देवदूत

ओंकार ओक 
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

ट्रेक कथा
 

‘हॅलो, अरे कुठे आहेस? मी स्वारगेटला येऊन थांबलोय,’ पलीकडून विनय बोलत होता.
‘पोचलास का? मग आता थांब तिथंच थोडावेळ. उद्या आपण ज्या बाईकनं जातोय ना तिनं असहकार पुकारलाय... सहा पंक्‍चर निघाली आहेत. फार सिरीयस नाहीये. आलो अर्ध्या तासात.’ आयसीयू मधल्या पेशंटची अवस्था सांगावी तसल्या सुरात मी विनयला कल्पना दिली. समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देणं भागच होतं. माझ्या चेहऱ्यावरची निष्क्रियता बघून त्या पंक्‍चरवाल्याला उकळ्या फुटत आहेत असं उगाच मला वाटून गेलं. ‘आपल्याला काय’ असं म्हणत तिकडं निव्वळ दुर्लक्ष करून मी पुन्हा बाईकच्या टायरकडं डोळे लावून बसलो.

साधारण २०१० मधली गोष्ट. बालमित्र आणि नुकत्याच ट्रेकिंगकडं वळलेल्या विनयची आणि माझी जवळपास १० वर्षांनी होणारी भेट ही अशी होणार होती. देश आणि कोकणातल्या सहा किल्ल्यांच्या बाईकवरून होणाऱ्या भटकंतीची सुरुवातच या प्रसंगानं झाली. रत्नागिरी जिल्ह्यातले रसाळगड, पालगड, मंडणगड, गोविंदगड ऊर्फ गोवळकोट व सातारा जिल्ह्यातले पाटण जवळचे दातेगड व गुणवंतगड या सहा अतिशय सुंदर किल्ल्यांची आखलेली मोहीम कित्येक दिवस अंगावर रोमांच उभी करत होती. जिवाभावाचा बालमित्र आणि त्यात कित्येक दिवस योजलेली या देखण्या किल्ल्यांसाठी केली जाणारी दोन दिवसीय अशी आयुष्यातली पहिलीच मोठी बाईक राईड हे दोन योग भन्नाट जुळून आले होते. पण निघायच्या आदल्या रात्री ही घटना घडली आणि तिथंच आमचा पहिला ठोका चुकला. बाईकचं काम उरकून विनयला स्वारगेटवरून उचललं. गळाभेट, गप्पा, जेवण, चर्चा, किस्से इत्यादी सोपस्कार व्यवस्थित पार पडले. दोन आठवड्यांपूर्वी माझ्यासाठी घेतलेल्या नव्याकोऱ्या ‘स्प्लेंडर प्लस’ या बाईकचं मनोभावे दर्शन विनयनं घेतलं. अगदीच कोरी करकरीत असल्यानं ही गाडी तुमच्या फाजीलपणासाठी मिळणार नाही असली तंबी घरून मिळाल्यानं आम्ही नेत असलेल्या आणि चार वर्षं जुन्या असलेल्या गाडीवरच सगळी भिस्त होती.

पहाटे २.३० चा अलार्म बेंबीच्या देठापासून ठणकला. प्रवास लांबचा असल्यानं काहीही करून ३.४५ च्या सुमारास निघायचं हे ठरलेलं होतं. का कुणास ठाऊक पण घरातून बाहेर पडताना माझ्या मानत सारखी शंकेची पाल चुकचुकत होती, पण ती कशासाठी होती हे त्या पालीलाही माहीत नव्हतं! ‘जाऊदे... निघालोय ना एकदाचं,’ असं म्हणून एकमेकांची समजूत काढली आणि मुख्य रस्त्याला लागलो. फेब्रुवारी महिना असला, तरी पहाटेची थंडी दातखीळ बसवणारी! संपूर्णपणे सुनसान रस्त्यावर आमची बाईक सोडली, तर कशालाच नावालासुद्धा जाग नव्हती. घरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर आम्ही पोचलो आणि अचानक बाईकच्या मागच्या टायरमध्ये काहीतरी ‘मेजर’ गडबड असल्याचा साक्षात्कार मला झाला. थोडक्‍यात समस्या अजूनही सुटली नव्हती. अख्खे दोन दिवस हा सासुरवास सहन करण्यापेक्षा आम्ही एक धाडसी निर्णय घेतला आणि ही बाईक आमच्या पार्किंगमध्ये स्थानापन्न झाली आणि माझी नवीकोरी बाईक तिच्या पहिल्या राईडसाठी बाहेर पडली. थोडक्‍यात तिच्याही नशिबात तेच लिहिलं होतं!

