती. मला क्षणभर लहानपणी वाचलेल्या त्या २ बोक्‍यांच्या गोष्टीची प्रकर्षानं आठवण झाली (ती नाही का, दोन बोके एकाच वेळी एका अरुंद ओंडक्‍यावर समोरासमोर येतात आणि मग पहिलं कोणी जायचं वगैरे वगैरे!). एक एक फूट अत्यंत बारकाईनं पुढं पुढं सरकत हा प्रवास सुरू झाला. अख्खा जीव तोंडात गोळा झाल्यानं कोणाच्याही तोंडून एकही शब्द फुटेना. ...आणि त्यातच जो नको तोच क्षण आला. गाडी पुलाच्या बरोब्बर मध्यभागी येऊन पोचली होती. दोन्ही बाजूंनी गड नदीचं अत्यंत खोल पात्र भयंकर धाक दाखवू लागलं. अचानक एका क्षणी गाडीचं उजवं चाक पुलाच्या अगदी कडेला असताना मकरंदनं खचकन ब्रेक दाबला आणि आमच्या डोळ्यासमोर अंधारीच आली! पलीकडच्या तीरावरचे बाईकवालेही हे दृश्‍य डोळे विस्फारून पाहत होते. ‘थोडं डावीकडं घे. बास बास बास. ये पुढं. येऊदे येऊदे...’ देवा आणि अमित आपली कामगिरी चोख बजावत असल्याची खात्री आम्हाला पटली, कारण जवळपास पुलाचा ७० टक्के भाग आता पार झाला होता. अत्यंत कुशल चालक असलेल्या मकरंदच्या चेहेऱ्यावरही काळजी आणि भीती यांची तर्रीबाज मिसळ तयार झाली होती. अखेरीस पुलाचा शेवटचा अरुंद टप्पा क्रॉस झाला आणि पलीकडच्या काठावर असलेल्या बाईकस्वारांच्या आवाजामुळं आम्ही भानावर आलो! अत्यंत अशक्‍यप्राय असणारा पूल अतिशय सुरक्षितरीत्या पार झाला होता. जणू काही आम्ही मोठ्ठी लढाई मारून आलोय, असे भाव त्या बाईकस्वारांच्या चेहेऱ्यावर दिसू लागले. ‘काय राव, मानलं तुम्हाला. इथं भल्या भल्यांची वाट लागते (अर्थात त्यांनी यासाठी वापरलेला वाक्‌प्रचार वेगळा होता). त्यांचं हे वाक्‍यच सगळं काही सांगून गेलं. देवा आणि अमित गाडीमध्ये बसल्यावर गाडीत जो काही हास्यकल्लोळ झाला, त्याला तोड नाही. पण इतक्‍यात मकरंदच लक्ष बाहेरच्या एका पाटीकडं गेलं. ज्यावर लिहिलं होतं, ‘हा पूल अत्यंत अरुंद असून त्यावर फक्त दुचाकी जाऊ शकतात. चार चाकी गाड्यांनी या पुलाचा वापर चुकूनही करू नये.’

सुरेख राखलेल्या माडाच्या बनातून गाडी आता मसुरे गावाकडे निघाली. प्रत्यक्षातला थरार जरी संपलेला असला, तरीही त्याच्या आठवणी मात्र आम्हाला आयुष्यभर पुरतील! मधे एका फाट्यावर रस्ता विचारायला आम्ही थांबलो, तेव्हा समोरून एक माणूस येताना दिसला आणि आमचा संवाद पुढीलप्रमाणे होता...

‘दादा भरतगडला कसं जायचं?’
‘ह्ये उजवीकडून... पण तुम्ही कुठल्या बाजूनं आलात?’
‘भगवंतगड. या पुलावरून आलो.’

आभाळ कोसाळल्यासारखा चेहरा करून आमच्या गाडीचा आकार आणि पुलाची अवस्था याचं झटक्‍यात गणित मांडत त्यानं डोक्‍यावरच हात मारून घेतला आणि ‘आरं बाबा...’  इतकेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले!

मागं वळून पाहताना आता विचार येतो, की हे साहस अनाठायी होतं का? मला वाटतं मकरंदच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्यानं आम्ही ही रिस्क घेतली. पण वेळ सांगून येत नसते हेही तितकंच खरं. पण हा लेख वाचणाऱ्या वाचकांना आणि पर्यटक-गिर्यारोहक मित्रांना नम्र विनंती, की चुकूनही या पुलाचा वापर चारचाकी असताना करू नये. आम्ही अत्यंत सुरक्षितपणे हे धाडस पेललं पण भरतगड ते भगवंतगड जाण्यासाठी नेहमीच्या आचरा- मसुरे रस्त्याचाच वापर करावा.

संबंधित बातम्या