अचानक झालेला आनंद ही अशी गोष्ट असते ना, की तो अनुभवण्याच्या नादात आपण नकळत नक्की कशाकडं दुर्लक्ष करतोय हेच विसरून जातो. तो मनसोक्त उपभोगायचा एवढंच आपल्याला कळत असतं. आम्ही घरातून निघून मगाशी जिथून परत फिरलो होतो, त्याच्या थोडंसं पुढं आलो आणि बोलता बोलता विनय बोलून गेला, ‘टाकी (पेट्रोलची) फूल आहे ना रे?’ त्याच्या या वाक्‍यावर प्रतिक्रिया म्हणून मी खच्चकन ब्रेक मारून गाडी बाजूला घेतली. कारण ही बाईक आमच्या मूळ प्लॅनमध्ये नसल्यानं हिच्यात फक्त १.५-२ लिटर पेट्रोल शिल्लक होतं आणि घरी ठेवलेल्या बाईकची टाकी मात्र तुडुंब भरून वाहत होती! विनयनं त्याच्या शिव्या नक्की किती संयमानं गिळल्या हे सांगता येणं कठीण आहे. बरं त्यावेळी किमान आमच्याकडं तरी स्मार्टफोन्स नसल्यानं (आणि अर्थात अज्ञानामुळंसुद्धा) २४ तास सुरू असणारे पंप कोणते हे माहीत असायचा प्रश्नच नव्हता. दोन लिटर पेट्रोलवर नवी गाडी असल्यानं विश्वास ठेवणं कठीण नव्हतं, पण वेळेचा भयंकर बोजवारा वाजणार होता. शेवटी आता होईल ते बघून घेऊ असं म्हणत आम्ही निघालो आणि गाडी ताम्हिणीच्या रस्त्याला लागली.

या वैतागनाट्याचा पहिला अंक संपायला पहाटेचे चार वाजले. अखेरीस सहाच्या सुमारास आम्ही मुळशीमध्ये पोचलो, तेव्हा नुकतीच गावाला जाग येऊ लागलेली. यापुढं पार माणगावपर्यंत कुठंही पेट्रोलपंप नसल्यानं असा एक निर्णय घेण्यात आला, की पुण्याकडं जाणारी पहिली एसटी येईपर्यंत किंवा पुण्याकडं जाणारी एखादी गाडी मिळेपर्यंत वाट बघायची आणि मी मुळशीतच थांबून विनयनं जवळच्या पंपावरून पेट्रोल घेऊन यायचं. हताश होऊन दोघंही एसटी थांब्याच्या शेडमध्ये जाऊन बसलो. काहीही सुचत नव्हतं. या नमनालाच इतकं घडाभर तेल गेलं होतं, की पुढच्या कीर्तनात काय घडणार आहे हे जाणून घ्यायचे त्राणही उरले नव्हते. त्या शेडमध्ये आमच्याबरोबर एसटीची वाट पाहत बसलेल्या एका म्हतारबाबांना मात्र आमची ही अवस्था लक्षात आली. कॉलेजवयीन दोन शहरी पोरं मधेच बाईक साईडला घेऊन इथं येऊन बसलेत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे त्यांनी अनुभवाअंती ताडलं.

‘काय झालं रं पोरांनो?’
आम्ही भानावर आलो. म्हतारबाबांचे डोळे आमच्या चेहेऱ्यावर उत्तर शोधत होते. शेवटी सगळी एनर्जी एकत्र करून मी घडलेलं सगळं रामायण त्यांना सांगितलं आणि परत ताम्हिणीतून येणाऱ्या रस्त्याकडं डोळे लावून बसलो. त्यांना काय दया आली माहिती नाही, पण त्यांनी अचानक माझा हात धरून मला उठवलं आणि त्या एसटी स्टॉपच्या शेडबाहेर आणलं आणि एका दोन मजली घराकडं अंगुलिनिर्देश केला...

‘त्या तिथं दुसऱ्या मजल्यावर जा. तो लाइट लागलाय ना तिथं. माझं नाव सांगा. त्यांच्याकडं कायम जादाचं पेट्रोल असतंय. अडीअडचणीला गाव त्यांच्याकडूनच पेट्रोल घेतंय. जा... व्हईल काम तुमचं. किमान माणगावात पोचाल एवढं पेट्रोल मिळालं तरी पुरेसं आहे.’

पाचव्या मिनिटाला मी त्या घराच्या दाराबाहेर उभा होतो. शनिवार असल्यानं नातवाची सकाळची शाळा म्हणून त्याच्या नावानं शंख करत एक आजी बाहेर आल्या. मी अगदी थोडक्‍यात पेट्रोल हवंय आणि कोकणात जायचंय हे सांगितल्यावर आजींनी त्या नातवाला पाच लिटरचा एक कॅन घेऊन माझ्याबरोबर पिटाळलं आणि त्या नातवानं जगातला सगळा निर्विकारभाव आणि दुर्मुखपणा चेहेऱ्यावर आणत बाईकच्या टाकीत भसाभसा पेट्रोल ओतलं आणि पैसे घेऊन निघून गेला! म्हातारबाबा अजूनही तिथंच होते. त्यांचे आभार कसे मानावेत तेच कळेना. समोर उघडलेल्या चहाच्या टपरीवर त्यांना चहा पाजला आणि त्यांचा निरोप घेतला.

मंडणगड व पालगड या दोन्ही किल्ल्यांवर गाडी जात असल्यानं आमच्या वेळापत्रकाच्या अगदीच आधी झालं. रसाळगडावर मुक्काम करण्याचा प्लॅन बाद करून चिपळूणच्या आसपास कुठंतरी मुक्काम करायचा निर्णय झाला. रसाळगड किल्ला मात्र कमालीचा देखणा असून वरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा अफाट आहे. महिपतगड आणि सुमारगड हे त्याचे अगदी सख्खे शेजारी. या त्रिकुटाचा रेंजट्रेक म्हणजे खरी पर्वणी! रसाळगडाची सोपी चढाई आणि वर असलेल्या तोफा, कोठार, झोलाई देवीचं नितांत सुंदर कौलारू आणि शांत मंदिर यामुळं या किल्ल्यानं मनात घर केलं आहे. मंडणगड-पालगड हे किल्ले तसे त्या मानानं दुर्लक्षित पण अतिशय अवशेषसंपन्न. पालगडच्या पायथ्याशी असणारं पालगडगाव हे तर साने गुरुजींचं जन्मस्थान असल्यानं या गावाला विशेष महत्त्व आहे. पालगडाच्या भेटीत साने गुरुजींचं गावातलं स्मारक नक्की बघावं.

परशुराम घाटातली संध्याकाळ अनुभवत आम्ही चिपळूणला उतरलो. उपलब्ध माहितीनुसार गोविंदगड किल्ल्याच्या पायथ्याच्या गोवळकोट गावात करंजेश्वरी देवीचं भव्य मंदिर असून त्या मंदिरात राहता येणार होतं. चिपळूणला एका चौकात गोवळकोट गावात जाणाऱ्या रस्त्याचा पत्ता विचारायला मी गाडी बाजूला घेतली. रस्त्याच्या कडेनं चाललेल्या त्या तिशीतल्या तरुणानं सगळ्यात पहिली नजर टाकली ती आमच्या कॅरीमॅट्‌सवर!

‘ट्रेकर दिसताय... कुठून आलात?’
‘पुण्याहून. गोविंदगड बघायचा आहे.’
‘मग राहण्याची सोय?’
‘बघू आता मिळेल तशी. काही नाही मिळालं, तर तशी पण वाट लागणार आहेच’
पुढच्या मिनिटाला त्यानं कोणाला तरी फोन फिरवला. 

‘अरे दिनेश, राहुल बोलतोय. ऐक ना, पुण्याहून माझे दोन मित्र आपला किल्ला बघायला आलेत. त्यांची जरा राहायची सोय कर. मी पत्ता देतोय त्यांना.’ इतकं बोलून त्यानं फोन ठेवला आणि आम्हाला भानावर आणलं! कोण कुठले आम्ही, ना त्याची आमची पूर्वीची ओळख. पण पुण्याहून दोन मुलं बाईकवरून खास किल्ले फिरत आपल्या गावात आले आहेत आणि आपल्या गावात असलेला किल्ला ते बघणार आहेत या निर्व्याज हेतूनं त्यानं गोवळकोट गावात असलेल्या त्याच्या मित्राला फोन करून आमची राहायची सोयपण केली. त्यानं स्वत:हून पुढं केलेला मदतीचा हात कोकणच्या साध्या आणि समुद्राइतक्‍याच अथांग मनाचं प्रतिबिंब आमच्या मनावर कायमचं कोरून गेला. गोवळकोट गावात करंजेश्वरी मंदिराच्या शेजारीच राहणाऱ्या त्याच्या दिनेश या मित्रानं आमचं जंगी स्वागत केलं आणि अवघ्या एक आठवड्यापूर्वी बांधलेला त्याचा नवा कोरा बंगला आम्हाला उघडून दिला!

‘राव्हा बिनधास्त इथं. पूर्ण बंगला आपलाच आहे. मागच्या आठवड्यातच बांधकाम पूर्ण झालं. सकाळी जाऊ आपण मस्त किल्ल्यावर. काही लागलं तर रात्री कधीही हाक मारा.’ असं म्हणून तो त्याच्या घरी निघून गेला. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडं बघतच बसलो. सकाळपासून चालू असलेली अतिशय नाट्यमय घटनांची मालिका आणि त्या अतिशय कळीच्या प्रसंगात धावून आलेले हे देवदूत... सकाळचे म्हातारबाबा आणि एका फोनवर आमची सरबराई करून देणारा तो अनामिक चिपळूणवासी मित्र! पुढचा आमचा सगळा ट्रेक सुफल संपूर्ण पार पडला ती गोष्ट वेगळी. पण आपल्या जगापलीकडंही एक अतिशय सुंदर जग वसलंय, ही जाणीव पुन्हा पुन्हा अनुभवावी अशीच आहे.

संबंधित बातम्या